दिगंत : भाग ९

 

 त्यादिवशी संध्याकाळी मग इतर कुठेही न जाता दोघीही हॉटेल वर परतल्या. तिथेच जेवण केलं. सुरूवातीला संहिता झाल्या प्रकारावरुन रियाला चिडवत होती. पण नंतर तिच्या मूड कडे पाहून तिने ते सोडून दिलं. रियाच्या मनात संमिश्र भाव होते. अनुरागचं हे असं हम्पीला येणं, तिला भेटणं या सार्‍याने ती आत कुठेतरी सुखावली होती. पण मग आपल्याला असं काहीतरी वाटतय याचाही तिला राग येऊ लागला. तिच्या मनाची ठाम समजूत होती, लग्न म्हणजे एंड ऑफ लाइफ! म्हणूनच ती त्या गोष्टीपासून स्वत:ला शक्य तितकं लांब ठेवण्याचा प्रयत्न करत होती. शेवटी, झोपेच्या आधीन होता होता तिने कधीतरी तो विषय डोक्यातून काढून टाकला. आणि सकाळी उठून आईला फोन करायचं ठरवलं.

इकडे संहिता पुन्हा डायरी उघडून बसली.

.....

Everything happens for a reason.. खरंय का हे? काही लोक अगदी कारण, संबंध नसताना आपल्या आयुष्यात येतात आणि खोलवर परिणाम करून जातात. आज त्या अनुराग कडे पाहिल्यावर अनिकेतची तीव्र आठवण आली. तो ही असाच poised, शांत, विचारी वगैरे पण तितकाच परिणामकारक. वर्माचीही बोलती बंद व्हायची त्याच्यापुढे. आमच्यात जे होतं ते विशेष होतं नक्कीच. मी घाई केली का? त्याला वेळ द्यायला हवा होता का थोडासा?

त्यादिवशी संध्याकाळी मला intuition होतंच की हा मला प्रपोज करणार. त्याने ते तसं केलंही. अगदी वेगळ्या पद्धतीने. पण मी काय केलं? मी सर्वात आधी त्याला माझी सगळी वैद्यकीय कथा ऐकवली. त्यावरच माझं मत आणि माझ्या आईपणाबद्दलचा मीच घेऊन टाकलेला निर्णय सुद्धा. त्याच्या हावभावांवरून त्याला ते अगदीच अनपेक्षित होतं. पण विशेष धक्का बसल्या सारखा तो वागला नाही. माझ्या मनातली भिती, असुरक्षितता सारं कदाचित माझ्या बोलण्यातून बाहेर पडत असावं. थोड्यावेळाने मी शांत झाले. तो इतकंच म्हणाला की या सगळ्याचा आत्ता विचार करण्याची गरज नाही. वेळ येईल त्यावेळी आपण बोलू यावर आणि मार्गही शोधू. हो एवढं नक्की, की तुला कुठल्याही प्रकारचा मानसिक अथवा शारीरिक त्रास मी होऊ देणार नाही. पण माझं या उत्तराने समाधान झालं नाही. मला त्याक्षणी त्याचा निर्णय हो किंवा नाही मध्ये हवा होता. पण एवढा मोठा निर्णय एका क्षणात कसा कोण घेऊ शकतो इतकी साधी गोष्टही मी गृहीत धरली नाही. ऑल थॅंक्स टू माय हार्मोनल इमबॅलेंस. मी चिडले. आदळ-आपट केली. आणि निघून आले. त्यानंतर त्याने बोलण्याचा प्रयत्न केला त्या त्या वेळी मी त्याला टाळलं.

आणि मग एक दिवस समजलं की त्याने जॉब स्विच केलाय. आता तो मला दिसणार नव्हता. आपल्यातलं न्यून समजल्यावर समोरची व्यक्ति आपल्याला सोडून जाणार हे मी माझ्या मेंदूत इतकं पक्कं केलं होतं की मला दुसरं काही दिसलंच नाही. समोरच्या व्यक्तीलाही काही बाजू असू शकते, ती आपणही समजून घ्यायला हवी हे अजिबात जाणवलं नाही. मी माझ्याच चौकटीत अडकून राहिले. आज इथे मनावरचे इतर मळभ पुसट होत असताना या सगळ्याची जाणीव होतेय.

बोलावं का एकदा त्याच्याशी? Maybe परत गेल्यावर..

 

संहिता.

हम्पी.

.....

दुसर्‍या दिवशीची सकाळ लख्ख होती. दोघींचं सूर्योदय पहायला मातंग हिल वर जायचं आधीच ठरलेलं होतं त्याप्रमाणे त्या लवकर येऊन पोचल्याही होत्या. एकमेकांचा तोल सांभाळत निश्चळ उभे अचाट पाषाण आणि त्यांनी भरलेली ती टेकडी एक वेगळाच दृक-चेतन अनुभव देत होती. खालून अनिमिषपणे वाहणारी तुंगभद्रा मनाला प्रवाहीत करत पुढे जात होती. अब्जो वर्षं झीज झालेल्या पूर्वीच्या एका अखंड पर्वताचं हे आजचं रूप.. अस्ताव्यस्त पसरलेले झिजून विलग झालेले पाषाण. पलिकडून उगवू पाहणारा सूर्य त्या सगळ्या काळाचा साक्षी होता.


तो उगवता सूर्य आणि आजूबाजूचं ते विहंगम दृश्य पाहत दोघी एका भल्यामोठ्या दगडाला टेकून बसल्या. छोटे
, मोठे असंख्य दगड दृष्टिक्षेपात.. सगळे एकमेकांना बॅलेन्स करत स्थिर होते. एकटा दगड इथे खूप काळ टिकून राहू शकला नसता.. त्याला तोलण्यासाठी, स्थिर ठेवण्यासाठी इतरांची मदत होत होती.. आयुष्याचंही असच असतं नाही का.. थोडा आधार देत, थोडा आधार घेत ते जगायचं असतं.

दोघी आपल्याच विचारात मग्न होत्या. इतक्यात त्यांच्या कानांवर आवाज पडला,

“तुमची खात्री आहे, तुम्ही माझा पाठलाग करत नाही आहात?”

दोघींनी मान वळवून बाजूला पाहिलं तर, तिथे गळ्यात कॅमेरा अडकवलेला आणि एका हाताने बॉटल उघडून पाणी पिणारा अनुराग दिसला.

त्याला तिथे पाहून रिया आधी चमकली आणि मग “स्वप्न बघ तू.” असं स्वत:शीच पुटपुटली..

“जोक! पण मला तरी आता असं वाटायला लागलंय की तू नक्की रियाचा पाठलाग करतोयस.” संहिता त्याला म्हणाली.

यावर डोळे मिचकावत तो म्हणाला,

“माझी तर तीच इच्छा आहे. त्यासाठी तर आलो इतका दूर. पण मॅडमना नकोय आमचा पाठलाग.. सो काय करणार..”

यावर चिडून दोघांकडे एक कटाक्ष टाकत रिया,

“चालूद्या तुमचं.. मला यात काडीचाही इंट्रेस्ट नाही” म्हणत तिथून उठून गेली.

तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पाहत अनुराग संहिताला म्हणाला,

“ही कायम अशी वैतागलेली असते का? की हा माझा स्पेशल इफ्फेक्ट आहे?”

“हाहा.. मला तुमच्या दोघात ओढू नका बाबांनो.” संहिता हसत म्हणाली.

तिच्या बाजूच्या दगडाला टेकून बसत चेष्टेच्या सुरात तो म्हणाला,

“बाय द वे.. तुझं पण असंच आहे का.. लग्न करायचं नाही अँड ऑल अजेंडा?”

यावर ती जराशी शांत झाली. आणि मग विषय बदलत म्हणाली,

“तुला लग्न सोडून दुसरं काही सुचतच नाही वाटतं!”

“हाहा.. हो. सध्यातरी नाही. मला करायचंय बाबा लग्न. एकटं जगण्यात काही अर्थ नाही.”

यावर ती काही बोलणार इतक्यात संहिता कुठे राहिली बघायला रिया पुन्हा तिथे आली आणि त्यांचा चाललेला विषय पाहून हाताची घडी घालून दोघांकडे पाहत उभी राहिली. त्या दोघांनी तिच्याकडे पाहिलं. आणि मग मिंटाच्या शांततेनंतर तिघेही एकमेकांकडे पाहून हसले.

तिच्याकडे पाहत अनुराग म्हणाला,

“बरं, मी काय म्हणतो, मला इथली एक मस्त जागा माहितीये.. लंच करूया का सोबत?”

यावर संहिताने रियाकडे पाहिलं. रिया शांत.

“बघा विचार करा.. यू विल रिग्रेट इट.. अगदी authentic food असतं तिथे.” अनुराग पुढे म्हणाला.

पुन्हा संहिता ने रिया कडे पाहिलं. रिया पुन्हा शांत.

“प्लस मला कन्नड येतं..” अनुराग खिंड लढवतच होता..

मग दोघांकडे पाहून रिया हसून म्हणाली,

“ओक्के.. ठीक आहे.”

आणि मग अनुरागकडे पाहत म्हणाली,

“एका अटीवर.”

“कोणत्या?” अनुराग.

“नो फ्लर्टिंग आणि नो लग्नाचा विषय!”

यावर डोकं खाजवत तो म्हणाला,

“ते.. जरासं अवघड आहे..”

रियाने मान वाकडी करून त्याच्याकडे पाहिलं,

ओके फाइन.. मान्य!” अनुराग शांतपणे हसत म्हणाला..

 

 

क्रमश:

 

@संजीवनी देशपांडे

 

 

 


टिप्पण्या

अनामित म्हणाले…
पुढील भाग?
Sanjeevani म्हणाले…
पुढचा भाग उद्या पोस्ट होईल.

एक दिवस आड भाग प्रकाशित होतात याची वाचकांनी नोंद घ्यावी. काही अडचण आली तर फारतर दोन दिवसांनी. ही कथा मालिका असल्याने दोन भागांमधील अंतर हा कथेचा अविभाज्य भाग आहे. त्याने अभिरुचि वाढवण्यास मदतच होते. त्याचप्रमाणे भाग मोठे किंवा लहान हे कथेच्या गरजे नुसार ठरत असतं (यासंबंधीचे बरेच अभिप्राय मला मिळत आहेत).

लोकप्रिय पोस्ट