शुक्रवार, २६ जून, २०२०

‘तळलेला आषाढ’       आषाढ महिना सुरू झाला की कोणाला मेघदूती कालिदास आठवतात, कोणाला आषाढी वारी तर कोणाला आषाढतला पाऊस.. पण सम्याला  मात्र, एकदा का आषाढ लागला की तळणाशिवाय दुसरं काहीही दिसत नाही. त्याच्या ध्यानी-मनी-स्वप्नी फक्त खमंग वास आणि चुरचुरीत-कुरकुरीत पदार्थ तरंगत राहतात. मग गुड ओल्ड डेज पासून पाऊस पाहत चकल्या खाण्यातली मजा काही औरच! वगैरे विषयांवर तो तास अन तास रसाळ निरूपण देत राहतो.  मागच्या आषाढात तर तो चक्क अल्बर्टला आषाढ तळण्यातली मजा एक्सप्लेन करत होता. अल्बर्ट म्हणजे त्याच्या मल्टीनॅशनल फर्म मधला त्याचा पाश्चिमात्य व्हर्च्युअल कलीग! मराठी महिन्यांची त्याला सम्याने ओळख करून दिली खरी पण आषाढ तळणे ही कन्सेप्ट समजाऊन सांगता सांगता त्याच्या नाकी नऊ आले. How one can fry a whole month? या प्रश्नाचं उत्तर अल्बर्टला देताना आणि आषाढ तळण्याच माहात्म्य समजाऊन सांगताना सम्याच्या चेहर्‍यावर अरे अरे काय हे पामर लोक!असे आविर्भाव उतरले. एकुणात त्याच्या रसरशीत जिभेला आषाढात पाणी सुटून सुटून अगदी पुरसदृश स्थिति उभी राहायची  आणि मग तो आपली रसना कुठे तृप्त होऊ शकते हे चाचपायला लागायचा.

पण यावर्षी नुकतच त्याचं कर्तव्यपार पडलेल असल्यामुळे त्याच्या रिकाम्या आलीशान फ्लॅट मध्ये आता सुमीची एंट्री झालेली होती. आणि मग सकाळच्या ग्रीन टी पासून रात्रीचं सॅलड रूपी अन्न घशाखाली उतरवताना तो रोज सुमि समोर त्याच्या आषाढी तळणाचा महिमा गायला लागला. लहानपणी आई कशी चकल्या, शेव, गोड पुर्‍या, तिखट पुर्‍या, खारे शंकरपाळे इ.इ. ऐकायला आणि करायला अति क्लिष्ट पदार्थ एक हाती तळायची आणि आम्ही भावंडं मिळून त्याचा कसा फन्ना पाडायचो याची वर्णनं तर जणू काही समोर फ्लॅशबॅक टि.व्ही. सुरू आहे अस वाटावं इतक्या भन्नाट स्किल्स सहित तो एक्सप्लेन करायचा.

त्याचं हे रोजचं पुराण ऐकून एका दिवशी सुमि वैतागली आणि समोरचा लॅपटॉप बाजूला ठेवत सुम्याला म्हणाली, “बास झाली तुझी नरेटीव्हज.. बोल काय खायचयं? चकल्या, पुर्‍या, की शंकरपाळे की सांजोर्‍या?”

आनंदातिशयाने फुलून जाऊन सम्या म्हणाला, “वॉव तू बनवतेयस?? मला यातलं सगळंच चालेल!”

त्यावर राखूमाई सारखी कमरेवर हात ठेऊन सुमि म्हणाली, मीनाही.. आपणबनवतोय!!”

आणि त्यावर आपला ठसका सावरत मोडेस्ट्ली तो म्हणाला, “हो हो.. बनवूया न आपण!”

आणि मग सम्या आणि सुमि दोघेही लागले आषाढ तळायची पूर्वतयारी करायला!

सुमिने लॅपटॉप उघडला, जवळ एक नोटपॅड घेतला आणि ती लागली कामाला.. सम्या अपूर्व कौतुकाने आणि अति महत्वाच्या मोहिमेवर असल्याच्या आविर्भावात तिच्याकडे पाहत बसला. तिची बोटं सुरू सुरू कीबोर्ड वरुण फिरू लागली आणि नंतर पेन हातात घेऊन काहीतरी नोट पण करू लागली. तसा धीर न धरऊन सम्या तिला म्हणाला, “रेसिपीज पाहतेयस न?”

त्यावर त्याला एक कडकडीत लुक देऊन ती म्हणाली,

“नाही, ती नेक्स्ट स्टेप.. आधी मी सब्जेक्ट अनॅलिसिस करतेय त्यावरून मग टार्गेट फिक्स करेन आणि मग रिसिपीज वगैरे!”

तिचं उत्तर ऐकून सम्याल घामच फुटला. ही आषाढ तळणारय की त्यावर प्रेझेंटेशन बनवणारे! ह्या स्पीड ने गेलो तर पुढचा आषाढ उगवेल!त्याला भीती वाटू लागली.

आणि मग थोड्या वेळाने सुमिच टार्गेट फिक्सिंग झाल्यावर ती सम्याला ते एक्सप्लेन करू लागली..

“हे बघ सम्या, चकली, शेव, पुर्‍या, आणि शंकरपाळे या कटेगरीज मी फिक्स केल्या होत्या. त्यांचा फर्दर अभ्यास केल्यावर मी चकल्या आणि पुर्‍या शॉर्टलिस्ट केल्या आहेत!”

“अरे वा मस्त.. पुर्‍या, गोड नं? म्हणजे कसं एक तिखट आणि एक गोड.. कॉम्प्लिमेंट करतील न एकमेकांना ते!” सम्या एक्ससाईट होऊन म्हणाला.

“नो वे! इट वोंट फिट इंटू आवर डायट प्लान.. तिखट पुर्‍या करतोय आपण!” सुमिच उत्तर!

त्यावर प्रचंड ओशाळून जाऊन तो पुढे म्हणाला, “मग निदान सांजोर्‍या तरी?”

“येस आय रिसर्च्ड अबाऊट इट पण त्यातली रिस्क प्रॉबॅबिलिटि पाहून तो विषय मी ब्लॅक लिस्ट मध्ये टाकलाय.” सुमि निर्विकारपणे म्हणाली.

सुमिने पुन्हा रेसिपीज च्या बाबतीत पण बराच रिसर्च केला आणि मग शेवटी दोन्ही पदार्थांची एक-एक रेसिपी फायनल करून त्यांचे प्रिंटआऊट्स काढले. पुर्‍यांची रेसिपी सम्याच्या हातात टेकवत, “तू पुर्‍यांच बघ, मी चकल्या करते!” असं म्हणून तिने मोर्चा स्वयंपाक घराकडे वळवला. डोळ्यांपुढे भलमोठ प्रश्नचिन्ह घेऊन सम्या तिच्या मागे चालू लागला.

मग यथावकाश तर्‍हेतर्‍हेची पीठं, मसाले, आणि रेसिपी यांच्यामधून रडत-पडत वाट काढत दोघेही तळणेया क्रियेपाशी येऊन थांबले. पण तळण्यासाठी सुमिने जेंव्हा ऑलिव्ह ऑइल घेतलं तेंव्हा दिल के तुकडे हुये हजारच्या फीलिंग ने सम्या काकुळतीला येऊन म्हणाला,

“नको गं नको असा अन्याय करू या आषाढावर! तुझ्या या उग्र ऑलिव्ह ऑइल मध्ये जीव गुदमरून मरून जाईल बिचारा तो!”

“मग राइस ब्रान वापरूया का?” सुमिने हेल्दी सबस्टिट्यूट सुचवला.

आणि त्यातल्या त्यात बरं म्हणत सम्या दुधाची तहान ताकावर भागवायला तयार झाला.

सुमिने महत्प्रयासाने चित्र-विचित्र वळणाच्या चकल्या पाडल्या आणि एकेक करून तेलात तळायला सोडल्या.. तापलेल्या तेलाच्या त्या चुर्र आवाजाने आणि तळणाच्या खमंग वासाने सम्या हवेत तरंगू लागला. त्याचं कैफात मग त्याने कशा तरी गोलया विशेषणाशी दुरान्वयेही संबंध नसणार्‍या पुर्‍या लाटल्या आणि चुकत-माकत तळून काढल्या.

प्रोजेक्ट सक्सेसफुल च्या आनंदात चकल्या आणि पुर्‍या प्लेट मध्ये घेऊन दोघेही येऊन गॅलरीत बसले, आणि चेरी ऑन द केक म्हणत जेव्हा बाहेर पावसाच्या सरी बरसू लागल्या तेव्हा तर सम्याच्या आनंदाला पारावारच उरला नाही. आणि मग पाऊस तोंडी लावत तो तळलेला आषाढ दोघांनीही भरपूर चाखला..!!  

 


ashadh mahina 2021, ashadh month 2021, 

३ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

mast...khup chan

संजीवनी देशपांडे म्हणाले...

Thank you

अनामित म्हणाले...

आषाढाचे सुंदर लेखांकन

Popular

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *