संपी आणि तिचं धमाल जग.. (भाग - २४)

बर्‍याच वेळाने मंदारचा रीप्लाय आला,

हाय..

संपी तोवर पुस्तकात गढून गेली होती. मेसेज पाहून तिने पुस्तक बाजूला ठेऊन दिलं आणि त्याला रीप्लाय केला,

अरे आई-बाबा आले होते आज. जाम मजा आली. आईला हॉस्टेल आवडलं. मी ना तिला कोल्ड कॉफी पाजली. नको नको म्हणत होती पण मग आवडली तिला. आणि बाबांना आइस टी..:D’

संपीची नेहमीसारखी सुटलेली गप्पांची ट्रेन पाहून दिवसभर नसते विचार करत बसलेल्या मंदारच्या चेहर्‍यावर हसू उमटलं.

अरे वा.. भारीये.

तुटक रीप्लाय करणं काही त्याने थांबवलं नाही पण.

हम्म.. अरे खूप धमाल. तू बोल.. काय करतोयस आणि काय म्हणत होतास सकाळी ते फेमस वगैरे?’

काही नाही.. फॅन फॉलोइंग वाढत चाललंय ना तुझं.. म्हणून म्हटलं.. मयूर, श्री.. वगैरे वगैरे..

संपीची ट्यूब आत्ता पेटली.

हाहा.. ओहह.. असंय का..

हो.. मंदार म्हणाला.

अरे काय सांगू.. ती श्वेता उगाच मला ब्लेम करतेय.. तसं काहीच नाहीये बरं. तरीही. हे क्रश वगैरे प्रकरण काहीच माहीत नव्हतं मला

यावर मग मंदार जरावेळ काहीच म्हणाला नाही. पण मग थोडसं बळ एकवटून म्हणाला,

तुलाही आवडतो का तो?’

आता संपी जराशी शांत झाली.

आवडतो म्हणजे हो, चांगलाय तो तसा. पण, त्या दृष्टीने वगैरे नाही पाहिलं मी त्याच्याकडे कधी..

संपी प्रांजळपणे म्हणाली.

अच्छा..

मंदारला थोडसं हुश्श झालं खरं पण त्याच्या मनातली insecurity काही कमी झाली नाही. पण, मोजकंच बोलण्याच्या त्याच्या स्वभावानुसार तो फार काही बोलला नाही.

एक अस्वस्थ शांतता दोघांत पसरली.

मग थोड्याशा इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर त्यांचं मेसेजिंग त्यदिवशी पुरतं तरी थांबलं. मनात मात्र बरेच नवे प्रश्न उभे होते.

रविवार असल्याने मीनल आणि संपी दोघी रात्री बाहेर जेवायला गेल्या. पण जेवण न करता त्यांनी त्यांचा मोर्चा त्यांच्या एरिया मध्ये नव्यानेच उघडलेल्या पिझ्झा सेंटर कडे वळवला. कॅम्पस ओलांडून बाहेर जाताना कोपर्‍यावर उभ्या पिवळ्या धम्मक बहाव्याने संपीचं लक्ष वेधलं. इतके दिवस हिरवाई अंगावर घेऊन उभ्या असलेल्या त्या झाडाकडे संपीचं क्वचितच लक्ष जायचं. पण आता ते त्याचं बहरलेलं पिवळं सौंदर्य पाहून ती अवाक झाली होती. तिने पहिल्यांदाच असा फुललेला बहावा पाहिला होता. त्यात आभाळात पौर्णिमेचा चंद्रही उगवला होता. या अशा रात्री संपीला जाम आवडायच्या.

पिझ्झा खाऊन परतताना त्या बराच वेळ कॅम्पस मधल्या फुलांच्या सड्यांनी भरलेल्या रस्त्यांवरून फिरल्या. रविवारची संध्याकाळ असल्याने कॅम्पस मुला-मुलींनी भरला होता. शॉर्ट्स मध्ये फिरणार्‍या मुली, लो वेस्ट जीन्स मधली मुलं.. मुला-मुलींचे जथ्थे, गप्पा, हशे, कुठेतरी एखादं कपल हातात हात गुंफून बसलेलं.. ही तिथली नेहमीची दृश्यं होती. संपीही आता या सार्‍याला सरावली होती. सुरुवातीच्या दिवसात मात्र फार बुजून जायची. आता तसं नव्हतं. तीही आता त्या दृश्याचा भाग बनलेली होती.

पहिलं वर्ष संपत आलं होतं. तो परिसर, तिथली झाडं सारं आता संपीच्या ओळखीचं झालेलं होतं.

आजचा दिवस अनपेक्षित घटनांनी भरलेला होता. मयूरचं बोलणं तिला पुन्हा पुन्हा आठवत होतं. तू मला आवडतेस असं पहिल्यांदा तिला कोणीतरी म्हटलेलं होतं. मंदार सोबत असताना विशेष फीलिंग तिला जरूर यायचं पण त्याच्या बोलण्यातून त्याने असं काही कधी डायरेक्ट्लि व्यक्त केलेलं नव्हतं. त्याचं आजचं तुटक बोलणंही तिच्या नजरेतून सुटलं नव्हतं.

वार्‍याच्या झुळुकेबरोबर अंगावर पडलेल्या बहाव्याच्या फुलांनी संपी तिच्या विचारांमधून बाहेर आली. आणि वर झाडाकडे पाहत नेहमीसारखी उत्फुल्ल हसली. घडायच्या त्या गोष्टी घडतील म्हणत आत्ताच्या क्षणावर मग तिने मन वळवलं आणि बराच वेळ दोघी गाणी ऐकत बहाव्याखाली बसून राहिल्या.

पुढचा महिना फार धावपळीचा असणार होता. Submissions, viva, आणि मग exams.. या सेमिस्टर मध्ये परीक्षेची भीती तशी कमी झाली होती. अभ्यासही थोडा असा-तसाच झालेला होता. आता सिरियसली तो करणं भाग होतं. इतर सगळे विचार बाजूला सारत लक्ष अभ्यासावर केन्द्रित करायचं ठरवून संपी हॉस्टेलवर परतली..

इकडे मंदारही त्याच्या रूटीन मध्ये व्यस्त झाला. संपीचं-त्याचं अधून मधून बोलणं व्हायचं पण आता ते अभ्यासाविषयीच. त्याच्या सोबत राहून संपी पाठ करणे पद्धतीपासून दूर जाऊ लागली होती. विषय समजून घेणे, नोट्स काढणे इ. प्रकार तिला आवडायला लागले होते. अभ्यास कसा करायचा याचा हा नव्याने होत असलेला अभ्यास तिला तिच्या विषयांच्या जवळ नेत होता. मॅथ्स, मेकनिक्स आ वासून समोर उभे असले तरी त्यातली गम्मत आता तिला कळायला लागली होती आणि एकूण इंजीनीरिंगही कमालीचं इंट्रेस्टिंग वाटायला लागलेलं होतं..

भरपूर जुगाड करून जर्नल्स पूर्ण झाली, submissions पण उरकली. ‘submission’ या गोष्टीची एक्झॅम पेक्षाही अधिक धास्ती असते इंजीनीरिंगच्या पोरांना. वर्षभर केलेली मस्ती यावेळी बरोबर उतरते. प्राध्यापक लोक अब आया उंट पहाड के नीचे अशा अॅटीट्यूड ने वर्षभराचं उट्ट काढायला टपलेले असतात. कोणाला कसं आणि किती जेरीस आणायचं यात त्यांचा हातखंडा असतो. त्यामुळे submissions सहीसलामत पार करणे म्हणजे अर्धी लढाई जिंकल्या सारखंच असतं. शेवटचं submission उरकून रूम वर परतल्यावर संपीने एकदाचं हुश्श केलं.. आणि त्याच आनंदात मॅगीचं पाकीट उघडलं..

 

क्रमश:


संजीवनी देशपांडे 

 

टिप्पण्या

Tanuja म्हणाले…
You are rendering Sampi's character very well. It's easy to imagine her and relate to her. Tumhi ticha Mandarshi asalela nata haluvaarpane chhan phulavat ahat. I am really enjoying her journey. Looking forward to the next part :-)
अनामित म्हणाले…
छान फुलत चालली आहे...
Sanjeevani म्हणाले…
Tanuja, Thank you.. trying to explore her. Tyamulech bhag post karayla vel hotoy. I don’t post until I’m fully satisfied with it..:)
अनामित म्हणाले…
Next part??

लोकप्रिय पोस्ट