निर्वाण..

 


जड अंतकरणाने राचम्मा उठली. तिन्ही सांजेला तिला का कोणास ठाऊक अशात खूपच उदास वाटू लागलं होतं. ती उठून ओसरीवर आली. तिच्या वाट्याला आलेला तो वाड्याचा इवलासा कोपरा.. नेहमीच्या सवयीने झाड-झुड करून हात-पाय धुवून तिने दाराजवळच्या तुळशी समोर दिवा लावला. आणि पुन्हा ओसरीवर येऊन बसत कोपर्‍यातल्या जीर्ण लाकडी पलंगा खालचा कापूस घेऊन तिने वाती वळायला घेतल्या. तिची नजर समोरच्या पडक्या अर्ध्या भागाकडे गेली. कित्ती वर्षं लोटली, तो भाग तसाच पडीक पडून होता. तिला आठवत होतं तसं दहा-बारा वर्षांपूर्वी एकदा प्रभाकर येऊन त्याचा हक्क पुन्हा एकदा सांगून गेला होता. राचम्मा त्यावेळी त्याला हसून म्हणाली होती,

“प्रभाकरा, वाड्याचा हा माझा कोपरा माझ्यासाठी पुरेसा आहे. त्याहून अधिक काही नको मला. तुझे तात्या आल्यावर त्यांच्यासमोर कर हक्काच्या गोष्टी!”

यावर पुन्हा डोक्याला हात लाऊन काहीतरी बोलायला त्याने तोंड उघडलं पण त्याचा उपयोग नाही हे उमजून जायला निघाला. जाताना फक्त,

“ते कुंकू लावणं बंद कर आधी तू..!” इतकच म्हणून निघून गेला.

प्रभाकर तेव्हा गेला तो परत कधी फिरकला नाही. अधून-मधून राचम्माला वाटायचं, विचारपूस करावी का, ठीक असेल नं सगळं. पण तिने ती कधी केली नाही. करणार तरी कोणाकडे होती, आधीच इवलसं ते गाव अशात अजून ओकं-बोकं होत चाललं होतं. जुनी-पानी माणसं आणि जनावरं घेऊन निपचीत पडून असायचं. मागे राहिलेल्या राचम्माचा आणि विष्णुचा प्रभाकरानेही कधी विचार केला नाही. आपल्या वडिलांची दुसरी बायको इतकीच त्याच्यापुरती राचम्माची ओळख होती. राचम्मानेही त्याच्या वागण्याकडे कधी फारसं लक्ष दिलं नाही. तात्यासाहेबांनी तिला लग्न करून वाड्यात आणलं तेव्हा प्रभाकर मॅट्रिक होऊन जिल्ह्याला शिकायला होता. तात्यांचं हे वागणं त्याला मुळीच आवडलं नव्हतं. पण त्यांच्यासमोर काही बोलायची हिम्मत त्याच्यात नव्हती. मग त्याचा सगळा राग तो कायम राचम्मावर काढत आला. विष्णुचा जन्म झाल्यावर तर त्याने सारे संबंधच हळूहळू तोडून टाकायला सुरुवात केली होती. आणि मग नंतर तर काय सारं अघटितच घडत गेलं.

डोक्यात एकेक विचार येत गेले तसतशी राचम्मा सुन्न होत गेली. आजकाल तिचं असच व्हायचं. हातातल्या वाती मात्र यंत्रवत वळल्या जात होत्या. तेवढ्यात तिच्या लक्षात आलं, पिण्याच्या पाण्याचा हंडा रिकामा झालाय. ती लगबगीने उठली. अंधार व्हायच्या आत परसातल्या विहीरीचं पाणी शेंदून आणायला हवं. तिन्ही सांजेच्या त्या अंधुक प्रकाशात आपला थकलेला जीर्ण देह घेऊन ती निघाली. सगळा वाडा मोडकळीस आला होता. पूर्वी सखाराम आठवड्याला तेल-मीठ द्यायला यायचा तेव्हा अंगण-परस साफ करून जायचा. पण आता तोही येईनासा झाला होता. दारातच वाण सामान टेकवून निघून जायचा. किती वर्षं लोटली होती कोणास ठावूक, राचम्माने घराबाहेर पाऊलही ठेवलं नव्हतं. विष्णु गेला तेव्हा पडली असावी.. त्याच्यामागे धावत स्मशानापर्यन्त गेली होती. आणि तो भडाग्नि डोळ्यात घेऊन शून्यात पाहत परतली होती. विष्णु.. तिच्या काळजाचा तुकडा. तिचा आधार. तिला तो कायम निरागस, भोळा-भाबडा वाटायचा. पण सारं गाव मात्र त्याला वेडा विष्णु म्हणून चिडवायचं. त्याला जीव फक्त दोनच माणसांनी लावला. एक राचम्मा आणि दुसरे तात्यासाहेब! खरतर तो मतिमंद आहे हे समजल्यावर तात्यासाहेब खूप खचले होते. पण पोराकडे पाहून त्यांनी बळ एकवटलं.

कधीकाळी शेणाच्या सारवणाने लख्ख राहणारं आपलं परस असं धुळीत माखलेलं, पालापाचोळ्यात झाकलेलं पाहून राचम्माला खूप वाईट वाटायचं. पण तिच्याच्याने आता काही होत नव्हतं. शरीर थकलं होतं आणि त्याहून जास्त तिचं मन आता थकलं होतं. कसंबसं पानी शेंदून तिने कळशी भरली आणि परत ओसरीवर आली. आता तिला धाप लागली होती. खाली कळशी ठेऊन ती जोत्याला टेकली. आणि मग श्वास एकसारखा होईतो नुसतीच दाराबाहेर पाहत बसून राहिली. त्या दारातून कोणीही आत यायचं नाही आणि कोणीही बाहेर जायचं नाही. दारावरून जाणारे मात्र कुतुहलाने आत डोकावून जायचे. पूर्वी वेडा विष्णु दिसतोय का म्हणून पहायचे, आता वेड्या विष्णूची वेडी आई राचम्मा दिसतेय का म्हणून पाहतात. नवरा गेला तरी कुंकू लावणारी राचम्मा!

एकदा कोर्टाच्या कामासाठी म्हणून तात्यासाहेब जिल्ह्याला गेले ते परतलेच नाहीत. त्यांच्या एस टी ला अपघात होऊन ती नदीत वाहून गेली. काही प्रवासी सापडले, बरेचसे वाहून गेले. तात्यासाहेबांचा देह काही शेवटपर्यंत सापडला नाही. प्रभाकर ही बातमी घेऊन आला तेव्हा राचम्मा न्हाणीघरात विष्णुला आंघोळ घालत होती. विष्णु तेव्हा चांगला 15-16 वर्षांचा झाला होता. प्रभाकराने दिलेली बातमी ऐकून ती क्षणभर स्तब्ध झाली. क्षणभरच. पण लगेच भानावर येत तिने स्पष्ट सांगून टाकलं, जोवर त्यांचं पार्थिव पाहत नाही तोवर या गोष्टीवर मी विश्वास ठेवायची नाही! ना तिने तिचं कुंकू पुसलं ना कुठल्या क्रियाकर्मात सहभाग घेतला. काही घडलच नाही अशा आविर्भावात ती तशीच बसून राहिली विष्णुसोबत. तात्यासाहेब म्हणजे तिच्या जगण्याचा आधार. त्यांचं हे असं एकाएकी जाणं तिने शेवटपर्यंत मान्य केलच नाही. तिला वाटायचं ते आज ना उद्या नक्की परत येतील. तिचं हे वागणं पाहून प्रभाकरसकट सार्‍यांनी विष्णुप्रमाणेच तिलाही वेडं ठरवून टाकलं. प्रभाकर निघून गेला. गावानेही राचम्माकडे पाठ फिरवली. वाड्याकडे कोणीही फिरकेनासं झालं. एरवी तिच्या परसातल्या तर्‍हेतर्‍हेच्या, राचम्माने निगुतीने पिकवलेल्या भाज्या नेण्यासाठी आसपासच्या सार्‍यांची वाड्यात ये-जा असायची. दोन घर सोडून पलिकडच्या वाड्यातली शिर्क्यांची मधु तर परकर सांभाळत सारखी राचम्माभोवती पिंगा घालायची. राचम्मा तिला शेवंतीच्या फुलांची वेणी करायला शिकवायची. आता ते शेवंतीचं बनही सुकलं आणि मधुही येईनाशी झाली. सखाराम एके दिवशी तिच्या लग्नाची बातमी घेऊन आला. राचम्माला केवढा आनंद झाला होता. माहेरपणाला आलेल्या मधुला तिने बोलावणंही धाडलं पण, किती दिवस ती आलीच नाही. एकदा मात्र तिन्हिसांजेला चोर-पावली परसातून आली. राचम्माला काय करू अन काय नको झालं. विष्णूच्याही चेहर्‍यावर कित्ती दिवसांनी हसू आलं. हसू लागला की तो नुसताच हसत बसायचा. तात्या आले, तात्या आले म्हणून टाळ्या पिटायचा. त्याने त्याच्या डोळ्यात आणि राचम्माने तिच्या मनात तात्यांना जीवंत ठेवलं होतं. मधु आधी घाबरली. पण नंतर राचम्माने प्रेमाने दिलेला लाडू तिने आवडीने खाल्ला. जाताना राचम्माच्या हातातला कुंकवाचा करंडा पाहून मात्र ती बावरली. तिला राचम्माला दुखवायचं नव्हतं. पण विध्वेकडून ओटी भरून घेणंही तिला नकोसं वाटत होतं. काहीतरी निमित्त काढून ती तशीच आल्यापावली परत फिरली. आणि पुन्हा कधी फिरकली नाही.

 

कोणी येत नसताना ती आली यातच राचम्माला समाधान वाटलं. तिने डोळे मिटून मनापासून अखंड सौभाग्यवती भव! असा आशीर्वाद तिला दिला.

जोत्याला टेकलेल्या राचम्माच्या डोळ्यात कुठल्या-कुठल्या आठवणी दाटू लागल्या. लग्न होऊन पहिल्यांदा माहेर नसलेल्या माहेरी ती गेली तेव्हा तिच्या मैत्रिणी तुझा नवरा म्हातारा म्हणून तिला चिडवत होत्या. लहान वयात आई गमावलेल्या, साधारण रूपाच्या राचम्माशी तात्यासाहेबांनी लग्न केलं ते केवळ घराला कोणीतरी बाईमाणूस हवं म्हणून. पण, राचम्माला मात्र ते सावत्र आईच्या जाचातून तिला सोडवणारे देवमाणूस वाटले होते. त्यांचं वय वगैरे गोष्टी तिच्यासाठी नगण्य होत्या. दोन वेळचं पोटभर जेवण आणि प्रेमाचे दोन शब्द या तिच्या साध्या गरजा ते पुरवत होते. आणि जगण्याला याहून जास्त काही लागतं असं तिला वाटायचं नाही. विष्णु झाल्यावर तर ती सुखात न्हाऊन गेली. त्याचं मतिमंद असणंही त्यात कधी आडवं आलं नाही. भोळ्या शंभूचा अंश माझ्या पोटी आला म्हणून ती सार्‍यांसमोर कायम त्याचं कौतुक करायची. वाड्याची देखभाल करण्यात, गाई-म्हशी वळण्यात, डाळी-दुळी करण्यात तिचा वेळ छान जायचा. पण, नियतीला हे मान्य नव्हतं. तिने आधी तात्यासाहेबांना तिच्यापासून हिरावून घेतलं आणि मग तिच्या विष्णुला!

बसल्या-बसल्या तिची नजर बाजूच्या खुंटीला अजूनही टांगून ठेवलेल्या विष्णूच्या सदर्‍याकडे गेली. आणि काळीज पिळवटून टाकणारं त्याचं नसणं तिला पुन्हा जाणवलं. काळजात चर्र झालं. हे आभाळाएवढं दुख्ख सांगावं कोणाला? कोणापाशी रितं करावं मन? डोळ्यातलं पाणी आता आटलं होतं. तिला पुन्हा तो प्रसंग आठवला. त्यादिवशी असच तिन्हिसांजेला परसात विहीरीचं पाणी शेंदताना, विष्णु राचम्माच्या मागे आला. आणि तिथेच त्याला फेफरं भरलं. हात-पाय वाकडे, तोंडात हा फेस! धावत जाऊन राचम्माने त्याचं डोकं मांडीवर घेतलं. हात-पाय चोळू लागली. नेहमीप्रमाणे थोड्यावेळात बरा होईल असं वाटून जरावेळ तशीच बसून राहिली. पण, चार-दोन मिनिटांनी त्याने डोळे बंद केले ते पुन्हा उघडलेच नाहीत. राचम्मा त्याला हलवत राहिली, विष्णु-विष्णु म्हणून हाका मारत राहिली. आणि मग आभाळ कोसळावं तशी रडली. काही दिवसांनी डोळ्यातलं पाणी ओसरलं. आणि तिथे उरला तो केवळ एकटेपणा आणि आठवणी! समाधान केवळ एकाच गोष्टीचं होतं, तिच्याआधी तो गेल्यामुळे तिच्या मागे होऊ घातलेले त्याचे हाल वाचले होते.

आता उरला होता फक्त तो वाड्याचा एक कोपरा, राचम्मा आणि तिच्या मनात तिने जपलेलं तिचं अहेवपण! राचम्माने जगाची पर्वा कधीच केली नव्हती. तिला वेडं ठरवणारं जगच तिला वेडं वाटायचं. स्वार्थात बुडालेले, आपल्याच माणसांच्या जिवावर उठणारे, एकमेकांना लुबाडणारे लोक पाहिले की तिला तिचा विष्णु आणि तात्यासाहेब लाखपटीने बरे वाटायचे. आणि त्या दोघांना तिच्या पदरात टाकलं म्हणून ती तिच्या देवाचे मनापासून आभारही मानायची. हेच सारे विचार डोक्यात घेऊन, शांत-समाधानी मनाने एका वेगळ्याच तंद्रीत राचम्मा जागची उठली, तुळशीपाशी आली. चिमटीत थोडसं कुंकू घेऊन तिने ते तुळशीला वाहिलं, स्वत:ला लाऊन घेतलं आणि खाली बसली.. आणि मग उठलीच नाही. तिचं अहेवपण बरोबर घेऊन ती गेली तिच्या विष्णुपाशी.. कायमची!

जिवीताने केला नसला तरी मृत्युने मात्र तिचा यथोचित सन्मान केला. हेवा वाटावा असं मरण तिच्या पदरात टाकलं.. आणि ती 'निर्वाण' पावली!


@ संजीवनी पाटील देशपांडे 


 


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट