विजिगीषा-२भाग-२


  बऱ्याचं वेळाने काहीतरी ठाम निश्चय झाल्यासारखी राजकुमारी वरदायिनी सभामंडपातून बाहेर आली. आणि पंचायतनातल्या पुर्वाभिमुख सूर्य मंदिरासमोर उभी राहिली, त्याच्या बरोबर मागे क्षितिजापाशी मावळतीचा सूर्य तळपत होता. तिने सूर्याला वाकून नमस्कार केला आणि ती त्या लाल-केशरी किरणांमध्ये न्हाऊन निघाली, जणु काही सूर्यदेवाने तिला तथास्तू असा आशिर्वादच दिला. तो ह्रदयात साठवत तिने डोळे उघडले आणि वळली.. समोर नवलेखा आणि कविराज उभे होतेचं!


कविराजांना उद्देशून वरदायिनी नेहमीपेक्षा ठाम स्वरात उद्गारली,

बोला कविराज, काय वार्ता?’

अपेक्षित प्रश्न ऐकून कविराज उत्तरले,

राजकुमारीजी, संपूर्ण नगरात विवाह वार्ता पसरवली गेली आहे. महालात विवाहाच्या तयारीसही प्रारंभ करण्यात आला आहे! आजच चालुक्याधीश आदित्येयांनी इकडे येण्यासाठी प्रस्थान केलं आहे, येत्या पौर्णिमे पर्यंत केंव्हाही ते नगरात दाखल होतील! त्यांच्या सोबत चतुरस्त्र सेना सुद्धा आहे! राज्याभिषेकानंतरची ही त्यांची पहिलीचं स्वारी असून लढता विजयश्री मिळाल्याने ते अतिशय प्रसन्न असल्याचंही ऐकिवात आहे!’


राजकवी असल्याने नीलवदन यांना दरबारातल्या इत्तंभूत वार्ता ज्ञात होत्या. आणि त्या येऊन राजकुमारींना सांगणं ते त्यांचं आदि कर्तव्य मानत! वरदायिनीमुळेचं तर त्यांना त्यांचं पद मिळालं होतं! संस्कृतचं प्रभूत्व असलेल्या राजदरबारात राजकुमारीने या  प्राकृत भाषेत काव्य करणाऱ्या नवोदित कवीला मानाचं स्थान दिलं होतं. अर्थात त्याचं काव्यही अप्रतिमच होतं पण प्राकृत महरठ्ठ भाषेला तोवर तरी जनसामान्यांच्या बोली व्यतिरिक्त कुठेही स्थान नव्हतं पण वरदायिनीने तिला संस्कृत जडत्वाने भारलेल्या राजदरबारात आणून ते बहाल केलं! तिच्यातल्या या अशा गुणांमुळेचं तर ती सामान्यांच्या ह्रदयावर राज्य करायची!


सारं वृत्त ऐकून वरदायिनी म्हणाली,

अरे वा! आनंदाचं वातावरण आहे तर चोहीकडे.. कविराज, ते तसंच राहिल याची काळजी घ्या! आणि तुमचं इथे येणं सध्यातरी गुप्त ठेवा.’

नवलेखा.. महालात कळव, राजकुमारी विवाहास तयार आहेत!’


आणि पुन्हा कविराजांकडे वळुन, एक दीर्घ श्वास घेऊन तिने त्यांना विचारलं,

आम्ही योग्य तेच करत आहोत ना कविराज?’

तिच्या बोलण्याचा रोख त्यांना लगेच उमगला, जरासं थांबून हातातलं पलाश पुष्प तिला देत ते म्हणाले,


पलाश रंगी, पाषाण शयनी

गर्भनाळेतुनी आवतरली  मृगनयनी ।

रक्ताभिषेक शिवसूर्यचरणीं

सुभग शुचित मंगल ही वरदायिनी ।।


त्यांचं काव्य ऐकून वरदायिनी ओळखीचं हसली. तिने सांगता तिचा विचार कविराजांनी ओळखला होता.

ती त्यांना म्हणाली,

चला तर मग, वेळ कमी आहे! गर्भ नाळ त्वरित स्वच्छ करुन घ्या!’

ती आज्ञा उमगुन कविराज लगोलग कामाला लागले. सोबत काही विश्वासाची माणसं घेऊन ते मंदिराच्यागर्भगृहाकडे निघाले.


नवलेखा कडुन मिळालेला निरोप ऐकून महालात आनंदाचं वातावरण पसरलं. महाराज मणिचंद्रांना वाटतच होतं, चालुक्य कुलाची थोरवी ऐकून राजकुमारी विवाहास नक्की तयार होईल. तेही आता निश्चिन्त झाले. पण महामात्यांच्या मनात मात्र अजुनही शंकेची पाल चुकचुकत होती, ऐनवेळी राजकुमारींनी काही दगा फटका करु नये म्हणून त्यांच्या पाळतीवर त्यांनी मणसं ठेवली. आणि विवाहादी विधींच्या तयारीसाठी तसेचं चालुक्याधीशांच्या स्वागतासाठी राजकुमारींनी लवकरात लवकर महालात परतावे अशीविनंतीहीसेवकांकरवी त्यांनी वरदायिनी ला केली!

हे सारं तिला अपेक्षितंच होतं. ती महामात्यांना पूर्णत: जाणून होती, त्यांची धाव कुठवर जाणार हेही तिला ठाऊक होतं!

त्यामुळेचं तिने अचूक आज्ञा कविराजांना आधीचं देऊन ठेवल्या होत्या. आता तिच्यावर जरी पाळत असली तरी कविराज आणि नगरीतले तिचे विश्वासू त्यांची भूमिका अचूक निभावणार याची वरदायिनीला खात्री होती! हे सर्व मार्गी लावून मग दुसऱ्या दिवशी ती महालात परतली. आता राजकुमारी डोळ्यांसमोरच असणार असल्याने महामात्यही थोडेसे निश्चिंत झाले आणि विवाहाच्या स्वागताच्या तयारीत व्यग्र झाले

त्यांना कुठे ज्ञात होतं वरदायिनी काहीही करता सर्व काही करतेय ते..


.....


दुसऱ्या दिवशी थोडंसं लवकरचं, ठरलेल्या वेळेच्या आधी मनवा मंदिरात आली. रात्रभर तिला झोप म्हणावी तशी आलेली नव्हतीचं.. एकीकडे रोहन आणि दुसरीकडे मंदिर.. दोन टोकांचे हे दोन विचार तिच्या डोक्यात ठाण मांडून बसले होते. शेवटी ती उठली आणि सोबत तिने आणलेल्या नोट्स उघडल्या, कुठे काही दुवा सापडतोय का पाहण्यासाठी. तेव्हा, गुप्तोत्तर कालीन कवी आणि काव्य या विषयावरील जुन्या कुठल्या तरी लेक्चर मध्ये काढलेल्या नोट्स तिला वहीत दिसल्या. त्यातल्या एका काव्य तुकड्याने तिचं लक्ष चांगलंच वेधून घेतलं. त्या ओळी वाचल्यावर तिला काहीतरी क्लिक झाल्या सारखं वाटलं.. तिने त्या नोट्स पूर्ण वाचुन काढल्या. प्राकृत मराठीचा अंश असलेली ती रचना होती चालुक्यकालीन कवी नीलवदन यांची,


पलाश रंगी, पाषाण शयनी

गर्भनाळेतुनी आवतरली  मृगनयनी ।

रक्ताभिषेक शिवसूर्यचरणीं

सुभग शुचित मंगल ही वरदायिनी ।।


पलाश.. पाषाण.. शिव.. सूर्य.. हे सगळं नक्कीचं तिच्या त्या शिवमंदिराशी संबंध सांगणारं वाटलं होतं. भारतात सूर्य मंदिरं अगदी बोटांवर मोजण्याइतकी आहेत. त्यात पळस, पाषाण.. म्हणजे आता तिला खात्रीचं वाटू लागली की या ओळींमधले शिवसुर्य म्हणजे हे आपलं मंदिरचं! पण त्या ओळींचा अर्थ काही तिला लागेना. गर्भनाळेतुनी म्हणजे? आता तिला हे कोडं सोडवण्याची प्रचंड घाई झाली. त्यामुळेच सकाळी लवकर आवरुन ती मंदिरात येऊन पोचली होती, प्रोफेसर प्रकाश खांडेकरांची वाट पहात. प्राचीन भारतातील कला आणि स्थापत्य या विषयातले ते तज्ञ होते. मनवाची या विषयातली तळमळ पाहुन त्यांनी तिला मार्गदर्शन करायचं ठरवलं होतं.. 

या सगळ्या विचारांमध्ये गढलेली असताना तिचं लक्ष मंदिराच्या बाह्य भिंतीवरच्या सगळ्यात तळाशी असलेल्या शिल्प पट्टी कडे गेलं, त्यावर हत्तीची एकासारखी एक सलग तोंडं कोरलेली होती. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या सगळ्या हत्तीची सोंड मात्र कोणीतरी नंतर छाटल्यासारखी दिसत होती.. तिला गम्मत वाटली, तिने पूर्ण मंदिराला प्रदक्षिणा मारून पाहिलं, सगळ्या हत्तीची सोंड छाटलेली होती, शिवाय एक.. गर्भगृहाच्या मागच्या भिंतीवर मधोमध येणारा हत्ती आणि त्याची सोंड दोन्हीही सुस्थितीत होते. या गोष्टीचा उलगडा काही तिला होईना. कोणा परधर्मीय आक्रमकाने नंतर मंदिराची विटंबना करण्यासाठी म्हणून हे केलेलं असेल का अशी शंका तिच्या मनात आली पण मग लगेच तिला वाटलं, विटंबना करायचीच असती तर त्यांनी शिवलिंगाची केली असती, मंदिर उद्ध्वस्त केलं असतं पण ते तसं नव्हतं, हे काहीतरी वेगळंच असलं पाहिजे असं म्हणत ती निरखून त्या हत्तींकडे पाहत होती तेवढ्यात तिच्या कानांवर ओळखीचा आवाज पडला,


'आज भल्या सकाळीच उठून निरीक्षण चालू आहे!' गळ्यात कॅमेरा अडकवलेला अनिकेत तिच्या मागे उभा होता. 

वळून त्याच्याकडे पाहत जरा आश्चर्यानेच ती म्हणाली,

'अरे, तुझं शूट तर संपलं नं कालच!'

'हो ते संपलं कालच.' तो म्हणाला. 

'मग आज पुन्हा इथे काय सहल म्हणून आला आहेस वाटतं!' 

जरासं हसून अनिकेत म्हणाला,

'काल जे शूट मी केलं ते पैशांसाठी, आणि आज जे मी करणार आहे ते माझ्या स्वतःसाठी! या मंदिराने का कोणास ठाऊक वेड लावलंय मला. आज सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच्या प्रत्येक फेज मधले याचे फोटोज काढायचेत मला आणि ड्रोन ने थोडंसं टाइम लॅप्स पण शूट करायचंय म्हणून आलोय.. आज सुद्धा! तसा मी नेहमीचं येत असतो इथे.'

'ओह दॅट्स नाईस! गो अहेड देन..' मनवा उत्तरली. 

'Yes off course, I'm going ahead. but it seems like you are stuck somewhere and struggling to find a way out!'

अनिकेत तिच्याकडे रोखून पाहत तिला विचारत होता. त्यावर थोडंसं दचकुनच मनवाने विचारलं,

'म्हणजे?' तितक्यात मागून कानावर आवाज आला,


'हॅलो मनवा!', तिने मागे वळून पाहिलं तर प्रोफेसर खांडेकर समोर उभे. तिने गडबडून त्यांना नमस्कार केला आणि म्हणाली,

'हॅलो सर! नाईस टू मीट यू! मी तुमचीच वाट पाहत होते.'

तिला हसून त्यांनी उत्तर दिलं आणि त्यांची नजर अनिकेत कडे गेली, मग मनवाने त्यांची आणि अनिकेत ची एकमेकांशी ओळख करून दिली!

आणि मग तो सारा परिसर फिरुन तिथले बारीक बारकावे तिला समजाऊन सांगताना, त्या पडक्या तटबंदीकडे आणि एकूणच मंदिराच्या दुरवस्थेकडे पाहत प्रोफेसर म्हणाले,

'लुक ॲट द मिझरी! हा इतका प्राचीन ठेवा आहे आणि त्याची हि अवस्था! मी आजवर शेकडो पत्रं पाठवली, पण काही उपयोग झाला नाही. इथे खरंतर संशोधनाला खूप वाव आहे पण इंस्टिट्यूट लक्ष द्यायला तयार नाही.'


मनवाने मग सरांवर प्रश्नांचा भडीमार केला. तिच्या सगळ्या शंका ती त्यांना विचारू लागली. अगदी मंदिराच्या वादग्रस्त कालावधी पासून, कवी नीलवदन चं काव्य ते हत्तींच्या तुटलेल्या सोंडेपर्यंत सगळे प्रश्न तिने त्यांना विचारले. आणि मग तिच्या लक्षात आलं कि त्यांच्याकडे पण या सगळ्यांची समाधानकारक उत्तरे नव्हती. कारण यावर आजवर काही संशोधनच झालेलं नव्हतं. कवी नीलवदन विषयी मात्र बरंचसं त्यांनी तिला सांगितलं, तो सेवण राज्याशी निगडित असावा असं त्यांच्या बोलण्यातून तिला जाणवलं, पण ठामपणे काही बोलावं असे पुरावे उपलब्ध नव्हते. तुटलेल्या सोंडेंविषयी त्यांनी सांगितलेली कथा तिला फारच रंजक वाटली. आजूबाजूच्या प्रदेशामध्ये लोक हि कथा एकमेकांना सांगतात, पण ती दंतकथा असावी कारण त्यासंबंधी काही पुरावे प्राप्त नसल्याचंही ते म्हणाले. पूर्वी कोण्या एका राजकुमारीने इथल्या हत्तीच्या सोंडेमध्ये दुर्मिळ हिरा लपवला होता म्हणे, तो शोधण्यासाठी  काही चोरांनी सगळ्याच हत्तींच्या सोंडी छाटल्या अशी ती कथा होती. त्या राजकुमारीचं नाव तिने सरांना विचारलं . पण ते म्हणाले, त्या राजकुमारीच माहित नाही पण या प्रदेशात ज्या सेवण वंशाचा उदय झाला त्या वंशात मात्र एक हरहुन्नरी राजकुमारी होऊन गेली, वरदायिनी नावाची. पण काही दुर्मिळ उल्लेखांशिवाय तिच्याविषयी काही जास्त माहिती उपलब्ध नाही असं ते म्हणाले. 

आणि मग मनवाला एकदम सगळं लिंक होत असल्याचं जाणवलं.. सेवण राज्य.. राजकुमारी वरदायिनी.. कवी नीलवदन.. हे मंदिर.. आणि ते काव्य..

पण गर्भनाळ म्हणजे काय? तिला या कोड्याचा उलगडा पडेना. प्रोफेसर खांडेकरांनाही या गोष्टी खूपचं इंटरेस्टिंग वाटल्या. आपण याचा नक्की पाठपुरावा करु असं ते मनवाला म्हणाले..

इतक्यात अनिकेत धावत त्यांच्यापाशी येताना त्यांना दिसला..

‘मनवा चल लवकर तुला काहीतरी दाखवाचंय..’

तो धपापत बोलत होता.

‘अरे पण काय झालं, तु असा पळत..’

तिचं बोलणं मध्येचं तोडत, तुम्ही चला दोघेही लवकर म्हणत तो दोघांनाही गर्भगृहाकडे घेऊन गेला.

गर्भगृहात गेल्यावर मात्र दोघेही अवाक् झाले!

शिवलिंगाच्या अग्नेयेला कोपऱ्यात, पुरातत्व विभागाने डागडूजी करताना घातलेल्या फरशीचा एक तुकडा भंगल्या सारखा दिसला,  म्हणून त्याला जवळून पाहण्यासाठी अनिकेत कोपऱ्यात जात असताना त्याचा पाय निसटला आणि तो जोरात त्याचं भंगलेल्या फरशीवर पडला. आणि आधीचं तडा गेलेली ती फरशी तुकडे होऊन सरळ हातातचं आली. ती कोणाच्या पायात घुसू नये म्हणून तो तुकडे गोळा करू लागला. उंदरांमुळे की काय कोण जाणे पण खालचा थर त्याला जरासा पोघर वाटला. त्याने हाताने तिथली माती बाजूला केली. बरीच माती बाजूला केल्यावर त्याला खाली एक लालसर दगड दिसला. कुतूहलाने त्याने अजून उकरुन पाहिलं तर खरंच तिथे चौकैनी आकाराचा आडवा लाल दगड होता. आणि नीट पाहिल्यावर त्याला जाणवलं, मंदिरातले इतर ठिकाणचे दगड

जसे एकात एक इंटरलाॅक्ड आहेत तसा हा नाही. हा मातीत रुतून बसलाय. अजून थोडी माती बाजूला करुन त्याने तो दगड जरा हलवला. तर काय आश्चर्य! तो चांगला हलत होता. आजूबाजूचं उकरुन जरा मोकळं केलं तर सहज सुटून वेगळा होईल असा. आणि मग त्याच्या लक्षात आलं हे काहीतरी वेगळंच आहे. मग तो धावत जाऊन मनवाला घेऊन आला.

मनवा आणि प्रोफेसर खांडेकर यांच्या लगेचं लक्षात आलं की ते एका भुयाराचं ओपनिंग आहे. आणि ते विस्मयाने भरुन गेले. मंदिराच्या गर्भगृहात चक्क एक भुयार होतं!

खांडेकरांनी लगोलग चार-दोन फोन केले आणि दुसऱ्या दिवशी पुरातत्व विभागाची टीम मंदिरात हजर झाली.

पण इकडे मनवा मात्र चांगलीचं चकित झाली होती.. तिच्या मनान नकळत प्रश्न उमटला.. ‘गर्भ’नाळ म्हणजे हे गर्भगृहातलं भुयार तर नसेल ना?


...... क्रमश:


टिप्पण्या

अनामित म्हणाले…
पुढच्या भागाची वाट पाहत आहे

लोकप्रिय पोस्ट