कवितेची ओंजळ भरली..

 कवितेची ओंजळ भरली!


तांबडं फुटलं

रात सरली, संपली

उभा दिवस नवा

वात विझला जरी दिवा,

कुण्या पाखराची ऊर्मी

डोळ्यांत उतरली..


कवितेची ओंजळ भरली!


सूर्य चढला माथी

कामाची दाटी-वाटी

रांधणं-रापणं..

दृष्टीत धूर-रहाटी

देहावरची लव,

घामात निथळली..


कवितेची ओंजळ भरली!


कुठे पानावरच्या 

थेंबापाशी,

कोकिळेच्या सुरापाशी,

मनातल्या मोरापाशी

पोळ्यातल्या मधापाशी,

पावलं अडखळली..


कवितेची ओंजळ भरली!


दिस ढळला, मावळला

कुठे दूर नभात,

चांद उगवला

थकलेल्या हातात 

कागद कोरा विसावला..

साऱ्या दिसाची निळाई

मग शब्दात उतरली..


कवितेची ओंजळ भरली!


~ संजीवनी

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट