महालक्ष्मीची गोष्ट आणि फेमिनीझम ! 

भाद्रपद महिना म्हटलं की घरोघरी लगबग सुरू होते गणपती बाप्पाच्या आगमनाची आणि मग गौरी म्हणजेच महालक्ष्मीच्या आवाहनाची.. आता घरोघरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा झालेलीच आहे.. पण गौरी आवाहन करण्या आधी देवी लक्ष्मीची मी वाचलेली एक सुंदर गोष्ट तुम्हाला सांगते. ही गोष्ट मी वाचली दुर्गा भागवतांच्या दुपानी या पुस्तकामध्ये! दुर्गा भागवतांविषयी काय बोलु.. त्यांचं काम, लिखाण, महितीसंग्रह आणि एकूण व्यक्तिमत्व पाहता त्या एका स्वतंत्र लेखाचा विषय आहेत. त्यांनी सांगितलेली ही लक्ष्मीची गोष्ट वाचल्यावर मला देवीचं ते स्वाभिमान जपणारं, खर्‍या भक्तांमध्ये रमणारं, रूढ संकेतांविरुद्ध जाणारं स्त्री-रूप खरोखर भावलं. आणि मला वाटतं, आपणही तिचं आवाहन, पूजन आणि विसर्जन करताना सजावट/नैवेद्य आदि गोष्टींमध्येच फक्त न रमता तिच्यातल्या स्त्रीत्वाची खर्‍या अर्थाने पूजा करत आपल्या स्वत:मधली देखील लक्ष्मी आणि सरस्वती सदैव जागृत ठेवायला हवी. पूजेच्या दिवशी पाटमाधवराणी आणि चिमादेवराणीची गोष्ट आपण वाचतोच. पण त्यासोबत ही गोष्टही ऐकलीच पाहिजे अशी आहे.

ही गोष्ट आहे ओरिसा मधली. तिथे जगन्नाथ पुरीच्या मंदिरात कृष्ण, सुभद्रा आणि बलराम यांच्या मूर्ती आहेत. त्यात लक्ष्मी मात्र नाही. तिचं मंदिर फारच दूर आहे. जगन्नाथ हा नारायणाचा अवतार, त्याच्या पत्नीला ओरिसा मध्ये लक्ष्मीच म्हणतात. तर तिची गोष्ट ही अशी..

भाद्रपद महिना होता. लक्ष्मीपूजन याच महिन्यात होते. तेव्हा लक्ष्मी जगन्नाथाला म्हणाली,

“देवा, माझी पुजा कोण कशी करतं ते मला पहायचं आहे आणि लोकांना आशीर्वाद द्यायचा आहे, तर मला जायची परवानगी द्यावी.”

“जा, पण सूर्यास्त व्हायच्या आत परत ये.”

ठीक आहे म्हणून लक्ष्मी निघाली. ती प्रथम ब्राहमणांच्या वस्तीत गेली, तिथे पूजेत बडिवार होता पण भक्ती नव्हती. मग ती व्यापार्‍यांच्या पेठेत गेली, तिथे तिला डामडौलाशिवाय काही आढळले नाही. मग ती जातीजातींच्या मोहोल्ल्यातून हिंडली, एकही स्त्री तिला कुठे भक्त म्हणण्यासारखी आढळली नाही. सार्‍या जणी स्वत:तच गर्क होत्या.. मी देवीसाठी हे केलं, ते केलं सांगण्यात मग्न होत्या. लक्ष्मीला वाईट वाटलं. ती चालतच राहिली नि अखेर चांडाळ-वाड्यात पोचली. तिथे मात्र एका घरात एक फाटके वस्त्र नेसलेली चांडाळ स्त्री तिला लक्ष्मी-पूजेत लीन दिसली. तोंडाने ती आपल्या बोलीत गाणे म्हणत होती,

माय लक्ष्मी,

मी चांडाळ वाड्यातली

तुच्छ चांडाळीण 

ना मला चांगलं बोलता येतं

ना मला काही समजतं

घरात धड भांडकुंडं नाही

नीट नैवेद्य नाही.

आई, पण मी भोळ्या भावानं

तुझी भक्ती करते,

रोज तुला आठवते.

आई दया कर,

माझी पूजा घे,

माझ्या गरिबाचा नैवेद्य गोड मानून घे.

आई कृपा कर.

मी दीन दुबळी

पण माझी भक्ती

माझी मनापासूनची भक्ती

तू जाणतेस ना?

लेकीवर दया कर.

चांडाळीण गात होती. फुलांच्या माळा मूर्तीला वाहत होती. डोळ्यातून आसवे गळत होती. पूजेत तन्मय झाली होती. लक्ष्मी प्रसन्न झाली. प्रगट झाली. त्या चांडाळणीला तिने आशीर्वाद दिला. तिने केलेल्या तांदळाच्या पिठाच्या गोड धिरड्यासारख्या नैवेद्याचा पिठा तिने चवीने खाल्ला आणि तिथेच बसून संतोषाने तो दिवस काढला. आनंदाच्या भरात तिला संध्याकाळचे भान राहिले नाही.

काळोख पडल्यावर ती मंदिरात परत आली. तोवर दूसरा प्रहर उलटला होता. जगन्नाथ आणि बलराम दोघेही क्रोधित होऊन तिची वाट पाहत होते. लक्ष्मी चांडाळवाड्यात जाऊन आली आहे हे त्यांना समजलं होतं.

लक्ष्मी दारात उभी होती, जगन्नाथ म्हणाला,

“तू घरात पाऊल टाकायचं नाही. मी तुला टाकलं आहे.”

“मी काय केलं?”

“चांडाळघरचं अन्न खाल्लस ना.. आता तुला मी घरात घेणार नाही तू चालती हो.”

“ठीक आहे. मी तुमची परवानगी घेऊनच गेले होते. मी खरे भक्त शोधायला गेले होते, ते चांडाळवाड्यात आढळले त्याला मी काय करू?” लक्ष्मी ने प्रतिप्रश्न केला.

“ते काही नाही. तू आत्ताच्या आत्ता इथून नीघ!” जगन्नाथ रागाने म्हणाला.

“बरं तर, तुम्ही सांगताच तर जाते मी. पण एक गोष्ट ऐका! मी गेले तर तुमचं सारं वैभव जाईल. तुम्हा दोघांना बारा वर्ष अन्न खायला मिळणार नाही. लक्ष्मीच्या कृपेनेच तुम्ही जेवत होता, चैन करत होता हे विसरू नका.” लक्ष्मी गेली. चांडाळवाड्यात पोचली. तिथेच सुरेख वाडा बांधून दासींबरोबर राहू लागली.

इकडे जगन्नाथ आणि बलरामाची अवस्था मात्र दयनीय झाली. घरातलं धान्यधुन्य, सोनंनाणं, दागदागिने नाहीसे झाले होते. पाण्याचे घडेही फुटून थेंबभर पाणीही प्यायला उरले नव्हते. त्यांच्या अंगावरचे कपडे मळके नि फाटके होते. घशाला कोरड पडलेली. पोटात भुकेचे काहूर माजलेले. ते गावात कोणी अन्न-पाणी देईल म्हणून हिंडू लागले. ब्राह्मण, क्षत्रीय, वैश्य, शूद्र कोणीही त्यांना ओळखले नाही. या दुर्दशेत बारा वर्ष लोटली.

शेवटी ते चांडाळवाड्यात आले. एक टूमदार वाडा दिसला. तिथे ते गेले आणि अन्न-पाण्याची याचना केली. लक्ष्मी आतच होती. तिने सुंदर पिठे केले. सुग्रास अन्न बनवले आणि सुगंधित पाणी देऊन दासीला बाहेर पाठवले. भोजनातले ते पिठे खाताना जगन्नाथाने ओळखले की, लक्ष्मीच केवळ असे पिठे करू शकत असे. आपण चांडाळवाड्यातले भोजन घेऊन बाटलो आहोत हे आता त्यांच्या मनातही आले नाही.

पुढे लक्ष्मीने त्यांना ओळख दिली. जगन्नाथ म्हणाला,

“लक्ष्मी, तू परत आपल्या मंदिरात चल”

लक्ष्मी म्हणाली, “मी इथेच कायम राहणार आहे. फक्त एक दिवस रथयात्रेच्या दिवशी मी मंदिरात येईन. पण माझा रथ वेगळा!”

पण लक्ष्मीने स्वीकार केल्यामुळे जगन्नाथाचे ऐश्वर्य त्याला परत मिळाले हे मात्र खरे.

जगन्नाथाने घराबाहेर काढलं म्हणून लक्ष्मी ना मुळूमुळू रडत बसली ना त्याने परत आपल्याला मंदिरात घ्यावं म्हणून कुठलं व्रत करत बसली. तिने तिचा स्वाभिमानही जपला, भक्तांचा मानही राखला आणि जगन्नाथाला संपत्ती परत देत मनाचा मोठेपणाही दाखवला! हे स्त्रीचं खरं रूप आहे. आणि याचं शक्तीरूपाची पुजा आणि आचरण व्हायला हवे.

स्त्रीचं स्त्रीत्व आणि शक्ती ही तिच्या स्वाभिमानात दडलेली असते. आणि तो आपण जपायला हवा. Simone de Beauvoir या ख्यातनाम फ्रेंच लेखिकेचं गाजलेलं वाक्य आहे, One is not born, but rather becomes, a woman!’ याचा अर्थ असा की, ‘स्त्रीत्वहे जीवशास्त्रीय, मानसशास्त्रीय किंवा बौद्धिक फरकांमधून जन्माला येत नसतं तर ते समाजशास्त्रीय आणि संस्कृतिक जडणघडणीतुन जन्माला घातलं जातं. म्हणजे मोठयाने हसू नये’, ‘हे करू नये’, ‘ते करू नयेइ. इ. स्त्रीने पाळायचे सामाजिक संकेत डोक्यात/जीन्स मध्ये घेऊन स्त्रिया जन्माला येत नसतात. त्यांना हळू-हळू तसं घडवलं जातं. त्या जन्माने/scientifically दुय्यम, submissive किंवा स्वयंपाकापलिकडे काही न कळणार्‍या वगैरे नसतात. आपल्या socio-cultural व्यवस्थेतून त्या तशा घडत जातात. आणि हे आपल्या देशातल्या स्त्रियांबद्दल नाही तर एकूण सगळ्याच संस्कृतींमधल्या सगळ्याच स्त्रियांविषयी आहे. पुरुषसत्ताक संस्कृतीने आखून दिलेल्या स्त्रीच्या आणि स्त्रीत्वाच्या व्याख्येमध्ये स्वत:ला फिट बसवण्यात आपण आपली आयुष्यं खर्ची घालतो.. पण क्षणभर थांबून आपण आपल्या दृष्टीने आपला विचार करून आपली व्याख्या तयार करायला हवीये.. याचा अर्थ पुरुषांशी भांडत बसणे हा नाही तर आधी स्वत:च्या मनातून आपण दुय्यम आहोत, स्त्री आहोत या गोष्टी काढून टाकणे हा आहे. आणि आपल्या लेकी-सुनांनाही तसं शिकवणे हा आहे. एकूण काय तर आपलं स्त्रीत्व हे अबलेच्यालेबलाखालून काढून सबलाया विशेषणाशी जोडणं हे स्त्रीचच काम आहे. ते पुरुषांकडे समान हक्कांची मागणी करून किंवा मोर्चे काढून किंवा व्रतं करून मिळणार नाही. 

तर यावर्षी महालक्ष्मीची षोडशोपचारे पुजा करताना मनात हाही विचार आणि हेही मागणं आपण तिच्याकडे नक्की मागुया..:)

 

दुर्गा भागवतांच्या पुस्तकाची लिंक खाली देतेय, अवश्य घेऊन वाचा!

 

 

 <>

टिप्पण्या

Unknown म्हणाले…
खूप छान 👌🏻👌🏻 जगातील कुठल्याही संस्कृती मध्ये स्त्री ही दुय्यम मानली जाते ह्याचं कारणच मला वाटतं की स्त्री मुळातच स्रृजनशील आणि कार्यक्षम आहे..प्रत्येक संस्कृती मध्ये overpower करण्यासाठी नियम , अटी तिला जास्त आहे. पण आपणच आपल्या निर्णय क्षमतेतून चांगल आत्मसात करू शकतो ...ही गोष्ट मला त्याची वाटली 👍🏻👍🏻👌🏻
Unknown म्हणाले…
👌👌खूप सुरेख लेखन.... कथा ही खूप छान आहे.
Sanjeevani म्हणाले…
मनापासून धन्यवाद 🙏🏻

लोकप्रिय पोस्ट