विजिगीषा-१भाग-१

मुख्य रस्ता सोडून रिक्क्षा आत वळली आणि साधारण - किमी आत गेल्यावर मंदिराची भग्नावस्थेतील तटबंदी दिसू लागली.. थोडं पुढे आल्यावर रिक्क्षा थांबवून रिक्क्षावाला म्हणाला, ‘मॅडम, आलं बगा तुमचं मंदिर.. जाऊन या तुमी निवांत, मी थांबतोय मनलं इतच!’ 

मनवा रिक्क्षामधून उतरली आणि त्या अर्धवट पडलेल्या अवस्थेत असलेल्या मोठ्या दगडी कमानीकडे तिने पाहिलं

ती इथे पहिल्यांदा आली होती तेंव्हाही अशीच पहात राहिली होती त्या कमानीकडे.. काहीतरी तिला तेव्हाही आकर्षून घेत होतं. त्यावेळी तिला कुठे माहीत होतं की ती एवढी प्रेमात पडेल या मंदिराच्या! ती कमानीतुन आत आली.. तो आतला प्रशस्त परिसर तिला सुखाऊन गेला. चहुबाजूच्या छिन्न-विछिन्न तटबंदीच्या आत अगदी मधोमध दगडी चबुतऱ्यावर ऊभं असलेलं ते अगदी प्राचीन असं शैव पंचायतन प्रकारातलं मंदिर देखणं दिसत होतं. त्यात तटबंदीच्या आत चहुबाजूंनी असलेला पळस लालसर केशरी रंगामध्ये न्हाऊन निघत होता.. वसंत ऋतू हा त्याच्या बहराचा ऋतू! लाल फुलांच्या दाट सड्यामध्ये मधोमध ऊभं असलेलं ते काळ्या पाषाणातलं मंदिर डोळ्यांचं पारणं फेडत होतं.

एखादी जागा आपल्याला का कोणास ठाऊक अगदी जवळची वाटू लागते. आपलं तिच्याशी काहीतरी नातं आहे असं वाटू लागतं. अगदी असंच वाटलं होतं मनवाला ती वर्षभरापूर्वी इथे आली होती तेव्हा. तिच्या बॅच ने मोजक्या प्राचीन मंदिरांच्या स्थापत्याचा प्रत्यक्ष तिथे जाऊन अभ्यास करावा या हेतूने एक ट्रीप आयोजली होती. त्यावेळी या मंदिराचीही धावती भेट त्यांनी घेतली होती. तेव्हापासून हे मंदिर तिच्या मनात घर करुन होतं. ट्रीपहुन परतल्यावर तिने ध्यास घेतला त्याचा आणि दिवस दिवस लायब्ररी मध्ये बसून अभ्यास केला, माहिती गोळा केली. अजून अजून त्याच्या प्रेमात पडत गेली. तिने ठरवलं, शेवटच्या सत्रातल्या प्रोजेक्टसाठी हेचं मंदिर निवडायचं. आणि आता ते प्रोजेक्ट असाइनमेन्ट तिच्या विभाग प्रमुखांकडून शिक्कामोर्तब झाल्यावर मंदिराचा विस्तृत अभ्यास करण्यासाठी ती पुन्हा इथे आली होती

पुरातत्व खात्याच्या अखत्यारित असल्यामुळे मंदिराचं व्यावसायीकरण झालेलं नव्हतं. त्यामुळे इतर मंदिरात दिसणारी दुकानांची, पुजाऱ्यांची, भाविकांची गर्दी इथे अज्जिबात नव्हती. अतिशय शांत आणि रम्य वातावरणात तटस्थपणे शतकांपासून उभ्या असलेल्या भूमिज शैलीमधल्या त्या मंदिरात केवळ काही मोजक्या पर्यटकांची किंवा मग चार-दोन हौशी छायाचित्रकारांचीच वर्दळ असायची. आजचंही चित्र काही वेगळं नव्हतं

इतकावेळ मनावर साठलेले सारे मळभ त्या तिथल्या वातावरणात तिला दूर होत असल्यासारखे वाटायला लागले. ती चबुतऱ्यावर चढली, आणि मंदिराच्या पायऱ्या चढून आत गेली. रेखीव सभामंडप आणि आत गर्भगृह अशी ती रचना होती. आणि या मुख्य मंदिराच्या भोवती चारी बाजूंना एक एक अशी, श्री पार्वती, श्री गणेश, सूर्यदेव आणि श्री विष्णू यांची छोटी छोटी मंदिरं होती.. एका अखंड चबुतऱ्यावरचा हा पाच मंदिरांचा समूह म्हणून ते शैव पंचायतन! आतल्या शिवलिंगाला नमस्कार करुन ती बाहेर आली आणि आता अभ्यासा साठी मंदिराच्या बाहेरच्या बाजूने कोरलेल्या शिल्पांची स्केचेस काढून घ्यावी म्हणून सॅक उघडून साहित्य बाहेर काढू लागली.. पण इतका वेळ प्रयत्नपूर्वक बाजूला सारत असलेले मनातले विचार पुन्हा पुन्हा मान वर काढत होते आणि तिला अस्वस्थ करत होते

काल संध्याकाळचं रोहनचं बोलणं तिला परत आठवू लागलं आणि त्याच्या वागण्याचे अर्थ लावण्यात तिचं मन गढून गेलं.. 


नाशिकला जाण्याआधी रोहनला एकदा भेटून घ्यावं म्हणून मनवा त्याला भेटायला आली होती.. त्याच्याशी बोलताना ती उत्साहाने भरुन गेली होती,

रोहन, रोहन, रोहन.. फायनली माझ्या प्रोजेक्ट चा विषय अप्रुव्ह झाला.. सरांनी परवानगी दिली!! आता मी उद्याचं नाशिकला जाऊन मंदिराच्या फिल्ड स्टडीला सुरुवात करायचं ठरवलंय.. सिन्नरला एक मैत्रीण आहे माझी तिच्याकडे रहायची सोयही झालीये.. आणि ती मला हवी ती सगळी मदत पण करणार आहे! सो आईचंही समाधान झालंय.’

मनवाला काय सांगू आणि काय नको असं झालं होतं पण मग रोहनची प्रतिक्रिया ऐकून ती थोडीशी ओशाळली..

 ‘काय यार मनु! हे काय काढलंयस तू मध्येचं? या वीकेन्डला आई-पपा युएस ला जातायत, त्याआधी एक छोटं गेट टूगेदर अरेंज     केलं होतं मी!’

अरेंज केलं होतं म्हणजे? अरे मला काहीचं म्हणाला नाहीस तू! असं कसं ठरवून टाकलंस?’

तुला काय सांगायचंय त्यात.. तू कुठे जाणारेस असं वाटलं मला!’

रोहन! मलाही कामं असतात!’

हो माहितीय.. जुने पुराणे ग्रंथ वाचत बसायचं काम!’

गप हं आता.. मी तुझ्या त्या बोरींग मल्टीनॅशनल बॅंकेतल्या त्याहून बोरींग जाॅबवरुन काही बोलते का तुला!’

काय बोलणार आहेस तू? त्या जाॅबला एक स्टेटस आहे. एलिट क्लासमध्ये ऊठ-बस असते माझी.. आणि वर घसघशीत पॅकेज! करिअर असावं तर असं! नाहीतर तू.. चांगलं ब्राईट फ्युचर सोडून पडक्या मंदिरांमधून फिरत असतेस.’

रोहन! आर यु सिरिअस? माझं आर्ट्स ला जाणं.. इतिहासाची पदवी घेणं आणि आता इंडोलाॅजी मध्ये मास्टर्स करणं.. या साऱ्याचं कौतुक करायचास नं तू?? आणि आता हा असा विचार करतोयस?’

अर्थात! भीकेचे डोहाळे आहेत हे सारे.. याने ना मान मिळतो ना पैसा! तूझी आवड म्हणून मी जाऊदे म्हणत आलो. पण आता ती मला डोईजड वाटू लागलीये. यू आर बिकमींग ओव्हर कम्पॅशनेट अबाऊट इट!’

ओह खरचं का? आणि तू रे? तू नाहीयेस ओव्हर कम्पॅशनेट तुझ्या जाॅब विषयी? डेडलाइन्स असल्या की आठवडा आठवडा भेटत नाहीस मला.. मी अशीचं रिअॅक्ट होते तेंव्हा?’

कम आॅन मनवा.. माझं काम इम्पाॅर्टन्ट आहेजुने दस्तऐवज आणि मंदिरं उकरत बसून कोणाचं पोट भरणार नाहीये.’

पुरे रोहन! आज तू काहीही बोलतोयस. मी उद्या नाशिकला जातेय.. परत आले की बोलू आपण!’

आणि मनवा जायला निघाली.

हो, नक्की बोलू! पण त्यावेळी येताना तुला नक्की काय हवंय ते मनात पक्कं करुन ये! बाय!’

त्याच्या या वाक्याने ती स्तिमीत झाली. हा असं कसं म्हणू शकतो? आपण निवडलेला मार्ग इतका क्षुल्लक वाटतो याला? एक ना अनेक प्रश्न तिच्या मनात पिंगा घालू लागले......


राजकुमारीजी..’

कोण?’

मी.. नवलेखा.. तुमची दासी.’

हम्म.. बोल!’

महालातून निरोप आहे.. तुम्हाला त्वरित राजमहालात येण्यास सांगितले आहे. दक्षिणेतून स्वार आला आहे, काहीतरी महत्वाचं असावं! आणि...’

आणि काय?’

आणि महामात्यांचं म्हणणं आहे की राजकुमारींचं असं या वनातल्या मंदिरात, पाषाणावर विश्रांती घेणं योग्य दिसत नाही.. तुम्हाला हवं असल्यास इथे एखाद्या कक्षाची व्यवस्था करुन दिली जाऊ शकते!’

पुरे!! आम्ही कुठे विश्रांती घ्यायची ते आम्ही ठरवणार! यानंतर आम्हाला योग्य-अयोग्य शिकवायला येणं त्यांच्यासाठीयोग्यठरणार नाही असं कळवा महामात्याना!!’

थोड्याशा आवेगातच राजकुमारी वरदायिनी तिच्या प्रिय अश्वावर स्वार होऊन राजमहालाच्या दिशेने निघाली.

महालात प्रवेश केल्यावर महाराज, महाराणी, महामात्य आणि राजमाता सगळ्यांना या वेळी महालात एकत्र पाहून वरदायिनी ला आश्चर्य वाटलं..  

तिचं स्वागत करत महामात्य म्हणाले,

या राजकुमारी जी, आम्ही आपलीच प्रतिक्षा करत होतो

त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत वरदायिनी ने महाराजांना अभिवादन केलंआणि ती महाराणींच्या बाजूच्या आसनावर जाऊन स्थानापन्न झाली.

तिला उद्देशून महाराज म्हणाले,

वरदायिनी, एक अतिशय बुद्धिमान आणि हरहुन्नरी पुत्री म्हणून तुझा आम्हाला अभिमान आहे! परंतू तुझे हेच गुण तुझ्या विवाहाच्या आड येत होते.. तुला साजेसा वर शोधणं कठीण काम झालं होतं. पण आता आमची चिंता मिटली आहे.. चालुक्य कुलोत्पन्न महाराज श्री आदित्येय यांनी आपणहून तुला मागणी घातली आहे! तुझ्या निमित्ताने एका मोठ्या साम्राज्याशी आपलं राज्य जोडलं जाणार आहे.’

आणि माझा या विवाहास विरोध असेल तर?’ वरदायिनीने ठाम स्वरात महाराजांना प्रश्न केला.

त्यावर महामात्य म्हणाले,

विरोध असण्याचं तसं काही कारण आमच्या दृष्टिस येत नाही राजकुमारीजी!’ 

अर्थात! तेतुमच्यादृष्टिस येण्याचे काही कारणच नाही महामात्य.. विवाहआमचानिश्चित होतो आहे!’

राजकुमारीच्या तीक्ष्ण उत्तराने महामात्यानी नजर जमिनीकडे वळवली.

महाराज, तुम्हाला काय वाटते, चालुक्य सम्राटाची उत्तरेकडे कूच करण्याची तयारी पाहून आपण आपल्या या विद्वान मंत्रीगणांच्या सल्ल्याने, या सेवण राज्याच्या युद्धविद्यापारंगत, बहुविधशास्त्रनिपूण राजकुमारीस, एखादे वस्त्र भेट द्यावे त्या आविर्भावात, तहाचे साधन करु पहात आहात हे आम्हास समजत नाही??’ उद्विग्न होऊन वरदायिनी महाराजांना संबोधत होती,

महाराज क्षत्रिय आहात आपण! क्षत्रियांसम समरांगणाची भाषा करा तेच तुम्हास शोभून दिसेल! द्या आज्ञा.. ही वरदायिनी त्या चालुक्यांशी लढून विजयश्री घेऊनच परत येईल!’

पुत्री, आपल्या राजकुमारीस लढायास पाठविले म्हणून हसेल हा भारतवर्ष आमच्यावर!’ महाराज हताश होऊन उद्गारले!

आणि राजकुमारीचा व्यवहार केला हे कळल्यावर आपला गौरव होणार आहे महाराज?’

क्रोधित आणि व्यथित होऊन वरदायिनी महालातून बाहेर पडली आणि अश्वारूढ होऊन वनात निघून गेली!


राजकुमारी वरदायिनी धाडसी होती आणि बुद्धिमानही! राज्य चालवण्याची, राज्याची राणी होण्याची तिची महत्वाकांक्षा होती.. महाराज मणिचंद्रांना पुत्र नव्हता आणि ज्येष्ठ कन्या असल्या कारणाने आपणच या राज्याच्या उत्तराधिकारी आहोत हे तिने तिच्या मनावर बिंबवलं होतं.. 

तिला नेहमी वाटायचं, भारतवर्षाला इतक्या दिग्गज राजा-महाराजांचा इतिहास आहे पण त्यात एकही स्वयंभू राणी नाही.. ज्या होऊन गेल्या त्या साऱ्या महाराण्या नाहीतर पट्टराण्या, सवतींशी ईर्ष्या करण्यात धन्यता मानणाऱ्या.. केवढा हा दैवदुर्वीलास! अन्याय सहन करत जगणाऱ्या स्त्रिया तिला भावायच्या नाहीत.. सीतेला वनवासास पाठवणाऱ्या श्रीरामांचा आणि द्रौपदीला द्यूतक्रिडेत वस्तूसमान पणाला लावणाऱ्या युधिष्ठीराचा तिला मनोमन राग यायचा


पण एक दिवस तिच्या कानांवर बातमी आली की महाराज मणिचंद्र दत्तक पुत्राच्या शोधात आहेत. ते ऐकुन ती क्रोधाग्नित तळपू लागली.. क्षणात तिच्या लक्षात आले की आपल्याला डावलले जातेय.. तिच्या मनात प्रश्नाचं काहूर उठलं.. आपण केवळ एक स्त्री आहोत म्हणून राज्य चालवण्यास असमर्थ समजले जातो?? आपल्यातल्या गुणांचा विचारच केला जाऊ शकत नाही?? 

तिला वाटायचं महाराजांना एक पुत्री म्हणून आपला अभिमान आहे.. कुठलंही एक क्षेत्र तिने स्वत:ला सिद्ध करायचं ठेवलं नव्हतं.. महाराज उत्तराधिकारी म्हणून आपलाच विचार करणार याची तिला खात्री वाटायची

पण झालं उलटचं.. तेव्हापासून तिचं मन महालावरुन उठलं.. आणि ती बराचसा वेळ या शिवमंदिरात काढू लागली. मोकळ्या आकाशाकडे पहात मंदिरात दिवस दिवस ती घालवू लागली.. कधी ती ग्रंथ वाचायची.. कधी गायन करायची तर कधी चक्क तलवारबाजी! इथे तिला मोकळं वाटायचं.. सेवण राज्याचे मूळपुरुष राजा रविचंद्रांनाी ते मंदिर तलावाच्या खोदकामा दरम्यान सापडलेल्या पाषाणाचा वापर करुन बांधून घेतलं होतं.. त्याची रचना, बांधणी, पंचायतन सारं काही विलोभनीय होतं.. त्यातल्या सूर्य मंदिराविषयी तर राजकुमारी वरदायिनी ला खूप ओढ वाटायची..


.......


काय मॅडम, अख्ख्या जगात विचार करत बसण्यासाठी हीचं जागा मिळाली काय तुम्हाला?’

मनवाने दचकून वर पाहिलं तर गळ्यात कॅमेरा अडकवलेला कुणीतरी तरुण तिच्याकडे रोखून पहात होता. त्याच्या तिरकस प्रश्नाला तितकंच तिरकस उत्तर देत ती म्हणाली,

हो! तुम्हाला काही अडचण आहे?’

नाही.. तुम्ही काही का करेनात मला काय करायचंय त्याच्याशी! पण तुम्ही आत्ता जिथे बसून गहन विचार करताय नं तिथे एक शाॅट घ्यायचाय मला.. ते कपल खोळंबलंय तिकडं!’

काय हे टूकार फोटोग्राफर!’ असं म्हणत मनवा तिथून उठली. ‘प्री-वेडींग नावाचं खूळ निघालंय आजकालअसंही काहीसं ती पुटपुटली.


मनातल्या विचारांना थोडं बाजूला सारत तिने मग तिचं लक्ष मंदिरावर केंद्रित केलं. भिंतींवरची शिल्पं जवळुन पाहत ती तिची निरीक्षणं वहीत नोंदवू लागली. ढोबळमानाने ते मंदिर हेमाडपंती समजलं जात होतं. त्याची बांधकामाची पद्धत हेमाडपंती शैलीशी मिळतीजुळती होती. त्या प्रदेशात आढळणारा काळा पाषाण इंटरलाॅकिंग पद्धतीने एकमेकात गुंफून केलेलं चुनाविरहित बांधकाम! पण मंदिराचा कालावधी काही कोणाला निश्चित करता आला नव्हता. अकराव्या-बाराव्या शतकातलं ते बांधकाम असावं असा अंदाज होता.पण खात्रीशीररित्या काही सांगावं असे पुरावे मिळाले नव्हते. काही तज्ञांनी ते तीन हजार वर्षांहूनही जूनं असु शकतं असेरी दावे केले होते. तिथल्या भिंतींवर कोरलेल्या अप्सरा, रामायणातील प्रसंग, हत्ती, त्यांची ती शिल्पशैली ११-१२ व्या शतकातील किंवा हेमाडपंती मंदिरांसारखी तिला वाटली नाही. नक्कीच वेगळी वाटली.. पण ते वेगळेपण तिला पाॅइंट आऊट करता येत नव्हतं

त्या शिल्पांवरुन हात फिरवता फिरवता तिला वाटून गेलं, पाषाणांतून हे असं देखणं मंदिर कोरणारी ती देखणी बोटं कोणाची असतील.. कोणत्या काळातली असतील.. ते जरी आता कालातीत झाले असले तरी त्यांनी निर्मिलेलं हे पाषाणातलं काव्य आजही माझ्यासारख्या हजारोंना वेड लावतंय.. ओढून घेतंय! किती अनभिज्ञ असतो आपण आपल्या भूतकाळाविषयी! आपण कुठून आलो, कसे आलो याबद्दल किती संदिग्धता असते.. 

ती पूर्वी होऊन गेलेली माणसं कशी असतील, कसा विचार करत असतील.. त्यांचे प्रश्न काय असतील.. कधीकाळी जे सत्य होतं ते आता केवळ पुराव्यांअभावी अस्तित्वहीन कसं काय होऊ शकतं?!

आत्ता जे घडतंय तेचं तेवढं खरं असं समजून जगणारे लोकही आहेतच की.. रोहन सारखे! त्याचा विचार मनात आल्यावर तिला वाटलं, आपण वर्तमानाबद्दलही अनभिज्ञच असतो की.. आपल्याला वाटायचं रोहनला आपली स्वप्नं कळतात, ‘आपणकळतो.. पण तसं नाहीच मुळात

मंदिराच्या त्या पुरातन शिखराकडे पहात ती मनात म्हणाली, ही अशी मंदिरं, प्राचीन अढळ स्थापत्यच खरे साक्षीदार असतात, भूत आणि वर्तमानाचे.. उद्या भविष्याचेही असतील! मीही एक दिवस मातीत मिसळून जाईन पण हे मंदिर इथेच असेल, सारंकाही तटस्थपणे पाहत! माझ्यासारख्या किती जणी याने पाहिल्या असतील, किती जणींची सुख-दु:खं अनुभवली, ऐकली असतील, किती जणींच्या आयुष्याचा साक्षी ठरला असेल..

....


व्यथितावस्थेत राजकुमारी मंदिरात आली. वरवर क्रोधाने तळपत असली तरी आत कुठेतरी ती मनोमन अश्रू  ढाळत होती. वरदायिनी थेट गर्भगृहात गेली आणि कितीतरी वेळ शिवलिंगासमोर नुसती बसून राहिली. रोज ज्या कविराजांचं काव्य ऐकण्यासाठी तिचे कान आतूर असायचे त्या कविराज नीलवदन कडे आज तिने वळुनही पाहिलं नाही. कविराजांना अर्थात साऱ्या वृत्तांताची कल्पना आली होती त्यामुळे ते तिला भेटायला आज स्वत:हून मंदिरात येऊन पोहोचले होते.

वरदायिनीची स्वप्नं चार-चौघींसारखी नव्हती. इतर राजकुमाऱ्यांसारखी ती दर्पण आणि आभूषणांमध्ये रमायची नाही. लहानपणापासूनच तिला ग्रंथालयाची आणि युद्धशाळेची ओढ होती. तिचा हट्ट पाहून महाराजांनी तिला तिच्या आवडीचं शिक्षणही दिलं.. जसजशी वरदायिनी मोठी होत गेली तसतशी अधिकाधिक तेजाने उजळू लागली.. ती रणांगणात जायला लागली.. मोठमोठ्या योद्ध्यांना तिच्या अंगभूत चपळाईने  आणि पराक्रमाने धूळ चारू लागली. तिची ही प्रगती मात्र राजमहालाच्या चिंतेचा विषय ठरत होती. एव्हाना तिची महत्वाकांक्षा काही कोणावासून लपून राहिलेली नव्हती. महाराजांना भिती वाटायची एका स्रीच्या हाती राज्यकारभार सोपवण्याने आपला सेवणवंश लयाला जाईल.. मंत्रीगणांनी तशा वदंताच उठवल्या होत्या.. त्यांना एका स्रिच्या अधिपत्याखाली राहणं कमीपणाचं वाटत होतं! आणि मग त्या गलिच्छ राजकारणाला महाराज मणिचंद्र बळी पडले आणि त्यानी राजकुमारी वरदायिनीचं स्वप्न तिच्यापासून हिरावून घेतलं. ती तेव्हाही व्यथित झाली होती पण महाराजांची इच्छा असं म्हणत मनाची समजूत घालायला लागली होती.. त्यामागचं राजकारण तिला कळत नव्हतं असं नाही पण पित्याचा मान राखायचा म्हणून उघड-उघड ती काही बोलली नाही.

तो घाव भरतोय भरतोय, तिच्यावर हा दुसरा आघात झाला होता. विवाह करुन आजन्म शोभेची वस्तू बनुन राहणं तिला नकोसं वाटायचं आणि त्यामुळेच स्वत:वर कसलीही बंघनं कधी लादून घ्यायची नाहीत हे तिनं ठरवलं होतं. तशी बंधनं लादता जर कोणी राजपुत्र तिच्याशी विवाहास तयार असेल तरच ती विवाहाचा विचार करणार होती. पण आज विवाहाच्या नावाखाली आपला चक्क व्यवहार होतोय हे कळल्यावर तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तिचा स्वाभिमान दुखावला गेला होता. आता ती शांत राहणं शक्यच नव्हतं..


....


आपली निरीक्षणं आणि काढलेले फोटोग्राफ्स घेऊन मनवा निघाली.. याचं विषयाचा अभ्यास करणाऱ्या एका संशोधकाशी दुसऱ्या दिवशी इथेचं तिची भेट ठरली होती! मावळतीची किरणं अंगावर घेऊन अजून लोभस दिसणारं मंदिर डोळ्यांत साठवत ती जायला निघाली. इतक्यात,

रोज संध्याकाळी हे असंच सुंदर दिसतं पाय निघत नाही मग इथुन

मंदिराकडे पाहात असलेल्या मनवा कडे पहात तो मगाचचा फोटोग्राफर तरुण बोलत होता,

हाय.. मी अनिकेत!’

त्याच्या हाय कडे पूर्ण दुर्लक्ष करत, तिचं सामान सॅक मध्ये भरता भरता मनवा म्हणाली,

झालं नाही का अजुन तुमचं शुटींग!’

आजच्या पुरतं झालं!’ अनिकेत उत्तरला

आजच्यापुरतं म्हणजे?’ सॅक पाठीला अडकवत मनवा विचारत होती

म्हणजे या कपल चं शुटींग संपलंय. आता पुढंचं असाईनमेन्ट मिळेपर्यंत मी इथे येऊन मनसोक्त फोटोग्राफ्स काढायला मोकळा! आपली आवड जपायची असेल तर ही प्री-वेडिंग सारखीखुळंसहन करावी लागतात आमच्या सारख्याटूकारफोटोग्राफर्सना.. पैसे त्यातुनच मिळतात नं!’ 

आपलं मगाशीचं बोलणं याने ऐकलंय तर असं म्हणून मनवा त्याला म्हणाली,

डोन्ट टेक इट पर्सनली.. मी ते तुमच्या तिरकस बोलण्याला उत्तर म्हणून बोलले होते.’

हाहा नाही हो एवढ्या छोट्या गोष्टी मी मनावर घेत नाही! बाय वे, तुम्ही हे दिवसभर, या मुर्तीला हात लाव, त्या मूर्तीला भिंग लावून बघ हे काय करत काय होतात नक्की? म्हणजे मला जरावेळ वाटलं मंदिर नक्की दगडाचंच आहे की सोन्याचं.. ही बाई इतकं निरखून काय बघून राह्यली याला!’ असं म्हणून तो स्वत:च्याच विनोदावर हसला.

तुम्ही नेहमीच असं टुकार बोलता की आज काही विशेष आहेमनवा निर्विकारपणे म्हणाली

त्यावरटुकार हा तुमचा आवडता शब्द आहे काअसं म्हणून तो पुन्हा हसला.

मी इंडोलाॅजी ची विद्यार्थिनी आहे आणि इथे या मंदिराचा अभ्यास करण्यासाठी आलेयअसं म्हणून ती जायला निघाली.

अच्छा म्हणजे मढी उकरायचं काम करता तर तुम्ही!’

यावर मनवा भलतीचं चिडली.. आधीचं रोहनच्या बोलण्यामुळे ती खंतावली होती,

लिसन मिस्टर तूम्ही जे कोणी आहात.. डोन्ट यू डेअर इन्सल्ट माय प्रोफेशन.. इट इज अॅज इम्पाॅर्टन्ट ॲज युअर्स.. गाॅट इट?’

हो अर्थात! पण मग दुसऱ्यांची टर उडवताना तुम्हीही ह्याचा विचार नक्की करत जा!’ अनिकेत शांतपणे म्हणाला

आपलं आधिचं बोलणं आठवून मनवा थोडीशी नरमली आणि तिच्या लक्षात आलं, आपण वड्याचं तेल वांग्यावर काढलंय!

मग ती त्याला साॅरी म्हणाली,

त्यावर तो तिला म्हणाला,

तुम्ही नेहमीच अशा चिडलेल्या असता की आज काही विशेष आहे?!’

आणि मग यावर ते दोघेही हसले..


त्याला बाय करुन निघाल्यावर नाही म्हटलं तरी मनवाच्या मनात विचार आलाचं, हे असं हलकं-फुलकं संभाषण रोहन सोबत होऊन किती काळ लोटला असेल..

तिची आणि रोहनची पहिली भेट केव्हा झाली हे आठवणं तिला तसं  कठीण होतं.. कारण कळायला लागल्यापासूनच्या तिच्या प्रत्येक आठवणीमध्ये तो होताच... कायम.. तो तिचा बालमित्र, वर्गमित्र, सवंगडी, प्रियकर सारं काही होता! शाळा संपल्यावर तिने चांगले मार्क्स असुनही कला शाखा निवडली आणि दोघांच्या करिअर च्या दृष्टिकोनातून वाटा वेगळ्या झाल्या. रोहनला पहिल्यापासूनच मॅनेजमेन्ट करायचं होतं सो तो काॅमर्स निवडणार हे साऱ्यांना ठावुक होतं. पण मनवा विषयी संदिग्धता होती. तिची हुशारी पाहून सर्वांना वाटायचं ही वडलांसारखी डाॅक्टर होणार म्हणून! पण दहावीनंतर कला शाखा निवडून तिने सगळ्यांना धक्का दिला होता. तिला तिची इतिहासाविषयीची ओढ जपायची होती. आणि म्हणून तिने प्रवाहाविरुद्ध जाण्याचं धाडस दाखवलं.

नंतर सारं ठीक होत गेलं. डीग्री मिळाल्यावर सगळ्यांच्या अपेक्षेप्रमाणे रोहन ने मनवाला प्रपोज केलं.. सारे आनंदात होते. आता सहा महिन्यानी, मनवाचं मास्टर्स झाल्यावर दोघांचं लग्नही ठरलेलं होतं. पण आधी लाईटली घेतलेलं मनवाचं हे इंडोलाॅजीस्ट बनायचं पॅशन रोहनला डोईजड वाटु लागलं, त्याच्या त्या पंचतारांकित आयुष्यात त्याला ते कमीपणाचंही वाटत असावं कदाचित.. पण त्या दोघांमध्ये एक अनामिक तणाव मात्र नक्कीचं निर्माण झाला होता!

रिक्शात बसल्यावर मनवाने डोळे मिटून घेतले, आणि रोहनच्या भाषेत तिला नक्की काय हवंय ते शोधण्याचा प्रयत्न करु लागली..
..... क्रमश:

टिप्पण्या

अनामित म्हणाले…
Mast....khup Chan lihile ahe....����
अनामित म्हणाले…
Awadle
Sanjeevani म्हणाले…
धन्यवाद!
अनामित म्हणाले…
Vijigisha awadla pudhil part take
Unknown म्हणाले…
Khup Chan...
Pudhacha part lavkarch vachayla aavdel :)
Sanjeevani म्हणाले…
Dhanyavad.. pudhche donhi parts blog var uplabdha ahet!
अनामित म्हणाले…
सुंदर कथानक ... शुभेछा!!

लोकप्रिय पोस्ट