दिगंत : भाग १३
“आपण कुठे जातोय नक्की, कळेल का?” समोरच्या रिक्षाच्या मागे आपली गाडी हाकणार्या रियाकडे पाहून संहिताने विचारलं.
“कळेलच तुम्हाला काही मिंटात..” शेजारी बसलेल्या तिच्याकडे एक नजर
टाकत रिया उत्तरली.
“ओह.. सर्प्राइज अँड ऑल..” मागे बसलेला अनुराग म्हणाला.
रियाने मान वळवून डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहिलं.
तिच्याकडे गमतीशीरपणे पाहत तो पुढे म्हणाला,
“एक मिनिट, मला होकार देण्यासाठी एखादी रोमॅंटिक जागा वगैरे निवडली आहेस की काय?”
संहिताने जोरात हसून अनुरागला टाळी दिली. रियाने चिडून दोघांकडे
पाहिलं आणि मग अनुराग ला म्हणाली,
“वेरी फनी. अनुराग सी, तू कितीही लेक्चर दे, फिलॉसफी झाड, मला ओळखायला लागल्याचा आव आण.. मी लग्न करणार नाहीये!”
“ऊप्स.. दिल के टुकडे हुये हजार.. नाही अॅक्चुअल्ली तुटून तुटून
मातीच झालीये आता पार..”
“शट अप..” तिने हसत त्याच्याकडे पाहिलं.
सोनेरी शेतांमधून वाट काढत रिक्शा पुढे जात होती. एका ठिकाणी
थोडसं वळून एका छोट्या लोखंडी गेट समोर ती थांबली. रिक्षावाल्याने इकडे-तिकडे
पाहिलं आणि मग तो चालत थोडं पुढे गेला. पाच एक मिनिटांनी सोबत एक मध्यमवयीन शेतकरी
सदृश इसमाला घेऊन परतला. हे तिघे तोवर गाडीतून उतरले होते. त्या व्यक्तीशी
बोलल्यावर त्यांना समजलं की, त्या छोट्या गेटच्या पलिकडची जागा म्हणजेच ओणके किंडी. आणि ती चक्क एक
खाजगी मालमत्ता आहे. आणि तो इसम मुंबईत राहणार्या त्या जागेच्या मालकाने नेमलेला
माणूस आहे. रिक्षावाल्याला आणि त्या इसमाला त्यांचे ठरलेले पैसे दिल्यावर
रिक्षावाला परत गेला आणि त्या रखवालदाराने गेटचं कुलूप उघडून तिघांना आत सोडलं.
आत वाढलेलं गवत, बरीचशी मोकळी जागा आणि थोड्याशा अंतरावर उजवीकडे मोठमोठाले एकावर एक बसलेले
दगड दिसत होते.
“कुठे आलोय आपण?” संहिताने पुन्हा विचारलं.
“ही एक प्रेहिस्टोरीक जागा आहे. ज्ञात अंदाजा नुसार जवळपास 5 हजार
वर्षांहून जुनी रॉक पेंटिंग्स आहेत इथे. Oldest of art form!”
संहिता आणि अनुरागने बर्याचशा कुतुहलाने रियाकडे पाहिलं.
त्या रखवालदाराच्या मागे तिघेही cave paintings च्या दिशेने
चालू लागले.
“प्रेहिस्टोरीक प्लेस.. वेल हे मजेशीर आहे.” रियाकडे पाहत अनुराग
म्हणाला.
“मजेशीर? काय..” रिया.
“हेच इथे काहीतरी सापडलं म्हणून या जागेला प्रेहिस्टोरीक
म्हणायचं. पण, मला
वाटतं आपण फिरतोय ती प्रत्येक जागा, आणि इतरही अजून ठिकाणं, आपला देश, पृथ्वीचा बराचसा भाग हे सगळंच
प्रेहिस्टोरीक आहे. त्या प्रत्येकाला इतिहास आहे. काहींचा आपल्याला महितीय तर
काहींचा नाही इतकाच काय तो फरक.”
अनुरागच्या बोलण्याने रिया विचारात पडली. खरंच आहे की हे.
ऑल्मोस्ट एव्री प्लेस इज मोर ऑर लेस प्रेहिस्टोरीक.
मोठ्या मोठ्या दगडांची ती विक्षिप्त छोटीशी ठेंगणी टेकडी चढताना
तिघांची बर्यापैकी दमछाक झाली. एका भल्यामोठ्या दगडाखाली त्या दगडाच्या कॉन्वेक्स
आकारामुळे तयार झालेल्या गुहेसमोर तिघे पोचले. आणि समोरच्या दगडावरच्या त्या लाल
रंगात रंगवलेल्या आकृत्या पाहून स्तिमीत झाले. हजारो वर्षांपूर्वीच्या मानवी
अस्तित्वाच्या त्या खूणा पाहताना नाही म्हटलं तरी त्यांची मनं थरारली. वेगवेगळ्या
प्राण्यांचे आकार,
कधी त्यांच्या मागे तर कधी त्यांच्या पुढे असणार्या मानवी आकृत्या.. चौकोनी
चौकटीत उभे दोन मानवी देह.. एक ना अनेक चित्रं. मोरासारखे वाटणारे पक्षी.. त्यांची
पिसं हातात घेतलेले लोक.. आपण कल्पनाही करू शकत नाही इतक्या प्राचीन काळी, कोणीतरी इथे ही चित्रं चितारुन ठेवली आहेत. काय हेतु असतील त्यामागचे? माहितीचं संकलन, भोवतालाचं वर्णन की व्यक्त
होण्याची उत्कट आकांक्षा? त्या आदिम कलाकारांना पुसटशी तरी
कल्पना असेल का की आपल्या या कलाकृती हजारो वर्षं जगणार आहेत, उन्ह, वारा, पावसात टिकणार
आहेत. कोणत्या तरी काळी त्या पहायला वाट विचारत त्या काळातले लोक इथे येऊन पोचणार
आहेत.. रियाच्या मनात विचारांच्या शृंखला सुरू होत्या. प्रत्येक चित्रावरून हात
फिरवून ती पाहत होती. जवळून निरखत होती. इतिहासविषयी फारशी ओढ न वाटणार्या
संहिताच्या मनाला देखील ती चित्रं स्पर्शून गेली. अनुराग एका मागून एक फोटोज क्लिक
करत होता. इतक्या वेळा हम्पीला येऊन देखील त्याला या ठिकाणा विषयी काहीही माहीत
नव्हतं.
बराच वेळ त्या परिसरात फिरून त्यांनी तिथली जवळपास सगळी चित्रं
पाहिली. एका गुहेत तर फणा काढलेला नाग चितारला होता. गुहेच्या तोंडावर त्याचा फणा
आणि आत जाणार्या कॉनकेव दगडावर शेपूट. त्या ठेवणीमुळे चित्र त्रिमितीय वाटत होतं.
तिघेही अवाक झाले.
पण खरं अद्भूत चित्र वेगळंच होतं.
“ओह माय गॉड..” ते दिसल्यावर रिया म्हणाली. आणि मागे असलेल्या
त्या दोघांना तिने ते पहायला बोलावलं.
गुहेच्या आतल्या भिंतीवर मगासारखी प्राण्यांची, माणसांची चित्रं होती. आणि
त्यांच्या अगदी वर गुहेच्या छतावर आतल्या बाजूने एक गोलाकार आकृती होती. ही
पेंटिंग्स पहायला येण्यामागे खरं कारण या विशिष्ट चित्रा विषयी रियाला वाटलेलं
कुतूहल होतं. जेव्हापासून तिने त्याविषयी वाचलं होतं तेव्हापासून त्याला पाहण्याचं
तिच्या मनात होतं. आणि ती ते आज प्रत्यक्षात पाहत होती. ‘एलियन
यूएफओ’, ‘मर्तिक विधी’ आणि अजून काय काय
निष्कर्ष त्या चित्रा विषयी काढले गेले होते. पण ठाम मता पर्यन्त कोणीच पोचू शकलं नव्हतं.
एखाद्या सॅटलाइट किंवा अंतरीक्ष याना सारखी दिसणारी ती आकृती आश्चर्य वाटायला लावणारी
होती. तिघेही पुन्हा पुन्हा त्या चित्राकडे पाहत होते. आणि अचंबित होत होते. इतिहास
ही खरच किती अनाकलनीय गोष्ट आहे याची जाणीव त्यांना होत असावी. ते खरंच यान असेल का
किंवा अजून काही? यान असेल तर कुठून आलं असेल? कोणी तयार केलं असेल? इथल्या आदिम लोकांना ते कसं दिसलं
असेल? एक न अनेक प्रश्न..
मनात प्रचंड विस्मय घेऊन तिघेही जवळच्या एक दगडावर बसले. सूर्य क्षितिजाकडे
झुकला होता. संध्याकाळची वेळ. आणि ते अद्भूत ठिकाण. काही न बोलता तिघेही बराच वेळ तिथे
बसून राहिले..
क्रमश:
@संजीवनी देशपांडे
टिप्पण्या