कॉफी, पाऊस आणि बरंच काही.. (भाग 20)

‘अरेच्चा.. पाऊस काय पडायला लागला अचानक..

ऐन चैत्रात पावसाची सर पाहून मंदारने आश्चर्य व्यक्त केलं आणि गाडी लगेच बाजूला घेतली. पण, पावसाचा जोर एवढा की तेवढ्यातही दोघे जरासे भिजलेच. छान संध्याकाळ होती. अंधार पडायला अजून बराच अवकाश होता. रस्ता प्रशस्त आणि झाडांनी भरलेला होता. एका झाडाखाली दोघे थांबले. प्लान बिघडणार की काय म्हणून मंदारच्या चेहर्‍यावर नाही म्हटलं तरी आठी उमटली. संपी मात्र तो पाऊस पाहून जाम खुश झाली. तिचं मन अजूनही अंगणातल्या पावसात खेळणार्‍या अल्लड मुलीप्रमाणेच होतं. हात पुढे करून ते पाउसकण हातात झेलत तिने एकवार मंदारकडे पाहिलं तर तो खट्टू.

काय रे काय झालं? चेहरा का पडलाय असा?’

आपला प्लान बिघडवणार बहुतेक हा पाऊस.. मंदार पावसाकडे पाहत म्हणाला.

कसला प्लान? कॉफीचाच ना? काय तू.. इतका मस्त पाऊस पडतोय. वातावरण बघ कसलं भारी झालंय. उलट आभार मान त्याचे. ती बघ तिकडे समोर चहाची टपरी दिसतेय.. पाऊस थोडा ओसरला की तिथे जाऊन मस्त आल्याचा चहा घेऊ. सोबत भजी मिळाली तर बहारच! पावसाचाच प्लान बेस्ट ए scholar!

तिच्या त्या पावसा सारख्याच निखळ, चैतन्याने रसरसून भरलेल्या हसण्याकडे आणि बोलण्याकडे मंदार पाहतच राहिला. खरंच होतं की तिचं. हा असा मस्त पाऊस, सोबतीला ती अजून काय हवं! कॉफी हुकली म्हणून खट्टू झालेल्या स्वत:चच मग त्याला हसू आलं.

हम्म.. कधी कधी बोलतेस तू लॉजिकल!

हो का? मिस्टर. प्रॅक्टिकल!..

..bdw, काय बोलणार होतास.. why कॉफी अँड ऑल?’

काही नाही गं.. शहाण्यासारखं खूप वागून झालं. तुझ्याकडून थोडासा वेडेपणाचा डोस घ्यावा म्हटलं. मग बॅलेन्स होईल सगळं..

तिची फिरकी घेण्याच्या सुरात तो उत्तरला.

वा रे शहाणं बाळ.. मला वेडी म्हणतोयस?’

यस.. इन ए गुड वे.. अॅक्चुअल्ली समटाइम्स आय एन्वी यू.. असं तुझ्यासारखं सहज, सोपं जगता  नाही येत मला..

यावर संपी जराशी शांत राहिली. तिला पुन्हा मीनलचं बोलणं आठवलं.

काय पाहतेयस अशी? प्रेमात वगैरे पडलीस का काय माझ्या?’ डोळे मिचकावत मंदारने विचारलं.

त्यावर आपल्या मनातला विचार याला ऐकू गेला की काय म्हणत तिने ते साफ झिडकारलं.

प्रेमात? ह्या.. मी मुळात लग्नच करणार नाहीये!

लग्न?? मी फक्त प्रेमाविषयी बोललो.. तू लग्नापर्यन्त जाऊन पोचलीस.. याने कुछ तो जरूर है.. मिश्किल हसत त्याने पुन्हा तिची फिरकी घेतली.

संपी आपला बावळटपणा पाहून अजूनच वैतागली,

ए गप रे तू.. मी नाही पोचले कुठेही. ते आपलं मी जस्ट क्लियर केलं.. ती तुझी मैत्रेयी आहे बघ तुझ्या प्रेमात.. कशी पाहत होती तुझ्याकडे..

माझी मैत्रेयी?? हाहा काहीही.. जळण्याचा वास येतोय कुठूनतरी..

शी.. मी आणि जलस? हाहा.. फनी.. पण, ती आहे खरंच तुझ्या प्रेमात..

नाही गं.. मैत्रीण आहे फक्त.

यावर संपी काहीच म्हणाली नाही.

मंदारने मग फोन ऑन करून एफएम सुरू केलं.. पावसाळी वातावरण पाहून त्यावर नेमकं सलील-संदीपचं,

तुझ्या माझ्यासवे कधी गायचा पाऊसही
तुला बोलावता पोहोचायचा पाऊसही  हे गाणं लागलं.

आजचा दिवस नक्कीच काहीतरी वेगळा उगवला होता. सगळं भलतंच घडत होतं. त्या गाण्याने दोघेही जरासे अवघडले. दोघांनी आधी एकमेकांकडे पाहिलं आणि नंतर हवंहवंसं ते गाणं, धुंदावणारं वातावरण, एकमेकांची सोबत अनुभवत एकमेकांकडे पाहणं मात्र टाळलं. मनातलं डोळे बोलून गेले तर काय! गाणं पुढे जात राहिलं..

... कशी भर पावसातही आग माझी व्हायची
तुला जेव्हा असा बिलगायचा पाऊसही..

या ओळींवर मात्र त्याने तिच्याकडे पाहिलंच. तिने नजर पुन्हा टाळली. लाजण लपवू पाहणार्‍या अर्धवट ओलेत्या तिच्याकडे तो पाहतच राहिला..

पुढे कधीतरी गाणं संपलं.

पावसाची अवचित सर आली तशी रस्ता ओला करून गेलीही. रस्त्यावर पुन्हा तिन्हिसांजेचं केशरी उन्ह पसरलं. खूपच आल्हादायक वातावरण. संपीच्या आग्रहाखातर मग दोघेही चहाच्या टपरीवर फक्कड चहा प्यायला गेले.. चहा पित पित संपीचे धमाल किस्से आणि बोलणं, मंदार ऐकत कमी आणि तिच्याकडे पाहत जास्त होता. दोघांनाही एकमेकांसोबत असं असणं जाम भारी वाटत होतं. पण, मनातलं ओठांवर काही येत नव्हतं. खूप हसत आणि एकमेकांना चिडवत मग त्यांची ती संध्याकाळ अगदी मजेत गेली.

तिला हॉस्टेलवर सोडून मंदार परतला. तिच्यासोबत असणं त्याला आता फार हवंहवंसं वाटायला लागलं होतं. तिचीही अवस्था काही वेगळी नव्हती. दोघांतली मैत्री आता घट्ट होत चालली होती. नातं खेळकर व्हायला लागलं होतं. ते आता पुढच्या टप्प्यावर न्यायचं की नाही, जाऊ द्यायचं की नाही या संभ्रमात दोघेही होते. एकतर करियर दोघांच्या दृष्टीने महत्वाचं होतं आणि इतक्यात केलेली कमिटमेंट आपल्याला नंतर खर्‍या अर्थाने किती काळ निभावता येईल याची भीतीही दोघांना वाटत असावी. आणि तो विचार न करता भावनावेगात पुढे पाऊल टाकण्याइतके अविचारी दोघेही नव्हते. त्यामुळे स्टेटस quo maintain करण्याकडे दोघांचा कल होता.

त्या रात्री बेडवर पडल्या पडल्या संपीच्या मनात पुन्हा पुन्हा मंदारचेच विचार येत होते. आल्यापासून मीनलही पुन्हा पुन्हा तिला त्यावरूनच चिडवत होती. पण याबाबतीत वाटतंय म्हणून पटकन बोलून टाकणार्‍यांपैकी संपी नव्हती. जे व्हायचंय ते होईल म्हणत शेवटी तिने तो विषय बाजूला सारला. आणि कानांत हेडफोन्स घालून एफएम वर पुरानी जीन्स ऐकत बसली..

 

 

क्रमश:

 

संजीवनी देशपांडे 

 

टिप्पण्या

Tanuja म्हणाले…
Always looking forward to your writing. You write so well. Anyone can easily connect with it. Please keep it up and all the best.
अनामित म्हणाले…
सुंदर!!!
पुढील भाग उद्याच येईल ही आशा.
कुसुमिता म्हणाले…
खुप छान वाटते आहे वाचायला.. जुने दिवस आठवतायेत
Sanjeevani म्हणाले…
Tanuja, thank you for such a nice testimonial!
Sanjeevani म्हणाले…
धन्यवाद, प्रयत्न करेन
Sanjeevani म्हणाले…
धन्यवाद :)
अनामित म्हणाले…
You write so damn good!!!
अनामित म्हणाले…
Waiting...
Vishakha म्हणाले…
सगळे भाग खूप छान झाले ही सिरीज संपूच नये असे वाटतं
Sanjeevani म्हणाले…
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

लोकप्रिय पोस्ट