पाऊस..

पाऊस पावसाच्या लयीत नेहमी बरसतो
जशी ज्याची दिठी तसा त्याला तो भासतो

कधी भर वैशाखात,  बहरलेल्या पारिजाताला विनवू पहातो
तर कधी प्राण कंठाशी आलेल्या चातकालाही            हुलकावणी देतो

पाऊस पावसाच्या लयीत नेहमी बरसतो..

कधी पुरणपोळी खाऊन सुस्तावलेल्या सज्जावर 
आपली रुणझुणती पावले उमटवतो
तर कधी झोपडीच्या गळक्या कौलांतुन आत येत
मिणमिणता संसार विझवतो

पाऊस पावसाच्या लयीत नेहमी बरसतो..

कधी एखाद्या नवतरुणीसम नाचरा, अवखळ होतो
तर कधी चीर दु:खासारखा केवळ कोसळत राहतो
कधी काव्यमय सृजनाचा जनक भासतो
तर कधी काळ होऊन जीविताचाच घास घेतो

पाऊस पावसाच्या लयीत नेहमी बरसतो..

तो कोपतही नाही आणि पावतही नाही
तो केवळ त्याच्या चक्रानुसार चालत राहतो
वारे कसे वाहतात यावर सारा आयाम त्याचा ठरतो
नशीबाला दोष देताना ‘कर्म’ आपण विसरुन जातो

पाऊस पावसाच्या लयीत नेहमी बरसतो
जशी ज्याची दिठी तसा त्याला तो भासतो..

~ संजीवनी


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट