संपी, मंदार आणि पाऊस.. (भाग ३३)श्रावण महिना. भुरभुर पाऊस आणि झाडांच्या फांद्यांमधून डोकावणारं उन्ह.. आल्हाददायक आणि चैतन्याने रसरसून भरलेलं वातावरण. कॉलेज कॅम्पस मधल्या ओल्या तरीही उन्हात चमकणार्‍या प्रशस्त रस्त्यांवरून संपी आणि मंदार फेरफटका मारत होते. सूर्य पश्चिमेकडे झुकला होता. दोघेही फार काहीच बोलत नव्हते. नेहमी बडबडणारी संपी आज खूप शांत होती. ओल्या रस्त्यांवरून फिरताना दोघांची पावलं मात्र अगदी एका लयीत पडत होती. ती शांतता अवघडलेली नव्हती. त्यात संपीच्या बाजूने ती जशी आहे तशी असण्याचा एक खूप समाधानकारक फील होता. कुठलंही दडपण नाही, जे वाटतंय त्याहून वेगळा मुखवटा धारण करण्याची केविलवाणी धडपड नाही. आणि मंदारच्या बाजूने निखळ स्वीकार.. संपीच्या मनोवस्थेचा, विचारांचा आणि खुद्द संपीचाही.

थोड्या वेळाने बंद कॉलेजच्या रिकाम्या पायर्‍यांवर येऊन दोघे बसले. एरवी गजबजलेला परिसर रविवार असल्याने शांत होता.

फीलिंग बेटर?’

बाजूला फुललेल्या monsoon लिलीज कडे पाहत असलेल्या संपीला मंदारने विचारलं.

अम्म?.. हो.. थोडं बरं वाटतंय आता..

लिलीज वरची नजर मंदारकडे वळवत ती किंचित हसत म्हणाली.

हम्म.. गुड!

पुन्हा काहीवेळ शांतता.

काही वेळाने समोरच्या रस्त्याकडे पाहत संपी बोलू लागली,

किती स्ट्रेंज आहे ना हे.. पुन्हा पुन्हा असं वाटतंय, श्रुतीने कोणाशी तरी बोलायला हवं होतं.. किंवा कोणीतरी तिच्यासोबत तरी असायला हवं होतं.. ती वेळ टळायला हवी होती. कदाचित आज चित्र वेगळं असलं असतं.. कदाचित ती आज इथे असती.. पूर्वीसारखीच हसत.

हम्म..

फेल होण्याचं फीलिंग प्रचंड वाईट आहे आय अंडरस्टॅंड.. बट त्यामुळे इतका टोकाचा निर्णय! नो यार..

‘……’

मंदार तिला फक्त ऐकत होता. आणि तिलाही आत्ता तेच अपेक्षित होतं.

तुला माहितीये, मला यावेळी आतून फीलिंग येतच होतं.. माझा विषय राहणार आहे कुठलातरी असं.. तसंच झालं बघ. रात्री फोनवर आईला हे सांगताना इतक्या वर्षात कधी आलं नाही इतकं बेक्कार फीलिंग आलं. स्वत:ची लाज, चीड, शरम.. सगळं सगळं वाटून गेलं.. आई काही म्हणाली नाही. पण तिला वाटलंच असणार ना..

हम्म.. मी समजू शकतो..

संपी पुन्हा शांत झाली. तिचा तो गिल्टने भरलेला, अतिशय प्रामाणिक चेहरा मंदार पाहत राहिला. नकळत संपीच्या डोळ्यांत पाणी दाटून आलं. ते पाहताच त्याच्याही नकळत एका हाताने तिला जवळ घेत मंदार म्हणाला,

ऐ वेडाबाई, इट्स ओके.. डोन्ट थिंक अ लॉट.. मला खात्रीये यावेळी पुन्हा जंप बॅक करशील तू.. असं रडायचं नाही..

त्या स्पर्शातली माया असेल, आपुलकी असेल किंवा अजून काही.. माहीत नाही, पण त्यामुळे संपीचा बांध फुटला आणि ती रडायला लागली..

खूप रडली. त्यानेही तिला रडू दिलं. नुसताच गोंजारत राहिला.

त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलेली ती. हळू हळू रडणं ओसरत गेलं. ती शांत होत गेली..

वातावरण निवळावं म्हणून मग काहीवेळाने मंदार म्हणाला,

आता आणखी थोडं जरी रडलीस ना तर मला माझा शर्ट पिळून काढावा लागेल.. इतका तो ओला केलायस..

संपीने मान हलवून लागलीच पाहिलं, खरंच तो संपीने डोकं ठेवलेलं तिथे ओला झाला होता..डोळे पुसत, हसत ती बाजूला झाली..

सॉरी..’

सॉरी? फॉर व्हॉट?’

शर्ट.. ओला..

हाहा.. अगं गम्मत केली मी..

तिने हसून पाहिलं त्याच्याकडे. तो पुढे म्हणाला,

बरं एक सांगू का तुला?’

काय..

रडताना ना..

तू..

फार घाण दिसतेस.. :D’

दोघेही यावर खूप हसले.

हो का.. असुदे.. हसत हसत लटकी रागावत संपी म्हणाली.

 

हसणार्‍या तिच्याकडे मंदार बराच वेळ पाहत राहिला. त्याला खरंतर आज तिला मनातलं सांगायचं होतं.. त्यादिवशी तिने मागितलेल्या पार्टीला डन म्हणताना त्याच्या मनात हाच विचार होता.. पण काल घडलेला प्रसंग, संपीचा रिजल्ट, मूड या सार्‍यामुळे त्याने तो विचार मनातून काढून टाकला होता..

पण तिथल्या त्या वातावरणात त्याला का कोणास ठावूक काय वाटलं, तो बोलून गेला,

पण तरी खूप आवडतेस मला..

संपीने दचकून त्याच्याकडे पाहिलं. तिच्यावर रोखलेले त्याचे डोळे. तिच्या अंगातून एक तीव्र वीज चमकून गेल्यासारखं तिला वाटलं.

एवढ्यात वार्‍याची एक मोठी झुळूक आली आणि वरच्या झाडाची फांदी हलून त्यावरचं पावसाचं पाणी त्यांच्यावर ओघळलं.

तिने आनंदून वर पाहिलं. त्याने क्षणभर डोळे मिटले आणि पुन्हा तिच्याचकडे पाहत राहिला..

संपी बावरून गेली. पण बोलली काहीच नाही.

इतक्यात मंदारचा फोन वाजला.. त्याने फोन कडे पाहिलं, मैत्रेयीचं नाव..

संपीलाही ते दिसलं. तिने मान वळवली.

मंदारने फोन घेतला,

हॅलो..

अरे कुठेयस तू? आजचं ठरलंय ना आपलं.. सगळे जमलेयत.. तुझीच वाट पाहतायत

अररे.. हो.. विसरलोच मी..

वाटलंचं मला.. ये लवकर

तिने फोन ठेवला.

मंदारने संपीकडे पाहिलं.

तिचा प्रश्नार्थक चेहरा.

अगं.. आज ग्रुपला पार्टी द्यायचं ठरलं होतं.. आम्ही दोघे देणार होतो..

तुम्ही दोघे?”

मी आणि मैत्रेयी..

‘..?’

ती फर्स्ट आहे ना आणि मी सेकंड.. कॉलेज मध्ये.. सो रिजल्टची पार्टी..

तो बोलून गेला पण नंतर उगाच बोललो असं त्याला वाटलं.

ओहह..

संपीला नाही म्हटलं तरी थोडं वाईट वाटलं. कदाचित थोडी जलसीसुद्धा..

विषय झटकत आणि काही झालंच नाही अशा आविर्भावात ती जागची उठली आणि म्हणाली,

अरे वा! मस्त. कॅरि ऑन देन.. चल निघूया.. उशीर होईल तुला..

मंदार थोडं विचार करून म्हणाला,

यू शुअर?’

संपी काहीच म्हणाली नाही.

तो प्लान पोस्टपोण होऊ शकतो.. ईफ यू विश..

खाली बसलेला मंदार उभ्या असलेल्या संपीकडे पाहत बोलत होता.

नो नो.. कशाला.. जा तू.. एंजॉय!

फार काही न बोलता ती जायला निघाली. आणि स्वभावाप्रमाणे शांत राहत लगेच react न होता तोही तिच्या मागे जायला निघाला..

 

 

क्रमश:

 


संजीवनी देशपांडे 

 

टिप्पण्या

कुसुमिता म्हणाले…
हा ही भाग खूप छान.. Waiting for next part
Suharsha म्हणाले…
Amazing 👏
अनामित म्हणाले…
Khup chan!
Sanjeevani म्हणाले…
कुसुमिता, सुहर्षा, अनामित.. Thank you :)
Suharsha म्हणाले…
Egarly Waiting for next part..

लोकप्रिय पोस्ट