या देवी.. ५

 

५.

 

वाटेवर विखूरलेला स्वत:च्याच स्वप्नांचा चूरा वेचत ती चालतेय. पाणोठ्याला थांबत. तोंडची तहान, पोटची भूक भागवत. वाटेतल्या काट्यांनी विव्हळतेय. गवताने मोहरतेय. तान्हुल्याचं हसणं, रडणं, कण्हणं सारं उराशी गोंजारत पुढे पुढे चालत राहतेय. कधी मन कातर झालं, कधी कढ दाटून आले तर वेचलेल्या चूऱ्यात स्वत:चं भंगलेलं पण ओळखीचं प्रतिबिंब पाहून स्वत: स्वत:च्या जखमांवर फुंकरही घालतेय.

कधी वाटेत रखरखीत वाळवंट लागतं, अणवाणी पायांना पोळणारं, डोळ्यांना थकवणारं.. 

तर कधी गर्द राई, पाखरांच्या किलबिलाटाने भरलेली, झुळझुळ झऱ्यांनी ओथंबलेली, मनाला-गात्रांना गारवा देणारी.. पण तिला पक्कं माहितीये, वाळवंटावर रुसून चालत नाही आणि राईने हुरळूनही चालत नाही. अलिप्तपणे सारं आपलंसं करत चालत राहिलं तरच इथे शेवटपर्यंत आपला निभाव लागणार.. ती चालत राहते. अखंड. अव्याहत.

तिला डोळ्यांतलं पाणीही लपवता येतं आणि खळखळून आलेलं हसूही दाबता येतं. नसलेली चूक कबूल करता येते. पडतंही घेता येतं. आणि तरी काळानुरूप, ‘आता तसं काऽही राहिलेलं नाहीवगैरे सुधारक वाक्यांसमोर मानही डोलवता येते.

कोणी तिलाबाईम्हणतं,

कोणीस्त्रीतर कोणी ‘woman’!

संज्ञा बदलल्या तरी वाट बदलत नाही.

आणि कितीही टार्गेट्स पूर्ण केली तरी चूलीपलिकडंचं अस्तित्व तिला काही केल्या गवसत नाही!

 

 

या देवी सर्वभूतेषू क्षान्ति रूपेण संस्थिता।

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

 

(क्षान्ति = forbearance, सहनशीलता)

 

 

संजीवनी देशपांडे

 


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट