वार्धक्य

सकाळी सकाळी मालती ताई उठल्या तेव्हा मुख्य दार उघडं पाहून थोड्याशा थबकल्या.. आत जाऊन पाहतात तो मनोहर आजोबा घरात नसल्याचं त्यांना जाणवलं. माॅर्निंग वाॅकला गेले असतील असं म्हणून त्या त्यांच्या कामाला लागल्या. वसुधा आजी मोठ्या मुलाकडे परगावी गेल्या होत्या त्यामुळे घरात सध्या फक्त मालती ताई, महेश दादा आणि मनोहर आजोबा तिघेच होते. पारोसं काम उरकून मालती ताई आता नाश्त्याच्या तयारीला लागल्या होत्या. तास दोन तास उलटून गेले तरी आजोबा परतले नाहीत म्हणून मालती-महेश दोघेही काळजीत पडले. गावातल्या ओळखीच्या लोकांकडे फोनाफोनी सुरू झाली पण कुठेच त्यांचा ठाव लागेना. ८५ वर्षांचे आजोबा अचानक घरातून गायब झाले होते.. महेश रावांनी दोन्ही भावांना फोन करुन विचारलं, ते तिकडेही गेले नव्हते. तिघांनी मिळून सर्व नातेवाइकांना फोन करून चौकशी सुरू केली पण आजोबांचा थांगपत्ता काही लागेना. शरीराने बरे असले तरी ते आता थकले होते आणि त्यांना आताशा ऐकायलाही कमी येऊ लागलं होतं.. त्यामुळेच त्यांच्या अशा एकाएकी गायब होण्याने सगळेच एकदम चिंतातूर झाले होते. मनोहर आजोबा पेशाने डाॅक्टर. हैदराबाद च्या प्रसिद्ध उस्मानिया विद्यापीठातून स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या काही वर्षात डाॅक्टर झालेले. पण त्यांनी हैदराबाद मध्ये प्रॅक्टीस न करता मराठवाड्यातल्या आपल्या छोट्याशा गावी येऊन प्रॅक्टिस करण्याचा निर्णय घेतला आणि आयुष्यभर प्रसंगी गावोगावी स्वखर्चाने फिरून त्यांनी रुग्णसेवा केली. पेशंटची आईप्रमाणे काळजी घेणारा डाॅक्टर म्हणून आजही त्यांची ख्याती आहे. रुग्णसेवा, प्रवास, राजकारण आणि क्रिकेट हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय. पुढे वय वाढत गेलं तशी सार्वजनिक आयुष्यावर बंधनं येत गेली. प्रॅक्टिस बंद झाली. शरीर थकु लागलं. आयुष्यभर स्वत:च्या मनाप्रमाणे वागणारा माणूस पिंजऱ्यात अडकल्या सारखा झाला. मुलांचाही नाईलाज होता. वय झालेलं त्यात ऐकायला नीट येत नाही म्हटल्यावर त्यांना जपणं मुलांना भाग होतं आता दूपार झाली होती.. महेशरावांनी गावातल्या बस स्टॅंडवर चौकशी केली, आजोबा पहाटे घराबाहेर पडले होते म्हणून त्यांनी तालुक्याकडे जाणाऱ्या पहाटेच्या गाडीचा आणि तिच्या कंडक्टरचाही मोबाईल नंबर शोधला त्याला फोन केल्यावर त्या कंडक्टरने आजोबांच्या वर्णणाशी मिळता-जुळता एक इसम पहाटेच्या गाडीत होता असं सांगितलं.. जवळ एक छोटी बॅग होती आणि छान गप्पाही मारत होते, कुठल्यातरी मित्राला भेटायला सोलापूरला निघालोय असंही म्हटल्याचं त्या कंडक्टरने महेश रावांना सांगितलं.. एव्हाना आजोबांची दुसरी दोन मुलंही गावाकडे येऊन पोचली होती. वेळ न दवडता तिघांनी मिळून सोलापूरला जायचा निर्णय घेतला. तिघेही सोलापूरला जायला निघाले होते, थोडंसंच अंतर गेले असतील की महेश रावांचा मोबाईल वाजला, नंबर अनोळखी होता, त्यांनी फोन उचलला, "नमस्कार, कृपया तुमचे मेसेजेस चेक करा " इतकचं बोलून पलिकडून फोन कट झाला. महेशराव बुचकळ्यात पडले, त्यांनी लगेच फोन चेक केला, आणि तो प्रदीर्घ मेसेज पाहून अचंबीत झाले. भरल्या अंत:करणाने त्यांनी तो मेसेज भावांना वाचून दाखवण्यास सुरूवात केली, "प्रिय मुलांनो, मी तुमचा बाबा बोलतोय. प्रथमत: सकाळपासनं माझ्यामुळे तुम्हाला जो काही त्रास सहन करावा लागला त्याबद्दल क्षमस्व! मी सुखरुप आहे. माझ्या काॅलेज मधल्या जीवश्च कंठश्च मित्राच्या घरी बसून जुन्या आठवणी तोंडी लावत त्याच्याकडून यथेच्छ पाहुणचार करुन घेतोय. आणि त्याचा नातू आमच्या समोर बसून त्याच्या स्मार्ट फोनवर (जो वापरणं मला काही केल्या जमत नाही) माझं हे तुमच्यासाठीचं पत्र टाईप करतोय. पोरांनो महिन्या-दोन महिन्यांपासून मनात घोळत होतं प्रभाकरला येऊन भेटावं. चार महिन्यांपूर्वी दिनकर गेल्याचं पत्र मिळालं आणि मी अस्वस्थ झालो. शेवटची भेटही न घेता जवळपास सारे जीवलग देवाघरी चालले होते. आता फक्त मी आणि प्रभाकर उरलो.. दोघांचं काही बरं-वाईट व्हायच्या आत एकमेकांना भेटावंसं वाटत होतं. पण आम्ही पडलो परावलंबी! तुम्हा तिघांनाही वेगवेगळ्या तऱ्हांनी विचारुन पाहिलं पण तुम्ही काही गांभीर्याने घेतलं नाही. जुना ५० वर्षांपूर्वीचा मित्र, त्याला भेटण्यासाठी माझ्या कृष देहाला तिथपर्यंत घेऊन जाणं तुम्हाला निरर्थक वाटत होतं. बरं मला एकट्याला जाऊ द्या म्हटलं तर तेही तुम्हाला नको होतं, मला मान्य आहे तुम्ही हे माझ्या काळजीपोटी करता पण अरे अशाने घुसमट होते माझी. तुम्ही जाऊ दिलं नसतं म्हणून न सांगता निघून आलो, नाईलाज होता माझा. काळजी नसावी! आज रात्री मस्त नाटक पहायला जातोय आम्ही दोघेजणं. उद्या दुपारच्या जेवणाला घरी असेन. कितीही वय झालं तरी तुमचा बाप आहे मी! थकलो आहे, संपलो नाहीये अजून!" पत्र वाचल्यावर तिघांच्याही डोळ्यांत पाणी होतं.. संजीवनी

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट