या देवी.. २

२.
 

हे पोट वाढलेलं. पुरते भरलेले नऊ महिने. नियोजित तारखेला ती दवाखान्यात दाखल होते. सोबत भल्यामोठ्या घरातले भलेमोठे नातेवाईक. घेतली जाणारी काळजी. केलं जाणारं कौतुक. ती त्रयस्थासारखी सारं पाहत राहते. प्रत्येकाची धावपळ, येऊ घातलेल्या नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याची उत्सुकता.. तिचे जड होत चाललेले डोळे सारं न्याहाळत असतात. आपल्या दोन वर्षांच्या चिमूरडीला घरी सोडताना जिवाचं पाणी झालेली ती. हळूहळू चढत जाणार्‍या सलायन मधून तिच्या अंगभर बाळंतवेणाही जोर धरू लागतात.. सृजन म्हटलं की वेदना आल्याच. तोंड घट्ट आवळून, मुठी घट्ट दाबून ती त्या असह्य वेदना साहण्याचा आटोकाट प्रयत्न करते. भोवताल धूसर होत जातो. तिला आता जाणवत असतं ते केवळ आतलं बाळ आणि वेणा.. वेदना परमोच्च बिन्दु गाठतात. आता आपण संपलो असं वाटत असतानाच संवेदना पुन्हा नव्याने जाग्या होऊन तिच्या लक्षात येतं, आपण प्रसूत झालो!

काहीवेळाने डोळे वेदनांच्या ग्लानीतून बाहेर येतात तेव्हा आजूबाजूला पुन्हा तिला ओळखीचे चेहरे दिसू लागतात. मगाशी धावपळ करणारे. पण आता शांत. पुढ्यात तो कोवळा जीव येतो तेव्हा प्राण डोळ्यांत आणून ती त्याला पाहू लागते. पण अचानक आजूबाजूची शांतता तिचं लक्ष वेधून घेते. अगदी आत्ता-आत्ता पर्यन्त उत्साहाने भरलेले आवाज अचानक कुठे गेले? एवढी टोचणारी शांतता? आणि मग पलिकडून एक दबका आवाज कानांवर पडतो,

मुलगीच झाली.

ती झर्र्कन हातातल्या बाळाकडे पाहते. नीट. तिच्या काय ते लक्षात येतं.

आणि मग निग्रहाने स्वत:च्या तान्हुलीकडे पाहत, तोंडभर हसून ती म्हणते,

‘हो मुलगी झाली!! पेढे कुठेयत?


अतिसौम्यातिरौद्रायै नतास्तस्यै नमो नमः 
नमो जगत्प्रतिष्ठायै देव्यै कृत्यै नमो नमः 

 

(अशा कटू शांततेने आणि नकारार्थी नजरांनी या जगात स्वागत झालेल्या त्या सगळ्या दुसर्‍या, तिसर्‍या, चौथ्या क्रमांकावरच्या कुमारिकांना आणि त्यांच्या मातांना आजचा दूसरा दिवस समर्पित)

 

संजीवनी देशपांडे

 

 

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट