अशीही एक वारी!!


“अशा भाकरी तुज्या कुनी केल्या व्हत्या गं ये भवाने.. हयेचं शिकीवलं व्हय तुज्या आयनं तुला?”

रुक्मिन बाई नेहमी प्रमाणे सुनेवर खेकसत होती.

पण सून तिच्या वरची..

ये म्हातारे, माज्या आयवर जाऊ नको.. दिसाच्या इस-पंचइस भाकर्‍या थापायच्या म्हंजी काय गम्मत वाटली काय तुला? त्या करून अजून तिकडं आंगणवाडीत खिचडी शिजवायला जायाच असतया मला, जर्रा येळ झाला की ती बाय वरडती. त्यात आता येळच्या येळी फोनवरून सगळं वर कळवाव लागतं. तुमास्नी काय कळणार हाय त्यातलं! पातळ-पातळ थापत बसले तर घरलाच बसावं लागल मला कायमच. जे बनतय ते खावा गुमान नायतर थापा भाकर्‍या तुमी!

त्या दोघींचा तो अवतार पाहून ताटातली भाकरी फडक्यात बांधून घेऊन विठू तिथून उठला आणि बाहेर आला. अंगणात शेंबूड पुसत चिंट्या खापरासोबत खेळत होता. आणि तिथेच कोपर्‍यात खाटेवर दिग्या घोरत पडला होता. त्याच्याकडे पाहत, रात्री झिंगला असणार चांगलाच म्हणत विठूने भाकरीचं फडकं सायकलला अडकवल आणि तो सरळ शेताच्या दिशेनं निघाला.

देशमुखाच्या शेतातली चाकरी करण्यात विठूचा जन्म गेला होता. त्याच्यातल्या प्रामाणिकपणा आणि कष्टाळू वृत्ती मुळे देशमुखानेही त्याला जपला होता. आता वयामुळे फारसं काम त्याच्याच्याने व्हायचं नाही, तरीही जमेल तितकं तो करत राहायचा.

पेरणीचे दिवस होते, शेतात कामं जोरात चालू होती. पण यंदा विठूचं मन कशातच लागत नव्हतं. दारसालाची त्याची वारी यावर्षी चुकणार होती.. त्यामुळे त्याचा चेहरा जरासा सुकलेलाच होता. आपलं काम भलं आणि आपण भलं असं म्हणणारा विठू पंढरीच्या विठोबाचा मोठा भक्त होता. दरवर्षी न चुकता वारीला जायचा, इतरवेळीही शेतातली कामं उरकली की संध्याकाळी भजन-कीर्तनात रमायचा.

त्याची बायको रुक्मिन सारखी त्याला बोल लावायची. फारशी कसलीच महत्वाकांक्षा नसलेला विठू, दोन वेळच मिळालं तरी खूप झालं म्हणत आयुष्यभर चाकरी करत राहिला होता. घराकडे त्याचं आज्जीबत लक्ष नसायचं. दिवसभर शेतात आणि रात्री मंदिरात असं सारा त्याचा दिनक्रम होता.

हाताशी आलेला लेक दारूच्या पायात वाया जात होता, तान्ही नातवंड, मरमर करणारी सून आणि वैतागलेली बायको, घरी हे असं सगळं चित्र होतं. आणि विठू मात्र विठोबाचं नाव घेत सरळ डोळे मिटून बसायचा. त्यामागे त्याची भक्ति जारी असली, तरी त्या परिस्थितीतून सुटण्याचा, तिच्याकडे कानाडोळा करण्याचा त्याने शोधलेला तो एक मार्ग होता, हे आत कुठेतरी त्यालाही ठाऊक होतं!

दरवर्षीची वारी त्याला यासाठीच प्रिय होती. चांगले 15-20 दिवस या सगळ्या पासून दूर जायचं, नवीन माणसात रमायच, भजन-कीर्तनात रंगून जायचं.. याहून मोठं सुख त्याला दुसरं कुठलं वाटत नव्हतं!

शेतात पोचल्यावर त्याने सायकल लिंबाखाली लावली, भाकरीचं फडकं झाडाच्या फांदीला अडकवलं आणि रोजच्या कामाला लागला.

शाळा सध्या बंद असल्यानं, देशमुखाची इंग्रजी शाळेत शिकणारी नात आजकाल बर्‍याच वेळा शेतात येऊ लागली होती आज्यासोबत.

विहिरीवर, आंब्याच्या झाडाखाली ती बसलेली विठूला दुरून दिसली. विठू दिसला की ती नेहमी धावत यायची पण आज तिथेच बसलेली पाहून, तोच तिच्यापाशी गेला. आणि तिच्या समोरचा अभ्यासाचा पसारा पाहून म्हणाला,

धाकल्या मालकीनबई, लईच कामात हायसा आज!”

त्यावर ती खरच मोठ्या कामात असल्याचा आव आणत म्हणाली,

“हो! आता माझी ऑनलाइन शाळा सुरू झालीये विठू मामा! घरात नेटवर्क नसतं म्हणून इथे येऊन बसलेय मी. आता थोड्या वेळाने माझे सर या फोनमधून मला शिकवणार!”

“आरं देवा.. लईच आवघडे म्हनायच हे! यंदा समदच तुमचं ह्ये ओनलेन का काय म्हनत्यात तसं झालय. इठोबाच दरसन सुदिक फोनवरच घडनार हाय म्हनं आमास्नि!”

विठू कौतुकाने तिच्याकडे पाहत म्हणत होता.

मग तिने पुस्तकात तोंड खुपसलं आणि विठू त्याच्या कामाला लागला. मधूनच तिचे शब्द त्याच्या कानांवर पडत होते..

“...God is present everywhere. We must, first acknowledge the god that resides within us! And then go on a hunt to find him elsewhere!...”

त्यातला गॉड हा शब्द ओळखीचा वाटून विठू तिला म्हणाला,

“हयेचा अर्थ काय धाकल्या मालकीणबाई? जरा अमाला बी शिकवा की!”

हे ऐकून] तिच्या अंगावरच मांस कणभर वाढलं, ती म्हणाली..

“हे सोपं नाही विठुमामा! अजून हा धडा शिकवला नाहीये आम्हाला. पण देव सगळीकडे असतो, आधी आपल्या आतला देव शोधला पाहिजे असा काहीतरी अर्थ आहे याचा.”

असं म्हणून तिने पुन्हा पुस्तकात तोंड खुपसलं.

ते ऐकून विठू थोडा अंतर्मुख झाला.

आपल्या आतला देव म्हंजी काय? देव तर देवळात आसतूया. तो आपल्यामद्धी कसं येईल! पन आता ह्या बुकात लिव्हलय म्हंजी खर असल की!

दिवसभर हा विचार त्याच्या डोक्यात घोळत राहिला. रात्री मग मंदिरात गेल्यावर त्याने भटाला विचारलं,

देव आपल्या मधी आसतूया म्हंजे काय हो महाराज?”

तो भट आधीच आपण किती ज्ञानी आहोत हे गावभर दाखवत फिरायचा. विठूने त्याला आयती संधी दिली ज्ञान प्रदर्शनाची!

“अरे देव चराचरात आहे विठोबा! अगदी ह्या मांजरीच्या पिल्लात सुद्धा आहे. आपल्याला फक्त पाहता यायला हवं!”

“अन मंग दिसायचा कसं त्यो? म्हंजी शोधावं कसं त्येला?” विठू विचारत होता.

“फार काही कठीण नाही ते विठू.. सदचरण आणि कर्तव्य पालन या दोन गोष्टी आपण करत राहिलो तर देव आपसूक आपल्यात वास करायला लागतो. आपलं मन समाधान आणि शांतिने भरून जातं आणि मग घडतं त्या आतल्या देवाचं दर्शन!”

“तुमाला घडलं होय दर्शन त्याचं?” विठूने निरागसपणे विचारलं!

मग भट जरा सावरत म्हणाला,

“नाही.. म्हणजे घडतं तस कधी कधी.. प्रयत्न करत राहावं लागतं बाबा!”

असं म्हणत देवासमोर कुणीतरी वाढवलेला नारळ पिशवीत घालून भट तिथून निघाला.

भट कसाही असला तरी त्याचं म्हणणं विठूला भावलं.

रात्रभर अंगणात पडून तो विचार करत राहिला. आणि त्याला जाणवलं, की हा आतला देव शोधण्याचा मार्ग वाटतो तितका सोपं नाही. डोळे सताड उघडे ठेऊन स्वत:कडे पाहणं, परिस्थितीकडे पाहणं, दत्त म्हणून समोर उभ्या अडचणींकडे पाहणं सोपं नाही! इतके दिवस आपण निवडला तो सोपा मार्ग! डोळे बंद करून घ्यायचे.. प्रश्नांकडे पहायचंच नाही म्हणजे ते सोडवण्याचा प्रश्नच उभा ठाकत नाही!

आणि मग बर्‍याच वेळाने मनाने काहीतरी निश्चय केल्यासारखा तो उठून आत आला, कुडकुडत झोपलेल्या बायकोच्या अंगावर गोधडी टाकली आणि तोसुद्धा झोपी गेला.

दुसर्‍या दिवशी सकाळी जरा लवकरच उठून तो देशमुखाकडे गेला, आणि दिग्यासाठी स्वत:चा शब्द खर्ची घातला. कधी काही न मागणार्‍या विठुचा देशमुखानेही मान राखला. आणि दिग्यासाठी कारखान्यावर काहीतरी काम पाहतो असं आश्वासनही दिलं!

तिथून विठू घरी आला तो घरात दिग्या झिंगून तमाशा घालत होता. रात्रभर बाहेर दिवे लाऊन आत्ता घरी आला होता तो आणि बायको सोबत भांडत होता..

विठू पुढे झाला, त्याने दिग्याची कॉलर धरली, ओढत त्याला अंगणात घेऊन आला आणि सण्णकण दोन कानशिलात ठेऊन दिल्या. दिग्याच्या डोळ्यांसमोर काजवे चमकले. त्याला कळेना कधी तोंडातून ब्र सुद्धा न काढणारा आपला बाप हे आज काय करतोय!

विठू त्याला म्हणाला,

“लक्ष दिऊन आईक दिग्या!! ह्ये असले तमाशे ह्यापुडं माज्या घरात चालणार न्हाईत! प्यायचं असल तर नीट घराभाईर व्हायचं.. पुन्यांदा तोंड दाखाऊ नको तुझ. ह्या पोरीला अन लेकराला सांबाळीन मी! हितं राहयाच असल तर दारूला हात बी लावायचा न्हाई! देशमुकाशी बोलून आलूय मी, कारखान्यात नोकरी देतो म्हणलेत तुला. कष्ट करून चटणी-भाकरी खायची.. समजलं काय? आता तू ठरीव, रस्त्यावर भीक मागायचीय का बायको-लेकरासंगाट सुखान जगायचाय ते!!”

सगळे अवाक होऊन विठुकडे पाहत राहिले.

त्यानं दिग्याला बाहेर काढला आणि, ‘शुद्धीत आल्यावर घरला येऊन सांग काय ठरिवलस ते!असं म्हणून दार लाऊन घेतल.

रुक्मिन आ वासून नवर्‍याकड पाहत राहिली. तिला तरुणपणीचा विठू आठवला. पण तो नक्की कधी गप्प गप्प होत गेला ते मात्र आठवत नव्हतं.

तिच्या त्या चेहर्‍याकडे पाहत विठू तिला म्हणाला,

“जरा च्या टाका रुक्मिन बाई.. लई दिस झाले तुमच्या हातचा फक्कड च्या घेऊन!”

विस्मय आणि आनंदाने भरून रुक्मिन बाई स्वायपाकघरात गेली.

भेदरलेल्या नजरेने अवाक होऊन उभ्या असलेल्या सुनेकडे पाहून विठू म्हणाला,

“सुनबाई, तुमच्या जाड भाकरी ग्वाड लागत्यात बरका मला. आता आमची कवळी म्हातारी झाली, पातळ भाकर चावत बी नाय! तुमी जावा तुमच्या कामाला.. चिंट्याकड बगतो म्या!”

आनंदाने डोळे पुसत, “जी अण्णा!” म्हणून ती कामावर गेली.

थोड्यावेळाने, रुक्मिनच्या हातचा फक्कड चहा पित विठू रुक्मिनला म्हणाला,

दुपारच्यान तालुक्याला जाऊ डाक्टरकड.. गुडघं दुखत्यात न्हवं तुझं!”

भरलेल्या डोळ्यानं त्याच्याकडं पाहत रुक्मिनने होकारार्थी मान हलवली.

आणि तिच्या डोळ्यांतला तो आनंद आणि समाधान पाहून, कोनाड्यातल्या विठोबाच्या मूर्तीकडे पाहिल्यावर विठूला जाणवलं, ही आतल्या मार्गाने मनातल्या पंढरीकडे नेणारी वारी जास्त मनोहर आहे.. आणि हा प्रवासही खूप सुंदर आहे.. त्याने समाधानाने डोळे मिटले.. आणि डोळ्यांसमोर आलेल्या त्या सावळ्या पांडुरंगाकडे पाहून तृप्त मनाने हसला!!


- संजीवनी 


टिप्पण्या

अनामित म्हणाले…
आवडले
Sanjeevani म्हणाले…
धन्यवाद
अनामित म्हणाले…
तुमचं लिखाण नेहमीच छान असतं .....पुलेशु....

लोकप्रिय पोस्ट