सैर..

 मोकळ्या आकाशाची झूल पांघरुन

मनाचे पंख अस्ताव्यस्त पसरुन

एक सैर करायचीय त्या शूण्य निळ्या पोकळीची!

अथांग निळाई

आभासी..

केवळ आपल्या डोळ्यांत तेवणारी

हातांना गवसतेय का पहायचंय..

नाव, गाव, वजन, गुरुत्व..

काही काही नसलेलं

ते अस्तित्वहीन अस्तित्व..

देव खरंच तिथे राहतो का.. पहायचंय!


आणि मग हळू-हळू भानावर येत,

ढगांच्या मागे पुढे लपंडाव खेळत.. 

तरंगत.. तरंगत..

खाली पहायचंय..

खालची सारी धावपळ, धडपड, दु:, हर्ष, विरह.. 

सारं काही..

एका अंतरावरुन न्याहाळत,

थोडंसं अलिप्त होता येतंय का बघायचंय..


त्या अलिप्त पूर्णत्वात मग पूर्ण एकजीव होत

सारे गैरसमज, सारं भय

मीपण भिरकाऊन देत

एक हलकी वाऱ्याची झुळूक..

कोवळी ऊन्हाची तिरीप..

एखादी पावसाची सर..

किंवा हलकासा ढगाचा पुंजका..

यातलं काहीसं होऊन 

पुन्हा जमिनीला येऊन बिलगायचंय..


असंच कधीतरी,

जमल्यास..

मोकळ्या आकाशाची झूल पांघरुन

मनाचे पंख अस्ताव्यस्त पसरुन

एक सैर करायचीय त्या शूण्य निळ्या पोकळीची!


~ संजीवनीटिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट