गणेश चतुर्थी 2.O
आई अगं, माझ्या त्या matching earrings सापडत नाहीयेत, कुठे ठेवल्यास तू?”

स्वतःभोवती साडीचं वेटोळं करून घेऊन अनघा आईला विचारत होती.

खरंतर, गणेश चतुर्थीची सकाळ म्हणजे मालती ताईंना हुश्श!! म्हणायलाही फुरसत नसते. पण लेकीची धांदल पाहून, हातातलं काम बाजूला ठेऊन त्या बेडरूम कडे धावल्या..

“अगं ह्या काय इथेचं तर आहेत! आणि हे काय चक्क साडी वगैरे?”

“अगं आई, Its Ganesh Chaturthi you know! आपण आपल्या traditions जपल्या पाहिजेत. See, मी youtube वर पाहून साडी घालतेय!”

“साडी नेसत असतात गं अनघा, घालत नाहीत! इतकी वर्षं मागे लागावं लागायचं तुमच्या, तयार व्हा वेळेत म्हणून! आणि आता तू मला Traditions शिकव!”

पण काही का असेना या चांगल्या बदलाला Thumbs up देत मालती काकू त्यांच्या कामाला लागल्या. इतक्यात, दारावरची बेल वाजली.. गावाकडे असणार्‍या वसुधा आजी घाम पुसत आत आल्या. दरवर्षी न चुकता त्या गौरी गणपती साठी पुण्यात मोठ्या मुलाकडे येतात.

“काय प्रचंड रहदारी वाढलीये बुवा!”

वसुधा आजी पाण्याचा घोट घेत घेत म्हणाल्या. आजीचा आवाज ऐकून अनघा धावत बाहेर आली. आजीला घरात आणि अनघाला साडीत पाहून अनुक्रमे अनघा आणि आजी दोघींना मनापासून आनंद झाला. अनघाने आजीला मिठी मारली आणि लगेच आजीसोबत एक सेल्फी काढला. सेल्फी म्हणजेच आधुनिक नमस्कार हे आजीच्या लक्षात आलं.

“छान दिसतेयस हं अनघा साडीमध्ये!”

वसुधा आजी, नातीच कौतुक करू लागल्या. पण अनघा फोनवरुन बोटं फिरवण्यात गुंग होती. ताजा सेल्फी apt caption सहित whatsapp status through सगळीकडे झळकावण्याच्या ती तयारीत होती. थॅंक यू आजी असं काहीसं ती पुटपुटली.

इकडे मालती काकूंचे मोदक आणि इतर प्रसाद तयार करून झालं होतं. पूजेची तयारी होत आली होती. डेकोरशन तर काय आदल्या दिवशीच तयार होतं. मधुकर काका आणि मनीष वाजत गाजत बाप्पाला घेऊन दारात हजर झाले. मनीष तोंडाने, गणपती बाप्पा मोरया! म्हणत होता आणि हातातल्या फोन मधून बाप्पाचा ‘welcome home event’ फेसबूक वर लाईव्ह करत होता.

आजीने कुतुहलाने त्याला विचारलं, “काय रे, तू पण सेल्फी काढतोयस की काय बाप्पासोबत?”

मनीष म्हणाला, “नाही गं आजी, मी हे सगळं लाईव्ह करतोय FB वर, आपण लाईव्ह क्रिकेट मॅच पाहतो नं तसच आपलं हे Welcome Event माझ्या सगळ्या Fb फ्रेंडसना लाईव्ह दिसेल बघ आता!”

“अरे बापरे!! असं पण करता येतं का?” आजीला आश्चर्य वाटलं.

यथावकाश whatsapp, facebook, Instagram इ.इ. सगळ्यांच्या साक्षीने आणि मनीष, अनघाच्या commentary रूपी मंत्रोच्चारांसहित गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना झाली.

मालती काकू, मधुकर काका कौतुकाने आणि उत्साहाने मुलांकडे, बाप्पाकडे आणि त्यांच्या इव्हेंट कडे पाहत होते. मधूनच, आम्हालापण टॅग करा रे! असही म्हणत होते.

वसुधा आजींना पोरांचा उत्साह पाहून एकीकडे कौतुकही वाटत होतं आणि इव्हेंट रूपी traditions पाहून त्या विचारातही पडत होत्या. इतक्यात अनघाचा आवाज त्यांच्या कानांवर पडला,

अरे इकडे लाईट कमी पडतोय. थोड्या वेगळ्या अॅंगल ने काढ नं!”

अनघाचं insta story साठीचं फोटोशूट सुरू होतं आणि मनीष तिचा फोटोग्राफर झाला होता.

“अरे मुलांनो, आता बास करा की ते. या जरा बसा आपण गप्पा मारू!” वसुधा आजी म्हणल्या.

“हो आलोच गं आजी. झालच आहे आता.!”

अनघाने फोटोज ना ग्रीन सिग्नल दिला आणि दोघही हुश्श!! थकलो बुवा!” म्हणत आजीच्या मांडीवर डोकं ठेऊन आडवे झाले.

“मग, कशी झाली गणेश चतुर्थी म्हणजे तुमचा इव्हेंट का काय तो?” आजी दोघांच्याही डोक्यावरुन हात फिरवत विचारत होत्या.

“एकदम मस्त झाली आजी!” मनीष ने उत्तर दिलं.

“हो आजी! माला 200+ लाईक्स आलेयत आणि 100+ कम्मेंट्स! खूपच छान झाली बाप्पाची एन्ट्री” अनघाने जोड दिली.

“अरे वा! हो का! छान छान! पण मला सांगा, बाप्पा काय म्हणाला? त्याच्याशी बोललात की नाही?”

आजीने पुढे विचारलं. पण यावेळी दोघेही बुचकळ्यात पडले.

“काय गं आजी बाप्पा कुठे बोलतो का?” मनीष ने विचारलं.

“हो तर! तुम्ही प्रेमाने बोललात त्याच्याशी तर नक्कीच बोलतो. पण, मी पहातेय, तुम्ही त्याच्या सोबत फोटो काढण्यात आणि ते शेअर करण्यात इतके दंग आहात की दोन मिनिटं त्याच्याकडे शांतपणे पहायलाही वेळ नाहीये तुमच्याकडे!” आजी बोलत होत्या...

“अरे मुलांनो, आपल्या घरी एखादा पाहुणा आला तर आपण त्याला या, बसा म्हणतो, त्याच्याशी जिवाभावाच्या गप्पा मारतो, त्याला काय हवं-नको ते पाहतो, हो की नाही? पण आपण जर त्याला एका ठिकाणी बसवून ठेवून त्याच्यासोबत फोटो काढत आणि ते शेअर करत राहिलो, त्याच्याकडे धड पाहिलंही नाही, तर त्याला कसं वाटेल? मग बाप्पाही आज आपला पाहुणाच आहे की नाही?”

अनघा आणि मनीष दोघेही थोडेसे अंतर्मुख झाले. त्यांच्या लक्षात आलं, त्यांनी पूर्ण दिवस फोन मधेच घातला होता. सोशलायझिंगच्या नादात खरा सण एंजॉय करणं कुठेतरी बॅकसीट ला पडलं होतं. दोघांनीही आजीकडे पाहून नजरेनेचं चुकीची कबुली दिली.

वसुधा आजींना त्यांची मात्रा लागू झाल्याचा आनंद झाला. त्यांनी हळूच उठून सकाळपासून दुर्लक्षित राहिलेले मोदक घेतले आणि अनघा आणि मनीष दोघांनाही भरवले. आणि मग तिघांनी मिळून उरली-सुरली गनिश चतुर्थी बाप्पासोबत आनंदाने साजरी केली!

 

-    संजीवनी  


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट