आरसा : अंतिम भाग

 
दुसर्‍या दिवशी तिन्हीसांजेला ठरलेल्या वेळेच्या क्षणभर आधीच तो तिच्या दारासमोर उभा होता. त्याने पूर्वीच कधीतरी तिच्यासाठी म्हणून घेऊन ठेवलेली द गोल्डन नोटबूक नावाची कादंबरी आणि तिच्या आवडीची लिलीची फुलं आज सोबत आणायलाही तो विसरला नव्हता. पूर्वी एकदा ग्रुपसोबत कास पहायला गेल्यावर तिथल्या वॉटर लिलीज तिला प्रचंड आवडल्या होत्या. कितीतरी वेळ त्यांना पाहत फुलपाखरा सारखी त्यांच्या आसपासच बागडत होती. इतर कुठे आली नाही तरी ट्रेक्स किंवा अशा निसर्गाच्या कुशीतले स्पॉट्स ठरले की ती आवर्जून यायची. तिथेही आपला एक स्वत:चा कोपरा शोधून शांतपणे निसर्ग अनुभवायची. हो, पण सगळ्यांच्या मिळून मैफिली रंगल्या की मात्र अशा एक एक  कविता म्हणायची की ऐकणार्‍यांनी मुग्ध होऊन जावं. तिच्या कविताही खूप खोल असायच्या. एकदा अशीच तिने तिची एक कविता गायली होती. ती वरकरणी उदास होती. पण अर्थ सुंदरच होता. ग्रेसांची माधुरी पुरंदरेंनी गायलेली एक कविता ऐकून ती तिला सुचली असं तिने प्रस्तावनेत म्हटलं होतं. दोन्ही कवितांचा अर्थाच्या दृष्टीने तसा संबंध नव्हता काही पण रचनेच्या बाबतीत मात्र दोघीत साधर्म्य होतं. तिने जेव्हा ती गाऊन दाखवली तेव्हा खरंच ती दुपार मंतरलेली वाटायला लागली होती.. तिचा क्षणात मधुर वाटणारा, क्षणात खर्जात तर क्षणात टिपेला पोचणारा आवाज, त्या कवितेला जीवंत करत गेला होता. दारात उभं असताना त्याला का कोणास ठाऊक त्या कवितेची धुन पुन्हा पुन्हा आठवायला लागली पण शब्द काही आठवेनात.

शेजारच्या वेलीवर बसलेल्या पाखरांच्या किलबिलाटाने भानावर येत  त्याने दारावरची बेल वाजवली.

तिने त्याला बोलावलं होतं खरं पण ऐनवेळी तिच्याकडे संस्थेचा, संबंधित आदिवासींच्या ऐतिहासिक वाटचाली संबंधी शास्त्रीय विश्लेषणाचा लेख हवा असल्याची विनंती करणारा मेल येऊन पडला होता. वार्षिक अंक उद्याच छपाईस जाणार असल्या कारणाने आजच लेख मिळाला तर बरं होईल अशी विनंतीही त्यात होती. नियोजित प्राध्यापकांना ऐनवेळी काहीतरी इमरजन्सी आल्यामुळे ते काम हिच्यावर येऊन पडलं होतं. त्यामुळे दुपार पासूनच तिचं संदर्भ, माहिती, काळ, दाखले गोळा करणं चालू होतं. दिवस कलायला लागल्यावर कुठे कागदांच्या-पुस्तकांच्या गठ्ठयातून हवे ते संदर्भ मिळवण्यात तिला यश आलं.

विजयीमुद्रेने ती त्या पसार्‍याकडे पाहत असतानाच दारावरची बेल वाजली. आणि क्षणात तिला आठवलं, आज तो येणार होता! तिची एकदम प्रचंड धांदल उडाली. केसांच्या वेटोळ्यात खुपसलेला पेन, एका हातात पेन्सिल आणि एका हातात मगाचचा कागद घेऊन ती तशीच दार उघडायला धावली. दार उघडलं. समोर एका हातात लिलीची फुलं आणि दुसर्‍या हातात छानपैकी रंगीत कागदात रॅप केलेलं पुस्तकवजा काहीतरी घेतलेला तो उभा. स्वत:चा गोंधळ सावरत ती त्याला हसून ये म्हणाली.

तिच्या त्या अवताराकडे आणि सवयीच्या गोंधळाकडे पाहून तो मनातल्या मनात हसला. आत आला. घर अगदी पूर्वीसारखच होतं. काही किरकोळ बदल सोडले तर विशेष काही बदललेलं नव्हतं.

बस हां.. मी आलेच”  म्हणत ती आत गेली आणि आतली पुस्तकं नीट रचून बाहेर आली.

घरात इतर कोणाची चाहूल लागली नाही म्हणून त्याने विचारलं,

“आई-बाबा?”

बैठकीवरच्या दुसर्‍या कोपर्‍यातल्या लोड ला टेकून बसत ती म्हणाली,

“ते एका कॉन्फ्रेंस साठी मुंबईला गेलेयत काल. उद्या येतील.”

“ओह अच्छा!” तो मागे टेकत म्हणाला.

तिने एकवार त्याच्याकडे पाहिलं. तब्येत किंचित सुधारली होती. पूर्वीपेक्षा कणभर जास्तच गोराही वाटत होता. बाकी व्यक्तिमत्व पूर्वीसारखंच चार-चौघात सहज उठून दिसेल असं. चटकन लक्ष जाईल असं, रुबाबदार. पुरुषी. काहीतरी आठवल्या सारखं त्याने एकदम आजूबाजूला पाहिलं. आणि मग शेजारी ठेवलेली फुलं आणि पुस्तक तिला देत तो मिष्किलपणे म्हणाला,

“रिकाम्या हाती आलो तर घराबाहेर काढशील असं वाटलं, म्हणून हे घेऊन आलोय सोबत. बघ आवडतय का..”

त्याच्या पूर्वीसारख्याच मजेशीर बोलण्याकडे पाहून मनातल्या मनात सुखावत तिने फुलं हातात घेतली आणि त्यांना हलकेच हुंगत ती म्हणाली,

“आजचं माहीत नाही पण इथून पुढे येताना ही फुलं आणली नाहीस तर नक्की काढेन घराबाहेर.. कुठे मिळाली तुला? किती सुंदर आहेत!”

यावर तुझ्यासारखीच वगैरे त्याच्या तोंडात आलं होतं पण त्याने तसं काही म्हटलं नाही. 

“पुस्तक पण छान वाटतय. नोबेल विनिंग म्हणजे छानच असणार. वाचते.” पुस्तक चाळता चाळता ती म्हणाली.

“पूर्वी एकदा लंडन ला जाणं झालं होतं तेव्हा तिथे एका बूकस्टोअर मध्ये हे दिसलं. आवडलं. मग सवयीने तुझ्यासाठीही एक घेऊन टाकलं होतं.” तो म्हणाला.

“अरे नवीन कशाला घेतलस? तुझीच प्रत वाचली नसती का मी? काय तू नुसती उधळपट्टी करतोस. सवयी बदलल्या नाहीत अजून तुझ्या.” ती पटकन बोलून गेली. पूर्वीही त्याने असं काही केलं की ती नेमकं हेच बोलायची.

दोघही मग एकमेकांच्या त्या जुन्या सवयीच्या वागण्याकडे पाहून हसलेही आणि सुखावलेही.

नंतर मग एकमेकांचे गेल्या काही वर्षातले अनुभव एकमेकांना सांगताना, एकमेकांचं काम समजून घेता- घेता वेळ कसा निघून गेला दोघांनाही समजलं नाही. घड्याळाकडे लक्ष गेल्यावर ती एकदम गडबडीने उठत म्हणाली,

“अरे मी साधं पाणीही विचारलं नाही तुला अजून. काय घेशील सांग. किंवा खायला करू का मी मस्त काहीतरी?” ती उत्साहाने विचारत होती.

“तुला येतं?” तो हसत म्हणाला.

“गप हां.. आता येतं मला बरचसं.” ती ओशाळून म्हणाली.

“बरचसं म्हणजे नक्की काय काय येतं मॅडम आपल्याला?” तो.

त्यावर लहान मुलीच्या उत्साहात ती म्हणाली,

“कांदेपोहे, दडपे पोहे, केळीचं शिकरण, काकडीची कोशिंबीर, आणि कणीक मळलेली असेल तर पोळ्यासुद्धा!!”

“अर्रे व्वा!! इतकं सगळं??” तो हसत म्हणाला.

“तुला इतकं तरी येतं का?” ती.

“येतं आता. बाहेर राहिल्यामुळे शिकलोय. आय मीन शिकावच लागलं.” तो.

“काही नकोय गं मला.. बस तू ये बोल माझ्याशी. सध्यातरी इतकच हवय मला.” तो पुढे म्हणाला.

आणि मग एकदम काहीतरी आठवल्यासारखं,

“ती कविता म्हण नं तुझी.. कधीची मनात रेंगाळतेय माझ्या पण शब्द काही केल्या आठवत नाहीयेत.”

खाली बसत तिने विचारलं,

“कोणती.. तुला आठवतात अजून माझ्या कविता?”

त्यावर तिच्या डोळ्यांत पाहत तो म्हणाला,

“सगळं आठवतं मला!”

ती क्षणभर शांत झाली. आणि मग, “सांग कोणती कविता.. म्हणते मी!”

“शिवथर घळ पहायला गेलो होतो तेव्हा म्हणाली होतीस ती..”

तिला आठवलं. जुनी डायरी आणून त्यातलं नेमकं पान शोधून ती पूर्वीच्याच जागी येऊन बसली. आणि कविता गायला लागली..

 

उन्हातल्या अंगणाला

सावलीचा भार

आसवांच्या तळ्याकाठी

सुखाचाच सल

 

ती डायरीत पाहून गात होती. तो तिच्याकडे पाहत होता.


कुठे कधी कशी सरली

जाणिवांची ओल

वाढणार्‍या वयाला रे

खुंटण्याचा शाप

 

गाव गेलं मागे, त्याची

वाट सुनसान

हिरव्या आठवांचं मनी

हलणारं पान

 

गंध मोगर्‍याचा आता

साहवेना फार

काटयांतल्या बाभळीची

फुंकर ती गार

 

वेगळाच ध्यास, त्याचं

वेगळंच वेड

वेड्या गोष्टींमध्ये आता

जगण्याचं सार

 

उन्हातल्या अंगणाला

सावलीचा भार

आसवांच्या तळ्याकाठी

सुखाचाच सल..

 

कविता संपली. तिने डायरी मिटली. त्याच्याकडे पाहिलं. तो डोळे बंद करून ऐकत होता. डोळे उघडून त्यानेही आता तिच्याकडे पाहिलं. आणि डोळ्यांत एक प्रकारची वेगळीच आर्तता घेऊन म्हणाला,

“शब्द अन शब्द खरा आहे अगदी. आत्ता कळतोय बघ अर्थ!”

एक शांत सुस्कारा सोडत ती म्हणाली,

“मलाही आत्ताच कळतोय.. तेव्हा कशी सुचली का लिहली माहीत नाही. पण आता तिचा अर्थ नव्याने कळतोय!”

दोघांनी एकमेकांकडे पाहिलं.

इतका वेळ टाळत असलेल्या विषयाला हात घालण्याची वेळ आता येऊन ठेपलीये हे दोघांनाही उमगलं होतं.

सुरुवात कोणी करायची हा प्रश्न होता. बराच वेळ त्या शांततेत गेल्यावर शेवटी तोच म्हणाला.

“तुझ्या आयुष्यात दुसरं कोणी?..”

त्यावर जरासं हसून आणि डोळ्यांच्या ओल्या कडा घेऊन ती म्हणाली,

“तशी सोबत पुन्हा मिळालीच नाही कुठे..”

त्याला आत प्रचंड आनंद झाला. पण, तो शांत राहिला.

तिने विचारलं,

“तुझ्या?”

नजर स्थिर ठेऊन तो म्हणाला,

“तसे एक-दोन प्रसंग आले होते.. पण मी पुढे जाऊ शकलो नाही. नेमकं कारण सांगू शकणार नाही. पण इतकं म्हणू शकतेस की मी आत कुठेतरी आपल्या एकत्र येण्याची कायम मनापासून वाट पाहत होतो..”

हे ऐकून तिच्या मनातला तो जुना हळवा कोपरा पुन्हा संवेदित होत होता. पण, मनातलं चेहर्‍यावर उमटेल या भीतीने ती कॉफी आणण्याचं निमित्त करून आत जायला निघाली. तिला थांबवत तो म्हणाला,

“किती दिवस दूर पळणार आहेस तू माझ्यापासून.. स्वत:पासून..?”

ती थांबली. तो पुढे बोलू लागला.

“कधी कधी नं आपलं एखाद्याशी न जुळवता असं काही विशेष नातं जुळतं ना की तो माणूस अंतर्बाह्य आपला वाटायला लागतो. तसं वाटतं मला तुझ्या बद्दल आणि मला खात्रीये तुलाही तसंच वाटतं माझ्याबद्दल. मग का सतत उद्याचा’, जर-तर चा विचार करून स्वत:ला मागे ओढत असतेस तू? हे असं वागून तुला कळतंय का, तू जगणंच थांबवलंयस. तिथेच उभी आहेस कधी पासून. जग. हस. स्वत:कडे जरा हसून बघ.”

ती वळली. त्याच्याजवळ बसली. तिच्या डोळ्यांत पुन्हा पाणी साचलं होतं. ते पुसत म्हणाली,

“ठीके. करते तू म्हणतोयस तसं. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे वगैरे वाक्य मी बोलून दाखवणार नाही. ते तुला कळतच असेल माझ्या डोळ्यांतून. तू सांग, काय करायचं? हे नातं कसं पुढे न्यायचं? लग्न वगैरे करण्याची माझी इच्छा नाही. मी माझं घर सोडून तुझ्याकडे येऊ शकत नाही. डोक्यात एखादी गोष्ट शिरली तर मी चार-चार दिवस झपाटल्या सारखी लिहत बसते.. खोलीच्या बाहेरही येत नाही. कधी वाटलं तर अगदी कुठल्याही वेळेला लायब्ररी गाठते. तिथे कोणी डिस्टर्ब केलेलं मला आवडत नाही. पैसे म्हणशील तर ते मला माझ्या दोन वेळच्या गरजा भागतील इतकेच कमवायचे आहेत. इतरवेळी मी दर्या-खोर्‍यातुन भटकत असते. मागच्याच आठवड्यात मेळघाटातल्या एका दिवस भरलेल्या आदिवासी अठरा वर्षाच्या मुलीला, केवळ येण्या-जाण्याचं साधन नाही म्हणून, चार माणसं झोळीत घालून खांद्यावर उचलून घाट चढून वर आले पण तोवर अतिरक्तस्त्राव आणि वेदनांमुळे तिने जीव टाकला. पोटातल्या बळासकट. ही अशी चित्रं मी रोज पाहते. अस्वस्थ होते. आपली ही बेगडी सुख-दुक्खं त्यासमोर क्षुद्र वाटायला लागतात मग. त्यासाठी खारीचा वाटा म्हणून काहीतरी आयुष्यभर करत राहायचय मला. सांग, चालणारे तुला? थोड्या काळासाठी हे सगळं खूप फसिनेटिंग वाटू शकतं. पण रोज डील करायला लागलं तर कसं मॅनेज करणार आहेस तू? आणि मी तरी?

त्याने शांतपणे सारं ऐकून घेतलं. आणि म्हणाला,

“मी चालणारे म्हटलं तर?”

तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं.

“हो. पण फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे.” तो.

“कोणत्या?” ती.

“लग्न का करायचं नाहीये तुला?”

“कारण हे जे सगळं मला करायचय ते लग्न झाल्यावर मला करता येणार नाही. कितीही पुरोगामी वगैरे आपण झालो तरी लग्न झाल्यावर मुलींवर मर्यादा येतात. आणि मला माझ्या आयुष्यात कसल्याच मर्यादा नको आहेत. घर-करियर-passion यांचा मेळ घालता-घालता मेटाकुटीला येतात सार्‍याजणी. सगळी एनर्जि गोष्टी बॅलेन्स करण्यात जाते. बेडशीट बदलण्या पासून स्वयंपाक, मूल, त्याची वाढ नंतर शाळा-शिक्षण या सार्‍याची जबाबदारी एकट्या स्त्री वर येऊन पडते. कितीही पुढारलेला पुरुष असला तरी त्याने केलेलं काम हे तिला त्याने केलेली मदत म्हणूनच पाहिलं जातं. समज उद्या आपण लग्न केलं, कशीतरी मूल होईपर्यंत करिअर्स पण सांभाळली एकमेकांची पण मूल झाल्यावर काय? तू वेळ देत नाहीस. तुझं त्याच्याकडे लक्षच नाही सगळं मी एकट्याने करायचं का?’ वगैरे वाद दोन्ही बाजूंनी सुरू व्हायला लागतील मग काय करायचं!.”

तो शांत झाला. विचार करू लागला.

थोड्या वेळाने त्याचा हात हातात घेत ती म्हणाली,

“मला हवा आहेस रे तूही! पण, काय करू सांग. हे सारे विचार मग एकापाठोपाठ एक डोक्यात यायला लागतात. आणि मग मला उत्तर मिळत नाही कशाचच. अस्वस्थ होते. थकलेय रे मी आता या जीवघेण्या द्वंद्वाशी तोंड देऊन देऊन.. तू सांग, काय करू? कसा काढूया आपण यातून मार्ग?”

काहीतरी ठरवल्या सारखं तिचा हात हातात घेत तो शांतपणे म्हणाला,

“लग्न करूया आपण!”

ती प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहू लागली. तो पुढे बोलायला लागला,

“हो लग्न! पण वेगळ्या पद्धतीचं.”

“म्हणजे कसं?” ती.

“म्हणजे लग्न करायचं. नंतर तू तुझ्या घरी राहायचं आणि मी माझ्या. तू तुझं आयुष्य जग. मी माझं जगेन. एकमेकांकडून प्रेमाव्यतिरिक्त इतर कसल्याही अपेक्षा आपण ठेवायच्या नाहीत. भेटत आपण राहुच. बाहेर. घरी. कधी तू माझ्या घरी ये. कधी मी तुझ्या घरी येईन. सगळं पूर्वी होतं तसच. फक्त लग्न झालेलं असेल.”

तिला आता यात लॉजिक दिसायला लागलं. हे म्हणजे लग्न करुनही कायम एकमेकांचे मित्र-मैत्रीण/प्रियकर-प्रेयसी राहण्यासारखं होतं. लग्ना संबंधीच्या रूढ संकल्पना बाजूला ठेऊन केवळ दोन मनांनी एकत्र येणं या अंगाने या सार्‍याकडे पाहिलं तर हा मार्ग खरच खूप लॉजिकल आणि सुंदर वाटला तिला. थोडसं अंतर जपल्याने एक्मेकांविषयीची ओढही टिकणार होती आणि अतिपरिचयाने येणारं कंटाळवाणेपणही टाळता येणार होतं. गरज होती ती फक्त लग्न या गोष्टीकडे रूढार्थाने न पाहता केवळ आपल्या सोयीच्या नव्या, सुखावह आणि सोप्या दृष्टीने पाहण्याची.

तिला क्षणभर त्याच्या या विचाराचं प्रचंड कौतुक वाटलं. चावी हरवलेल कुलूप कुणीतरी सहज येऊन उघडावं तसं वाटायला लागलं.

“हे शक्य आहे? किती छान होईल खरच असं झालं तर.” ती.

“शक्य आहे की नाही ते आपल्या हातात आहे. तू हो म्हण, होईल शक्य.” तो.

“हो.. हो.. हो... हजारवेळा हो.” आनंदाने ती लहान मुलीसारखी त्याला जाऊन बिलगली.

तुला कसं सुचलं रे हे? मी इतके दिवस नुसतीच चाचपडत राहिले या प्रश्नांसमोर ती

“अगं मला काहीच नाही सुचलं.. हे सारे तुझेच तर विचार आहेत. मी फक्त आरसा दाखवलाय तुला. तू आत्ता मगाशी जे काही बोललीस ते ऐकूनच तर आलं माझ्या मनात.”

आनंदाने हलकी होत होत ती तिच्या आरशाकडे पाहतच राहिली..

समस्या सगळ्या नात्यात असतात. पण आपण नातं नक्की कुठल्या मार्गाने जाऊ द्यायचं, त्यांच्याकडे कसं पाहायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं असतं. त्या दोघांनीही त्यादिवशी त्यांच्या पद्धतीने त्यांच्या समस्यांमधून मार्ग काढायचा असं ठरवलं. ती त्यांच्या आयुष्यातल्या नव्या बदलांची नांदी होती..

एक सुंदर पहाट आता दोघांचीही वाट पाहत होती..

 

समाप्त

 

संजीवनी

मला इथे नमूद करायला आवडेल की, लग्नाची रूढ संकल्पना दोघांना मानवणारी नव्हती. दोघांना एकमेकांसोबत ‘जगायचं’ होतं, ‘रहायचं’ नव्हतं! या एकत्र जगण्याला रूढ लग्नाची जोड देणं तिला मान्य नव्हतं. पण, त्याला मात्र लग्न करायचं होतं. शेवटच्या निर्णया पर्यंत येताना दोघांनीही एक एक पाऊल पुढे टाकलं. त्याने तिचं स्वतंत्र आयुष्य आणि अस्तित्व अबाधित राखलं आणि तिने लग्नाचा विधी स्वीकारला. यामागे नाईलाज दोन्ही बाजुंकडून नव्हता. त्याला तिचं म्हणणं पटलं होतं आणि तिलाही आपल्या नव्या आयुष्याची सुरूवात चार आप्तांच्या साक्षीने करण्यात काहीही गैर वाटलं नाही.

इथे ‘लग्न’ या गोष्टीकडे, कोणीतरी कोणाकडे जाऊन राहण्याची किंवा मुळातच दोन जीवांनी ‘एकत्र राहण्याची’ ‘व्यवस्था’ म्हणून पाहिलं गेलं नाहीये.
तर, ‘दोन मनांचा एकत्र येण्याचा’ ‘सोहळा’ अशा अर्थाने पाहिलं गेलंय.
त्या दोघांचंही मोकळं आकाश ते जपू पाहत आहेत. आत्ता त्यांना ‘२४/७ एकत्र राहण्याची’ आवश्कता वाटत नाहीये. पुढे कधी वाटली तर राहूही शकतील.
आणि इथे दोघेही केवळ एकमेकांचा विचार करताना दिसताहेत, ‘जगाचा’ किंवा ‘समाजाचा’ नाही! )

 


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट