'क्रश', 'फीलिंग्स' आणि 'प्रेम'.. वगैरे वगैरे.. (भाग - २२)
सेमिस्टरचा शेवट जस-जसा जवळ येऊ लागला, तस-तशी संपी सीरियस व्हायला लागली. लेक्चर्स
बंक करणं बंद झालं. प्रॅक्टिकल्सला आवर्जून हजेरी लागायला लागली. कोणाची फाइल कंप्लीट
आहे, कोणाकडून ती कशी
मिळवायची, शेवटी शेवटी प्राध्यापक लोक जणू ब्रह्मदेव आणि आपण
त्यांचे परम शिष्य आहोत अशा पद्धतीने त्यांच्याशी वागणं इ. इ. गोष्टी आता संपीला जमायला
लागल्या होत्या. परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे चाप्टर्स वेगळे करणं, ‘किती’ चाप्टर्सचा अभ्यास केला
की आपण पास होऊ याची गणितं मांडण, संभावित प्रश्नांचीच फक्त तयारी
करणं वगैरे वगैरे गोष्टीही आता ती शिकली होती. इंजीनीरिंगला आलेला प्रत्येक विद्यार्थी
‘इंजीनीरिंग’ शिको न शिको या सगळ्या गोष्टी
नक्कीच शिकतो आणि त्या जोरावरच ‘इंजीनियर’ देखील होतो. पाण्यात पडल्यावर पोहायला शिकणे टाइप्स थ्यरी नुसार संपीही या
सार्यात निपुण व्हायला लागली होती.
दरम्यान, एका दिवशी रात्री तिला अनपेक्षितपणे श्वेताचा फोन आला. संपी जेवण उरकून जर्नल
कंप्लीट करत बसली होती. तिने फोन उचलला तर पलिकडून श्वेताचा रडवेला आवाज. हिला काही
कळेचना काय झालंय. शेवटी हुंदका आवरत श्वेता म्हणाली,
‘तुला माहित होतं ना.. तरी काही म्हणाली नाहीस मला..’
‘काय? कशाविषयी बोलतेयस तू? आधी
ते रडणं थांबव.. आणि नीट सांग काय ते..’
‘हेच की मयूरला ‘तू’ आवडतेस..’ असं म्हणून तिने अजून मोठयाने हंबरडा फोडला.
‘काय???’ संपी जागची दोन फूट उडालीच.
‘हो! मी आज ठरवलं होतं, काही करून
त्याच्याशी मनातलं बोलायचंच. पण तितक्यात श्रीचा मेसेज आला म्हणून त्याच्याशी बोलू
लागले. मग वाटलं, श्रीलाच सांगावं मयूरशी बोलायला म्हणून मग त्याला
सांगितलं मी वेड्यासारखं सगळं.’ श्वेता रडणं आवरत बोलत होती.
‘मग?’ संपीने न राहवून विचारलं.
‘मग काय!! उगाच बोलले असं झालं माझं. श्री म्हणाला, दहावीत
असल्यापासून संपदा मयूरचं क्रश आहे. तो बोलत नाही पण त्याला ती फार आवडते वगैरे..’ तिचं रडणं अजून वाढलं.
संपी प्रचंड गोंधळली. एक तर आपण कोणाचं तरी तेवहापसून क्रश वगैरे असू
शकतो ही गोष्टच तिच्या मेंदुपर्यंत पोचायला आणि मग त्याने ती अॅक्सेप्ट करायला वेळ
लागला. त्यात वरून मयूर? मयुरला आपण आवडतो? संपीला आधी हे सगळं झेपलंच नाही.
आणि वर पुर आल्यासारखं अखंड रडणार्या श्वेताला आता काय आणि कसं समजावायचं हेही तिला
कळेना. तिला खरंतर तिच्याविषयी वाईट वाटायला लागलं होतं. तिला तो किती आवडायचा हे तिला
माहितच होतं. पण आता तिच्या दु:खाचं कारण आपण ठरतोय हे तर म्हणजे डील करायला अगदीच
नवीन आणि अवघड वाटलं तिला.
‘श्वेता रडू नको अगं, मला खरंच नाही माहिती यातलं काहीच..
कधी म्हणाला नाही तो. आणि मला अशा गोष्टी फार कळत नाहीत तुला माहितीच आहे ना..’
श्वेता काहीच बोलली नाही. संपीच पुढे म्हणाली,
‘तू थांब, मी बोलते मयूरशी.. त्याला सांगते तुला तो किती
आवडतो ते..’
यावर श्वेता चिडलीच,
‘काही नको.. नको बोलूस त्याच्याशी काहीच.. त्याला ना,
किम्मत नाहीये माझ्या फीलिंग्सची..’
असं म्हणून श्वेताने फोन कट केला.
संपीला कानांवर काहीतरी आदळल्यासारखं वाटलं. नाही म्हटलं तरी ‘प्रेम’ या
उल्लेखापाशी ती जराशी अडखळलीच. एकदम तो शब्द तिला फार मोठा वाटायला लागला. आणि श्वेताकडून
तो अशा पद्धतीने ऐकण तिला क्षणभर झेपलंच नाही. श्वेताचा अगदी देवदासचं झालेला होता.
पहिल्या ‘प्रेमाची?’ जखम वगैरे शब्दप्रयोग
तिने सुरू केले होते. त्याने तेवढ्यातही संपीला जरासं हसूच आलं.
पण मग काहीवेळाने वाईटही वाटायला लागलं. तिचे दोन जवळचे फ्रेंडस आता
विनाकारण तिच्यापासून दुरावणार होते. मयुरला तिच्याविषयी काय वाटतं हे कळल्यामुळे आणि
तिला त्याच्याविषयी ‘तसं’ काही वाटत नसल्यामुळे तिला आता त्याच्याशी पूर्वीसारखं
वागणं जडच जाणार होतं आणि श्वेता तर काय जग बुडाल्याच्या दु:खात वावरत होती आणि ते
बुडण्याचं कारण तिच्यालेखी संपी होती.
जराशा चक्रावलेल्या अवस्थेत संपी खाली बसली. समोर पसरलेला जर्नल्सचा
पसारा पाहून नाही म्हटलं तरी ती अजून चक्रावली. आणि तिने आता मूड गेला म्हणत त्या पसार्याकडे
साफ दुर्लक्ष करत गौरी देशपांडेचं थांग उघडलं. काही ना काही कारणाने ते वाचायचं मागेच
पडत होतं. पुस्तक हातात घेतल्यावर नाही म्हटलं तरी तिच्या मनात जर्नलचा विचार आलाच.
आणि जिचं जर्नल ‘उद्याच
परत करते!!’ असं दहावेळा सांगून आणलं होतं ती अश्विनी रखुमाई
सारखी तिच्या डोळ्यांसमोर उभी ठाकली. पण मग संपीनेही ‘मारू अजून
थोडा मस्का तिला’ म्हणत डोळ्यांसमोरची रखुमाई निग्रहाने बाजूला
सारून ‘थांग’ मध्ये डोकं खुपसलं आणि त्यातली
‘कालिंदी’ तिच्या डोळ्यांसमोर हळू-हळू आकार
घ्यायला लागली.. संपी कधी त्यात बुडून गेली तिचं तिला कळलं नाही. गौरी देशपांडे नावच्या
अजब रसायनाशी ती तिची पहिलीच गाठ होती. तिचे विचार आणि एकूण जगाकडे पाहण्याची दृष्टी
दोन्ही संपीच्या वैचारिक बैठकीला आव्हान देणारे होते. पण, गोष्ट
पुढे-पुढे जाऊ लागली तस-तशी संपीला कालिंदी आणि तिला उभं करणारी गौरी देशपांडे दोन्ही
आवडायला लागल्या. गौरी आता ‘त्या’ वरून
‘ती’ झाली होती. वेधक, विचार करायला भाग पाडणारे विचार, मनाचा ठाव घेणारी, डोळ्यांसमोर उभी राहणारी पात्रं.. संपी कधी त्या कथेत गुंतत गेली तिचं तिलाही
कळलं नाही.. खिडकीतला चंद्र वर येत गेला आणि संपी पुस्तक वाचतच गेली..
पुस्तकाच्या जवळपास मध्यावर, ‘दिमित्री’ च्या एका वाक्यावर
ती थांबली..
‘असं हलकं फुलकं, जाता-येता, लहर
लागली म्हणून जरा वेळ प्रेम करणं जमायचं नाही मला.. किंवा तुलाही, तेंव्हा जपून..’
संपी विचारात पडली. या वाक्याने तिला प्रचंड आकर्षित केलं.
आणि मग ‘क्रश’, श्वेताने उल्लेख केलेल्या 'फीलिंग्स' आणि हे दिमित्रीने कालिंदीला उद्देशून
व्यक्त केलेलं अव्यक्त ‘प्रेम’ या सार्याविषयीचे
विचार तिच्या मनात घोळू लागले. कुठल्या निष्कर्षापर्यन्त ती पोचली नव्हती. पण, गौरीने विचारांची, समजांची नवी वाट तिच्यासमोर खुली
केली होती.. आणि संपी नकळत त्या वाटेने चालूही लागली होती.
याच विचारात कधीतरी उरलेलं पुस्तक उद्या उठल्या-उठल्या पूर्ण करायचं
ठरवून ती झोपी गेली..
क्रमश:
@संजीवनी देशपांडे
टिप्पण्या
‘थांग’ हा ‘मुक्काम’चा प्रिक्वेल आहे..