टेलिव्हिजन डे च्या निमित्ताने..
या विषयावर बऱ्याचं दिवसांपासून लिहायचं मनात होतं. टेलिव्हिजन हा माझ्यासाठी तरी जिव्हाळ्याचा विषय आहे. एकाहुन एक सरस टेलिव्हिजन सिरिअल्स पहात मी मोठी झाले. त्यांचा पगडा कायमचा मनावर आहे. टेलिव्हिजनचा तो सुवर्णकाळ मला अनुभवता आला याचा खरंच खूप आनंद वाटतो. झी मराठीचा अर्थात तेव्हाच्या अल्फा मराठीचा मराठी टेलिव्हिजन विश्वावर जबरदस्त पगडा होता. एकेक सिरिअल अतिशय कसदार.. किती नावं घ्यावी! आभाळमाया पासून सुरू झालेला तो प्रवास पिंपळपान, प्रपंच, वादळवाट, टिपरे इ.इ. आशय आणि अभिनयसंपन्न मालिकांच्या मार्गाने पुढे जात राहिला. आणि माझं लहानपण आणि बरचसं कळतेपण समृद्ध करुन गेला. त्या साऱ्या मालिका मनाचा ठाव घेणाऱ्या होत्या. आभाळमाया चालू होती तेव्हा मी बरीचशी लहान होते. माझी आई पहायची. त्यातलं काय कळायचं तेव्हा माहित नाही. पण त्या कथा, मालिका खऱ्या वाटायच्या. वादळवाट मधली ॲडव्होकेट रमा तर मनावर कोरली गेली आहे. कथाबीज कुठेही हरवू न देता आशय समर्पकरित्या प्रेक्षकांपर्यंत पोचवणाऱ्या या मालिका होत्या. पिंपळपान, प्रपंच तर खूप जवळच्या आहेत. प्रपंच मधली ती समुद्राकाठची वास्तू अजूनही मन मोहवते. सुधीर जोशींचा कसदार अभिनय, बदलत्या कौटुंबिक तसेच सामाजिक बदलांचा मार्मिकपणे घेतलेला ठाव, विचार करायला भाग पाडणारे संवाद एक ना अनेक गोष्टी त्यात होत्या. विषयांमधलं वैविध्य, वास्तवाचं न सुटलेलं भान, टीआरपीच्या रेसचं अनाकर्षण ही त्यावेळच्या मालिकांची वैशिष्ट्ये होती. काही अपवाद वगळता हा कल अंकूर, असंभव पर्यंत चालू होता. नंतर त्याला उतरण लागली. तेव्हा मालिकांचं बजेट फारसं नसायचंच पण दर्जा उत्तम होता. आता चित्र याच्या अगदी उलट आहे. 

किळस वाटावी अशा मालिका सध्या सुरु आहेत. मालिकेची पार्श्वभूमी, कथा काहीही असो ती शेवटी प्रेम त्रिकोणावरच येऊन स्थिरावते. पती-पत्नी पैकी कोणाचंतरी एक्सट्रा मॅरिटल अफेअर दाखवल्या शिवाय मालिका चालतच नाही असा बहुतेक निर्मात्यांचा समज झालाय. सुरुवातीचा महिनाभर गोड वाटणाऱ्या मालिकांची नंतर टीआरपीच्या रेसपायी होणारी फरफट केविलवाणी वाटते. रोजच्या जगण्यापासून मैलोनमैल दूर गेलेल्या या मालिका बेगडी वाटतात. अर्थात यालाही काही अपवाद आहेत पण ते नावापुरते. एकुण टेलिव्हिजनचं आजचं चित्र खूप निराशाजनक आहे. या अशा मालिका दाखवून आपण कसला समाज घडवतोय याचा विचार त्या बनवणाऱ्यांनी आणि बघणाऱ्यांनी दोघांनीही करायला हवा. अतिशय नेभळट, गरीब नायिका आणि कुटील, कारस्थानी विलन असं चित्र सगळीकडे दाखवलं जातं. पण वास्तवात पूर्ण वाईट किंवा पूर्ण चांगलं असं काहीही नसतं. Nothing is black or white, Everything is grey!  हे आपण कधी सांगणार आणि समजावून घेणार? वर्षानुवर्षं रटाळ कथानक रेटत राहण्यापेक्षा ‘सिरीज’ चा पॅटर्न आता मराठी टेलिव्हिजनने आजमावायला हवा. एका लग्नाची दुसरी गोष्ट, दिल दोस्ती दुनियादारी, बन मस्का सारखे प्रयोग पुन्हा पुन्हा व्हायला हवेत. 

हल्ली घरोघरी लहान मुलं आजी-आजोबांसोबत सर्रास या मालिका पाहतात. आणि मग नकळत तसेच संस्कार त्यांच्यावर होत राहतात. कारस्थानं, अवास्तविकता, भडकपणा त्यांच्या मनांवर बिंबत जाते. याचे दूरगामी परिणाम अर्थातच चांगले नाहीत. 

टेलिव्हिजन हे अतिशय प्रभावी माध्यम आहे. माझी पिढी त्याने घडवली. पण, जसजशी टेक्नाॅलाॅजी अपडेट होत गेली तसतसा टेलिव्हिजनचा दर्जा मात्र खालावत चाललाय. आणि आता पिढ्या घडवण्यापेक्षा बिघडवण्याकडेच त्याची वाटताल होतेय. हे चित्र बदलण्याची आणि टेलिव्हिजनचे जुने सोनेरी दिवस परत येण्याची मी नक्कीच वाट पाहतेय.. तो दिवस लवकर येवो!

Happy Television Day :)


@Sanjeevani Deshpande

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट