संपीचा अभ्यास!! (भाग ६)
“संपे, अगं किती
गं हा पसारा?”
संपी टेस्ट पेपर सोडवत होती. CET चे चार पर्याय असणारे objective प्रश्न! बाजूला घड्याळ ठेवलेलं. समोर
प्रश्नपत्रिका. हातात पेन. साइड ला rough work साठी कोरा
पेपर. असा सगळा setup. प्रश्न
वाचला की संपीला सगळे पर्याय सारखेच वाटायला लागायचे. मग ती तिच्या बुद्धीला बराच ताण
द्यायची. ‘कुठेतरी वाचलंय
पण नीट आठवत नाहीये’ किंवा
‘अरेच्चा हे काल
सर शिकवत होते, पण मी
पेन्सिल शार्प करून नवीन वह्यांवर ‘श्री’ टाकत बसले. लक्ष द्यायला हवं होतं काय?’ किंवा ‘छे, हा प्रश्न स्कीप. हा चॅप्टर अजून वाचलाच नाही ना आपण’ वगैरे वगैरे commentary तिची मनातल्या मनात सुरू होती. घड्याळ
पुढे सरकू लागलेलं. तिची चिडचिड सुरू होती मनातल्या मनात. तेवढ्यात आईचं ते वाक्य ऐकून
ती चरफडलीच आणि
“डिस्टर्ब करू नको गं आई, आवरते मी नंतर!” असं म्हणून दूध प्यायला लागली.
दूध पिऊन झाल्यावर ‘अरेच्चा
आपली दहा (?) मिनिटं वायाच गेली
की आईमुळे’ म्हणत तिने पेपरसाठीची
वेळ पंधरा (!) मिनिटांनी मनातल्या मनात वाढवून घेतली.
त्या प्रश्नपत्रिका संचाच्या मागच्या पानांवर उत्तरंही होती, उलटी टाइप केलेली. एखादं उत्तर 50-60%
बरोबर आहे असं तिला वाटू लागलं की ती हळूच संच उलटा करून मागचं पान काढून अर्धवट मिटल्या
डोळ्यांनी उत्तर पाहून घ्यायची आणि ‘मग बरोबरचे माझं’ असं म्हणत
त्या पर्यायासमोर गोल करायची. प्रश्न पुढे जाऊ लागले तस-तसं तिची ही संचासोबतची योगासनं
वाढायलाचं लागली.. तिथून ये-जा करणारी आई ते पाहून शेवटी म्हणाली,
“त्यापेक्षा एकदाच काय ते बघून का घेत नाहीस. ही कसरत तरी वाचेल.”
डोळे बारीक करून संपीने तिच्याकडे पाहिलं. आणि पुन्हा आपलं ‘प्रश्न सोडवण’ चालूच ठेवलं.
मग केव्हातरी ‘पाणी पिण्यासाठीची
पाच मिनिटं’, ‘बेल वाजली म्हणून दोन मिनिटं’, ‘लहान बहीण शिंकली म्हणून चार मिनिटं’ अशी बेरीज करत करत दोन तासांचा तो पेपर
संपीने तीन तासात पूर्ण (?) केला एकदाचा.
आणि मग जाऊदे यावेळी नकोच मोजायला मार्क, पुढच्यावेळी ‘सिरियसली’ सोडवू असं म्हणत ‘किती दिवे लावले’ ते न पाहताच तिने तिचा पसारा आवरला.
आणि मग आपण जणू काही गडच सर केलाय अशा आविर्भावात लगेच येऊन तिने टीव्ही
लावला. ‘आई काहीतरी खायला दे गं..’ अशी
आरोळी ठोकत टीव्ही समोर आडवीही झाली. तिच्याकडे पाहत तिचे आजोबा म्हणाले,
“संपे, दहावी सारखं बारावीत पण चांगले टक्के मिळवायचे बरं!”
टीव्ही वरची नजर हटू न देता संपी उत्तरली,
“आप्पा अहो, बारावीत बोर्डाचं नसतं काही एवढं. ग्रुपिंग पुरते मिळाले तरी खूप झाले. सीईटी
चा स्कोर इम्पॉर्टंट असतो फक्त.”
आप्पांच्या पचणी काही हे पडलं नाही.
“अगं पण विषय सारखेच आहेत ना..”
“हो आप्पा, पण अभ्यासाची टेक्निक वेगळी असते हो..”
“टेक्निक?” आप्पा विचारात पडले.
“हो मग.. बोर्डाचं कसं, उत्तरं पाठ करावी लागतात तिथे. सीईटी चं तसं नाही, कन्सेप्ट
क्लियर असाव्या लागतात, फोर्म्युले पाठ, आणि भरपूर एमसीक्यू सोडवावे लागतात.. सोपं नाही आप्पा ते.. फार अभ्यास करावा
लागतो!!”
“असं होय.. असेल असेल.. मग तुझ्या झाल्यात वाटतं concepts क्लियर. टीव्ही पाहत बसलीस
ती..” अप्पा तिरकसपणे म्हणाले.
टीव्ही वरची नजर वळवून संपीने मग त्यांच्याकडे पाहिलं. आणि मग ठसक्यात
म्हणाली,
“ब्रेक चालूये माझा! आत्ताच एक मोठ्ठी प्रश्नपत्रिका सोडवलीये मी.”
“हो का.. किती झालाय मग ‘स्कोर’
का काय तो?” इति अप्पा.
नावडीचा प्रश्न ऐकून टिव्हीवर नजर खिळवून संपी मग तोंडातल्या तोंडात
पुटपुटली,
“मोजायचेत अजून”
‘मैत्रिणीकडे अभ्यासाला जाणे’ हा एक संपीच्या आवडीचा प्रकार होता. आठवड्यातून एक-दोनदा तो केल्याशिवाय तिचं
अभ्यासू मन भरायचंच नाही. तिथे जाऊन मग आधी थोडा पोटोबा, मग थोड्या
चकाट्या पिटणे (शुद्ध भाषेत गावगप्पा मारणे) मग केला तर थोडाफार अभ्यास करणे असा सगळा
क्रम असायचा. एकदा तर अशी अभ्यासाला म्हणून जाऊन संपी, मधुच्या
मांजरीसोबत दोन तास खेळून आली होती चक्क. कधी झाडं लाव, फुलं
तोड असे प्रकार. अभ्यास वाढू लागला तसं-तसं तर तिला या बाकीच्या गोष्टींमध्ये जरा जास्तच
रस वाटू लागला. नंतर नंतर तर आईला कामात मदत करणं पण तिला कधी नव्हे ते खूप इंट्रेस्टिंग
वाटायला लागलं.
कॉलेज मधलं वातावरण पण आता बर्यापैकी सीरियस झालेलं होतं. ‘आपल्या नोट्स शेअर न करणे’, ‘कोणती पुस्तकं वाचतो ते कोणालाही न सांगणे’, ‘माझा अजिबात अभ्यास झालेला नाही असं उगाच दर्शवत राहणे’ इ.इ. न बोलले जाणारे, अलिखित ‘अभ्यासू’ नियम कमी-जास्त प्रमाणात सारेच अवलंबत होते.
परीक्षा जस-जशा जवळ येऊ लागतात तस-तसा ‘गेस’ नावाचा
प्रकार डोकं वर काढायला लागतो. ‘गेस’ म्हणजे
कॉलेज मधल्या किंवा क्लास वाल्या प्राध्यापकांनी अपार मेहनत आणि अभ्यास करून तयार केलेले, आगामी परीक्षेत येऊ शकतील असे ‘संभावित’ प्रश्न! हा गेस रॉच्या कारवायांना लाजवेल इतका जास्त classified असतो बरंका. ज्या-त्या क्लास पुरता तो मर्यादित असतो. मग या सरांनी काय गेस
दिला, त्या सरांनी कोणते प्रश्न दिले इ.इ. शोधमोहिमा ज्याच्या-त्याच्या
व्यवक्तिक पातळीवर सुरू होतात. आता काहींना हे बहुमूल्य गेस मिळवण्यात यश मिळतं, काहींना
नाही. 'contacts' याकामी फार महत्वाचे ठरतात. वर्षभर टवाळक्या करणार्या विद्यार्थ्यांना या काळात भलतंच महत्व येतं. कारण ते आता याच मिशन वर असतात.
संपी तशी सगळ्यांच्या मर्जीतली असल्याने आणि सगळ्यांशी तिचं चांगलं
जमत असल्याने असे एक-दोन गेस न मागता तिच्याही वाटेला आले होते. खरंतर ती या कशावर
विश्वास ठेवायची नाही. पण मग आता मिळालेयत तर बघायला काय हरकत असा व्यवहारी विचार करून
तिनेही ते चाळले झालं.
हा हा म्हणता संपीची परीक्षा आता चक्क दीड महिन्यांवर येऊन ठेपली आणि तिच्यासकट
घरातल्या सार्यांचीच लगबग वाढायला लागली..
क्रमश:
@संजीवनी देशपांडे
टिप्पण्या