दिगंत : भाग ४
“उदे गं अंबे उदे..”
मंदिराच्या परिसरात काही कीर्तनकरी अंबाबाईच्या नावाचा जयघोष करत होते.
हात-पाय स्वच्छ धुवून रिया आणि संहिता मंदिर परिसरात आल्या. तर्हेतर्हेची दुकानं, फुलं, ओटीचं
सामान घेऊन बसलेल्या बायका, दागिन्यांची छोटेखानी थाटलेली दुकानं, हळदी-कुंकवाचे रचलेले डोंगर.. दोघींनाही प्रसन्न वाटलं. ठरल्याप्रमाणे दुकानदारांची
चढाओढ सुरू होती, ताई ओटीचं सामान घ्या, ताई देवीसाठी फुलं घ्या.. संहिताने मग एका ठिकाणी थांबून ओटीचं सामान घेतलं.
रियाने मात्र निशिगंध आणि चाफ्याची काही फुलं घेतली फक्त.
दुपारची वेळ असल्याने फारशी गर्दी नव्हती. रांगही अगदी नावाला. तिथे उभं
असताना काळ्या पाषाणातलं ते सुंदर मंदिर, त्याची अफाट व्याप्ती, कोरीवकाम, त्याचा हजार एक वर्षांचा प्रवास सारं काही
मनावर उमटत होतं. दोघींच्या मनात आपोआप लीन भाव दाटायला लागले. गर्भगृहाच्या दाराशी
उभं राहून रियाने देवीकडे पाहिलं. पिवळं मळवट, त्यावर ठसठशीत
लाल कुंकू, अंगावरची भरजरी लाल काठांची हिरवी साडी, आभूषणे आणि या सर्वाहून जास्त आकर्षित करणारं महालक्ष्मीचं सावळं, भेदक, आणि स्वयंभू रूप, आभा तिच्या
मनाला वेगळीच अनुभूती देऊन गेली. हातातली निशिगंधाची नि चाफ्याची फुलं रियाने देवीला
वाहिली. पुष्परूपी चैतन्याने शक्ती-स्वरूप चैतन्याची पुजा केली!
मनभर व्यापलेली एक वेगळीच शांती घेऊन दोघी बाहेर पडल्या. मनातले सारे
कोलाहल काही काळासाठी निवळल्या सारखे वाटायला लागले.
दोघींनी मग भरपेट जेवण केलं. सोलकढी ओरपली. आणि पुढच्या प्रवासाला
निघाल्या. त्यांनी कोल्हापूर सोडलं तेव्हा घड्याळाचा काटा साडे तीन- चार च्या आसपास होता. जेवणामुळे दोघी थोड्या सुस्तावल्या
असल्या तरी प्रवासाची धुंदी आता त्यांना चांगलीच चढली होती. मगाशी देवळात प्रसाद म्हणून
मिळालेलं प्रसन्न मनही आता त्यांच्या सोबत होतं.
थोडावेळ नकाशाचा अभ्यास करून रिया म्हणाली,
“संहिता, इथून आपण थोडा रस्ता वाकडा केला ना तर गोकाक फॉल जवळच आहे.. जाऊया का?”
“थोडा वाकडा म्हणजे नक्की किती ते सांग.”
“100 kms आहे. दोन एक तास लागतील.”
संहिता ने थोडा विचार केला. आणि मग, “ओक्के, रूट ऑन कर. हुबळीला
पोचायला उशीर होईल पण ठिके. असंही जाऊन झोपायचंच आहे.”
निपाणीच्या बरंच पुढे आल्यावर संकेश्वरच्या अलिकडे नॅशनल हायवे वरुन
डावीकडे टर्न घेत त्यांनी गोकाक-हुक्केरी-संकेश्वर रोड धरला. आणि गोककच्या दिशेने निघाल्या.
रस्ता अर्थात खूप रमणीय होता. घट्प्रभा नदीची कृपा सारी. ड्रायविंग करायला संहितालाही
मजा येत होती. रिया कमेर्याने दृश्य टिपण्याचा प्रयत्न करत होती. गोकाक जवळ येऊ लागलं.
मुख्य गावापासून सहा किमीवर मुख्य धबधबा आहेसं त्यांना समजलं. वाटेत नदीच्या खळाळत्या
प्रवाहाच्या तीरावर असलेलं शिवमंदिर दोघींना भावलं. ठरलेल्या काही टुरिस्ट पॉईंट्स
वरुन त्यांनी धबधब्याचं दर्शन घेतलं. पण त्यांचं समाधान होईना. जवळपास 170 फुट उंचीवरून
घटप्रभा नदी खाली कोसळते. तो घोंघावणारा आवाज, शुभ्र तुषार त्यांना अधिकाधिक जवळ बोलावत होते. गोकाक
धबधब्याचं एक आकर्षण म्हणजे, तिच्यावर स्वातंत्र्यपूर्व काळात
बांधलेला झुलता पूल. जवळपास 210 मि. लांबीचा आणि 14 मि. उंचीवर असलेला हा लाकडी पूल
रोप्स वर तोललेला आहे. दोघींना आधी काही वाटलं नाही. पण जस-जशा त्या पूलावरून पुढे
चालत जाऊ लागल्या तसं त्यांना कळलं याला झुलता पूल का म्हणतात ते. पायांखाली रोरावत
वाहणारी घटप्रभा आणि त्यावर झुलणारा हा पूल.. थोडीशी भीती, प्रचंड
उत्सुकता आणि ते नितांत सुंदर दृश्य.. दोघी भारावून गेल्या.
सूर्य मावळायला अजून थोडा अवकाश होता॰
चौकशी अंती त्यांना समजलं, एक छोटा रस्ता खालून धबधब्याच्या आणखी जवळ नेतो. क्षणाचाही विचार न करता त्यांनी
तो रस्ता धरला. दोन्ही बाजूंनी गर्द झाडी, नारळीची झाडं, वडाचे जीर्ण वृक्ष.. विलोभनीय रस्ता, कललेला दिवस..
दोघींची मनं उन्मेषाने भरली होती. वाटेत काहींनी दोघीच मुली आहात पुढे जाऊ नका वगैरे
सल्ले दिले. पण अजून पुरेसा सूर्यप्रकाश असल्याने दोघींनी ती रिस्क घेतली आणि रस्ता
संपून पायवाट लागते तिथे गाडी थांबवली. धबधब्याचा आवाज होताच वाट दाखवायला. पण, फारसं चालावं न लागता त्यांना नदी दिसली आणि तिच्या काठावरचे खडकही. तिथून
डावीकडे बर्याच अंतरावर वरुन कोसळणारा गोकाक दिसत होता. नदीच्या किनार्यावर झाडी
होती. आणि झाडीच्या अलिकडून एक पायवाट डावीकडे धबधब्याच्या दिशेने जाताना त्यांना दिसली.
काही विचार न करता दोघी त्या पायवाटेने भराभर निघाल्या. वाटेत त्यांच्यासारखा एखाद
दूसरा प्रवासी त्यांना दिसला. धबधब्याचा आवाज सोबतीला होताच. विरळ झाडीतून शेजारून
वाहणारी नदीही दिसत होती. चालत चालत त्या खूप पुढे आल्या. आता एकमेकींचे आवाजही त्यांना
ऐकू येईनात.. रोरावणारा धबधबा त्याचं अस्तित्व सिद्ध करत होता.
पायवाट संपली. नदीच्या किनार्यावरचे दगड लागले. समोर नदी आणि पंचेंद्रिये
व्यापून टाकणारा अफाट गोकाक जलप्रपात! दोघी आ वासून पाहत राहिल्या. धबधब्याचे तुषार
सहज त्यांच्यापर्यंत पोचत होते. तो गारवा दोघींना खोल खोल शांतवत गेला. तो भव्य जलप्रपात
आणि ते त्याचं शुभ्र स्फटिकी रूप त्यांच्या डोळ्यांत मावेना. निसर्ग नावाची गोष्ट आणि
आपलं त्याच्या समोरचं अति क्षुद्र अस्तित्व दोघींना ठळक जाणवलं. रंध्रा-रन्ध्रात तो
प्रपात साठवत दोघी मागे फिरल्या. त्याच पायवाटेने मागे येत झाडांतून मगाशी दिसलेल्या
खडकापशी आल्या. तो महाकाय जलप्रपात पचवून नदी इथे अगदीच शांत अविचल भासत होती. पाण्यात
एक-दोन पावलं टाकून दोघी त्या खाडकावर चढल्या. समोर भव्य धबधबा, बाजूला शांत नदी, सूर्याची मावळती आभा.. एक अनोखी तंद्री लागली. बराचवेळ दोघी एक शब्दही न बोलता
तिथे बसून राहिल्या. काही गोष्टी शब्दांकीत करता येत नाहीत. व्यक्त करता येत नाहीत.
भाषा नावाची गोष्ट अशावेळी अगदीच निरुपयोगी. तसा हा अनुभव. त्या रोरावणार्या धबधब्याच्या
आवाजात दोघींना कमालीची शांतता मिळात होती. निसर्ग कदाचित यासाठीच जवळचा वाटतो. तो
आपला आपल्याशीच संवाद घडवून आणतो.
काहीवेळाने रिया बोलू लागली,
“अब्जो वर्षं.. अक्षरश: अब्जो वर्षं ही नदी अशीच वाहतेय.. आणि आपण
तिच्या तीरावर काही वर्षं जगणार आहोत फक्त.. घडीचे प्रवासी.. काळाच्या या अतिविशाल
कॅनवस कडे आणि तो काळ याचि देही अनुभवलेल्या ह्या प्राचीन प्रवाहाकडे पाहिलं ना की
आपण किती लहान, आपलं
विश्व किती छोटं आणि आपले प्रॉब्लेम्स किती हास्यास्पद वाटतात ना..”
संहिता तिचं बोलणं नुसतंच ऐकत होती. रियाच्या डोळ्यांसमोर जॉग्रफी-हिस्टरी
सार्याची सरमिसळ झळकू लागली होती. जवळपास अब्ज वर्षांपूर्वी इंडियन प्लेट गोंडवना
पासून म्हणजे आत्ताच्या आफ्रिकेपासुन विलग होऊन उत्तरेकडे सरकू लागली.. युरेशियन प्लेट
ला येऊन मिळाली. त्या प्रचंड आघातातून हिमालय निर्माण झाला. विंध्य पर्वताच्या दक्षिणेचा
भारत हा उत्तरेपेक्षा अधिक प्राचीन आहे तो याचमुळे. तेव्हापासून ही भूमी तिचं अस्तित्व
राखून आहे. इथली सृष्टी उत्पत्ति-स्थिति-लय सार्यांतून पुन्हा पुन्हा आवर्तीत होतेय.
मत्स्य-कूर्म-वराह करत मानव इथे उत्क्रांत होत गेला. प्रगत झाला. निरनिराळी साम्राज्ये
स्थापली गेली, मोडून
पडली.. किती हास्य, किती फुत्कार, किती
अंगार, किती उल्हास या प्रवाहाने पाहिले असतील, वाहिले असतील. आज त्या दोघींच्या मनाच्या अवस्थाही तो वाहत होताच की..
अंधार पडायला लागला तशा दोघी माघारी फिरल्या. एक वेगळाच चिरंतन अनुभव
गाठीशी बांधून. गोकाक-हुबळी रोड त्यांची वाट पाहतच होता..
क्रमश:
@संजीवनी देशपांडे
टिप्पण्या