गेट-टुगेदर कंटिन्यूड.. (भाग २९)





सगळ्यांच्या मग बर्‍याच गप्पा-टप्पा झाल्या.. इतकी वर्ष एका वर्गात असूनही आज खर्‍या अर्थाने होत असलेल्या ओळखी.. दंगा-मस्ती.. धमाल चालू होती. संपी काही वेळाने उठून कोपर्‍यात एकटीच बसलेल्या श्वेता जवळ गेली,

श्वेता हाय..

श्वेताने तिच्याकडे पाहून जुजबी स्मित केलं फक्त. संपीच पुढे म्हणाली,

आपण बोलूया का थोडंस?’

श्वेता ने काही न बोलता बाजूला सरकून संपीसाठी जागा केली.

संपी मग तिच्या बाजूला बसत म्हणाली,

कशी आहेस?’

ठीक आहे. उदास चेहर्‍याने श्वेता म्हणाली.

अच्छा.. किती दिवस आहेस इथे? कधीपासून सुरू होतंय कॉलेज तुमचं?’

होईल आठ एक दिवसात.. पुन्हा तसाच थंड प्रतिसाद.

संपीने मग विषयालाच हात घातला,

श्वेता, मी समजू शकते अगं तुला खूप वाईट वाटलंय.. पण मला खरंच यातलं काहीच माहित नव्हतं गं. तुला जितका धक्का बसला ना तितकाच मलाही बसलाय..

यावर मग श्वेता दाटून आलेले काढ दाबत म्हणाली,

ठिके गं संपदा.. तुझ्यावर नाही चिडले मी. ते पहिल्यादिवशी रागाच्या भरात बोलले असेन. पण आता तसं काही नाही.

हे ऐकून संपीला मनावरचं मनभर ओझं कमी झाल्यासारखं वाटलं. आणि तिने एकदाचं हुश्श केलं (मनातल्या मनात)

श्वेताची मात्र ट्रेन आता फुल्ल वेगात धावू लागली होती,

तुला माहितीये कित्ती मनापासून प्रेम करायचे मी त्याच्यावर. खरं-खरं प्रेम होतं गं माझं.

खरं-खरं वर शक्य तितका जोर देऊन श्वेताने ओढणीचं डोळ्याला लावली. आता ही ढसा-ढसा रडते की काय वाटून संपी कमालीची अस्वस्थ झाली. ती तिला काही म्हणणार इतक्यात पुन्हा श्वेता सुरू झाली,

मला तर ना उगाच मनातलं बोलून बसे असं झालंय. झाकली मूठ राहिली असती तर माझं दु:ख किमान माझ्यापाशी तरी राहिलं असतं.

संपीला काय बोलावं कळेना.

आता हे सगळ्यांना माहित झालंय. त्यालाही कळलं असेलचं की. पण साधा एक मेसेज पण नाही केला गं त्याने.. यावर मात्र आता तिचा बांधच फुटला.

आता संपीलाही उगाच वाईट वाटायला लागलं. ती श्वेताला थोपटत राहिली फक्त. मग बराच वेळ तिच्याजवळ बसून ती थोडी हसायला वगैरे लागली की संपी तिथून उठली. सगळे गप्पांमध्ये दंग होते.

दुरून तिला मयूर कोणाशी तरी बोलत असलेला दिसला. श्वेताकडे एकवार पाहून काहीतरी विचार केल्यासारखी संपी त्याच्या दिशेने गेली.

 

त्याच्या मागे उभी राहून ती म्हणाली,

मयुर..

मयुरने मागे वळून पाहिलं. उभ्या असलेल्या संपी कडे पाहून अतिशय शांतपणे म्हणाला,

संपदा, हाय.. बस नं.. ना चुळबुळ, ना आश्चर्य, ना ओवर excitement.

संपी त्याच्या समोरच्या बेंच वर बसत हाय.. म्हणाली. आणि काही क्षणांसाठी तीच चुळबुळली.

कशी आहेस?’ शांतपणे हसत मयुरने विचारलं.

मी छान अगदी.. तू कसा आहेस?’

मी पण..

थोडावेळ शांतता. संपीने इकडे-तिकडे पाहिलं. तेवढ्यातही पहिल्या रांगेत बसलेला मंदार तिला दिसला. तो तिच्याचकडे पाहत होता. आता नजर वेगळी होती.

काही बोलायचं होतं का?’ मयूरच्या प्रश्नाने ती भानावर आली.

आणि मग जरासा विचार करून म्हणाली,

तुला खरंच श्वेता विषयी तसं काही वाटत नाही?’

मयुरने क्षणभर खाली पाहिलं. आणि मग शांतपणे तिच्या डोळ्यांत पाहत म्हणाला,

मला एकाच व्यक्तिविषयी तसं काही वाटतं.. पण, अनफॉर्चुनेटली त्या व्यक्तिला माझ्याविषयी तसं काही वाटत नाही

आता संपी पुन्हा अवघडली. पण ऐकून न ऐकल्या सारखं करत, सावरत म्हणाली,

तरी तू एकदा तिच्याशी बोलावस असं वाटतं मला. तिला खूप वाईट वाटलंय. तू बोललास तर बरं वाटेल.

मला तिचे गैरसमज अजून वाढवायचे नाहीत. मी बोलायला जाईन आणि ती वेगळाच विचार करत बसेल. ते नको आहे मला..

नाही करणार ती वेगळा विचार वगैरे. साधा मित्र म्हणून नक्कीच बोलू शकतोस तू..

यावर तो काहीच म्हणाला नाही.

असो, मी मला वाटलं ते सांगितलं, बाकी तुझी मर्जी 

असं म्हणून त्याच्याकडे पाहत किंचित हसत संपी तिथून उठली आणि जायला निघाली.

मयूर तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पाहत राहिला.

 

संपी तिच्या ठरलेल्या जुन्या बेंचवर जाऊन बसली. तिला पाहून मधुही तिथे आली,

काय झाल्या का गाठी-भेटी?’

हम्म.. चालू आहेत. तुझं झालं की नाही मंदारशी बोलून?’

हाहा.. हो झालं!

काय बोललात काय एवढं?’

बोललो काहीतरी.. तुला का सांगू 

हो का? ठिके नको सांगू.. मला काय त्याचं!

चिडली.. चिडली.. एक मुलगी चिडली..

इतक्यात समोरून मंदार त्या दोघींकडे येताना त्यांना दिसला.

तो जवळ आल्यावर त्याच्याकडे पाहत, चालूदे तुमचं. मी आलेच. म्हणत मधु तिथून गेली.

संपीच्या बाजूला बसत मंदार म्हणाला,

मग संपदा मॅडम.. काय चाललंय..

संपीची धडधड उगाच वाढली. तो प्रथमच तिच्या इतक्या जवळ येऊन बसला होता.

माझं काही नाही.. खाणे-पिणे-झोपणे आणि उंडारणे.. निवांत एकदम..  हसण्याचा आव आणत संपी म्हणाली.

अजूनही बरंच काही चालूये असं दिसतंय.. मयुरकडे पाहत तो म्हणाला.

म्हणजे? काय म्हणायचंय..

काही नाही.. पाहतोय फॅन फॉलोइंग.. तो हसत म्हणाला.

हो का? तुमचंही काही कमी नाही बरं फॅन फॉलोइंग! मैत्रियीने लास्ट वीक तुला प्रपोज केलं असं ऐकलंय..

हे ऐकून मंदार उडालाच. तुला कोणी सांगितलं?’

समजलं सूत्रांकडून’’

ओहह.. आय सी.. सूत्र!!

हम्म..

यस अॅक्चुअल्ली.. तिने सगळ्यांसमोर विचारलं यार.. मी अवाक झालो. पहिल्या प्रथम तू आठवलीस. तुझा अंदाज खरा ठरला ना म्हणून..

ओहह

हम्म..

मग?’

मग काय?’

तू काय म्हणालास तिला?’

काय म्हणालास म्हणजे? नाही म्हणालो.. i dont feel that way..’

ओहह..

हम्म म्हणजे डायरेक्ट्लि असं नाही म्हणालो.. समजाऊन सांगितलं तिला..

अच्छा..

दोघे मग काही मिनिटं शांत झाले.

 

धिस बेंच.. का आवडायचा गं इतका तुला?’

भिंतीजवळ आहे म्हणून.. हाहा..

हम्म.. माझ्या त्या तिसर्‍या रो मधून एका साइडने किंचित चेहरा दिसायचा तुझा. तेही मधु बाजूला झाली तर..

‘omg.. एवढं लक्ष होतं तुझं?’

हम्म.. हो म्हणजे.. जायचं लक्ष मोरपंखी रंगाच्या ड्रेस कडे.. काय करणार! तो तिच्याकडे पाहत होता.

तिने नजर खाली वळवली.

मग.. कधी जातेयस पुण्याला परत?’ थोड्या वेळाने विषय बदलत मंदारने विचारलं.

मी? काही ठरलं नाही अजून. जाईन आठ एक दिवसात

 

या दोघांना असं कोपर्‍यात बसलेलं पाहून मंदारला कोणीतरी हाक मारली. आलो म्हणत जराशा अनिच्छेनेच तो उठला..

अशावेळी नको इतकी आठवण येते या लोकांना माझी..

संपीकडे पाहून म्हणाला.

संपी गालातल्या गालात यावर हसली फक्त..

 

नंतर गप्पा-खाणं-पीणं-भेंड्या अशा अंगांनी गेट-टुगेदर पुढे जात राहिलं.. पण, संपीच्या मनाचं मात्र का कोणास ठाऊक आता गोड फुलपाखरू झालेलं होतं..


क्रमश:


संजीवनी देशपांडे 


#marathistory #marathikatha marathi story, marathi katha, sampi ani ticha dhamal jag

 

टिप्पण्या

Tanuja म्हणाले…
Superb! Doghahi get-together che bhaag agadi chhan zale ahet :-)
अनामित म्हणाले…
Pudhil bhag?
Unknown म्हणाले…
Sampi che पुढील भाग दिसत नाहीत
ग्रुप वर शेअर करा pls. आम्हाला उत्सुकता आहे

लोकप्रिय पोस्ट