प्रिय कविते..

प्रिय कविते,

काल तू अगदी ध्यानी-मनी नसताना,
मातीच्या सुगंधाने टच्च भरलेला, पाचूंनी मढलेला
‘पाऊस’ घेऊन माझ्या ऊन्हाळलेल्या मनात उमटलीस..
आणि त्या पावसात अजून मी नाहतेय तोवर,
आज खरा-खुरा थेंबांनी भरलेला पाऊस माझ्या दारात ऊभा.. या वर्षीचा पहिला!
याला टेलीपथी म्हणावं का?
योगायोग.. किंवा मग अजून काही?

खरंतर तू नक्की केंव्हा माझ्या आयुष्यात आलीस आठवत नाही..
पण आधीची बाळबोध मी,
जगाची खरी ओळख व्हायला लागल्यावर 
मनाला येणारे खरपूस, हसरे, नाचरे, भाजणारे असे सारे अनुभव तुला सांगायला लागले..
आणि तू ते कसलाही पूर्वग्रह  बाळगता आपलेसे केलेस..

तू माझ्या आनंदाला उत्फुल्ल बनवलंस
आणि वेदनेला लालित्य दिलंस
जेंव्हा कोणी नसतं तेंव्हा तू असतेस!
जगाला वेडगळ वाटू शकणारे माझे लहान-लहान आनंद, 
एकात एक विणून त्यातून अवीट गोडीचं
पोळं तयार केलंस तू.. माधुर्याचं पोळं!
आणि मी ते चाखत राहिले,
तान्हुल्यानं आईचं स्तन्य चोखावं तसं..

कधी मनातल्या किर्र अंधारात मी ठेचकाळत असता,
तू पणती होऊन आलीस आणि मग सुभग, सुंदर समईचं रुप धारण करून,
तुझ्या प्रकाशात मला न्हाऊ-माखू घातलंस..

तसं कधी-कधी तू हुलकावणीही देतेस..
कितीही विणवण्या केल्या तरी येत नाहीस!
आणि मग एखाद्या बेसावध क्षणी,
असा काही साक्षात्कार देऊन जातेस की तुझ्या त्या प्रत्ययाने मी स्तिमीत होऊन जाते..

आणि या साऱ्यामध्ये मी असते ती केवळ निमित्तमात्र!
जे काही करतेस ते तू..
जन्म मी तूला नाही तर तू मला देतेस.. 
दरवेळी नव-नवा!
मला समृद्ध करत जातेस..
माझ्या मनातला सगळा कोलाहल सुघड करुन माझ्याचं समोर मांडत जातेस..
मला  उमगलेल्या माझं, मला दर्शन घडवतेस!

आणि म्हणूनचं..
प्रिय कविते,
माझ्यामुळे तुला नाही
तर तुझ्यामुळे मला अस्तित्व आहे..
मी तुझी जन्म-जन्मांतरांची ऋणी आहे!!

~ संजीवनी

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट