थोडसं मनातलं..
पण, यावर्षीचा चैत्र आकांत घेऊन आला. पापणी लवायच्या आत अतिशय जवळचं माणूस बरोबर घेऊन गेला. दु:ख हा शब्दही मग खूप छोटा वाटायला लागला. विदीर्ण काळीज घेऊन मी उभी. तो क्षण सोडवत नव्हता. पुढे जावसं वाटत नव्हतं. पण, आयुष्य थांबत नाही. ते सरकतच राहतं अव्याहत पुढे. मग जोर लावून स्वत:लाही ढकलावं लागत होतं. अशावेळी आपल्या आतला कोलाहल ना कोणाला दाखवता येतो, ना शब्दांत मांडता येतो.. सांत्वनंही निर्जीव वाटू लागतात.
लिहणं जवळपास बंदच झालेलं. हळू-हळू थोडेफार शब्द सापडायला लागले. पण त्यांनाही तिन्हिसांजेला माळावरच्या मंदिरातला घंटानाद जसा गूढ भासतो, तशा गूढतेची किनार होती.
तशातच वैशाख उगवला. रणरणत्या उन्हाचा महिना. पण, उन्हाऐवजी ढग दाटलेयत यावर्षी. परवा गावाहून परतताना सहज खिडकीबाहेर पाहिलं, दूरवर पांढरट खोडाचं एक निष्पर्ण झाड फांद्यांच्या टोकावर कोवळी पालवी मिरवत उभं होतं. जवळ गेल्यावर लक्षात आलं, तो पिंपळ होता. आणि ती पालवी? किरमिजी-गुलाबी छटा असलेली ती कोवळी पिंपळाची पानं काय सुखावून गेली म्हणून सांगू! वसंत ऋतु चालू आहे याची तेव्हा जाणीव झाली. इतके दिवस मनातली पानगळ वेचत होते. त्यात बाहेर चालू असलेल्या ऋतू पालटाची जाणीवच झाली नाही. पुढे पूर्ण प्रवासात मग हे पिंपळाचं वसंत-वैभव जागो-जागी भेटतच राहिलं. आणि बर्याच दिवसांनी आत सुद्धा थोडीशी सळसळ जाणवली. आल्हाद दायक.
लिहावसं वाटायला लागलंय आता. बरंचसं लिखाण पेंडिंगही आहे. 'संपी..' च्या पुढच्या भागांची विचारणा होतेय.. लवकरच करेन आता पोस्ट. बरेचसे नवे विषयही मनात रुंजी घालताहेत. पाहू कसे शब्द सापडतात.
तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि प्रतिक्रिया मधल्या काळात अर्थातच खूप धीर देऊन गेल्या. त्यासाठी आभार..
भेटूया पुन्हा लवकरच!
संजीवनी
टिप्पण्या