शुक्रवार, १ ऑक्टोबर, २०२१

दिल-ए-नादान.. : दिगंत २.६


 

अनुराग आणि आई-बाबा येऊन गेले त्यानंतरचा आठवडा मी जवळपास लोळूनच काढला. एडिटोरियल्स वाचायची, लिहणार्‍याना शिव्या घालायच्या, वाढलेल्या नखांकडे पाहत बसायचं. ते कापायचे मात्र नाहीत. कपाटाच्या वर कोपर्‍यात छताला झालेली जळमटं इमाने-इतबारे रोज निरखायची. साफ करायची नाहीत. असे सगळे उद्योग. आणि मग आज सकाळी उठले ती अभूतपूर्व उत्साह अंगात घेऊनच. पहिली गोष्ट केली ती म्हणजे इतक्या दिवसांचं अस्ताव्यस्त घर आवरलं. कपाटावरची जळमटं काढली. नख कापले. तासभर आंघोळ केली. आवडीने पेपर वाचला. छान नाश्ता बनवला. हम्म आलीस तर पूर्वपदावर एवढंच म्हणून संहिता पुन्हा तिच्या कामात घुसली. रविवारच्या सकाळीही ही कामच करते.

त्यानंतर पहिला फोन अनुरागला केला. त्याने तो घेतला नाही. कामात असेल. मग मी अनिकेत त्या दिवशी गात होता ती गझल लावली. कोचावर मागे रेलून शांतपणे कॉफी पीत ती ऐकली. भलतंच रोमॅंटिक वगैरे वाटायला लागलं. काही म्हणा, संगीताने माहोल बनतो. स्वत:कडे जरासं आरशात पाहिलं. आता पूर्वीपेक्षा बरी दिसत होते. मनात विचार आला, संहिताला घेऊन लंचला जावं. पण मग अनुराग आठवला. त्यालाही बोलवू. मग अनिकेत का नाही? त्यालाही. मग चिंट्याच तेव्हढा राहतो. त्याला तरी कशाला सोडा. शी काय मी पण. नको. अनुरागशी बोलणं होणार नाही नीट. एक मिनिट, आयडिया! आत्ताच जाऊन डायरेक्ट धडकते अनुरागच्या घरी. बघू काय करतोय. मग पुढचं पुढे.

पत्ता माहित होता पण अजून कधी घरी गेले मात्र नव्हते. दारासमोर उभी राहिले. एक दीर्घ श्वास घेतला आणि बेल वाजवली. एक-दोन मिनिटं गेली. आतून बरेच आवाज येत होते. चार-पाच मिनिटांनी दरवाजा उघडला. समोर जवळपास माझ्याच वयाची एक मुलगी. मला पाहून तिच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह आणि तिला पाहून माझ्या. क्षणभर मनात येऊन गेलं उगाच आले का.. तिच्या प्रश्नार्थक नजरेला शेवटी उत्तर दिलं,

अनुराग आहे?

हो आहे.. तुम्ही?

मला आता या मुलीचा रागच यायला लागला. उगाचच. मुळात मी इथे दुसर्‍या कोणाचं असणं गृहीतच धरलं नव्हतं. मी कोण हे हिला सांगत बसणं तर जिवावरच आलं. पण इतक्यात आतून कोणय गं नेहा म्हणत अनुराग दाराशी आला आणि मी जरासा सुटकेचा श्वास सोडला. ही नेहा की कोण वळून त्याच्याकडे पाहत थोडी बाजूला झाली. अनुरागची नजर दारात उभ्या माझ्यावर पडली. त्याच्या चेहर्‍यावर प्रथम आश्चर्य, मग थोडासा आनंद..

रिया तू??

हो मी.

वरुन खालपर्यंत माझ्याकडे पाहत आश्चर्य पचवत तो ओह ग्रेट असं काहीसं म्हणत तिथेच थांबला. त्याच्या बाजूला ती नेहा की कोण डोळ्यांच्या कोनातून एकदा त्याच्याकडे आणि एकदा माझ्याकडे पाहत उभी. शेवटी मीच म्हणाले,

आत येऊ? की इथूनच परत जाऊ?’

ओह, अगं ये की.. सॉरी! प्लीज कम.. म्हणत त्याने मला वाट करून दिली.

नेहा एव्हाना आत गेली होती.

मी मनात नसलेला एक भलताच कटाक्ष अनुरागकडे टाकत आत गेले. माझ्या मागोमाग तोही आला..

आत जाऊन पाहते तर हॉलमध्ये सोफ्यावर एक जण, खाली मॅटवर एक-दोघे अस्ताव्यस्त झोपलेले.. सगळीकडे प्लेट्स, ग्लास्सेसचा पसारा. इतक्यात, अन्या, हा ब्रेड किती दिवसांचा आहे रे म्हणत नुसत्याच शॉर्ट्स वर असलेला कुणीतरी ब्रेडचा पुडा झळकावत बाहेर आला. आणि हाताची घडी घालून उभ्या माझ्याकडे पाहून उघडलेल तोंड तसंच ठेऊन गप्प झाला. नंतर त्याची आणि माझ्या मागे उभ्या अनुरागची काहीतरी नजरा-नजर झाली आणि तो आला तसा आत पळाला. मगाची नेहा तर कुठेच दिसत नव्हती. मी आता प्रश्नार्थक नजरेने अनुरागकडे पाहिलं. तो शांतपणे म्हणाला,

सॉरी फॉर धिस मेस.. अॅक्चुअल्ली काल रात्री पार्टी होती इथे. सम कलीग्ज, सम फ्रेंडस अशी. हा सगळा हॅंगओवर आहे..

ओह.. मी अशी न बोलवता यायला नकोच होतं.. आपण उगाच आलो हा मनातला किडा अजून ठाण मांडून बसलेलाच होता.

असं काही नाही. मला आवडतात surprizes..

मी क्षणभर त्याच्याकडे पाहिलं. तो माझ्याचकडे पाहत होता.

चल ये आत ये.. इथे बसायला जागा नाहीये. हे कुंभकर्ण अजून दोन तास तरी उठणार नाहीत..

मी त्याच्या मागोमाग आत गेले.

हॅंगओवर अगदी जिथे-तिथे दिसत होता. तो जात होता ती बहुधा त्याची बेडरूम असावी. आत पण सगळं बरंच अस्ताव्यस्त दिसलं. बेडवर पसरलेली रजई, कोणीतरी आत्ताच त्यावरून झोपून उठलंय असं वाटावं. बाल्कनी जवळची समानाने भरलेली चेअर माझ्यासाठी त्याने रिकामी केली. आणि बस म्हणाला. मी जाऊन बसले. बाजूचा एक स्टूल ओढून घेत तोही बसला. आम्ही एकमेकांना आवडत होतो हे नक्की. आमच्यात तसं बर्‍यापैकी मैत्रही होतं. पण पूर्वीची आता अल्पशी म्हणता येईल अशी भेट, मधल्या काळात अगदीच न झालेल्या गाठी-भेटी या सार्‍यामुळे किंवा आत्ताच्या सिचुएशनमुळेही असेल मला तो प्रचंड अनोळखी वाटायला लागला. काहीतरी बोलायचं म्हणून मी म्हणाले,

सकाळी मी फोन केला होता तुला. पण तू घेतला नाहीस.

हो का? अगं झोपलेलो असेन मी. आत्ताच उठलोय थोड्यावेळापूर्वी.

इतक्यात वॉशरूमचं दार उघडून ती मगाची नेहा बाहेर आली. मला तिथे बघून तिच्या चेहर्‍यावर पुन्हा आश्चर्य उमटलं. आणि तिला असं अनुरागच्या बेडरूम मधल्या वॉशरूम मधून बाहेर येताना पाहून मला आत प्रचंड कसंतरी झालं. अनुरागने वळून तिच्याकडे पाहिलं.

अनुराग चल मी निघते आता.. बेडवर पडलेली तिची पर्स उचलत ती म्हणाली.

कलर केलेले केस, खूप जास्त mod आणि स्ट्यलिश वाटणारा पेहराव. मी उगाच माझ्या ढगळ टी-शर्ट कडे पाहिलं आणि डोळ्यांवरचा चश्मा खाली-वर केला. अनुराग तिला शांतपणे ओके सी यू देन.. म्हणाला. हे जे काही चालू होतं ते सगळं मला खूप अस्वस्थ करत होतं. मी अस्वस्थ होण्याचं तसं काही कारण माझ्या बुद्धीला दिसत नव्हतं. पण मनाचा कुठे थांगपत्ता लागतो कधी. माझ्या नकळत माझा चेहरा आता पूर्ण उतरला. मला त्या क्षणी तिथून उठून जावंसं वाटत होतं. ताबडतोब. आणि मी तसं केलंही. ती नेहा रूममधून बाहेर पडायच्या आधी मी जागची उठले,

मी निघते..

अनुराग पुन्हा आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागला.

कुठे? अगं आत्ता तर आलीस..

नाही तुझं चालूदे. आपण नंतर कधीतरी भेटू.

हे म्हणताना माझी नजर नकळत बाहेर पडणार्‍या पाठमोर्‍या नेहावर होती.

अनुरागची बहुतेक ट्यूब पेटली. पण तो काहीच न म्हणता फक्त जरासा हसला.

मी अजूनच चिडले. मनातल्या मनात हा मला थांबवत का नाहीये??? असं होत होतं. मी जराशा रागातच त्याच्याकडे पाहिलं.

तो हसत स्टूलवर मांडी घालून माझ्याकडे पाहत म्हणाला,

झालं?.. बस आता.. चिडके..

मी आता उगाच इकडे-तिकडे पाहिलं. त्याला कळलंय याचं बरं वाटत होतं, ते हसणं आवडत होतं, मी समजत होते तसं काही नाहीये हे त्याने न सांगताही कळलं होतं. तरी मी रागाचं बेरिंग सोडलं नाही. खुर्चीवर बसले मात्र.

काय घेशील?’ पुन्हा तो शांत.

त्याचा हा शांतपणा, स्वत:वर असलेला प्रचंड आत्मविश्वास.. मी गारचं पडते दरवेळी. It is so very attractive. मी विचारात पडलेली पाहून तो म्हणाला,

अगं कलीग आहे. रात्री उशीर झाला होता. हिचं घरही लांब. सो मी राहा म्हटलं इथेच. या रूम मध्ये ती राहिली. आम्ही बाकीचे इतरत्र.

मी आता त्याची नजर टाळून इकडे-तिकडे पाहू लागले. मला माझाच राग यायला लागला. I felt jealous, insecure?? Really? हे असं फील करणं हाच स्वत:चा इन्सल्ट वाटला. त्यात त्याला ते कळलं याचाही राग आला.

माझं म्हणजे एकदा गेलेला मूड परत काही लगेच येत नाही. सो आता उगाच इथे थांबून नो आय अॅम कूल वगैरे ड्रामा करण्यात काहीच तथ्य नाही हे उमजून म्हणाले,

ओके.. फाइन.. पण मी खरंच निघते आता. आपण भेटू नंतर. तुला बरंच आवरायचं देखील आहे..

त्याने तेही शांतपणे घेतलं असावं. मी काही ते पहायला थांबले नाही. त्याने फार काही बोलाय-सांगायच्या आत मी तिथून निघालेही होते.

वाटेत पूर्णवेळ स्वत:वर चरफडले. हे असं-कसं झालं आपलं. इतरवेळी इतकी कूल असणारी, बेफिकिरी स्वत:त मुरवलेली मी. आज तिथे एका मुलीला, त्याच्या बेडरूममध्ये पाहून इतकी बिथरले? वर ते त्याला कळूही दिलं? नो यार आय insulted मायसेल्फ. वाटेत मग दिसेल त्या कफेत शिरले. मिळेल ते पोटात ढकललं. आता थोडंसं बरं वाटायला लागलं होतं.

आणि मग काहीवेळाने थंड डोक्यात एक स्पष्ट लहर चमकून गेली.. रिया, यू आर इन लव!

 

 

क्रमश:

 

संजीवनी देशपांडे

 

 


५ टिप्पण्या:

Kiran m म्हणाले...

चला सुरुवात तर झाली.... मजा एतेय...पुलेशु

Kiran m म्हणाले...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
संजीवनी देशपांडे म्हणाले...

हो.. पण फारच रखडली यावेळेस. आता लिहून संपवायचंच ठरवलंय :)

गार्गी म्हणाले...

पुढील भाग कधी?

संजीवनी देशपांडे म्हणाले...

गार्गी, पोस्ट केलाय पुढचा भाग

Popular

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *