यमीचं लग्न! - भाग २


   लग्नाची बैठक आटोपून पद्माकरराव, खेडकर काका, सुमन काकू, मोठे अण्णा आणि दिनू परत आले. त्यांची चाहूल लागताच घरातले सगळे एकेक करून हॉल मध्ये गोळा व्हायला लागले. बैठकीत काय घडलं असेल, ठरलं असेल लग्न की बिनसलं असेल याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली होती. यमी सुद्धा हळूच येऊन कोपर्‍यात उभी राहिली. सुलभा काकूंनी सगळ्यांना पाणी दिलं. सुमन काकुंचा चेहरा थोडासा पडलेलाच होता. त्यांना सुलभा काकू काही म्हणणार इतक्यात खेडकर काका कोपर्‍यात उभ्या असलेल्या यमी कडे पाहून म्हणाले,

“यामिनी बाई आता तुम्ही भाटकरांच्या देशमुख होणार बरका! गोडाचं करा पाहू आता काहीतरी!”

यमी आतून खरतर लाजलेली असते. पण वर-वर काहीचं न घडल्या सारखं दाखवून नुसतं हो म्हणते.

“म्हणजे ठरलं का?” सुलभा काकू विचारतात.

त्यावर पाण्याचा घोट घेऊन खेडकर काका म्हणतात, (त्यांच्या चेहर्‍यावर मोहीम फत्ते केल्याचा आनंद असतो. आणि साहजिकच नाही का ते? आपल्या ओळखीतल्या दोन उपवर मुला-मुलींना हेरून दोन्ही घरांपूढे तसा प्रस्ताव ठेऊन, पाहण्याचा कार्यक्रम उरकून, बैठकीच्या अत्यंत खडतर परीक्षेला सामोरं जाऊन एखादं लग्न जुळवण ही काही खायची गोष्ट नाही! त्यासाठी समस्त मध्यस्थ मंडळींमध्ये असतात तशी पराकोटीची स्किल्स असावी लागतात!)

“हो ठरलं. सालंकृत कन्यादान करणार आहेत पद्माकर राव!”

सुलभा काकूंच्या भुवया उंचवतात. त्यावर ओशाळलेल्या चेहर्‍याने सुमन काकू म्हणतात,

“तरी मी म्हणत होते, आधीच बोलून बसू नका सगळं.. पण ऐकतायत ते हे कसले! त्या लोकांना काय असाच हवं होतं. मी काय म्हणते, ते असतील हो तालेवार.. पण आपण आपल्याला झेपेल तेवढच नको का करायला!”

त्यावर जवळच्या पंचाने डोक्यावरच्या, समोरच्या अर्ध्या टकलावरचा घाम पुसत पद्माकर राव म्हणतात,

“यमी एकुलती एक लेक आहे आपली सुमन! एवढं करायलाच हवं की. शिवाय चांगलं स्थळ हातच जाऊ नये म्हणून कबुल झालो लगेच. पोरीच्या सुखाचा प्रश्न आहे शेवटी. आणि हुंडा कुठे मागितलाय त्यांनी. मुलाचे कपडे, येण्या-जाण्याचा खर्चही त्यांचा तेच पाहणार आहेत ना!”

यावर मग यमीकडे पाहून सगळ्यांनी तो विषय सोडून दिला.

सुमन काकू हातातला ग्लास खाली ठेऊन, सुलभा काकूंना म्हणल्या,

“सुलभा, येता येता नारायणदेवांशी बोलून आलोय आम्ही. उद्याचा दिवस चांगला आहे म्हणे. आपण उद्याच लग्नाचा मुहूर्त उरकून घेऊ. इंदुकाकूंना म्हणावं, गाणी तयार ठेवा मुहूर्ताची.. त्यांना मोठी हौस आहे.”

माळावरच्या पिसाटलेल्या वळूच्या अंगात जसं वैशाखाचं वारं शिरतं अगदी तसचं घरात एखादं लग्न ठरलं की बायकांच्या अंगात लग्नाचं वारं शिरतं. मग ते लग्न उरकून घरी परतेपर्यन्त त्यांना दुसरं काहीही दिसत नाही.

दुसर्‍या दिवशी शेजार-पाजारच्या सार्‍या बायकांच्या हजेरीत मुहूर्ताचा कार्यक्रम रंगतो. यमी साडी सावरत पूजेला बसते. मांडवाच्या गं दारी.... इंदु आजी त्यांच्या तारसप्तकातल्या आवाजात, गळ्याची तार तुटेपर्यंत (आपण जणू संधी न मिळालेली लता मंगेशकरचं आहोत अशा आवेशात) एक हात जात्याला लाऊन मुहूर्ताची गाणी सुरू करतात. मग चहा/दूध पित पित, लग्न कसं ठरलं? सोनं किती तोळे घालणार? मुलाचा फोटो पाहू! इ.इ. चर्चा तोंडी लावत त्या मागाशी जात्यात दळलेल्या पिठाचा हळद लावून गणपती तयार होतो. आणि त्याची पूजाही पार पडते.

लग्नसराई तोंडावरच आलेली असल्याने, जास्त वेळ कशाला दवडा म्हणत दोन महिन्यांवरचीच तारीख देशमुखांनी काढलेली होती. त्यामुळे आता समस्त भाटकर फॅमिली कंबर कसून कामाला लागते. तालुक्याचं कार्यालय बूक होतं. आचारी ठरतो. मेनूचा विषय मात्र दिनू एक हाती सांभाळतो. दिनू म्हणजे पद्माकर रावांचा मोठा मुलगा. तो पुण्यात इंजिनियर असतो. पुण्यात राहत असल्यामुळे आणि वर इंजिनीअर असल्यामुळे त्याला सगळ्यातलं सगळं इतरांपेक्षा जरा जास्तचं कळतं यावर सार्‍यांचच एकमत असतं. मुख्य मुख्य गोष्टी मार्गी लावून सुट्टी संपल्याने तो परत पुण्याला जायला निघतो. त्याच्या बायकोला, नंदिनीला, मात्र सूमन काकू तयारी साठी म्हणून थांबवून घेतात. एकुलत्या एक नणंदेचं लग्न नाही का!!

दरम्यानच्या काळात इकडे सुरेशच्या मार्फत यमी आणि दिनेशमध्ये मोबाइल नंबरची देवाण-घेवाण झालेली असते. आठवड्याभरातचं व्हाटसप्प चॅट ते तास अन तास चालणारे फोन कॉल्स अशी त्यांची प्रगतीही होते. यमी फूल टू सिरीयल मोड मध्ये असते. साड्या नेसून, भांगात सिंधुर वगैरे भरून, हातात भरपूर बांगड्या घालून सर्वगुणसंपन्न बायकोची’, सुनेची किंवा बहूची भूमिका वठवण्याची मनोमन तिची जोरात तयारी चालू असते. त्या सिरियल मधल्या हिरोंना पाहून तिच्या मनात तयार झालेल्या आदर्श नवर्‍याच्या भूमिकेत दिनेशला ती पाहू लागते. दिनेश सुद्धा बायकोची त्याने रंगवलेली प्रतिमा यमीवर चिकटवून ती तशीच आहे असं मानून चालू लागतो. उगाच चार-दोन इंग्लिश सिनेमे, ट्रेंडिंग वेब सिरिज किंवा मग इकनॉमिक टाइम्स वगैरे दर्जेदार शब्द तिच्याकडे फेकून तो तिच्यासमोर शायनिंग मारण्याचाही प्रयत्न करतो.

आता भाटकरांची गाडी येऊन थांबते पाहुण्यांची यादी आणि लग्नाचा बस्ता या अतिशय महत्वाच्या आणि सेंसिटीव्ह विषयावर! रात्रीची जेवणं उरकून सगळे बैठकीत जमा होतात. सुरेश हातात वही-पेन घेऊन यादी करायला सज्ज असतो. वहीच्या पानावर श्री लिहून सुरुवात होते. आधी देशमुखांकडची यादी केली जाते. त्यात मग प्रत्येक नावागणिक त्या-त्या व्यक्तीच्या स्वभाव विशेषांचाही उद्धार केला जातो. मुलाची मामी नं, खोचकच आहे थोडी!’, त्या कुठल्याशा अमेरिकेच्या आते की मामे बहिणीचं नाव लिही बाबा.. फारच कौतुक सुरू होतं तिचं आणि त्या अमेरिकेचं! सारखी वाक्य हमखास ऐकायला येतात. आणि मग गाडी येऊन ठाकते भाटकरांच्या नातेवाईकांवर. आणि मग जवळचे नातेवाईक नोंदवून झाल्यावर बाकीच्यांची वर्गवारी होते ती, कोणी-कोणी त्यांच्या कार्यात आपल्याला निमंत्रण दिलं होतं किंवा कोणी आपल्याला कसा आहेर केला होता याची उजळणी करूनच.. ती सोलापूरच्या दिवेकरांची शांता नं? काही नको तिला इतका मान-पान द्यायला.. तिच्या मुलाच्या लग्नात साधं पोलिस्टरचं नव्वार पातळ देऊन बोळवण केली होती तिने माझी. आणि आपण मात्र चांगला भरजरी आहेर नेला होता”, साहणेवर वाती वळत-वळत इंदु आजींनी उगाच आपलं एक मत पेरून टाकलं.

“भरजरी कुठला इंदु काकू, जोशांच्या लग्नातलीच साडी फिरवली नव्हती का आपण तिकडे!” सुमन काकू उत्तरतात.

“अगं म्हणजे चांगलीच होती नं पण साडी. आरपार दिसणारं पोलिस्टरचं तर नव्हतं नं तिचं सूत!” इंदु आजी सारवा-सारव करतात.

आणि मग अशा तर्‍हेने रडत-पडत याद्या एकदाच्या तयार होतात. आणि भाटकरांची बस्त्याची खरेदीही नंदा-भावजईंच्या मांनापमान नाट्यांसाह यथासांग पार पडते.

दिवसामागून दिवस पटापट जातात. ओलं रुखवत, सजावटीचं रुखवत, साखरेचं रुखवत इ.इ. प्रकार तयार होतात. पुण्या-मुंबईत कॉंट्रॅक्ट देतात तसं अजूनतरी खेडोपाडी नाही. शक्यतो निम्म रुखवत तरी घरीचं बनवलं जातं!

इकडे दिनेश हल्लीच्या ट्रेंड नुसार प्री-वेडिंग फोटोशूटचा प्रस्ताव यमी समोर ठेवतो. आदर्श यमी घरच्यांना विचारून सांगते असं म्हणते. आणि समस्त भाटकरांपूढे हा विषय गेल्यावर हे रे काय आणि नवीनच?’, आमच्यावेळी असलं काही नव्हतं बुवा! अशी वाक्य हवेत तरंगू लागतात. शहरातल्या लोकांसाठी या गोष्टी आता नवीन राहिलेल्या नाहीत, पण खेड्यात राहणार्‍या, जुन्या विचारांच्या भाटकरांसाठी हा विषय पुरेसा नवीन होता. पण कसतरी दिंनूच्या मध्यस्थीने यमीला परवानगी मिळते. आणि सुरेशच्या उपस्थितीत, दिनेश-यमीचं प्री-वेडिंग फोटोशूट’, भर उन्हाळ्यात हातात छत्री घेऊन किंवा आयुष्यात कधी नं घातलेला वन-पीस घालून आणि तर्हे-तर्हेच्या पोजेस देऊन पार पडतं.

दरम्यान पत्रिका छापून येतात. त्या फोल्ड करून, नावं, पत्ते लिहून पोस्टात टाकण्याच काम सुरेश व्यवस्थित पार पाडतो. एकेक करून पाहुणे-मंडळी गोळा होऊ लागतात. नंदिनी वहिणी जबाबदारीने यमीचं पार्लर, मेहंदी, मेक-अप इ.इ. आघाड्या सांभाळते.

आणि हां-हां म्हणता लग्न अगदी उद्यावर येऊन ठेपतं!

घरभर पाहुण्या-रावळ्यांचा गोतावळा जमा झालेला असतो. आहेराच्या पेट्या नावांच्या चिठ्ठ्यांसकट कार्यालयात जाण्यास तयार असतात. आणि मग तिन्हीसांजेला भरल्या अंत:करणाने यमीसकट सगळे कार्यालयात येऊन दाखल होतात.

सीमान्त-पूजन मध्यरात्रीच्या आधी कधीच कारायचं नसतं या सार्वकालिक नियमाला शिरोधार्य समजून रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम चालतो. नवर्‍या-मुलाचे, त्याच्या आईचे, बहीणींचे पाय धुण्याचा, आजच्या काळात शून्य सिग्निफीकंस असलेला विधी दोन्ही बाजूंकडून अगदी यथासांग पार पाडला जातो. आणि मग रात्री खूप उशिरा कार्यक्रम आटोपून मुलाकडची मंडळी, त्यांना नेमून दिलेल्या खोल्यांमध्ये आणि मुलीकडची मंडळी, जागा मिळेल तिथे आपली पथारी पसरतात आणि निद्रधीन होतात.

दुसर्‍या दिवशी सकाळी, उगवत्या सूर्यासोबत सनईचे सूर कार्यालयात प्रवेशतात आणि ज्या दिवसाच्या तयारीत दोन्ही घरे गेल्या दोन महिन्यांपासून अव्याहत कार्यरत होती तो दिवस एकदाचा उगवतो! पटापट आन्हिके उरकून मंडळी नाश्त्यासाठी धाव घेतात. सुमन काकू आणि सुलभा काकूंना हुश्श! म्हणायलाही फुरसत नसते. रुखवताची मांडणी नंदिनीवर सोपवून त्या गौरीहराच्या पूजेच्या तयारीसाठी धावतात. आणि  थोडफार काहीतरी पोटात ढकलून भरगच्च मेक-अप करून यमी गौरीहर पुजायला बसते. इकडे दिनेश घोड्यावर बसून देवळात निघतो.

प्रत्येक लग्नात नवर्‍या-मुलाच्या मित्रांचा असा एक गट असतो, जो फक्त वरातीच्या वेळी बेफाम नाचण्यासाठीच जन्मलेला असतो. कारण हे मित्र नंतर फारसे कधीच दिसत नाहीत. पण बॅंडवाल्याच्या उरावर बसून नागीण डान्स करत भटजींनी काढलेला मुहूर्त टाळण्यात ते अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात. इथेही काही वेगळं चित्र नव्हतं. आणि मग कसातरी त्यातून वाट काढत दिनेश कार्यालयाच्या दाराशी येऊन पोचतो. सुमन काकू त्याला ओवाळतात. आणि तो स्टेज कडे जायला निघतो. इकडे स्टेज वर, मुलीचे मामा.. मुलीचे मामा.. मुलीला घेऊन लवकरात लवकर या वगैरे उत्साही घोषणा चालू असतात.

शेवटी गंगा.. सिंधु.. सरस्वती.. च यमुना... च्या घोषात वधूवरांच्या अंगावर मंगलाष्टका कमी आणि मंगलाक्षता जास्त पडायला सुरुवात होते. आणि इंडियन आयडोल ची स्पर्धा रंगावी तशा थाटात एकेक करून हौशी गायक नातेवाईक आपापली गायनाची हौस भागवून घेतात. सुमन काकूंच्या डोळ्यात पाणी तरळतं. वधू-वराच्या गळ्यात हार पडतात आणि एकदाचं लग्न लागतं!

समस्त पुरुष मंडळी आता जेवणाकडे धावतात आणि समस्त बायका मंडळी अक्षता पडल्या नंतरची साडी नेसायला सरसावतात! सुमन काकू-सुलभा काकू आणि पद्माकर राव आहेराच्या देवाण-घेवाणीत अडकतात. तर स्टेज वर यमी आणि दिनेश पुन्हा तर्हे-तंर्हेच्या पोजेस देत फोटो काढून घेण्यात हरवून जातात.

हळू-हळू आहेर-माहेर उरकून, नव-जोडप्यासह फोटो काढून घेऊन लाडू-चिवडा-रिटर्न आहेर बॅगेत कोंबुन सारे नातेवाईक एकेक करून परतायला लागतात. कार्यालय रिकामं होऊ लागतं. मोजक्या जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत उरलेले विधी, विधिंसाठी म्हणून कमी आणि फोटोसाठी जास्त असे पार पडतात.

आणि मग येऊन ठेपतो यमीच्या पाठवणीचा क्षण.. सार्‍या भाटकरांच इतक्या दिवसांपासून गोळा केलेलं सारं अवसाण यावेळी गळून पडतं. आणि सगळ्यांचे डोळे ओलावायला लागतात. ओल्या डोळ्यांनी यमी सार्‍यांचा निरोप घेते आणि डोळ्यांदेखत आपली चिमणी उडून जाताना पाहून सुमन काकू आणि पद्माकर रावांचा कंठ खरोखर दाटून येतो..


- संजीवनी 

 वाचकांनी प्रचंड दाद दिलेली माझी कथा 'विजिगीषा' आता अमेझोन वर अतिशय अल्प दरात उपलब्ध आहे! विजिगीषा म्हणजे जिंकण्याची इच्छा.. महत्वाकांक्षा.. अशा दोन महत्वाकांक्षी मुलींची वेगवेगळ्या काळात घडणारी ही गोष्ट आहे.. अवश्य वाचा आणि अभिप्राय द्या!

 
<>

टिप्पण्या

अनामित म्हणाले…
Sundar lihila ahe Bhag 1 ani 2 Khup chan kalpile ani shabdat utravile ahet..
अनामित म्हणाले…
खूपच सुंदर... लग्नाच्या काळात, मुलीकडच्या लोकांच्या भावना मजेशीर पद्धतीने रेखाटल्या आहेत. :)

लोकप्रिय पोस्ट