Memories.. (संपी आणि तिचं धमाल जग : भाग - २५)

 Days pass by,

Leaving memories behind.

Our laughter, cheers, glooms..

Everything, then, gets a room in that memory lane

So, my dear,

Give your future,

A gift of memories that would be worth celebrating..

And then,

Wear your memories like a crown..

Like a damn precious crown..!!

 

-    Sampada..  

 

संपदा गॅलरी मध्ये बसून जुन्या डायरीची पानं धुंडत होती. बाजूला लॅपटॉप होता आणि हातात कॉफी. भुरभुर केसांचा लूज बन वर टाय अप केलेला.

बर्‍याच दिवसांनी मिळालेली निवांत संध्याकाळ गॅलरीमधल्या झाडा-झुडपांसोबत आणि पलीकडून मावळणार्‍या सूर्यासोबत घालवावी असं तिच्या मनात चालू असतानाच दुपारी ती नसताना घरी येऊन पडलेल्या कूरियर कडे तिचं लक्ष गेलं. वर आईचं नाव पाहून तिने ते लगोलग उघडलं आणि खजिना सापडावा अशा आनंदात ते घेऊन कधी गॅलरीत येऊन बसली तिचं तिला कळलं नाही.

संपदाच्या आईने घराचं renovation करताना संपदाच्या सापडलेल्या जुन्या जपून ठेवलेल्या काही वस्तु तिला कूरियर केल्या होत्या. तो बॉक्स उघडल्यावर आत आठवणींचा तो पेटारा पाहून ‘serendipity’ चा खरा अर्थ संपदाने अनुभवला. एकेक वस्तु पाहून, जवळ घेऊन, त्या-त्या आठवणीत जरावेळ रमून दुसर्‍या वस्तूला हात लावायचा.. असं तिचं चालू होतं. डायरी, त्यातली सुकलेली फुलं-पानं, आठवणी, कविता, जपून ठेवलेले कीचेन्स आणि किती काय काय! सगळ्यात खाली एका बॅगमध्ये घडी घालून ठेवलेला मोरपंखी पंजाबी ड्रेस पाहून तर अलगद तिच्या डोळ्यांत पाणी तरळलं. ती नक्की हसत होती की रडत होती तिचं तिलाही उमगत नव्हतं. टाइम-मशिन मध्ये बसल्या सारखं एका मोठा प्रवास मात्र तिचं मन करून येत होतं नक्कीच.

इंजीनीरिंगच्या दुसर्‍या-तिसर्‍या कुठल्याशा वर्षात तिने लिहलेली ही ‘memories’ नावाची कविता! तिने आज ती पुन्हा पुन्हा वाचली. नव्हे जगली म्हणायला हवं. कॉफी कधीची गार पडली होती पण त्याचं तिला गम्य नव्हतं. कामाचा वाढता व्याप, करियरच्या अगदी महत्वाच्या टप्प्यावर तिने घेतलेली रिस्क, त्यात कष्ट आणि प्रयत्नांअंती मिळू पाहत असलेलं यश.. या सार्‍यात मनातला हा कोपरा कुठेतरी गुडुप झाला होता. ते दिवस आठवणीत मागे पडले होते.  पण, आज ते असे अवचित डोळ्यांसमोर उभे राहिले आणि संपदा मधल्या संपीने कितीतरी दिवसांनी पुन्हा डोकं वर काढलं. आणि ते अर्थात खूप सुखद होतं. आपल्याच जुन्या व्हर्जनशी अवचित आपली गाठ पडावी तसं काहीसं. ती आतून सुखावून गेली. स्वत:च्या तेव्हाच्या वेंधळेपणावर तिचं तिलाच हसू येत होतं.

आणि मग गुलाबासोबत त्याचे काटेही हातांना सापडावे तशा मनात खोल दडवलेल्या काही आठवणीही डोळ्यांसमोर तरळू लागल्या. आपआपल्या दिशांना विखुरलेले मित्र-मैत्रिणी.. घडलेले काही प्रसंग.. काही माणसं.. आणि अर्थात मंदारही! काही माणसं आयुष्यात येतात, जन्मोजन्मीची ओळख असल्यासारखे भासतात, आपल्या असण्यावर/व्यक्तित्वावर खोल परिणाम करतात आणि एका क्षणी अगदी कुठेतरी नाहीसे होऊन जातात.. त्या सोबतीची सवय झालेल्या आपल्या मनाचं मग काय करायचं असतं? ती पोकळी कशाने भरून काढायची?

मावळणार्‍या सूर्याकडे पाहणारी संपदाची नजर क्षितिजावर आता वेगळंच काहीतरी शोधत होती.. इतक्यात फोन वाजला म्हणून ती भानावर आली. राधाचा फोन. राधा.. संपदाची पार्टनर कम जिवलग कम एव्रिथिंग.. इंजीनीरिंगच्या शेवटल्या वर्षात दोघींची गाठ पडली आणि दोघी सख्ख्या बहिणी वाटाव्या इतक्या एकमेकींच्या झाल्या. कॅम्पस मध्ये selection झाल्यावर संपदाला आनंद नक्कीच झाला होता पण तोवर जॉब करणे हे काही आपलं अंतिम ध्येय नाही हेही तिला कळलेलं होतं. मग राधासोबत जॉब सांभाळून केलेला landscape designing चा कोर्स.. पुरेसे पैसे साठल्यावर त्यातच करियर करायचं ठरवून जॉबला ठोकलेला राम-राम.. संपदाचा प्रवास वेगळा आणि नक्कीच रोमांचक होता.

संपदा अगं, त्या राठींचा कॉल आला होता.. त्यांचा तो पाचगणीचा प्रोजेक्ट.. उद्या थोडंस कमी आहे काम. जाऊन यायचं का तिकडे?’

राधा गडबडीत बोलत होती.

स्वत:ची मनोवस्था सावरत, भानावर येत मग संपदा उत्तरली,

हो.. माझ्याहि डोक्यात अगदी हेच आलं होतं.. जाऊया.. डिटेल्स whatsapp कर..

ओके चालेल.. काय गं.. आवाज का असा येतोय? यू ओके?’

अगं हो.. झोपेतून उठले आत्ता.. सो.. संपदाने विषय टाळला.

 

दुसर्‍या दिवशीची तयारी करत पुन्हा ती मनात येणार्‍या विचारांमध्ये गुंतली. मधला सगळा घटनाक्रम आठवू लागला. पहिल्या दोन वर्षात केलेली धमाल. नंतर करियर, relationship सार्‍याच बाबतीत आलेली एक जबाबदारीची जाणीव, मंदारसोबत इतर मित्र-मैत्रिणीसोबत घालवलेले सोनेरी दिवस, आणि नंतर अवचित निर्माण झालेला दुरावा.. जो आजतागायत टिकून होता.. सारा पट उलगडू लागला.

तसं फेसबूक वर अधून-मधून स्ंनीक केल्यावर कळायचं कोणाच्या आयुष्यात काय चाललंय पण मंदार या सगळ्याच बाबतीत खूप अलूफ आधीपासूनच असल्याने त्याचं फारसं काही समजायचं नाही.. कुठल्याशा बीच वरचा एक काहीवर्षांपूर्वीचा फोटो सोडला तर त्यावर दुसरं काहीही नव्हतं. एकमेकांच्या अगदी जवळ येऊन आता असं इतकं दूर जाणं मनाला वेदना देणारं असलं तरी त्यासोबत जगणं संपीने आता अंगवळणी पाडून घेतलं होतं. आणि दुख्ख वेदना कुरवाळत बसणार्‍यांपैकी ती मुळात नव्हतीच. आला दिवस आणि आव्हाने हसत आपलंसं करत खळाळत्या झार्‍या सारखी ती जगायची. कामही आवडीचं आणि चॅलेंजिंग. त्यामुळे यश-आनंद तिला दाही-दिशांनी हाकारत होते. तीही जगण्याला भिडत होती.

पण आज हा असा अवचित मनाचा हळवा कोपरा छेडला गेला होता.. आणि ती बावरून मावळलेल्या सूर्याकडे कितीतरी वेळ पाहत बसली होती..

 

 

क्रमश:


संजीवनी देशपांडे टिप्पण्या

अनामित म्हणाले…
Loved those lines!!!
Unknown म्हणाले…
2nd sem nantar asa anpekshit turn pahun thoda vel blank zale.karan sampi n mandar ch bhavvishv kuthetari apalas zal hota.but ha sudha bhag awdla.
अनामित म्हणाले…
Waiting for the next part :)
@mrutakshar म्हणाले…
अचानक गोष्ट शेवटच्या टप्प्यावर आलीय का? कृपया अस करू नका मी मंदार आणि सम्पी ची लव्ह स्टोरी येईल या आशेवर आहे. ती फुलू द्या. हळूहळू पुढे न्या. अगाऊ सुचनेसाठी सॉरी.
Sanjeevani म्हणाले…
नाही, कथा संपत नाहीये :)

लोकप्रिय पोस्ट