समर्थ रामदास!

 


समर्थ रामदास..

महाराष्ट्रात, देशात बरेच साधू-संत होऊन गेले. मग समर्थांचं वैशिष्ट्य ते काय? यावर फारसा विचार करावा लागत नाही.
भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे माथी हाणू काठी।

असं म्हणणारे संत तुकाराम जसे कायम आपल्या मनात असतात तसेच वैशिष्ट्य पूर्ण मनाचे श्लोकलिहणारे समर्थ रामदास स्वामीही असतात.

सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा | 

हे ऐकल्या-म्हटल्या शिवाय कुठल्याच मराठी माणसाचं बालपण सरत नाही. त्यांची ओळख लहानपणीच सर्वांना होते. मनाच्या श्लोकांतून. मराठीच्या पुस्तकात वाचलेल असतं, ते छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते. आता त्यावरून वाद होतात. पण हे वाद केवळ हास्यास्पद आहेत. समर्थ रामदास जितके वंदनीय आहेत तितकेच संत तुकाराम ही आहेत. आणि असे गुरु लाभलेले छत्रपती शिवराय तर जगद्वंद्य आहेतच. मुळात मला असं वाटतं तो काळच किती धन्य होता, ती तेव्हाची माणसं किती नशीबवान होती, हे तिन्ही महापुरुष त्यांना एका जन्मात याची देही याची डोळा पाहता आले, अनुभवता आले.

समर्थांचं वेगळेपण अतिशय सुस्पष्ट आहे. ते व्यायाम करायला सांगतात. नवस-सायास करायला नाही. नेटकं अक्षर काढायला सांगतात. कर्मकांडात अडका असं म्हणत नाहीत.  

दिसामाजि काहीतरी ते लिहावे | प्रसंगी अखंडित वाचीत जावे | असा उपदेश करतात.

ते देवाला माझं भलं कर, नवसाला पाव, मी अमुक अमुक करतो मग मला अमुक अमुक दे असं काहीही म्हणत नाहीत. श्रीरामाकडे त्यांचं मागण काय तर,

दस्तक टाळी दे रे राम । नृत्यकला मज दे रे राम ॥
प्रबंध सरळी दे रे राम । शब्द मनोहर दे रे राम ॥
सावधपण मज दे रे राम । बहुत पाठांतर दे रे राम ॥
दास म्हणे रे सदगुण धाम । उत्तम गुण मज दे रे राम ॥  

हेच समर्थ अतिशय पोटतिडिकेने शिक्षणाचं महत्व सांगताना म्हणतात,

शिका रे शिका रे फिका जन्म जातो

नका नका रे तुका घात होतो

जनी जाणता शिकता हित होते

शिकेंना तरी व्यर्थ आयुष्य जाते

समर्थ रामदास जगण्याचा एक उत्तम पाठ आपल्यापुढे ठेवतात. ते अतिशय व्यवहारी उपदेश करतात. जादू-टोणा, देव तारुन नेईल वगैरे गोष्टी ते सांगत नाहीत. ते प्रचंड प्रयत्नवादी आहेत. आणि समाजालाही प्रयत्नवादी होण्याचं आवाहन करतात.

वन्ही तो चेतवावा रे चेतविता ची चेततो |

विवेके जाणिजे जैसा वाढविता ची वाढतो ||

केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे |

यत्न तो देव जाणावा अंतरी धरिता बरे ||

त्यांनी संगीतलेली मूर्ख लक्षणे तर अतिशय नेमकी आहेत.

दंत चक्षु आणि घ्राण | पाणी वसन आणी चरण | सर्वकाळ जयाचे मळिण | तो येक मूर्ख ||

घरीच्यावरी खाय दाढा | बाहेरी दीन बापुडा | ऐसा जो कां वेड मूढा | तो येक मूर्ख ||

अक्षरें गाळून वाची | कां तें घाली पदरिचीं | निघा न करी पुस्तकाची | तो येक मूर्ख ||

ही काही उदाहरणे. अशी जवळपास 60-70 मूर्खलक्षणे समर्थांनी दासबोधात लिहून ठेवलीयेत.

आरत्या. आपण रोज देवापुढे ज्या म्हणतो त्या नानाविध आरत्या त्यापैकि बहुतेक समर्थांनीच लिहलेल्या आहेत. ते अतिशय प्रतिभावंत कवि होते. लेखणीतून सरस्वती पाझरते म्हणतात ना तसं काहीतरी.

समर्थांचा हा प्रॅक्टिकल, विज्ञाननिष्ठ, कलासक्त अप्रोच मनाला भावतो. त्यामुळे ते जवळचे वाटतात. मी फार देवभोळी नाही. पण समर्थांना मात्र मनापासून गुरु मानावसं वाटतं. माझी पणजी आजी समर्थांची एक स्तुति गायची. आईने ती अजून जपून ठेवलीये. अतिशय गेय आणि म्हणाविशी वाटावी अशी ती आहे. आज दासनवमी च्या निमित्ताने ती इथे द्यायला मला आवडेल.

सद्गुरू समर्थ माझा गं, सज्जन गडचा राजा गं

महामंत्र हा श्रीराम जय राम, करितो मौजा मौजा गं

जांब क्षेत्री जन्म गं, स्थापन केले ब्रह्म गं

काम क्रोध हे जिंकूनि सारे जगता साठी जन्म गं

माय मांडिले लग्न गं, करितो बाई विघ्न गं

सावधान हा शब्द ऐकता स्वरूपी झाला निमग्न गं

पंचवटीला जाऊनिया वश केला तो रघुराया

तेरा कोटि जप करुनी शिणवी आपुली काया गं

शरण असे तव शिवराया, प्रसन्न केली आदिमाया

महाराष्ट्र हा जिंकूनि सारा स्वराज्य स्थापि लवलाया

दासबोध हा ग्रंथ कसा, ग्रंथामाजि परिस जसा

ऐशा सद्गुरू स्वामीला त्रिकाळ करूया नमनाला

सरस्वती ही अल्पमतीने गात असे तव कवनाला..

 

सद्गुरू समर्थ माझा गं, सज्जन गडचा राजा गं

महामंत्र हा श्रीराम जय राम, करितो मौजा मौजा गं ||

 

 

@संजीवनी देशपांडे 

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट