संपीचं कॉलेज.. (भाग - ४)
एकामागून एक धडाधड लेक्चर्स चालू होती. संपी एका जुन्याच रजिस्टरचं
मधलं पान दुमडून काहीतरी उतरवत बसली होती. नवीन वर्ग, नवं कॉलेज, नव्या मैत्रिणी, शाळे सारखं धाकाचं वातावरण नसणं या सगळ्याची
तिला मजा वाटायला लागली. ओळखीच्या मुलींशी
बोलणं, अनोळखी
वाटणार्यान्चा कानोसा घेणं इ. इ. चालू होतं. त्यात दहावी बोर्डात कोणाला किती
मार्क आहेत हे विचारणं आणि त्यावरून कोण किती ‘हुशार’ हे ठरवणं हे ज्याचं-त्याचं चालूच होतं.
प्राध्यापक विद्यार्थ्यांशी ओळख करून घेत होते. आपापल्या विषयांची
तोंड-ओळखही करून देत होते. ‘मार्क’ कसे मिळवायचे, किती तास
अभ्यास करायचा, पुस्तकं कुठली वापरायची (त्यात स्वत:च्या
एखाद्या पुस्तकाची जाहिरात वगैरे आपसूक आलंच), एंट्रेन्स
मध्ये ‘स्कोर’ कसं करायचं इ.इ.
त्यांच्या मार्गदर्शनाचे विषय! प्रत्येकाला एकदम भरावल्यासारखं वाटायला लागलं.
दहावीत झालं ते झालं पण आता इतका अभ्यास करायचा, इतका अभ्यास
करायचा की COEP, VJTI सोडा थेट IIT च सर करायची असे संकल्प (?) मनातल्या मनात बांधले
जात होते. संपी पण एकदम भारावलेली. आता फक्त फिज़िक्स,
केमिस्ट्रि आणि मॅथ्स.. बास.. तिसरा विषय डोक्यात पण आणायचा नाही असा तिनेही मनोमन
निग्रह (?) वगैरे केला.
एक खरं, की या सगळ्या ‘objective’ भारावलेपणात मूळचे phy, chem आणि math कुठेतरी कोपर्यात
जाऊन बसलेले होते. मार्क, स्कोर, रॅंक
आणि engg ला अॅडमिशन हे खरे काय ते ‘विषय’.
बाकी सगळं मिथ्या!
त्यादिवशी घरी आल्यावर संपीने फर्मान सोडलं, ‘नवी
पुस्तकं हवी आहेत.. आजच्या आज.’ तिला आता एक दिवस काय एक
क्षणही वाया जाऊ द्यायचा नव्हता. भारावलेपण हो दुसरं काय! मग याचा सल्ला घे, त्याला विचार, publication
कुठलं चांगलं, कोणत्या पुस्तकातले प्रश्न हमखास विचारले
जातात इ.इ. मौलिक मुद्दे ध्यानात घेऊन संपीची पुस्तक खरेदी पार पडली.
न भूतो न भविष्यती अशा उत्साहात सकाळी नऊ च्या कॉलेजसाठी संपी
दुसर्या दिवशी चक्क ‘सात’ वाजता उठली. आई-बाबा आ वासून तिच्याकडे पाहतच
राहिले. ‘पोरगी सुधारली’ वगैरे वाटायला
लागलं त्यांना. घेतलेली पुस्तकं, विषयवार वह्या, हिरवी-नीळी-लाल-काळी इ पेनांचा गुच्छ असा सारा
जामानिमा घेऊन संपी मधु यायच्या आत ‘तयार’ होऊन बसली होती.
कॉलेज मध्ये आल्यावर संपी आज चक्क पहिल्या रांगेतल्या बाकावर
बसली. आणि गप्पा-बिप्पांना फाटा देत कालच घेतलेलं नियोजित लेक्चरच्या विषयाचं
पुस्तक उघडून त्यात तोंड खुपसून बसली.. ध्यास हो ध्यास! ‘सर्क्युलर मोशन’ प्रकरणाचं नाव. वाह! आता ओळ अन ओळ पाठच करते असं म्हणत त्याच्यावर आडवा
हात मारण्याच्या ती विचारात असतानाच तिला आजूबाजूचा आवाज एकदम शांत झाल्यासारखा
वाटला. काय झालं म्हणून पहायला तिने मान वर केली. वर्गात पिन ड्रॉप सायलंस.
संपीच्या बेंच च्या अगदी समोर परगावाहून आलेली नवी शहरी वाटावी अशी एक नवीन
अॅडमिशन घेतलेली मुलगी अवचटशी बोलत थांबली होती. कोणी दाखवत नसले तरी वर्गातल्या
प्रत्येकाचं लक्ष तिकडेच लागलेलं. संपीने
एकवार दोघांकडे पाहिलं आणि त्यांच्यापेक्षा तीच जास्त अवघडली. तिच्या अगदी समोर हा
प्रकार चालू होता. ती नवीन मुलगी, दिशा की कोण, अवचटला गावात कुठले क्लास चांगले, पुस्तकं कोणती
घेणार आहेस इ.इ. प्रश्न विचारत होती. आणि सुरुवातीला अवघडलेला अवचट नंतर काहीतरी
जुजबी उत्तरं देऊन तिथून सटकण्याच्या प्रयत्नात होता. पण,
दिशा काही थांबेचना. तिला काल कोणीतरी अवचट फर्स्ट आहे वगैरे सांगितलं होतं. कॉलेज
मध्ये आलेले असले तरी असं एकदम सामोरं-समोर बोलणं त्यांच्या आजवरच्या घडणीला धक्का
देणारंच होतं. आता पोरं नंतर हिच्यावरून आपली उडवणार हे अवचटला कळून चुकलं. इतका
वेळ धीर धरून बसलेला तो, ‘तू अभ्यास
कसा करतोस?’ असा दिशाचा प्रश्न ऐकून बादच झाला. त्याने समोर
बसलेल्या संपीकडे पाहिलं आणि काही न सुचून तिला म्हणाला,
‘अरे हाय.. तुला काल ते माझं केमिस्ट्रिचं पुस्तक हवं होतं ना?’
संपीने आधी इकडे-तिकडे बघितलं. त्याने पुन्हा तिला ‘अगं ते नाही का ते इनोर्गनिक
केमिस्ट्रिचं?’. संपी चाट पडली. तिला ओ की ठो समजेना. समोर
अवचट. त्याच्या बाजूला दिशा. आणि पूर्ण वर्गाचं लक्ष याच संभाषणाकडे लागलेलं.
संपीचं ततपप सुरू.. एवढ्यात पुन्हा अवचट,
‘थांब मी आणलंय का पाहतो’ म्हणून तिथून सटकला.
दिशा ‘अरे थांब.. थांब..’ म्हणत त्याच्यामागे गेली. संपी
पुरती ब्लॅंक. पुस्तकातली सर्क्युलर मोशन आता तिच्या डोक्यात घुमायला लागली होती.
पुन्हा कधीही पहिल्या बाकावर बसायचं नाही असा मग तिने निश्चयच केला.
‘संपे, तू कधी मागितलंस गं पुस्तक त्याच्याकडे?’ शेजारच्या मधुने तिला विचारलं.
‘अगं.. शप्पथ. मी नाई मागितलं. मी कशाला जाऊ त्याच्याशी बोलायला. खोटं
बोलला तो साफ!’
संपी बावरून शपथा घेत म्हणाली.
‘वाटलंच मला. चल विचारू त्याला, असं खोटं का बोललास
म्हणून. उगाच तुझं नाव खराब नको व्हायला.’ मधु जागची उठत
म्हणाली.
तिला ओढून खाली बसवत संपी म्हणाली,
‘नको नको. बस गप्प. मी नाई येणार बाबा कुठे. मला नाही बोलायचं कोणाशी.’
आणि तिने पुन्हा तोंड ‘सर्क्युलर मोशन’ मध्ये खुपसलं.
त्यादिवशी दिशा आणि अवचट हा सर्वांसाठी दिवसभर चघळायला मिळालेला
हॉट विषय होता. दिशा फुल्ल ऑन एटेन्शन सीक करत वावरत होती. आणि अवचट तिच्याकडे
दुर्लक्ष करत मित्रांमध्ये बसून फिदिफीदी हसत होता. येणारे प्राध्यापक येऊन शिकवून
जात होते. संपी प्रामाणिकपणे त्यांचा शब्द अन शब्द टिपून घेत होती. आणि घरी जाऊन
त्या सगळ्याचं रिवीजन करायचं असंही तिने ठरवलं होतं. पण घरी आल्यावर मात्र
टीव्हीवर चालू असलेलं टॉम अँड जेरी बघण्यात ती इतकी गढून गेली की कॉलेज, सर्क्युलर मोशन वगैरे सगळं
तात्पुरतं तरी साफ विसरून गेली.
@संजीवनी देशपांडे
टिप्पण्या