या देवी.. १
१.
रणरणतं उन्ह. कडेवर पोर. डोक्यावर गाठोडं. विटकी चोळी. मळकं लुगडं. शिणलेला देह. थिजलेली ती. अनवाणी पाऊलं. गाठलेला बाजार. ठरलेला कोपरा. ती बसते. गाठोडं सोडते. पिना.. सूया.. कंगवे.. किती काय काय. सारं पसरून लेकराकडे पाहते. भुकेची नीज त्याच्या डोळाभर दाटलेली.. बोहणी व्हायला हवी. डोळे गिर्हाइक शोधतात. लेकराचं कण्हण. कोणीतरी थांबतं. चार वस्तु चाळतं. काहीच न घेता निघून जातं. असं कितीतरी वेळा. पुन्हा पुन्हा पल्लवित होणारी आशा आणि पदरी पडणारी निराशा. भर उन्हात त्या विटक्या पदराखाली अंगाचं मुटकुळं करुन अर्धवट निजलेलं, अर्धवट जागं लेकरू. ‘घे माय घे.. सूया.. कंगवे.. पिना.. घे..’ आधीचा टिपेचा आवाज आता काकुळतीला आलेला. चढलेला सूर्य आता उतरू लागतो. चार वस्तु विकल्या जातात.. उठणारी पालं पाहून तीही तिचं गाठोडं बांधते. भर रस्त्यात कुठल्याशा हॉटेलासमोर फूटपाथवर विजेच्या दिव्याला टेकून खाली बसते. तिच्या हातातली दोन केळं, एखादा पावाचा तुकडा आणि एवढसं दूध पाहून लेकरू त्याच्यावर तुटून पडतं. जे-जे जितकं जाईल तेवढं पोटात ढकलतं. आणि मग भरल्या पोटी खरं-खुरं निजतं.
त्याच्या चेहर्याकडे समाधानाने पाहत तीही आता काहीतरी पोटात ढकलते..
आणि पुन्हा चालू लागते.. नव्या दिवसाच्या दिशेने.. दूसरा बाजार शोधत..
कललेलं उन्ह. कडेवर पोर. डोक्यावर गाठोडं. विटकी चोळी. मळकं लुगडं. शिणलेला
देह. समाधानी ती..
या देवी सर्वभूतेषु ‘मातृ-रूपेण’ संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ॥
सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा :)
संजीवनी देशपांडे
टिप्पण्या