Realization.. (संपी : भाग ३५)
संपी हॉस्टेलवर परतली ती थोडीशी खट्टू होऊनच. खरंतर, तिने खट्टू होण्याचं तसं काही कारण
नव्हतं हे तिलाही कळत होतं पण वळत मात्र नव्हतं. तिला मुळात हेही कळत नव्हतं की तिला राग नक्की
कशाचा आलाय. मंदार जाणार
होता याचा की तो मैत्रेयीसोबत असणार होता याचा की मैत्रेयी topper आहे आणि आपला मात्र एक backlog आलाय याचा.. हळूहळू तिच्या लक्षात येऊ लागलं की तिच्या खट्टू होण्यामागे
थोड्याफार प्रमाणात या तिन्ही गोष्टी होत्या. पहिल्या दोन कारणांचा विचार केल्यावर
आपण मंदारवर नकळत हक्क दाखवायला लागलोय हे तिला जाणवलं. त्या भुरभुर, सोनसळी पावसात तो जे बोलला तेही तिला आठवलं. पुन्हा ती मोहरली! पण, मग तिसरं कारण आठवलं, मैत्रेयी topper आणि आपल्याला केटी.. यात खेद होता. स्वत:विषयी अकारण मूळ धरू लागलेलं एक
नवंच न्यून होतं.. आणि थोडी असूयाही! असूया? या विचाराने
मात्र ती चरकली. तिला स्वत:चीच शरम वाटली. न्यून आणि असूया या दोन्ही गोष्टी
चुकीच्या आहेत हे तिने स्वत:ला पुन:पुन्हा बजावून सांगितलं. आणि डोळ्यांत तरळलेलं
पाणी निग्रहाने बाजूला सारत तिने यावेळी आपल्या क्षमता शत-प्रतिशत वापरण्याचा आणि ‘focused’ होण्याचा निश्चय केला!
मंदारचा विचार अर्थात येत होताच मनात. पण त्याला टाळण्याची तिला
गरज वाटेनाशी झाली. आणि आपल्या मनात काय आहे हे लगबगीने त्याला सांगण्याची घाईही
वाटली नाही. तो आपला आहे हे फीलिंग तिच्या मनात आता रुजलं होतं. त्याच्या बाजूनेही
काहीसं असंच असावं. तिने आत्ता अभ्यासाकडे लक्ष केन्द्रित केलेलं आहे हे जाणून
त्या दिवशीचा विषय त्यानेही पुढे फार लावून धरला नाही. ज्या फीलिंग्स डीप रूटेड
असतात त्यांना सततच्या validationची किंवा संपर्काची आवश्यकता बहुधा नसतेच. त्या ‘असतात’.. कायम!
हॉस्टेलवर आता संपीचं मन रमेनासं झालं.
येता-जाता श्रुतीची रूम दिसायची आणि मग खूप अस्वस्थ व्हायचं. रात्रीच्या वेळी
भीतीही वाटायला लागली होती. काही दिवसातच मग संपी आणि मीनलने हॉस्टेल सोडायचा
निर्णय घेतला. परिसरात जवळच एक नवीन बांधलेलं घरगुती हॉस्टेल त्यांना सापडलं. आणि
मग दोघी तिथे शिफ्ट झाल्या. तिथे त्यांना प्राजक्ताही येऊन मिळाली. तिनेही तिचं
जुनं हॉस्टेल सोडलं होतं. सो एक मेघा सोडली तर कॉलेज मधला त्यांचा ग्रुप आता एकत्र
रहायलाही लागला होता. मेघाचं पुण्यात घर असल्याने ती अधून-मधून यांच्या रूमवर
येत-जात रहायची. चौघिंची गट्टी तशी पहिल्या वर्षापासूनच असली तरी आता त्यांच्यातली
मैत्री घट्ट होत चालली होती. संपी आणि प्राजक्ता दोघी जवळपासच्याच छोट्या
शहरांमधून आलेल्या होत्या. त्याचं बॅकग्राऊंड, कुटुंबं ही
पण एकसारख्या वळणांची. त्यामुळे दोघी एकमेकिना खूप रीलेट करायच्या.
नवी जागा, नवी मेस..
संपी काही दिवस चांगलीच व्यस्त राहिली. त्यात कॉलेजमध्ये आता lectures,
प्रॅक्टिकल्स व्यवस्थित सुरू झाले होते. विषय नवीन आणि गुंतागुंतीचे असल्याने तिथे
प्रॉपर लक्ष देणंही गरजेचं होतं. दिवस भराभर जात होते. मंदारशी बोलणं व्हायचं पण
बाकी कोणाशी आता जवळपास नाहीच. भेटी-गाठीही कमी झालेल्या. अभ्यासातून वेळ मिळाला
की संपी इतर पुस्तकांना जवळ करायची. गौरी देशपांडे आता तिची आवडती झाली होती. ती, मेघा आणि
प्राजक्ता तिघींनी गौरीची पुस्तकं वाचण्याचा सपाटाच लावला. तिघी एक-एक पुस्तक विकत
घ्यायच्या आणि मग शेअर करायच्या. त्या कथा, त्यातली
पात्रं हे त्यांचे खूप आवडीचे विषय झाले होते. वाचून झाल्यावर तिघींच्या त्यावर
भन्नाट चर्चाही रंगायच्या. केवळ दिमित्री, इयन, कालिंदीच
नाही तर नमू, वनमाळी, तेरूओ, सुहास या
व्यक्तिरेखा देखील मनात घर करू लागल्या. गौरीची काही कालातीत वाक्यं तर संपीच्या मनात
अगदी फिट्ट बसली होती. अगदी त्यांची फ्रेम बनवून भिंतीला टांगावी इतकी.. उदाहरणच
द्यायचं झालं तर,
“...जोपर्यंत
माझ्यातील माणूस या
व्यक्तीबद्दल तुझ्यातील माणूस या
व्यक्तीला दया, मैत्री,सहानुभूती,प्रेम वाटत नाही किंवा वाटल्याचा मला प्रत्यय येत नाही तोपर्यंत
सर्व पुरुषांना सर्व स्त्रियांच्या संदर्भात (किंवा नरांना माद्यांच्या संदर्भात)
होणार्या ग्रांथिक
स्रावांना प्रेमबीम म्हणण्याच्या भानगडीत न पडणंच चांगलं!....”
-
कारावासातून
पत्रे
आणि
“माझ्यातल्या कुठल्याच 'गुणा'मुळे तू माझ्या प्रेमात पडलेला नाहीस. प्रेमात
असणं ही किती प्रचंड , सुंदर, जगायला
आवश्यक गोष्ट आहे हे माझ्याकडे बघून तुला उमजलं , एवढंच .”
#
तेरुओ
यातल्या पहिल्या वाक्याने तिच्या मनातली ‘प्रेमा’
विषयीची बैठक, व्याख्या पक्की झाली होती. इतके दिवस जे
वाटतंय ते प्रेमच आहे की आणखी काही या प्रश्नापाशी ती अडखळायची. पण आता ते ठरवणं
तिला सोपं जाऊ लागलं. श्री, मयूरला पण ती आवडायची. तेही एका
मर्यादेपर्यन्त तिला आवडायचे. पण तिच्या बाजूने तरी ते आवडण खोल नव्हतं. श्रीचा
गमतीशीर स्वभाव तिला आवडायचा, मयूरचं mature वागणं आवडायचं.. पण, अंतर्बाह्य एखादी व्यक्ति आवडण, त्या व्यक्तीचं सोबत असणं आवडण, त्या असण्यामुळे
नकळत आपलं स्वत:चं ‘असणं’ही नुकत्याच
उमललेल्या कळीसारखं सुंदर होत जाणं या गोष्टींचा अनुभव तिला फक्त आणि फक्त
मंदारसोबत असताना यायचा.. आणि इथेच गौरीच्या दुसर्या वाक्याचा प्रत्यय तिला आला!
प्रेमात पडण हे समोरच्या व्यक्तीच्या गुणावगुणावर अवलंबून नसतं तर
प्रेम म्हणजे त्या सार्याच्या पल्याड जात सारे भेद बाजूला सारत दोन मनांचं एक
होणं आहे हे तिला उमजलं आणि इतके दिवस ही गोष्ट मान्य करायला टाळाटाळ करणारं तिचं
मन ‘आपण खरंच
प्रेमात पडलोय’ या जाणिवेने आनंदाने बागडायला लागलं. हे सगळं
मंदारला धावत जाऊन सांगावं असंही तिला वाटायला लागलं. तिने तसं केलं नाही. पण काही
दिवसांनी घडलं मात्र तसंच..
गणपती येऊन गेले होते. पाऊस अजूनही अधून-मधून दर्शन देतच होता. एका
दिवशी असेच ढग दाटून आले. रिमझिम पाऊस पण सुरू झाला. सुंदर वातावरण! मंदारच्या काय
मनात आलं काय माहित त्या पावसात अंगावर जॅकेट चढवून आणि डोक्यावर हेलमेट घालून तो संपीच्या
कॉलेज जवळ आला. आणि खाली थांबून त्याने संपीला कॉल केला. संपी होती क्लासरूम मध्ये.
एक लेक्चर संपलं होतं. दुसरं सुरू होण्याची वाट पाहत मस्ती करत सार्याजणी बसलेल्या.
संपीने फोन घेतला. आणि तो खाली थांबलाय हे ऐकून चकित झाली. काही विचार न करता मीनलला
सांगून sack घेऊन ती
खाली आली, समोर झाडाखाली पावसात उभा मंदार!
तिने तिचं जॅकेट चढवलं, हूड वर घेतलं आणि त्याच्यापाशी गेली.
‘काय रे असा भिजत? काय झालय?’
‘बस गाडीवर..’
‘का? कुठे जायचंय?’
‘सिंहगडावर.’
‘काय?’
‘हो..’
‘अरे पण, पाऊस..’
‘तू पावसाला कधीपासून घाबरायला लागलीस? चल.’
त्याच्याकडे पाहत क्षणाचाही विचार न करता संपी बाईकवर बसली आणि दोघेही
सिंहगडाच्या दिशेने निघाले..
क्रमश:
संजीवनी देशपांडे
टिप्पण्या
आवडला हाही भाग:)
तनुजा, हम्म.. lets see what happens :)