संपी आली घरी.. (भाग २७)

पहिलं वर्ष पार पाडून संपी घरी परतली. खूप दिवसांनी आल्यामुळे अर्थात खूप आनंदात होती. तिला बर्‍याच दिवसांनी पाहणार्‍यांना तिच्या राहणीमानातले बदल ठळक जाणवले. ती आता पूर्वीपेक्षा जास्त confidently बोलत-वावरत असल्याचंही कोणाच्या नजरेतून सुटलं नाही. काही लक्षणीय बदल झालेले असले तरी तिचा मूळ स्वभाव थोडाच बदलणार होता? पीएल मध्ये केलेल्या जागरणांची पूर्ण भरपाई तिने आल्यावर रोज सकाळी अकरा-बारा वाजेपर्यंत झोपून केली. तिथून मग निवांत उठणे, खाणे-पिणे, माऊ सोबत खेळणे, नमी सोबत भांडणे वगैरे वगैरे ठरलेल्या वळणांनी तिचा दिवस जात राहायचा.. दुपारुन एखादी मैत्रीण तरी घरी यायची किंवा ही तरी कोणाकडे जायची. दिवाळीच्या सुट्ट्या तशा कमी असल्यामुळे फार कोणाच्या गाठी तेव्हा पडल्या नव्हत्या. पण, यावेळी मात्र जवळपास सारेच सुट्टीच्या निमित्ताने घरी परतलेले होते. त्यामुळे रोज कोणा-न-कोणा मैत्रिणीसोबत संपीची धमाल सुरू होती. श्वेताने मात्र मयूर प्रकरणानंतर संपीशी बोलणं जरासं कमीच केलेलं होतं. त्यामुळे ती काही हिला भेटली नाही.

आज मात्र संपी जरा जास्त खुश होती. मधु तिची एक्झॅम संपवून कोल्हापूरहून काल परतली होती आणि दोघी जवळपास वर्षभराने आज भेटणार होत्या. दोघींना एकमेकींना किती काय सांगू असं झालेलं होतं. दुपारी मधु घरी आली तेव्हा संपी पालथी पडून मांजरीला दूध पाजवत होती. ती आलेली पाहून संपीने मधे... म्हणत जाऊन तिला कडकडून मिठी मारली.

संपे.. काय ए हे.. haircut, eyebrows.. omg.. भारीच की एकदम. संपीची samy झालीस की तू!!

तिची गळाभेट घेऊन मधु उत्साहाने बोलत होती.

हाहा.. मंदार पण सेम हेच म्हणाला.. संपी अनावधानाने बोलून गेली.

मंदार..? कोण तो अवचट??’ मधुने आश्चर्याने विचारलं.

हो अगं.. अवचट! आम्ही एका वर्कशॉप मध्ये भेटलो होतो एकदा.. तो पण पुण्यातच असतो ना.. आणि मी ते गेट-टुगेदर विषयी बोलले होते ना तुला.. मधु यार तू असायला हवं होतं. फार धमाल आली. तो श्रीनिवास आठवतो ना तुला.. जाम भारीये.. खूप हसवतो.. आणि..

पुढचं बोलता-बोलता मात्र ती थांबली. आई पण तिथेच आहे हे तिला जाणवलं बहुतेक.

हो मी ऐकलं.. मजा करताय तुम्ही सगळे पुण्यात. आमच्या कोल्हापूरला काही नाही बघ. मधु म्हणाली.

 

मग खाणं-पिण करत हॉस्टेल, कॉलेज, नव्या मैत्रिणी, अभ्यास, रिजल्ट, पुणे, जुने मित्र-मैत्रिणी सगळ्याविषयी दोघींनी भरपूर गप्पा मारल्या. मधून-मधून संपीच्या फोनचं टूण-टूण चालूच होतं. आणि मधुशी बोलत-बोलत संपी सराईतासारखी रीप्लाय पण करत होती. मधुच्या नजरेतून हे अर्थात सुटलं नाहीच. बर्‍याच वेळाने दोघी गच्चीवर आल्या तेव्हा मधु तिला म्हणालीच,

संपे, जाम बदललीयेस गं तू.. पूर्वी मुलांची नावं जरी घेतली तरी गडबडायचीस. आता बिनधास्त गप्पा मारतेयस..

हो.. पूर्वी मी घाबरायचे. आणि ते थोडं चुकीचंही वाटायचं. मीनल तर मला म्हणायची तुला बॉइज फोबिया आहे हाहा. पण ना आता माझ्या लक्षात येतंय, त्यात चुकीचं किंवा घाबरण्यासारखं काहीच नाहीये.. आता तू जशी माझी मैत्रीण आहेस, तसेच मंदार, श्री, मयूर, निखिल इ. इ. पण आहेत. आम्ही खूप गप्पा मारतो. अभ्यासविषयी बोलतो, चिडवा-चिडावी करतो, प्रोब्ल्म्स शेअर करतो.. मजा येते. मी उगाच वेगळे समज बाळगून होते पूर्वी.

हम्म.. हे खरंय.. आपण त्या दिशाला पण किती नावं ठेवायचो ना.. पण, ती तेव्हापासून असाच विचार करत असणार. आपण आत्ता करायला लागलोय इतकंच.. मधु म्हणाली.

हो ना.. अगं दिशाचा काही कॉनटॅक्ट आहे का? मुंबईला आहे असं कळलेलं पण माझ्याकडे तिचा नंबरच नाहीये. ती गायबच झाली एकदम..

अगं हो, तुला सांगायचंच राहिलं, दिवाळीत तो अनिरुद्ध भेटला होता मला. सांगलीला लागलाय. त्याने दिला होता दिशाचा नंबर. पण मी काही फोन नाही केला. तुला हवाय का?’

हो.. दे ना.. मला किती दिवसांपासून बोलायचंय तिच्याशी..

घे.. सेव्ह कर.. मधुने नंबर दिला. आणि फोन बाजूला ठेवत म्हणाली,

बाय द वे संपे, या अवचटचा मंदार कधीपासून झालाय? हम्म.. कुछ तो है.. तिने डोळे मिचकावले.

यावर नाही म्हटलं तरी संपीने तिची नजर टाळली,

गप गं, तू पण आता मीनल सारखी बोलू नकोस.. तसं काही नाहीये..

हाहा.. हो का?’ मधु हसली.

हो.. म्हणजे चांगलाय तो. आवडतो मला. पण तसं पहायला श्रीपण चांगला मित्र आहे माझा आणि मयूर सुद्धा.. ते पण चांगलेच आहेत.. हम्म मंदारशी थोडं जास्त बोलणं होतं इतकंच..

इतकंच?’ मधुने विचारलं.

हो.. म्हणजे सध्यातरी इतकंच.. तसं थोडं विशेष फीलिंग येतं तो असला की.. पण ते तसं प्रेम आहे की नाही मला माहीत नाही.. मुळात प्रेम म्हणजे काय हेच माझं अजून क्लियर व्हायचंय..

मधुने थोडं आश्चर्याने संपीकडे पाहिलं. पूर्वीची वेंधळी संपी आता तिला खूप विचारी आणि संयमी वाटली.

दोघींनी मग प्रचंड कल्ला केला.. नमिला सोबत घेऊन भटकल्या..

संध्याकाळी मधु घरी जायला निघाली तेव्हा संपीच्या फोन वर श्रीचा मेसेज झळकला,

आपल्या 11-12वीच्या कॉलेज मध्ये आपल्या बॅचचं गेट-टुगेदर करायचं ठरवलंय पोरांनी.. पुण्यात कसे सगळेच नसतात ना.. आता सुट्टीत सगळे आहेत तर भेटू असा विचार आहे.. मुली पण येतायत. सो ये तू पण. आणि अजून कोणी असतील तर त्यांनाही सांग..

संपीने तो मेसेज लगेच मधुला दाखवला. यावर मधु खुश झाली.

अरे वा.. चालेल जाऊ की आपण.. तुझ्या मंदारला भेटता येईल मला..

यावर डोळे मोठे करून हसत संपीने तिच्याकडे पाहिलं. जावं की जाऊ नये याविषयी यावेळी मात्र संपीच्या मनात साशंकता होती. तिथे अर्थात मयूर आणि श्वेताही असणार होते.. सो सिचुएशन उगाच awkward होईल असं तिला वाटत होतं..

 

 

क्रमश:संजीवनी देशपांडे 

 

टिप्पण्या

Unknown म्हणाले…
अतिशय सुंदर कथा
Unknown म्हणाले…
अतिशय सूंदर कथा
अनामित म्हणाले…
Pudhil bhag?
Tanuja म्हणाले…
I am probably giving the same reply again :-) But story is coming very beautifully. Agadi chhotya chhotya goshti jya tumhi tipat ahat, tyamule goshta ajun chhan vatat ahe. I am really liking Samy and always looking forward for the next part...
Sanjeevani म्हणाले…
tanuja, thank you :) such comments always inspire me.. my reply also is same again :-)

लोकप्रिय पोस्ट