ओघळ..
आज श्वास आहे. उद्या असेल की नाही माहीत नाही. उदास खेडी.. भकास
शहरं.. बंद दारांआड जगण्याचा अखंड चालू असलेला संघर्ष. हातांना काम नाही, घरात सामान नाही, ताटात अन्न नाही, अशी कित्येकांची अवस्था.
मोलकरीण आज हताश होऊन म्हणाली, 'काय करू बाई घरात बसून? पोरांना खायला काय घालू? हौस नाही मला जीव मुठीत घेऊन घरोघरी कामं करत
फिरायची. घरात निवांत बसायला कोणाला आवडणार नाही? पण आमच्यासारख्यांचं इकडे आड अन तिकडं विहीर असं
झालंय.. मला कै झालं तर पोरांचं कसं होईल विचाराने जीव घाबरा-घुबरा होतो..'
तिच्या डोळ्यांच्या कडा ओल्या. आवाज
कातर आणि मी गप्प.
हे टाळता येऊ शकलं असतं का? कदाचित हो, कदाचित
नाही. सरकारला दोष द्या.. व्यवस्थेला नावं ठेवा.. या पक्षाचे लोक त्या पक्षाला
बोलणार आणि त्या पक्षाचे या पक्षाला. सामान्य लोक अगतिकपणे न मिळणार्या बेडकडे,
लसींकडे आणि रेमडिसिव्हरकडे पाहत बसणार.
यातलेच बरेचसे अगदी आत्ता-आत्ता पर्यन्त बिनबोभाटपणे फिरताना दिसत होते. 'कोरोना गेला' इथपासून 'तो खोटा आहे' इथपर्यंत
वदंताही वावटळी सारख्या उडून खाली बसल्या. परिणाम आता आपल्यासमोर आहेत.
इतके दिवस खेडी बर्याच प्रमाणात यापासून अबाधित होती. पण आता चित्र
उलटं आणि भीषण आहे. खेडोपाडी लोक घरीच मरताहेत. ना चाचण्या. ना निदान. सर्दी-खोकला
तर आहे म्हणून आधी दुर्लक्ष. नंतर दवाखान्यात गेलं की घरी जाऊ देत नाहीत म्हणून
दुखणी अंगावर काढण्याचे प्रकार. आणि मग मृत्यू. अंत्ययात्रा निघताहेत. घरंच्या घरं
पॉझिटिव! अज्ञान, अपुरी
साधनं, अक्षम
व्यवस्था.
लोकसंख्येचा अवाढव्य आकार आणि विषणू पसरण्याचा वेग पाहता यंत्रणा गुडघे टेकणार
हे अटळ आहे. मोठ-मोठे प्रगत देश जिथे सपशेल हरले तिथे आपली काय कथा.
या अशा परिस्थितीत यातून बाहेर पडण्याचा, तिला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न व्हायला हवा.
होतंय काय तर याला दोष द्या.. त्याची उणी काढा.. पाहू तिकडे हाच प्रकार.
निवडणुका घेणारे, त्या
घेऊ देणारे, त्यात सहभाग
घेणारे, ती बातमीपत्रं चवीने पाहणारे सारेच यात दोषी आहेत. कोणा एकाचं हे पातक नाही. ते सामूहिक आहे. त्याची
जबाबदारीही सामूहिक आहे आणि परिणाम देखील सामुहिकच असतील. आणि त्याचमुळे 'सामूहिक प्रयत्न' हेच यावरील औषध आहे.
पाऊस थांबलाय. निथळणार्या काचेवर आणि कोरड्या डोळ्यांमध्ये आता निर्विकारपणे ओघळणारे चार ओघळ
आहेत फक्त..
संजीवनी
टिप्पण्या