संपी निघाली कॉलेज ला.. (भाग - ३)

 

सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नांची..

संपीची आई गल्लीभर ऐकू जाईल अशा आवाजात आणि 3क्ष वेगाने आरती म्हणत होती. आणि मधुन मधून,

संपे, आरती म्हणायला ये..

असंही म्हणत होती. तेही हे वाक्य जणू काही आरतीचाच भाग आहे असं वाटावं अशा भन्नाट सुरांत.

पण बैठकीत टीव्ही वर कार्टून बघत बसलेली संपी ढिम्म हलली नाही. उलट त्या टॉम च्या कारनाम्यावर हसत बसली. ती असेच खीखी दात काढत असताना शेवटी तिची आईच हातात आरती घेऊन समोर येऊन उभी राहिली. काढलेले दात बंद करत संपीने निमूटपणे आरती घेतली. आणि एकवार पैठणी नेसलेल्या आईकडे पाहून आश्चर्याने म्हणाली,

अगं कोणाचं लग्न-बिगनय का? एवढी का तयार झालीयेस तू?’

यावर लुंगी नेसून लोडला टेकून वर्तमानपत्र वाचत बसलेल्या संपीच्या बाबांकडे एक कटाक्ष टाकून तिची आई म्हणाली,

नाही. वीस वर्षांपूर्वी मीच केलय म्हणून तयार झालेय..

म्हणजे?’ संपीचा प्रश्नार्थक चेहरा.

यावर बाप तशी लेक म्हणत कपाळाला हात लावून संपीची आई आत निघून गेली.

मग तोंडासमोरचा पेपर जरासा बाजूला सारून संपीचे बाबा हळू आवाजात संपीला म्हणाले,

अगं वडाला गळफास द्यायचा दिवस आहे आज. त्याचीच तयारीये ही सगळी. आता जातील या सगळ्या गल्लीतल्या बायका मिरवत वडाकडे. वटपौर्णिमा आहे आज.

एवढ्यात हातात एक मोठं ताट, त्यावर लोकरीने विणलेलं एक ताटझाकण टाकून आई बाहेर आली.

संपीच्या बाबांनी लगेच तोंड पेपर मध्ये खुपसलं.

गळयातल्या मंगळसूत्राकडे बोट दाखवत संपीची आई म्हणाली,

हो हो.. गळफास कोणाला पडलाय ते दिसतंय बरं. तुम्ही बसा आरामात वाचन-बिचन करत. आम्ही करतो पूजा, लाटतो पुरण-पोळ्या, दाखवतो नैवेद्य.. सगळं काय ते बायकांना. या पुरूषांना मोकाट सोडलय आपल्या सणवारांनी.

तुच्छतामिश्रित कटाक्ष टाकून संपीची आई घराबाहेर पडली.

एकदा तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे आणि एकदा पेपर आडून आई गेली का बघणार्‍या बाबांकडे पाहून संपीने पुन्हा तिची नजर टॉम अँड जेरी वर स्थिर केली. आणि मग पुन्हा तिचं खो-खो सुरू.

तेवढ्यात दराबाहेरून कोणीतरी मारलेली हाक तिच्या कानांवर पडली,

संपदा.. संपे..

वळून बघेतो नेहा आत आली. आणि संपीला कार्टून्स बघताना पाहून तिच्या शेजारी बसत म्हणाली,

संपे.. काय कार्टून बघतेस गं अजून. ते अमुक-अमुक चॅनेलवरच कसम की कसम बघ त्यापेक्षा. ती मेहक घर सोडून जाणार आहे आज.

कोण मेहक.. काय कसम की कसम.. ए मी नाही बघत त्या बोरिंग सिरियल्स. तूच बघ. संपी म्हणाली, आणि काय गं, कुठे गायब आहेस रिजल्ट लागल्यापासून. आम्ही तुझ्या घरी जाऊन आलो.

अगं, मी मावशीकडे जाऊन आले नेहा.

आणि अॅडमिशनचं काय?’ संपी.

ते झालं की. आजच घेतलं. कॉमर्स ला. नेहा.

अच्छा. चांगलंय. अजून कोण-कोणय कॉमर्सला?’ संपी.

तो घाटपांडे दिसला बाई. ती लांब केसांची मेघा पण होती. मी बघितलं तर साधी हसली पण नाही. तुसडी कुठली. इति नेहा.

काय गं आपला ग्रुप तुटणार आता. संपी.

तुटतोय कशाला. मी एकटीच तर आहे कॉमर्सला. बाकी तुम्ही सगळ्याजणी सायन्सलाच तर आहात. आणि मी काय, मी येत जाईन की सायन्सच्या बिल्डिंग मध्ये अधून-मधून.

अगं सायन्स आहे पण math ग्रुपला मी आणि मधुच आहोत फक्त. बाकी राधाने बायो घेतलंय. आणि तेजुने आयटी. Divisions वेगळ्या असतील. संपी.

असं पण असतं काय? सायन्स वाले लोक बाबा तुम्ही. स्कॉलर. आमचं बरंय बाबा. निवांत एकदम.

मग संपी आणि नेहाने गच्चीवर जाऊन बराच वेळ धुडगूस घातला. उद्या कॉलेजचा पहिला दिवस असल्याने संपीला उगाच धडधडत होतं. शिक्षक कसे असतील इथपासून, नवीन मैत्रिणी, वर्गातली मुलं, सायन्सचा अभ्यास’, केमिस्ट्रि भलतीच अवघड असते म्हणे ब्वा.. इथपर्यंत बरेच विषय तिच्या डोक्यात घोंघत होते. त्यात नेहाने इकडच्या तिकडच्या खबरी पुरवून तिला बरंच ज्ञानही दिलं. दिवस कलल्यावर नेहा घरी गेली तशी उद्याचा विषय तात्पुरता बाजूला सारत संपी पुन्हा कार्टून्स समोर जाऊन बसली.

 

आज संपीचा कॉलेजचा पहिला दिवस म्हणून घरात बरीच लगबग होती. संपीच्या आजोबांनी संपी साठी नवीन पेन आणलं होतं. आई डबा बनवण्याच्या घाईत होती. संपीची लहान बहीण उगाच मध्ये-मध्ये घुटमळत होती. पण या सगळ्यात संपी कुठे होती? तर मॅडम अजून स्वप्नातच विहरत होत्या. आईच्या दहा हाकांना झोपेतच पाचच मिनिटं असं म्हणत ती तासाभरापासून snooze करत होती. शेवटी सारे प्रयत्न थकल्यावर आई हातात लाटण घेऊन जेव्हा तिच्यासमोर येऊन उभी राहिली तेव्हा 9 चं पहिलं लेक्चर गाठायला संपी 8.20 ला उठली. एव्हाना मधु बाहेर येऊन बसली होती. डोळे चोळत तिच्याकडे पाहत संपीने नाहणीघरात धूम ठोकली आणि तिच्या नेहमीच्या हवाई वेगाने आणहिके उरकुन धावत-पळत बाहेर आली.

आईने दिलेला डबा बॅगेत ठेवत तिने आईच्या सांगण्यानुसार अनुक्रमे आधी देवाला मग आजोबांना मग आई-बाबांना धावता नमस्कार केला आणि कॉलेजच्या दिशेने सायकल हाकायला सुरुवात केली. कॉलेज सायकलने पंधरा मिनिटांच्याच अंतरावर होतं तरीदेखील दोघींना पोचायला उशीरच झाला. वर्गाबाहेर त्या पोचल्या तेव्हा वर्गात सर आलेले होते. पूर्ण वर्ग भरलेला. आणि दारात घामेघूम संपी, तिच्या बाजूला मधु. बॅग सांभाळत संपीने हळूच मधुला पुढे केलं. सगळ्यांच्या नजरा आता दोघींवर खिळलेल्या.

चाचरत मधुने विचारलं,

आत येऊ का सर?..’

संपी तिच्यामागे खाली मान घालून उभी. तिने हळूच डोळ्यांच्या कोपर्‍यातून आत पाहिलं. थोडेफार ओळखीचे, थोडेफार अनोळखी चेहरे आत दिसत होते.

वाह! पाहिल्याच दिवशी उशीर. छान. नावं काय आहेत तुमची?’ सरांनी विचारलं.

मी मधुरा देशमुख.. मधु उत्तरली.

संपी तिच्याकडे पाहत तशीच उभी. आपल्याला पण नाव विचारलंय हे तिच्या गावीच नाही. पूर्ण वर्ग तिच्याकडे पाहतोय आणि ती मधुकडे.. शेवटी मधुने खूण केल्यावर तिच्या लक्षात आलं. आणि मग आपल्याकडे रोखून पाहत असलेल्या सरांकडे पाहत ती गडबडीत म्हणून गेली,

मी.. मी संपी

संपी?’ सर.

यावर आता पूर्ण वर्ग मोठ-मोठयाने हसला.

संपी मग ओशाळून खाली मान घालून म्हणाली, संपदा जोशी

तिच्या वेंधळपणावर सरही जरासे हसले आणि त्यांनी दोघींना आत बसायला सांगितलं.

दोघी मग शक्य तितक्या मागे आणि शक्य तितकं भिंतीच्या बाजूच्या बेंचवर जाऊन बसल्या..

 

 

क्रमश:

 

 

संजीवनी देशपांडे


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट