पाऊस..
 “आत्ता ह्या क्षणी पाऊस पडला तर येशील माझ्यासोबत?कायमची?” 

हसता हसता एकदम गंभीर होत तो म्हणाला. 

खूप दिवसांपासून जे बोलायचं राहून जात होतं ते असं अचानक त्याच्याही नकळत बाहेर पडलं होतं.

“हो.. का नाही? ऊन्हातला पाऊस खोटाच असतो नाहीतरी”

ती मात्र आधीचं हसणं पुढे नेत म्हणाली. 

पण, त्याच्या डोळ्यांत पाहिल्यावर तिला जाणवलं, त्या डोळ्यांतला पाऊस खरा होता.. 

मग ती एकदम गप्प झाली. 

आणि तो शांत.

एक खोल वेदनेची लहर त्याच्या डोळ्यांत चमकून गेली. पण दुसऱ्या क्षणी लगेच चेहरा सावरत तोही हसला. 

ते हसणं नव्हतं हे तिला मात्र जाणवलं. पण तसं काही न दाखवता तीही माफक हसली. 

हसण्याच्या त्या केविलवाण्या धडपडीत, ‘इज़हार का वो पल’ मात्र दोघंही हरवून बसले.

दोघांच्याही अवघडलेल्या नजरा मग अंगणावर येऊन स्थिरावल्या.

आणि काय नवल, दूरदूरचे चार ढग कुठूनसे एकत्र आले आणि खरंच पाऊस पडू लागला.. भर ऊन्हात.. 


त्यानंतर, पावसाच्या गप्पा त्यांच्यात कधीचं झाल्या नाहीत.


~ संजीवनी

टिप्पण्या

Nagesh kanade म्हणाले…
तुमच्या लेखनामध्ये वाचकांना खिळवून ठेवण्याची क्षमता आहे.
लिखाणात एक प्रकारचे सौंदर्य दिसून येतं,
अतिशय छान पद्धतीने लिहिता तुम्ही.
एक लेखक म्हणून योग्य आहात.
Sanjeevani म्हणाले…
धन्यवाद, नागेश जी!

लोकप्रिय पोस्ट