सटवाईची गोष्ट

नमस्कार मंडळी, आजपासून मी एक नवीन लेखमालिका सुरु करतेय ‘आपली संस्कृती आणि आपण’! भारतीय संस्कृती ही बहुविधतेने नटलेली आहे. आपले सणवार, उत्सव यामागे खूप माहितीपूर्ण आणि उपयोगी असे संदर्भ दडलेले आहेत. अशा वेगवेगळ्या प्रतिकांमागचा अर्थ शोधणं, शास्त्रीय दृष्टीने आपल्या प्राचीनतेकडे पाहणं खूप रंजक आणि समृद्ध करणारं आहे असं मला वाटतं. यात मग संस्कृती या छताखालचं सर्व येतं. आणि याच कुतूहलापोटी जे काही माझ्या आकलनात आलंय, येतंय ते तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करतेय. 

तर आज, बाळ जन्मल्या जन्मल्या त्याची ज्या पहिल्या देवतेशी ओळख करुन दिली जाते ती षष्ठी/सटवाई/पाचवी/छथी हिच्याविषयीची एक रंजक गोष्ट माझ्या वाचण्यात आली ती मी तुम्हाला सांगणार आहे. ही गोष्ट थोडी विचित्र तर आहेचं पण माझं कुतूहल आणखी चाळवलं ते अगदी तिच्या सारखाचं तंतोतंत गाभा असलेली ग्रीक पुराणांतली एक गोष्ट वाचल्यावर! दोघी सख्ख्या बहिणी वाटाव्यात इतकं त्यांच्यामध्ये साधर्म्य आहे. फक्त त्या वाढल्यात एकमेकांपासून खूप दूर. तसं पहायला गेल्यावर ग्रीक आणि भारतीय पुराणांमध्ये कुठे न कुठे थोडंफार साधर्म्य जाणवत रहातंच. प्राचीन ग्रीकमध्ये शब्द ला अब्द म्हणतात म्हणे.. आहे की नाही गंमत?! 

असो, तर आपली ही सटवाई बाळ जन्मल्यावर पाचव्या दिवशी रात्री येऊन त्याच्या कपाळावर भविष्य लिहून जाते. ते कोणालाही पुसता येत नाही. (‘पाचवीला पुजलेलं असणं’ ही म्हण यावरुनचं पडलेली आहे 😄) .  हे जेव्हा सटवाईच्या मुलीला समजलं तेव्हा तिने आईकडे हट्ट केला माझं भविष्य काय ते सांग म्हणून. ती काही केल्या ऐकेना म्हटल्यावर सटवाईने तिला सांगितलं, ‘तू तुझ्या मुलासोबतचं लग्न करशील आणि त्याच्यापासून तुला मुलगा होईल!’ हे असं विचित्र भविष्य ऐकून सटवाईची मुलगी घाबरते आणि दूर वनात निघून जाते आणि नंतर तिथेचं रमते. आणि एका दिवशी तळ्याकाठी बसलेली असताना पाण्यात एकमेकांमध्ये दंग माशांचा युगुलाकडे पाहण्यात ती इतकी गुंगून जाते की त्यातून तिलाचं गर्भधारणा होते. पुढे त्या गोंडस बाळाला ती स्वत:च्या वस्त्रांमध्ये गुंडाळून कमळाच्या मोठ्या पानावर ठेऊन नदीत सोडून देते. त्याच नदीच्या काठावर वसलेल्या एका राज्याच्या निपुत्रिक राजाला ते मूल सापडतं. दैवी प्रसाद समजून राजा त्याला राजपुत्रासम वाढवतो. राजपुत्र मोठा झाल्यावर शिकारीसाठी म्हणून पुन्हा त्याच वनात जातो तिथे या सटवाईच्या मुलीला पाहून तिच्या प्रेमात पडतो. आणि लग्न करेन तर हिच्याशीचं असं म्हणतो. पण ती लग्नाला तयार होत नाही. राजा-राणी सुद्धा तिला विनंती करतात. शेवटी नाईलाजाने ती तयार होते आणि त्या दोघांचं लग्न होतं. यथावकाश त्यांना मूल होतं. आणि नवजात बालकाला नवी वस्त्रं घालू नयेत म्हणून राणी, राजपुत्र ज्या वस्त्रामध्ये नदीत सापडला होता तेचं वस्त्र त्या बाळाला घालते. सटवाईची मुलगी ते वस्त्र लगेचं ओळखते. आणि मग चौकशी अंती तिला समजतं राजपुत्र राजाला नदीत सापडला होता. आणि मग तिला सारा उलगडा होतो आणि आपण इतके प्रयत्न करुनही आईने लिहिलेलं भविष्य पुसू शकलो नाही याची खंत वाटते. 
आहे की नाही मजेशीर गोष्ट! हिची ग्रीक बहीण तर याहून मजेशीर आहे. 

लायोस नावाच्या थीब्ज (Thebes) नगरीच्या राजाला ओरॅकलनं (ग्रीक भविष्यवेत्ता) सांगितलेलं असतं की ‘तुझा मुलगाच तुला मारणार आहे’. लायोस मग त्याच्या नवजात बालकाला मारण्याचा आदेश देतो. पण लायोसच्या पत्नीला ते करवत नाही ती त्या बालकाला एका धनगराकडे देते आणि टेकडीवरुन खाली टाकायला सांगते. त्या धनगरालाही त्या बाळासोबत तसं करवत नाही. तो त्याला काॅरिन्थच्या निपुत्रिक राजाच्या हवाली करतो. त्याचं नाव इडिपस ( Oedipus) ठेवलं जातं. ते बाळ तिथे राजपुत्रासारखं वाढतं. पण मोठा झाल्यावर ‘पाळलेला, अनौरस’ वगैरे चिडवलं गेल्यामुळे तो त्याच्या माता-पित्याच्या शोधार्थ निघतो. आणि त्या ओरॅकल पाशी येऊन पोचतो.ओरॅकल त्याला वेगळंच काहीतरी सांगतो, ‘तू तुझ्या जन्मदात्याला मारशील आणि जननीशी लग्न करशील!’ हे ऐकून इडिपस वेडापिसा होतो. तिथून निघाल्यावर एका ठिकाणी एक बलशाली माणूस पाच सैनिकांसह जात असतो तो इडिपसला उर्मटपणे रस्त्यातून बाजूला व्हायला सांगतो. आधीचं चिडलेला इडिपस अजून वैतागतो आणि त्या माणसाला त्याच्या सैनिकांसह मारुन टाकतो. पण तो माणूस म्हणजेचं आपला पिता लायोस आहे याची त्याला सुतरामही कल्पना नसते. पुढे तो थीब्ज नगरात प्रवेशतो. तिथे एक स्त्रीचा चेहरा, सिंहीणीचं शरीर आणि पंख असलेली स्फिंक्स नगरवासीयांना छळत असते. ती सगळ्यांना ‘सकाळी चार, दुपारी दोन आणि रात्री तीन पायांवर चालणारा प्राणी कोण?’ हे कोडं विचारून भंडावून सोडायची. त्याचं उत्तर मात्र कोणालाचं जमत नव्हतं. इडिपस मात्र ‘मनुष्य’ असं बरोबर उत्तर देतो... बालपणी रांगणारा (४), तरुणपणी चालणारा(२) आणि म्हातारपणी काठीचा आधार घेणारा (३)! आणि तो स्फिंक्सला मारून टाकतो. नगरवासीय त्याचा जयजयकार करुन आपल्या विधवा राणीसोबत त्याचं लग्न लाऊन देतात. पुढे त्या राज्यात प्लेगची साथ येते आणि मग ओरॅकल म्हणतो ‘पित्याचा खून आणि मात्रागमनाचं पातक केल्यामुळे थीब्जवर देवाचा कोप झालेला आहे’. हे अतिवाईट कृत्य कोणाचं असं इडिपस त्याला विचारतो. ‘ते तूच केलं आहेस’ महंत उत्तरतात! इडिपस संतापतो, वैतागतो. आणि मग राणीशी बोलल्यावर त्याला सारा उलगडा होतो. आणि मग शरमून राणी आत्महत्या करते तर इडिपस स्वत:चे डोळे फोडून घेतो. 

जगप्रसिद्ध मनोवैज्ञानिक असलेल्या फ्राॅईडनं ‘इडिपस काॅम्प्लेक्स’ ही टर्म प्रसिद्ध केलेलीचं आहे. पण पु.ल.देशपांडेंनीही ‘राजा इडिपस’ नावाचं नाटक लिहलंय. सुनीता देशपांडेंनी लिहिलेल्या ‘सोयरे सकळ’ या पुस्तकात सटवाईच्या गोष्टीचा उल्लेख आहे. वसंतराव देशपांडेंच्या आईने पुलंच्या इडिपस नाटकाची गोष्ट ऐकल्यावर, अरे यात काय नवीन ही तर आपल्या सटवाईची गोष्ट आहे असं म्हणून ती त्यांना सांगितली होती म्हणे😊

टिप्पण्या

अनामित म्हणाले…
वाह सूरेख

लोकप्रिय पोस्ट