विजिगीषा-३


भाग-३ 

       ठरल्याप्रमाणे पौर्णिमेदिवशी चालुक्य सम्राट आदित्येय नगरीत येऊन दाखल झाले. महाराज मणिचंद्र मोठ्या लवाजम्यासह त्यांना सामोरे गेले. चालुक्य सम्राटाचं अतिशय भव्य-दिव्य असं स्वागत करण्यात आलं! 

पितृछत्र अगदी तरुण वयात हरवलेले महाराज आदित्येय पराक्रमी तर होतेचं पण एक सुसंस्कृत आणि संवेदनशील राजे अशीही त्यांची ख्याती होती. लहान वयात मोठ्या जबाबदाऱ्या त्यांच्या अंगावर येऊन पडल्या होत्या. वडील निवर्तल्यावर राज्याची घडी विस्कळीत न होऊ देता कारभारावर आणि राज्यावर घट्ट पकड ठेवण्याच्या यशस्वी प्रयत्नांमध्ये, स्वत:च्या खासगी आयुष्याकडे लक्ष देण्यास त्यांना अवकाशच मिळाला नव्हता. पण आता जेंव्हा त्यांच्या पराक्रमापुढे मान तुकवून सेवण राजाने आपल्या राजकुमारीशी विवाहाचा प्रस्ताव आदित्येयांपुढे ठेवला तेंव्हा तो प्रस्ताव त्यांनी आनंदाने स्वीकारला, राजकुमारी वरदायिनीची ख्याती त्यांनी ऐकलेलीचं होती.. तिला भेटायची त्यांना उत्सुकताही होती. 

इकडे वरदायिनी मात्र वेगळ्याच कामांमध्ये व्यस्त होती. महाराज आदित्येय काळे कि गोरे हे पाहण्यातही तिला रुची नव्हती! ती पेटून उठली होती. आपल्या सभोवतीचं जग जेव्हा कुठल्या न कुठल्या कारणाने सतत आपल्या क्षमतांकडे दुर्लक्ष करत आपल्या संधी नाकारत जातं, तेव्हा आपण दुप्पट आवेशाने  सर्व शक्ती पणाला लावत आपलं अस्तित्व सिद्ध करण्याचे प्रयत्न करत जातो तशी!  तिची अस्मिता तिच्यासाठी सगळ्यात वर होती आणि ते योग्यही होतं! त्यामुळेचं चतुराई, धाडस आणि पराक्रम या तिन्हींचा योग साधत ती, तिला कमी लेखणाऱ्या त्या पूर्ण व्यवस्थे विरुद्ध दंड थोपटून उभी राहणार होती..  समोर कोण उभं आहे हे तिच्यासाठी महत्वाचं नव्हतंच! ती लढत होती ते तिच्या न्याय्य हक्कांसाठी!

महाराज आदित्येय नगरात दाखल झाल्यावर वरदायिनी वरची बंधनं अजून वाढली. तिला आता तिच्या कक्षातून बाहेर पडण्याचीही बंदी करण्यात आली. पण त्यामुळे राजकुमारीचं तसं काहीही अडणार नव्हतं, तिचे सारे व्यवहार पूर्ववत चालू होते! अतिशय दूरदर्शी असलेल्या वरदायिनीने संकटकाळात उपयोगी पडेल म्हणून २-३ वर्षांपूर्वीचं महालातल्या तिच्या कक्षातून, थेट वनातल्या शिवमंदिरात पोचणारं भुयार तयार करून घेतलं होतं , त्यासाठी या कामात कुशल असणारे कामगार तिने थेट नर्मदेपलीकडच्या प्रदेशातून बोलावून घेतले होते. आणि त्या भुयार मार्गाची कल्पना तिच्या व्यतिरिक्त केवळ आणखी दोघांनाच होती, एक म्हणजे कविराज नीलवदन आणि दुसरे वरदायिनीच्या विश्वासातले सेनापती वीरदमन! या तिघांव्यतिरिक्त ही गोष्ट अन्य कोणालाही ज्ञात नव्हती! दरबारातल्या मुत्सद्दी मंत्रिगणांना काहीही वाटत असलं तरी वरदायिनी त्या सार्यांना पुरून उरणारी होती! ती आता केवळ योग्य संधीची वाट पाहत होती. आणि ती तिला लवकरच मिळाली!

महाराज आदित्येय अभिरुची संपन्न होते. त्यांनी राजकवी आणि राजगायकाला भेटण्याची इच्छा दर्शवली. आणि ही अशी चालून आलेली संधी राजकवी नीलवदन यांनी दवडणे शक्यच नव्हते. त्यांनी त्यांच्या प्रतिभेने आदित्येयाना मोहित केलं. आणि बराच वेळ त्यांच्यासमवेत घालवून मिळालेला सारा वृत्तांत ते रात्री मंदिरात येऊन वरदायिनी ला देऊ लागले. वरदायिनी  रात्रीच्या वेळी भुयारातून मंदिरात येऊन तिच्या माणसांना भेटायची आणि पुढच्या योजना आखून आदेश द्यायची. तिने आदित्येयांची, त्यांच्या सैन्याची, चालुक्य राजधानीची सर्व माहिती गोळा केली होती. आणि त्याप्रमाणे तिची योजनाही आता तयार होती. महाराज आदित्येय इकडे येताना जवळपास त्यांच्या एकूण सैन्याच्या पाऊण प्रतिशत सैन्य घेऊन सेवण राज्यात आलेले होते. त्यामुळे आता चालुक्य राजधानीत केवळ एक चतुर्थ सैन्य उपस्थित होते. याचा अचूक फायदा घेत वरदायिनीने तिच्या खाजगी आणि गुप्त दोन्ही सैन्य दलांना सेनापती वीरदमन यांच्या नेतृत्वाखाली गुप्तरित्या आणि भिन्न मार्गाने चालुक्य राजधानीकडे केंव्हाच रवाना केलं होतं. आता फक्त महाराज आदित्येयांशी सामना होणं बाकी होत. कवी नीलवदन कडून आलेला सारा वृत्तांत ऐकल्यावर तिने तिची योजना सार्यांना सांगितली..  आणि सर्व नियोजन मार्गी लावल्यावर रात्री उशिरा ती महालात परतली. उद्याचा दिवस सगळ्यांसाठीच खूप महत्वाचा असणार होता!

..... 

प्रोफेसर खांडेकरांनी त्यांचा वट वापरून पुरातत्व खात्याकडून मंदिरातल्या त्या भुयार सदृश्य जागेत खोदकामाची परवानगी मिळवली आणि लगोलग कामाला सुरुवात देखील झाली. दोन दिवसांसाठी म्हणून आलेल्या मनवाने तिचा मुक्काम आणखी चार दिवस वाढवला! आईने थोडेसे आढेवेढे घेतले पण मग नंतर ती काही म्हणाली नाही. वरवर जरी मनवाने स्वतःला त्या कामात गाढून घेतलेलं असलं तरी आतून मात्र तिला सारखं जाणवत होतं, ती इथे आल्यापासून रोहन ने एक साधा फोनही तिला केलेला नव्हता. आल्या आल्या तिनेच त्याला पोचल्याचा मेसेज पाठवला होता आणि त्यावर त्याचा  'K ' असा आलेला रिप्लाय.. एवढंच काय ते त्यांचं संभाषण! एकेकाळचं एक अतिशय सुंदर नातं आणि त्याची आज झालेली हि अवस्था मन हेलावणारी होती! क्षणभरासाठी तिला वाटलं देखील, आपलं काही चुकत तर नाहीये नं .. पण मग दुसऱ्या मनाने तो विचार लगेच झटकला. तिला त्या विचाराचाच राग आला.. आपलं स्वतःची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी धडपडणं, स्वतःची पॅशन जपणं किंवा अगदी सोप्या  शब्दात सांगायचं तर स्वतःच्या आयुष्यात आपल्या स्वतःला फस्ट प्रायॉरिटी देणं या गोष्टीचं आपल्याला गिल्ट यावं? आणि तेही केवळ रोहन तसं म्हणाला म्हणून?? 

मनवाला तिच्यासमोरची धुरकट वाट थोडीशी स्पष्ट होत असलेली जाणवली!

मंदिरातलं खोदकाम जोरात चालू होतं, प्रोफेसर खांडेकर स्वतः जातीने यात लक्ष घालत होते. मनवा तर होतीच अव्याहत तिथे, प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करत! साधारण ५-६ फूट खाली खोदल्यावर आता अगदी स्पष्ट झालं  होतं कि तिथे नक्की भुयार च आहे.. पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यादिवशी खालच्या मातीच्या ढिगाऱ्याचा अभ्यास करताना मनवाला त्यात  अर्धवट तुटलेल्या अवस्थेत असलेलं एक ताम्रपत्र सापडलं! आणि तो एक निर्णायक क्षण होता. त्याक्षणी जरी त्याच्यावरचं काही वाचता येण्यासारखं नसलं तरी त्यावर प्रक्रिया करून मजकूर शोधणं, तिच्या क्षेत्रातल्या लोकांसाठी काही अवघड काम नव्हतं. तिने लगेचं ते पुढच्या प्रक्रियेसाठी पुण्याला पाठवलं आणि १-२ दिवसांनी तीही पुण्याला परतली!

...... 

कवी नीलवदन दुसऱ्या दिवशी सकाळी महाराज आदित्येयांकडे गेले, त्यांना पाहून आनंदित होत महाराज म्हणाले,

'या कविराज या! आम्ही तुमचाच विचार करत होतो. तुमच्या काव्याने आम्ही मोहित झालो आहोत.. बोला! आज सकाळीच येणं  केलंत?'

त्यावर कविराज म्हणाले,

'धन्यवाद महाराज! तुम्हाला इथलं शिवमंदिर दाखवण्याची मनीषा होती. अतिशय सुरेख मंदिर आहे, तुम्हाला अवश्य आवडेल! तुमची इच्छा असल्यास  तिकडे  जाण्याची मी व्यवस्था करतो!'

कविराजांच्या या अगत्याला प्रतिसाद देत आदित्येय म्हणाले,

'अवश्य! जाऊ आपण. '

राजकवी नीलवदन नी त्यांचं काम चोख केलं!

पण याची वार्ता महामात्यांपर्यंत पोचली. सावधगिरी चा पवित्रा घेत तेही मग त्या दोघांसोबत मंदिराकडे निघाले. सूर्यास्ताच्या दोन घटका आधी, ठरलेल्या वेळेला कवी नीलवदन महाराज आदित्येय आणि महामात्यांसह मंदिरात पोचले!

मंदिराच्या गर्भगृहात राजकुमारी वरदायिनी शुभ्र पुरुषी वेश परिधान करुन, शिवलिंगासमोर ध्यानमुद्रेत बसली होती! तिचे काजळी लांबसडक केश आज मोकळे नव्हते, ललाटी एक चंद्रकोर सोडली तर बाकी काहीही आज रोजच्या सारखं नव्हतं. तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं आरस्पानी तेज उतरलं होत आणि त्या तेजवलयामुळे ती अधिकच प्रखर आणि राजस दिसत होती. 

महाराज आदित्येयानी मंदिरात प्रवेश केला.. त्यांच्या मागोमाग महामात्यही आत आले. कविराज नीलवदन मात्र सभामंडपाच्या दाराशीच उभे राहिले. 

आत येताच त्या शुभ्र पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून क्षणभर ते दोघेही थबकले. पुढे होत महामात्यानी विचारलं,

'कोण आहे तिकडे? महाराज आदित्येयांसमोर अभिवादन न करता बसून राहण्याचं हे धाडस कोणाचं?'

त्यांच्या बोलण्याकडे पुन्हा संपूर्ण दुर्लक्ष करत वरदायिनी तशीच बसून राहिली. महामात्य आता चिडून पुढे सरसावणार इतक्यात, महाराज आदित्येयानी त्यांना थांबवलं, आणि ते  स्वतः गर्भगृहाकडे निघाले.. ते गर्भगृहाच्या दारात पोचलेले असताना, वरदायिनी उठली आणि वळून आदित्येयासमोर उभी राहिली. ते क्षणभर तिच्याकडे पाहतच राहिले तिच्या त्या भेदक नजरेने त्यांना प्रभावित केलं.. 

राजकुमारीला पाहून महामात्य विस्मयीत आणि भयभीत झाले.. त्यांना कळेना, आपण केलेल्या इतक्या कडेकोट बंदोबस्तातून निसटून वरदायिनी इथे पोचलीच कशी!

..... 

पुण्यात आल्यावर प्रथम मनवाने त्या ताम्रपटाचा पाठपुरावा केला, त्यासंदर्भात बऱ्याच तज्ज्ञांना ती भेटली. अभ्यासा अंती त्यावरचा मजकूर वाचण्यात त्यांना यश आलं. त्यावरचे दोन उल्लेख अगदी स्पष्ट होते.. एक म्हणजे चालुक्यधीश आदित्येयांचा उल्लेख आणि दुसरा उल्लेख होता, 'राणी वरदायिनीचा'. मनवाला तिचं कोडं सुटत असल्यासारखं वाटलं. पूर्ण मजकुराचा अर्थ लावण्याचं काम अजून चालू होतं. मधल्या काळात कार्बन डेटिंगचे रिपोर्टही आलेले होते, त्यावरून ते भुयार तरी इसवी सनाच्या नवव्या शतकात खोदलेलं होतं याचा उलगडा सर्वाना झाला. आता मनवा प्राच्यविद्या संस्थेतल्या मोठ्या लायब्ररीमध्ये येऊन चालुक्यधीश आदित्येय आणि राणी वरदायिनी विषयीचे संदर्भ गोळा करण्याच्या कामाला लागली. आणि त्या दिवशी अशीच पुस्तकांमध्ये गढलेली असताना तिचा फोन वाजला.. स्क्रीनवर नाव होतं रोहनचं.. 

..... 

'आपला परिचय?'  

आदित्येय वरदायिनीला विचारत होते. त्यांनी तिच्याविषयी आजवर ऐकलेलं जरी असलं तरी प्रत्यक्षात अजून पाहिलेलं नव्हतं. 

त्यांच्या त्या प्रश्नाला तिच्या तीक्ष्ण नजरेने उत्तर देत वरदायिनी म्हणाली,

'जिच्याशी विवाह करण्यासाठी जिच्या संमतीशिवाय आपण इथे आला आहात..  राजकीय पटावरची जी केवळ एक देव-घेवीची वस्तू गणली गेली आहे.. आणि राज्याच्या तथाकथित हितासाठी जिला 'देऊन' टाकण्यात या सेवण राजदरबाराला आणि उपहार स्वीकारावा तसं तिला स्वीकारण्यात तुम्हाला, पराक्रम वाटतो आहे ती.. राजकुमारी वरदायिनी!'

तिच्या या उत्तराने स्तिमित होत आदित्येय तिच्याकडे पाहत राहिले.. 

परिस्थिती हाताबाहेर जातेय हे लक्षात येऊन सारवासारव करण्यासाठी महामात्य पुढे झाले, ते काही म्हणणार इतक्यात, राजकुमारी वरदायिनीची जळजळीत नजर त्यांच्यावर पडली, त्यांना उद्देशून ती गरजली,

'सांभाळून महामात्य! सेवण देशाच्या भावी राणीवर सैनिकांकरवी पळत ठेवण्याचा अपराध तुम्ही केलेला आहे. याची शिक्षा तुम्हाला ज्ञात असेलंच! ती आत्ता इथे अमलात आणण्यास भाग पाडू नका आम्हाला!'

तिच्या त्या शब्दांनी महामात्य चांगलेच चरकले. 

या सगळ्या प्रकाराने विस्मयीत होऊन, महाराज आदित्येय म्हणाले,

'हा काय प्रकार आहे राजकुमारी!'

त्यावर तिच्या जवळची तलवार त्यांना देत वरदायिनी म्हणाली,

'हा प्रकार काय आहे ते तुमच्या लक्षात यायला हव होतं एव्हाना.. राजकुमारी वरदायिनीला जिंकणं इतकं सोपं नाही चालुक्यधिराज! मी तुम्हाला द्वंद्व युद्धाचं निमंत्रण देतेय.. माझ्याशी विवाहाची स्वप्नं रंगवण्या आधी आत्ता ह्या क्षणी इथे या पाषाणावर, मला हरवून दाखवा! मी हरले तर त्याक्षणी माझा प्राण त्यागेन आणि जिंकले तर सेवण राजसिंहासनावर माझा राज्याभिषेक करूनच तुम्ही तुमच्या राज्यात परताल!'

'आणि आम्ही यास नकार दिला तर?' महाराज आदित्येय उत्तरले. 

'तुमच्याकडे दुसरा पर्यायच नाही! इथून राजदरबारापर्यंत आमचे सैनिक जागोजागी उभे आहेत! आणि शिवाय आमच्या सेनापतींनी तुमच्या राजधानीला एव्हाना वेढाही दिलेला असेल!'

राजकुमारीच्या उत्तराने आदित्येय चांगलेच स्तिमित झाले. क्षणभर वारदयिनीच्या चातुर्याने आणि धाडसाने ते प्रभावितही झाले. तिच्या पराक्रमाचं दर्शन मात्र त्यांना अजून व्हायचं होतं.   

आदित्येयानी राजकुमारींचं आव्हान स्वीकारलं.. आणि दोघेही सभामंडपाच्या बाहेर पाषाणावर पश्चिमेला कललेल्या सूर्याच्या साक्षीने एकमेकांसमोर तळपत्या तलवारी घेऊन उभे राहिले!

.... 

थोड्याशा नाराजीनेच मनवाने रोहनचा फोन घेतला तर तो उत्साहाने बोलत होता,

'congratulations मनवा! आज पेपर मध्ये तुझं नाव वाचलं. त्या मंदिरात सापडलेल्या पुरातन गोष्टींविषयी छापून आलंय आज. तू त्यात महत्वाची भूमिका पार पाडलीस असंही  लिहीलंय त्यात! आई-पपा पण कौतुक करत होते तुझं.'

त्याच्या त्या बोलण्याचं आश्चर्य वाटून मनवा किंचित उपहासाने म्हणाली,

'ओह इज  इट! कालपर्यंत तर तुला हे सगळे भिकेचे डोहाळे वाटत होते नं रोहन!'

'सोड नं आता मनवा! मला सांग आपण भेटूया का आज?' रोहन म्हणाला. 

'हो भेटावं तर लागेलच. भेटू आपण. पण उद्या! आज मला थोडंसं काम आहे.' मनवा उत्तरली. 

त्यावर 'ठीक आहे' म्हणून रोहन ने फोन ठेवला. 

मनवाला त्याच्या बोलण्याचं आश्चर्य वाटण्यापेक्षा खेद अधिक वाटू लागला. इतके दिवस मी काय करतेय याची त्याला दाखल घ्यावीशी वाटली नाही आणि आता पेपर मध्ये नाव वाचून हा माझं अभिनंदन करतोय. तिला त्याच्या वागण्यात खूप विरोधाभास जाणवला. हे सारे विचार बाजूला सारत ती पुन्हा पुस्तकांमध्ये गढून गेली. आणि जवळपास अर्धी लायब्ररी पालथी घातल्यावर एका अतिशय जुन्या आणि दुर्मिळ चालुक्य कालीन ग्रंथामध्ये तिला त्या दोघांचा उल्लेख सापडला.. ती आनंदातिशयाने फुलून गेली!

.... 

महाराज आदित्येयाना राजकुमारीशी द्वंद्वयुद्ध करणं म्हणजे त्यांच्या डाव्या हाताचा मळ वाटत होतं. त्यांनी तलवार उचलली आणि सिद्ध अवस्थेत वरदायिनी समोर येऊन ते उभे ठाकले. वरदायिनी ने त्यांच्याकडे रोखून पाहिलं, दोघांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि आदित्येयाना समजायच्या आत वरदायिनीची तलवार अतिशय चपळाईने त्यांच्या मानेजवळ येऊन पोचली. तिच्या त्या कौशल्याने चकित होऊन आदित्येयानी तितकंच चपळ प्रत्युत्तर तिला दिलं पण त्यांच्या चांगलंच लक्षात आलं की हे द्वंद्व अटीतटीचं होणार! आणि मग जवळजवळ तासभर दोघांच्या प्रखर तलवारींचा टणत्कार परिसरात घुमत राहिला.. कविराज नीलवदन आणि महामात्य डोळ्यात प्राण आणून ते युद्ध पाहत होते. 

महाराज आदित्येय अतिशय पराक्रमी होते त्यांना रणांगणात धूळ चारणं सोपं काम नव्हतं पण वरदायिनी आज अभूतपूर्व तेजाने तळपत होती, तिला हरवणं साक्षात तिच्या देवालाही कठीण वाटावं इतकी! तिची काटक शरीरयष्टी आणि दुर्दम्य इच्छाशक्ती तिला थकू देत नव्हती. पण तिच्या तलवारीच्या चपळ वारांनी  महाराज आदित्येय मात्र थकू लागले.. आणि हीच संधी साधत वरदायिनीने एक निर्णायक वार केला, तशी महाराज आदित्येयांची तलवार दहा फूट दूर जाऊन पडली, आणि ते स्वतः तोल जाऊन खालच्या पाषाणावर कोसळले. महाराज आता हरणार हे लक्षात येऊन महामात्य धावत जाऊन वरदायिनीला मागून विचलित करायला धावले.. खाली कोसळलेल्या महाराजांच्या मानेवर रोखण्यासाठी वरदायिनीने तलवार उचलली तसं तिला मागून धावत येणाऱ्या महामात्यांची सावली दिसली आणि तिचा वेध घेत तिने तिच तलवार विरुद्ध दिशेने तत्क्षणी जोरात फिरवली आणि चर्रर्र आवाज करत महामात्यांचं शीर क्षणार्धात धडावेगळं होऊन सूर्यमंदिरासमोर जाऊन पडलं, आणि त्यांचा थरथरणारा देह रक्ताच्या थारोळ्यात खाली पाषाणावर कोसळला..  मंदिराला रक्ताभिषेक घडला!

वरदायिनीने क्षणात मागे वळून, सावरण्याच्या तयारीत असलेल्या आदित्येयांच्या मानेवर तिची रक्ताने माखलेली तलवार धरली.. मावळतीची किरणं अंगावर पडून वरदायिनी अधिकच उजळून निघत होती.. तिचं ते रूप पाहून आदित्येयानी तिच्यासमोर हात जोडून स्वतःचा पराभव पत्करला! 

आणि हे सर्व याची देही याची डोळा पाहत असलेल्या कविराजांच्या तोंडातून नकळत पुन्हा त्याच काव्यपंक्ती बाहेर पडल्या.. 

पलाश रंगीपाषाण शयनी

गर्भनाळेतुनी आवतरली  मृगनयनी ।

रक्ताभिषेक शिवसूर्यचरणीं

सुभग शुचित मंगल ही वरदायिनी ।।


आणि मग मानाने वरदायिनीने नगरात प्रवेश केला. यथावकाश तिचा राज्याभिषेक पार पडला. प्रजाजनांनी आनंदाने जल्लोष केला. राज्याभिषेकानंतर महाराज आदित्येय जायला निघाले तेव्हा वरदायिनीने त्यांचा यथायोग्य सन्मान केला. त्यांनीही तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.. आणि हो, त्यांनी पुन्हा एकदा तिच्यासमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला.. तिच्या सगळ्या अटी मान्य करून! अगदी ते त्यांच्या राज्यात आणि वरदायिनी तिच्या राज्यात राहून संसार करण्याची तयारीही त्यांनी दाखवली.. पण आता निर्णय राणी वरदायिनी घेणार होती, स्वतःच्या मर्जीने!

.......


 त्या जुन्या ग्रंथात मनवाला महाराज आदित्येय आणि राणी वरदायिनीच्या विवाहाचे उल्लेख आढळले, आणि कवी नीलवदन ने त्या दोघांवर केलेलं काव्यही सापडलं. राणी वरदायिनीची ती गोष्ट वाचून मनवा भारावून गेली.. त्या प्राचीन विजिगीषू राणीचा पराक्रम पाहून कुठेतरी मनवाला तिच्या आतली विजीगिषाही जागृत होत असलेली जाणवली..


आणि मग दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे, ती रोहनला भेटायला आली. 

ती आल्या आल्या रोहन तिला साॅरी म्हणाला. 


पण त्याला पुढे काहीही बोलू न देता ती शांतपणे म्हणाली,


'रोहन, मी खूप विचार केला! तू त्यादिवशी मला म्हणाला होतास नं, तुला नक्की काय हवंय ते आधी ठरव म्हणून! पण मग माझ्या लक्षात आलं, मला काय हवंय ते माझं खूप आधीपासूनचं ठरलेलं आहे! मला इंडोलाॅजीस्ट व्हायचंय हे मी वयाच्या सोळाव्या वर्षीचं ठरवलं होतं. तुला ते माहितही होतं. मग तुला आत्ताचं या सगळ्याचा त्रास का व्हावा? 

कारण रोहन तू बदललायस.. तुझं विश्व बदलत चाललंय.. आणि त्यामुळे तू मलाही बदलू पाहतोयस! पण ते शक्य नाहीये.. मी केवळ तुला आज वाटतंय म्हणून स्वत:ला बदलू शकत नाही आणि बदलणारही नाही! काय माहीत उद्या तुला आणखी वेगळं काहीतरी वाटेल.. मी माझं आयुष्य असं तुझ्या आवडी-निवडी आणि मूड्स वर अवलंबून ठेवू इच्छित नाही! 

तुझ्या त्या चकचकीत आयुष्याचा मला पूर्वीही मोह नव्हता आणि आताही नाहीये. त्यामुळे त्यात स्वत:ला फिट बसवण्याचा व्यर्थ आणि मूर्ख प्रयत्न मी कधीही करणार नाही!

माझं ठरलेलं आहे, मला माझं पॅशन आणि माझा पूर्वीचा रोहन दोन्ही हवे आहात. मी होते तिथेचं आहे! गोंधळ तुझा झालाय अरे.. तुला कळत नाहीये तुला नक्की काय हवंय ते.. सो ते आधी मनाशी पक्कं कर आणि मग नंतर आपण या विषयावर बोलू!’


तिच्यातल्या  त्या नव्याने डोकावणाऱ्या आत्मविश्वासाकडे रोहन चकित होऊन पाहतचं राहिला..


पुढे मग मनवाचा तो प्रोजेक्ट तर उत्तम झालाच पण नंतर तिने चालुक्य-सेवण संबंधांवर आणि त्या मंदिरावर एक पेपर सुद्धा लिहिला जो तिच्या क्षेत्रात पुढे खूप नावाजला गेला!~ संजीवनी
टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट