अगंबाई! बाराव्वी?! (संपी आणि तिचं धमाल जग, भाग - ५)

 

एकामागून एक दिवस भराभर जात होते. कधी सुरू झाली आणि कधी संपली कळायच्या आत अकरावी निघूनही गेली. आता बारावीचं वर्ष. म्हणजे अक्षरश: समरांगण. काॅलेजच्या सुरुवातीच्या दिवसात संचारणारा उत्साह चार दिवस टिकतो आणि मग पुन्हा येरे माझ्या मागल्या सुरू. पहिले आठ दिवस संपीही अभूतपूर्व उत्साहाने वावरली. पण नंतर हळूहळू, त्या दिसेल ती गोष्टपाठकरण्याच्या नादात तिच्या मेंदूला मुंग्या यायला लागल्या, मग निश्चयाला सुद्धा आणि मग आपसूकच वेळापत्रकालाही. वर्षभर तिने पहिलं लेक्चर जेमतेमच अटेंड केलं. ती आताउशीरा येणारी वेंधळी संपीम्हणून काॅलेजात प्रसिद्धही झाली होती


वर्गात एव्हाना काही नाॅर्म्स सेट झालेले होते. काही स्काॅलर लोकांचे ग्रुप, काही उडाणटप्पूंचे ग्रुप, काही अवचट सारखे पहिले येणारे तर काही तळागाळातले, काही आपल्या स्टाईल मुळे प्रसिद्ध असणारे, काही चातुर्यामुळे. संपी मात्र या कशातही नव्हती. कोणाच्याही फारसा दृष्टीस पडणारा, ठळक जाणवणारा, पुढे नसणारा आणि मागेही नसणारा असा एक मधला पॅच सगळीकडे असतो. संपी त्यापैकी होती. कोणाच्या अध्यात-मध्यात नसणे, किंवा अंगभूत निरागसपणा किंवा कुठल्याच बाबतीत वागण्यातून तरी काॅम्पीटंट नसणे .. गुणांमुळे तसं तिचं प्रत्येकीशी छान जमायचं. प्रत्येकीला ती अशी आपली वाटायची. अगदी नवीन आलेल्या दिशासकट सगळे तिला येऊन मनातल्या गोष्टी सांगायचे. आणि तीही सार्यांचं सारंऐकुनघ्यायची

दिशाकडून बऱ्याच नवनव्या गोष्टी संपीला समजायच्या. दिशा बिनधास्त होती. भीड वगैरे तिला कशाचीच वाटायची नाही. त्यामुळे वर्गातल्या इतर खाली मान घालून फिरणाऱ्या मुलींमध्ये ती वेगळी दिसायची आणि पडायची सुद्धा. वाटेल तेव्हा अगदी सहजपणे मुलांशी जाऊनबोलण्याचंदुर्दम्य धाडस तिच्यात होतं. तिच्या या स्वभावाला वर्गही आता पुरेसा सरावला होता. त्यामुळे चकित होणं वगैरे गोष्टी आता उरल्या नव्हत्या. एव्हाना मुलांपैकी दोघं-तिघं तिचे मित्रही झालेले होते. अवचट त्यापैकी नसला तरी तिचं-त्याचं बऱ्यापैकी बोलणं व्हायचं. ती तशी हुशारही होती म्हणा. पण, सध्या तिचं नाव जोडलं जात होतं ते शिर्केशी. अनिरुद्ध शिर्के. त्या दोघांची फिजिक्सची शिकवणी एक होती. संपीचं काॅलेज अकरावी-बारावी सायन्स प्रसिद्ध असल्याने बाहेरगावचे बरेच विद्यार्थी तिथे शिकायला यायचे. दिशा त्यापैकी एक असल्याने होस्टेलवर रहायची. एक-दोनदा शिकवणी संपल्यावर शिर्केला तिला होस्टेलवर सोडताना कोणीतरी पाहिलेलं होतं. तेव्हापासून बातमी वाऱ्यासारखी काॅलेजभर पसरली. पण दिशाने कधी असल्या गोष्टींना भीक घातली नाही

त्यादिवशी आॅफ लेक्चरमध्ये संपी, मधु आणि त्यांचा ग्रुप असंच काही टाईमपास करत बसलेले होते. वर्ग बराचसा रिकामाच होता. मागच्या एका बेंचवर दिशा एकटीच बसलेली संपीला दिसली. तिने मग दिशालाही त्यांच्यामध्ये बोलावलं. बाकीच्या जणींनी जराशी नाराजीच दर्शवली. पण त्यांच्या गप्पा रंगत गेल्या. काहीवेळाने मागच्या बाजुने शिर्के, त्या बसल्या होत्या तिथे आला. आणि त्याने दिशाला हाक मारली. सगळ्याजणींनी वळून पाहिलं. आणि मग शाॅक लागल्या सारख्या गप्प बसल्या

काय रे?” काहीच घडल्यासारखं दिशाने त्याला विचारलं

इकडे ये ना.. बोलायचंय थोडंसं.” तो

संपी उगाचच गारठली. दिशा उठून गेली

आणि मग इकडे बाकिच्या जणींनी संपीची कानउघाडणी  सुरू केली

कशाला बोलतेस गं तू तिच्याशी? तीकशीयेमाहितीये ना!’ वगैरे वगैरे

संपी गप्प. तिला म्हणजे कळेचना काय करावं. दिशा तर आता तिची मैत्रीण होती. मैत्रिणीला असं कसं तोडून टाकायचं! पण मग तिचं वागणं? त्याचं काय करावं? हे असं बरोबर आहे का सारखं सारखं मुलांशी जाऊन बोलणं? आणि मग संपीला जाणवलं, आपण कन्फ्युझ्ड आहोत. दिशाचं वागणं बरोबर की चूक तिला ठरवता येत नव्हतं. ती ज्या गावात, वातावरणात वाढली होती, तिथे ते फारसं काय अजिबातचचांगलंवगैरे समजलं जात नव्हतं. त्यामुळे तिचेही विचार तसेच झालेले.पण मग दुसरं मन म्हणत होतं, की दिशा तर तशी चांगली आहे. ती वाईट असं काही बोलत-वागत नाही आपल्याशी. संपीला कळेना. एकीकडे इतर मैत्रीणी आणि एकीकडे दिशा. संपी नकळत हळू-हळू दिशाशी जितक्यास तितकं वागू लागली एवढं मात्र खरं


त्यादिवशी केमिस्ट्रीचं प्रॅक्टिकल बऱ्यापैकी लांबल्यामुळे संपीला घरी यायला जरासा उशीरच झाला. संपीचं एकंदर राहणीमान बऱ्यापैकी गबाळंच. केस कधी तेलात माखून चापुन-चोपुन बसवलेले तर कधी एकदम विस्फारलेले. कपडे म्हणजे एखादा पंजाबी ड्रेस अन् त्यावर लटकवलेली ओढणी. ती सायकलच्या चाकात किंवा बॅगच्या चेनमध्ये अडकण्यासाठीच घेतलेली असायची. दिवसभराचं काॅलेज करुन बऱ्यापैकी थकुन अशाच काहीशा अवतारात ती घरी आली. दाराबाहेर थोड्या नव्या चपला पाहून थबकली आणि कोण आलंय? म्हणत घरात गेली. तिची मोठी आत्या आणि तिच्यापेक्षा एखाद दोन वर्षांनी मोठी आत्येबहीण घरी आले होते. ही आत्या काही संपीला फारशी आवडायची नाही. एकतर ती उगाच जाता-येता संपीच्या आईला टोमणे मारायची. आणि दुसरं म्हणजे स्वत:च्या लेकीचं इतकं कौतुक करायची, इतकं कौतुक करायची की संपीला नुसतं कानकोंडं व्हायला व्हायचं


जराशा पडलेल्या चेहऱ्यानेच संपीने नमस्कार-चमत्कार केला. बारावीचं वर्ष म्हणून जरासं कौतुक आणि बरेचसे सल्लेही मग तिच्या वाटेला आले. त्यात, ‘ते कार्टून्स बघणं बंद झालं की नाही गं सीमा हीचं अजून?’ वगैरे खोचक टोमणेही होतेच

रात्री जेवायला बसताना, ‘मी किती कामं करतेहे दाखवण्यासाठी आतूर आतेबहिणी सोबत जरासं नाईलाजानेच संपीलाही पानं वाढायला उठावं लागलं. कामं आणि संपी यांचा तसा दुरान्वयेही संबंध नसल्याने संपीने तिच्या वेंधळेपणाला साजेसं वाढायला सुरूवात केली. आणि तेवढ्यात त्या आतेबहिणीच्या किंकाळी सदृश उद्गाराने थबकली.

संपे, अगं मीठ तिथे नसतं वाढायचं. आणि हे काय कोशिंबीर अशी मधोमध वाढतं का कोणी?’

संपी प्रचंड गोंधळ चेहऱ्यावर घेऊन तशीच ऊभी राहिली. तिच्या हातातलं वाढण मग स्वत:कडे घेत ती बहीण मग हसत म्हणाली,

काय संपे, तुला साधं वाढायला पण येत नाही!’ 

संपीची आत्या कौतुक ओसंडून वाहणाऱ्या चेहऱ्याने लेकीकडे पाहत म्हणाली,

सग्गळं माहितीये हो माझ्या मिनूला!’ 

आणि संपीकडे एक तुच्छतामिश्रीत कटाक्ष टाकून जेवायला बसली

असं काही झालं की संपीला राग यायचा खरा. पण म्हणून या कशाचा स्वत:वर फारसा परिणाम ती होऊ द्यायची नाही

जेवणं उरकल्यावर त्या सगळ्यांच्या टिपिकल गप्पांकडे पाठ फिरवत ती सरळ पुन्हा कार्टुन्स बघत बसली.. क्रमश:


संजीवनी देशपांडे

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट