'लास्या' आणि 'अभिसार'.. ई-साहित्य वर दोन कथासंग्रह प्रकाशित!

 नमस्कार वाचकहो,


कळवताना अत्यंत आनंद होतोय, ई-साहित्य या ई बुक प्रकाशन संस्थेतर्फे नुकतेच माझे  'लास्या' आणि 'अभिसार' हे दोन दिर्घकथा संग्रह प्रकाशित झाले. त्यांना वाचकांचा भरभरून प्रतिसादही मिळतोय. तसेच 'लास्या' या कथासंग्रहाचं ऑडिओ रूपांतरणही लवकरच ई-साहित्यच्या 'कानगोष्टी' विभागात प्रकाशित होणार आहे. त्याचं काम सध्या सुरू आहे. लेखिका वैजयंती डांगे त्याचं अभिवाचन करत आहेत. त्यामुळे पुस्तकातील कथा आता 'ऐकताही' येऊ शकतील. 

याव्यतिरिक्त एक नवा-कोरा छापील कथासंग्रह (ज्यातील कथा इतर कुठेही प्रकाशित केलेल्या नाहीत) प्रकाशित करण्याचा मानस आहे.. 

वाचक आवर्जून प्रतिसाद कळवतात तेव्हा एक लेखक म्हणून अतीव आनंद होतो. आपली कलाकृती लोकांपर्यंत पोचते आहे आणि आवडीने वाचली जाते आहे या गोष्टी खूप ऊर्जा देणार्‍या आहेत. एक उल्लेख इथे आवर्जून करावासा वाटतो, काही दिवसांपूर्वी मुंबईहून जयश्री देशपांडे या पंच्याऐंशी वर्षांच्या आजींनी फोन करून त्यांचा अभिप्राय कळवला होता. माझ्या आजीच्या वयाच्या या माझ्या वाचक आजींकडून मिळालेली कौतुकाची थाप खूप मोलाची होती. 

लास्या आणि अभिसार ही दोन्ही ई-पुस्तकं आहेत. यात प्रत्येकी दोन-दोन दिर्घकथांचा संग्रह आहे. या कथा पूर्वी चाफा वर प्रकाशित केलेल्या आहेत. या पुस्तकांच्या स्वरुपात आता त्या सलग आणि एकसंध, वाचकांना डाऊनलोड करून वाचता येऊ शकतात. ई-साहित्य प्रतिष्ठान ही एक साहित्य चळवळ आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यांच्या esahity.com या संकेतस्थळावर अशी कितीतरी पुस्तके पीडीएफ स्वरुपात मोफत उपलब्ध आहेत. 

या दोन्ही पुस्तकांच्या लिंक्स सोबत जोडतेय, ती मोफत आहेत.. वाचा आणि अभिप्राय कळवा.. 

लास्या 

अभिसार - संजीवनी देशपांडे 

टिप्पण्या

Tanuja म्हणाले…
Congratulations!!! Will definitely read the both the books.
Sanjeevani म्हणाले…
तनुजा, आभार!
तुमचा अभिप्राय वाचायला आवडेल

लोकप्रिय पोस्ट