आभाळमाया..


आभाळमाया..

शाळेत अभ्यासाला कवी बींची ‘माझी कन्या’ नावाची सुंदर कविता होती. ती पहिल्यांदा वाचली तेव्हा आणि त्यानंतर जेव्हा-जेव्हा वाचली तेव्हाही बाबा तुम्हीच डोळ्यांसमोर उभे राहता. बाहेरच्या जगात कोणीतरी अकारण बोल लावलेल्या आपल्या लेकीची तिच्या पित्याने काढलेली समजूत या कवितेत आहे..

गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या
का गं गंगा यमुनाही या मिळाल्या
उभय पितरांच्या चित्तचोरटीला
कोण माझ्या बोलले गोरटीला..

कविता शेवटाकडे जाऊ लागते तशा दरवेळी डोळ्यांच्या कडा ओलावतात. 
छोट्याशा खेड्यातून आधी शहरात आणून आणि नंतर महानगराची दारं माझ्यासाठी खुली करुन बाबा तुम्ही मला ‘मी’ बनवलंत. तुम्ही माझ्यासाठी लावलेल्या या कल्पवृक्षाची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. लेक परक्याचं धन मानणाऱ्या या जगात तुम्ही कायमच काळाच्या खूप पुढचं वागत आला आहात. मुलगा-मुलगी भेद तर कधीच नाही, उलट दरवेळी भावापेक्षा कणभर अधिकच मला मिळत आलंय. 

फादर्स डे वगैरे निमित्त आहे केवळ. समोरा-समोर फारशा न बोलल्या जाणाऱ्या गोष्टी अशावेळी बोलून दाखवता येतात इतकंच. 
स्टेटस, अपडेट्स च्या जगापासून खूप दूर आहात तुम्ही. आज दिवसअखेर आई हे तुम्हाला वाचून दाखवेपर्यंत तुमच्या गावीही नसेल आज फादर्स डे आहे वगैरे. 

आमच्यासाठी अख्खं आयुष्य कष्ट केलेल्या तुमच्या हातांचा सन्मान केवळ कुठल्या तरी डे नामक संकल्पनेच्या तोकड्या शुभेच्छांनी खचितच होऊ शकत नाही हे मला माहितीय.. पण, काही गोष्टी वेळीच बोलल्या-सांगितल्या गेल्या पाहिजेत असं आता वाटायला लागलंय. म्हणून हा लेखनप्रपंच!

लहानपणी टिव्हीवर आभाळमाया सिरिअल लागायची. मी बरीच लहान होते. एकदा आईने आभाळमाया या शब्दाचा अर्थ विचारला होता तुम्हाला. तुम्ही म्हणालात, आभाळमाया म्हणजे आभाळाएवढी माया.. तो प्रसंग अजुनही अचूक लक्षात आहे. त्यावेळी कळला नसला तरी आता तो अर्थ चांगलाच उमजलाय. अमर्यादित आभाळासारखी अमर्यादित, निर्हेतुक माया म्हणजे आभाळमाया. 
आपल्यात मतभिन्नता नाही असं नाही. खूप आहे. रुसवे-फुगवे चालतात, प्रसंगी वादही होतात. पण सरतेशेवटी तुमची आमच्यावरची ही आभाळमाया त्या साऱ्याला कायमच पुरून उरते..

Happy Fathers Day, Baba!

~ संजीवनी

(कवी बींची पूर्ण कविता खाली देतेय)

माझी कन्या

गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या
का गं गंगा यमुनाही या मिळाल्या
उभय पितरांच्या चित्तचोरटीला
कोण माझ्या बोलले गोरटीला

तुला लंकेच्या पार्वतीसमान
पाहुनीया होवोनी साभिमान
काय त्यातील बोलली एक कोण
“अहा,आली ही पहां भिकारीण”

पंकसंपर्के का कमळ भिकारी?
धुलीसंसर्गे रत्न का भिकारी?
सूत्रसंगे सुमहार का भिकारी?
कशी तुही मग मज मुळी भिकारी?

नारीमायेचे रुप हे प्रसिध्द
सोस लेण्यांचा त्यास जन्मसिध्द
तोच बिजांकुर धरी तुझा हेतू
विलासाची होशील मोगरी तू

तुला घेईन पोलके मखमलीचे
कूडी मोत्याची फूल सूवर्णाचे
हौस बाई पुरवीन तुझी सारी
परी यांवरी हा प्रलय महाभारी

प्राण ज्यांचे वर गुंतले सदाचे
कोड किंचीत पुरवीता नये त्यांचे
तदा बापाचे ह्र्दय कसे होते?
न ये वदता अनुभवी जाणती ते

देव देतो सद्‍अगुणी बालकांना
काय म्हणुनी आम्हांस करंट्यांना?
लांब त्याच्या गावास जाऊनीया
गूढ घेतो हे त्यांस पुसूनीया

“गावी जातो” ऎकता त्याच गाली
पार बदलूनी ती बालसृष्टी गेली
गळा घालुनी करपाश रेशमाचा
वदे,”येते मी, पोर अज्ञ वाचा”

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट