करोनाष्टके - १


सम्या आणि सुमी खूप आनंदात असतात.

(सुमी तिच्या ऑफिसात आणि

सम्या त्याच्या ऑफिसात..)

आणि मग एके दिवशी त्यांच्या शहरात कोरोना येतो

शहर लॉकडाऊन होतं.

दोघांचही वर्क फ्रॉम होम सुरू होतं.

आता सम्या आणि सुमी दोघही घरीचं असतात!

एरवी त्यांना सकाळी तासभर आणि रात्रीही तासभर एवढाच वेळ एकमेकांचे चेहरे पाहण्याची सवय असते.

पण आता ते दिवसभर पहावे लागणार असतात.

सम्याला पहिल्यांदाच सुमीच्या चेहर्‍यावर पाच पिंपल्स आहेत हे समजतं.

आणि सुमीच्या लक्षात येतं की डोक्यावर भोवर्‍याच्या जागी पडलेल टक्कल लपवण्यासाठी सम्या पुढचे केस हल्ली कमी कापतो आणि मग ते वळऊन मागे घेऊन ते टक्कल झाकतो.

खूप दिवसांनी असा वेळ मिळाल्यामुळे आपण किती आनंदात आहोत हे दाखवणं काही दिवसांनी दोघांनाही जड जाऊ लागतं

आणि मग दोघही तो नाद सोडून देतात.

आधी आनंदाने दोघांत वाटून घेतलेली कामं (जी करतानाचे फोटो काढून सोशल मीडियावर भरपूर मिरवलेलं असतं),

त्यांचा दोघांनाही आता कंटाळा येऊ लागतो, आणि मनातल्या मनात ते रोज त्यांच्या मोलकरणीची पूजा बांधत असतात.

सुमीची, साडी.. नथ.. इ.इ. चॅलेंजेस पण आता संपत आलेली असतात.

एकंदरीत लॉकडाउनचं नवेपण संपलेलं असतं.

मग हळूहळू,

वीकएंड आणि हॉलिडे कल्चर मधून बाहेर येऊन,

चारचा चहा घेणे किंवा सकाळच्या उरलेल्या आमटीवर रात्रीचं उदरभरण करणे वगैरे गोष्टी म्हणजे खरं सुख हे त्यांना कळायला लागतं.

आणि मग एखाद्या कर्मयोग्याप्रमाणे,

सहजीवन ही गोष्ट नक्की कशाशी खातात हे मांडीवरच्या लॅपटॉप ची जागा हातातल्या झाडू आणि लाटण्याने घेतल्यावर त्यांना समजायला लागते..!


टिप्पण्या

अनामित म्हणाले…
सहजीवन’ ही गोष्ट खरेच लाॅकडाऊन मध्ये समजली हा हा हा..

लोकप्रिय पोस्ट