दिगंत २.१० : Season Finale!दिगंत १०

 

शरीर थकलंय पण झोप येत नाहीये. घरी आले तेव्हा मध्यरात्र उलटून गेली होती. किती थकवणारा दिवस होता आजचा. मानसिक थकवा अर्थात. आणि शेवट असा हा. शांत. किती दिवसात हे असं फील केलं नव्हतं. सतत अस्वस्थता. आताही आहेच ती आत कुठेतरी. रिजल्ट येणारे कुठल्याही क्षणी, अलार्म वाजतोच आहे बॅक ऑफ द माइंड सतत. पण तरी मी शांत आहे.

काय कपडे न बदलताच झोपणारेस का? सकाळपासून अडकवलायस तो टी-शर्ट.

वळून पाहिलं तर बाजूला झोपलेली संहिता अर्धवट डोळे उघडून म्हणत होती. मी टी-शर्ट कडे पाहिलं. खरंच की.

तू झोपली नाहीस अजून?’

झोपलेचे मी. जाग आली तुझ्या विचारांनी! किती मोठयाने विचार करतेस

मी क्षणभर स्वत:कडेच संशयाने पाहिलं. मोठयाने बोलत होते की काय मी सगळं.

हाहा.. येडे.. जा कपडे बदलून ये..

कधीही काय जोक मारतेस गं..

बरं ऐक ना.. चल काहीतरी करू. मला झोप येत नाहीये.

आत्ता? ए बाई उद्या ऑफिस आहे मला..

काही नाही होत. उठ ना..

एका अटीवर.

कुठल्या?’

मी काहीही खायला वगैरे बनवणार नाही. कॉफी सुद्धा नाही. थोड्यावेळाने सुरू करशील, काहीतरी खावसं वाटतंय.. कर ना वगैरे..!

हाहा.. बरं बाई. उठ तू. मी ऑर्डर करते मस्त काहीतरी.

आत्ता ऑर्डर?’

हो त्यात काय झालं..

काहीही कर..

मी पटकन काहीतरी मस्त मागवलं आणि चेंज करून बाहेर आले. संहिता गॅलरी मध्ये जाऊन बसली होती. मीही गेले.

छान चांदणं पडलं होतं.

काय मग? मिटलं वाटतं सगळं?’ मी हसू दाबत विचारलं.

हो.. मिटलं..

कसंय मला ना आजकाल माझ्या ठरवलेल्या प्लॅन्समध्ये कोणी बदल करायला लावला तर रेस्ट्लेस वाटायला लागतं. उगाचंच. कसली भांडले यार आज मी. विनाकारण. रागात काय-काय बोलले त्याला. एका पॉइंट नंतर मी त्या मूळ मुद्द्यावरून भांडतच नव्हते. मी स्वत:वरच चिडून आणि आपणच केलेल्या त्या केओस वरुन भांडत होते. बिचारा अनिकेत

हाहा.. बिचारा वगैरे काय! तो एका लिमिट नंतर पूर्ण इग्नोर करतो तुला. मग तू काय बोलतेस-कशी वागतेस याने त्याला काही फरक पडत नाही..

काय? चल काहीही..

अगं खरंच. त्यानेच एकदा सांगितलं होतं मला. असच एकदा आपलं वाजलं होतं. मी त्याला म्हटलं कसं हॅंडल करतोस रे हिला. तर त्याने मला हे गुपित सांगितलं..

मी आपल्याच धुंदीत बोलून गेले आणि वर तिच्याकडे पाहून डोळेही मिचकावले. पण ती आता तुम्हा दोघांची काही खैर नाही! अशा नजरेने पाहत होती माझ्याकडे. मग काय मी एकदम गप्प.

अच्छा!! असंय का.. बोललं पाहिजे मग त्याच्याशी यावरून! इति चिडूनही कूल आहोत असं दाखवणार्‍या संहिता बाई.

ए बाई. आता यावरून नको भांडूस हां त्याच्याशी. माझा जीव घेईल नाहीतर तो..

हो का! फारच गूळपीठ ए गं तुमच्या दोघांचं.

हीही.. आहे तसं. अरे जिगरी झालाय तो आता माझा.

हो महितीय. राहुद्या. गावभरच्या गप्पा मारत बसता नुसत्या. रिकामटेकड्या.

वेडे, व्यासंग म्हणतात त्याला व्यासंग. तुला नाही कळणार. जाऊदे. तू मार अनुराग सोबत त्या बोरिंग मार्केटिंग अँड strategies, कोणाला कसं गळाला लावायचं टाइप्स गप्पा.. हाहा..

यावर तिने एक सणसणीत तुच्छ कटाक्ष माझ्याकडे टाकला आणि मी तो सवयीच्या गोड स्माइलने परतावला.

संहितासोबत हे भारी आहे. आम्ही काहीही बोलतो. चिडतो. भांडतो. वैतागतो. आणि पुन्हा एक्मेकींपाशीच येतो.

बाकी तुमचं काय. फिक्स झालेलं दिसतंय. इतकी चुरुचुरु बोलत्येस ती. हम्म?’

मी खाली आडवी होत वरच्या चांदण्यांकडे पाहत म्हटलं,

हम्मम्म... म्हणू शकतेस तसं..

माहित होतं मला. उगाच वेळ घालवत होतीस इतके दिवस.

हो यार.. अनुराग भारीये..

असं का.. बर!!!

नाही खरंच गं. अशी मुलं या जगात आहेत असं मला वाटायचंच नाही. पण आता पटलं. असतात!

हम्म.. मग आता पुढे?’

आता काय.. उद्या भेटायचं वूड बी इन-लॉंज ना.. टेंशन येतं बाबा अशा फॉरमॅलिटीजचं. आणि त्यात रिजल्टची टांगती तलवार!

चिल्ल.. सगळं नीट होईल. बरं उद्या पहिले पार्लरला जाऊन ये. पुरे झालं आता हे वैराग्य वगैरे. दिस जराशी नॉर्मल आणि बरी..

हाहाहा तू अजून तिथेच आहेस का!

हो.. मी अपॉईंटमेंट घेऊन ठेऊ का.. नाहीतर एक काम करू. मी पण येते. हाल्फ-डे च मारते उद्या. तुझा मेक-ओवरच करू आपण..

मी काहीही न म्हणता मान डोलवली फक्त.

 

दुसर्‍यादिवशी, उत्साहाने भरलेली संहिता. तिला काय करू अन काय नको झालं होतं. माझ्या दुपारपर्यंतच्या दिवसाचं पूर्ण प्लॅनिंगच करून टाकलं तिने. आधी पार्लर. तिथे ती म्हणेल ते सगळे उद्योग मी करून घ्यायचे. आणि त्यानंतर शॉपिंग. मग घरी येऊन नीट तयार होणे आणि मग सगळ्यांना भेटायला जाणे. बापरे. किती हे हेक्टिक सगळं. मेरा बस चलता तो, दुपारपर्यंत लोळले असते मस्त आणि मग उठून एखादा त-शर्ट किंवा फॉर ए चेंज कुर्ता अडकवून गेले असते. हे एवढं सगळं म्हणजे जरासं अतिच झालं. त्यात माझे डोळे आज सकाळपासून फोनकडे लागलेले. कधी निकाल येतोय असं झालेलं. पण संहिता मॅडम पुढे काय निभाव लागतोय कोणाचा. गेले निमूटपणे. तिने खरंच मकेओवर घडवून आणला ना. मी स्वत:ला क्षणभर ओळखलंच नाही. त्यानंतर थोडे मुलींसारखे कपडे घे कधीतरी म्हणत तिने माझ्यासाठी मुलींसारखे कपडे घेतले. Elegant होते अर्थात. पण माझ्यासाठी uncomfortable. घेतले. मग accessories. त्याही घेतल्या.

घरी आलो. जरासे टेकलो की आई-बाबांचा फोन. वेळेत ये. इति बाबा. जरा बरे कपडे घालून ये. इति आई. देवा रे कसं होणारे माझं म्हणत मी सोफ्यावरच आडवी झाले. तर आतून अजून तितक्याच उत्साहात बाहेर येत संहिताने तिचा मेक-अप किट माझ्या हातात टेकवला.

उठ. तयार हो. आणि लाइट मेक-अप कर.

मी तिच्याकडे पाहतच राहिले. इतक्यात पुन्हा फोन खणाणला. माझी धड-धड वाढली. पण बघितलं तर अनुराग.

‘venue आणि वेळ टेक्स्ट केलाय. बघितलंस का?’

हो. ब्ल्यु टिक्क्स दिसल्या नाहीत का तुला?’

बघितल्यावर रीप्लाय करायचा असतो हे माहित नाही का तुला?’

मी गप्प॰

ओके. भेटू मग. मी ऑफिसमधून डायरेक्ट्लि येतोय. आई-बाबा पोचले तुझे?’

हो. मावशीकडे उतरलेयत. ते तिकडूनच येतील. त्यांना जवळ आहे.

'बर.. मग तू कशी येतेयस? की मी येऊ receive करायला?’

असा काय हा. माझा एकदम चार्ज घेतल्यासारखा काय बोलतोय.

मी घड्याळात पाहिलं. अजून एक तास होता.

नको. येईन मी. डोन्ट वरी!

ओके

 

संहिता घेतलेल्यांपैकी नक्की कोणता ड्रेस घालणारेस हे विचारात होती. मी वैतागत कुठलाही दे गं.. म्हणत फ्रेश व्हायला गेले.

मेक-अप नावाच्या गोष्टीशी माझा संबंध म्हणजे केवळ लिपस्टिक लावणे इतकाच होता. त्यापलीकडच्या कुठल्या गोष्टीत कधी इंट्रेस्ट वाटला नाही आणि ते जमलंही नाही. आरशासमोर बसले खरी पण कशाशी काय खावं इथून माझी सुरुवात. संहिता पाहते माझा वेडेपणा. चार-दोन गोष्टी हाताळल्यावर शेवटी पुन्हा वैतागून उठले. पण मला खाली बसवत तिने पुन्हा माझा चार्ज घेतला. अरे हे काय चाललंय काय आज. हे लोक मला मी राहुच देत नाहीयेत.

तिने काय-काय प्रकार केले. आय लायनर नावाची गोष्ट मला प्रचंड त्रास देते दर वेळी. डोळे किती छान आहेत तुझे, वापरत का नाहीस?’ अशा एक-दोन प्रश्नांनंतर पूर्वी काही वेळा ट्राय केलं होतं. पण ते म्हणजे एस्से लिहणं एकवेळ सोप्पं. पण हे? एक डोळा मिटा. दुसर्‍या डोळ्याने पाहत मिटलेल्या पापणीवर लाइन मारा. ही कसरत कशी तरी झाली की मग दुसर्‍या पापणीवर सेम प्रकार. पण ते सेम कधी झालंच नाही. एका पायात एक अन दुसर्‍या पायात दूसरा जोड घातल्यासारखा प्रकार सगळा. आणि वर पूर्ण-वेळ डोळ्यांवर दगड ठेवलाय की काय वाटायला लावणारं फीलिंग. श्या. हे आपल्याला झेपणारच नाही.

मी सगळे विचार करतेय तोवर संहिताने सगळं अगदी सफाईदारपणे केलं होतं. डोळे उघडून समोर आरशात पाहिलं तेव्हा खरच क्षणभर स्वत:ला ओळखलं नाही. चक्क मुलगी वगैरे वाटायला लागले होते की मी.  

 

नेहमीसारखा मला पोचायला जरासा उशीरच झाला. माझे आई-बाबा, त्याचे आई-बाबा, तो सगळे पोचले होते. ठिकाण चांगलंच होतं. Nice ambiance. दुरून पाहिलं, कोपर्‍यातल्या टेबल वर सगळे बसलेले. मी गेले.

हॅलो.. सॉरी. थोडासा उशीर झाला मला..

इट्स ओके वगैरेच्या अपेक्षेत मी सगळ्यांकडे पहायला लागले. तर सगळे आ-वासून माझ्याकडे पहातायत. अगदी माझे आई-बाबा सुद्धा. अनुराग तर कंप्लीट उडालाच होता. मला मजा आली.

इट्स ओके बेटा, ये ना. बस. त्याची आई.

मी बसले.

अनुराग अजूनही शॉक मध्येच. मधूनच भुवई उडवून दाद दिली त्याने. मीही हसून ती घेतली. मग अशा occasions मध्ये होतात तशा गप्पा सुरू झाल्या. मुख्य विषय सोडून अशावेळी इतर भलतेच विषय अगदी हवामान बदल सुद्धा चघळण्याचा प्रघात असतो बहुतेक. सगळे तसंच करतात. इथेही तेच सुरू होतं. आपण किती कमालीचे विनोदी आहोत असंही दाखवण्याची एक आपली पद्धत. माझे बाबा आणि त्याची आई यात आघाडीवर होते. यथावकाश ऑर्डर प्लेस झाली.

मग स्टार्टर यायच्या पुढे पुढे, हे समजल्यावर आम्हाला किती आनंद झाला वगैरे आशयाचे काही संवाद. अनुराग आता उत्साहाने बोलत होता. मुख्य म्हणजे माझ्या बाबांच्या विनोदांना (?) दाद वगैरे देत होता. मग कॉमन नातेवाईक कोण किंवा अमुक अमुक आमच्या परिचयातलेच वगैरे वळणही गप्पांमध्ये येऊन गेली.

आणि एकदाचं जेवण आलं. मला लागली होती प्रचंड भूक. सकाळच्या त्या परेड नंतर पोटात कावळे रडायला लागले होते. पहिला घास घेतला आणि कानांवर प्रश्न आला,

मग आता ह्या अटेम्प्टनंतर काय विचार आहे?’ अनुरागचे बाबा.

मी घास गिळला आणि म्हणाले,

पुढचा अटेम्प्ट द्यायचा..

मग सगळ्यांची नजरा-नजर. मला मजा वाटली.

ते सावरत मग म्हणाले,

अरे वा. छान. खरंतर हे यूपीएससी वगैरे आमच्याकडे नविन आहे. कोणी इकडे फारसं वळलं नाही. पण छान. कर कर.

मी पुन्हा जेवणाकडे वळले.

अनुरागची आई कूल वाटली. पण त्या अधून-मधून अंदाज घेतच होत्या. आवडी-निवडी, जेवणात काय आवडतं मग ते बनवता येतं का? वगैरे sophistication ची शाल पांघरलेले संवाद. मी अहसून माझ्या स्टाइल मध्ये उत्तरं देत होते. त्यावर कधी तेही हसत होते कधी अनुराग कडे पाहत होते. मग अनुराग सांभाळून घेत होता.

मग आता एंगेजमेंट कधी या मुख्य आणि foremost मुद्दयाकडे सगळे वळणार इतक्यात माझ्या फोनने टुन्न केलं. मला ठसकाच लागला.

पाहिलं. रिजल्ट आल्याचं नोटिफिकेशन. अंग क्षणभर गार पडलं.

मग सर्र्दीशी फोन unlock. Site open. Result file वर क्लिक. हे सगळं मी अर्ध्या सेकंदात केलं.

पास झालेल्या रोल नंबर्स मध्ये माझा शोधू लागले. स्क्रीन स्क्रोल होत होती. माझा जीव तो तो खाली-वर.

रिया, तुला काय हवंय डेजर्ट मध्ये?’ कानांवर आवाज पडला. पण उत्तर द्यायचं मेकॅनिजमच बंद पडलं होतं. माझी नजर फोनच्या स्क्रीनवर. अनुराग ला बहुतेक शंका आली. तो माझ्याकडे पाहत शांत झाला. मी क्षणभरच त्याच्याकडे पाहिलं. माझ्या डोळ्यांतली भीती त्याने वाचली. नजरेतूनच काल्म डाउन म्हणाला.

मी पुन्हा माझा रोल नंबर शोधू लागले.

लिस्ट संपली. मला माझा नंबर सापडलाच नाही. मी एकदम ब्लॅंकच झाले. ‘फेल झालो आपण?’ अविश्वासाने फोन हातातून गळून टेबलवर पडला.

माझ्या चेहर्‍याकडे पाहत अनुरागने तो हातात घेतला. एव्हाना काहीतरी घडलंय याची इतर चौघांनाही कल्पना आली होती. काय झालं?’ म्हणत ते आमच्याकडे पाहत होते. मी काही बोलण्याच्या मनस्थितीतच नव्हते. आणि अनुराग माझा फोन हातात घेऊन क्रॉस चेक करत होता.

मला सगळं संपल्यासारखंच वाटलं क्षणभर.

इतक्यात डेजर्ट आलं टेबलवर. मी गप्प. रडावंसं वाटत होतं. I was regretting being there in that situation.

हे काय? रियाचा pannacotta कुठेय?’ अनुरागचा उत्साहाने भरलेला आवाज.

इतक्यात वेटरने तो माझ्यासमीर आणून ठेवला.

मला नकोय.. मी रडू दाबत कशी-बशी म्हणाले.

का नकोय? आजतर घ्यायलाच हवं.. तो.

आता मला त्याचा राग यायला लागला.

इन फॅक्ट.. लिसेन वेटर, ब्रिंग वन मोर..

मी चिडून त्याच्याकडे पाहिलं. तो शांतपणे म्हणाला,

‘Congratulations! You are appearing for interview!’

‘what?? Stop kidding. आय have checked already.. not cleared mains!’

शेवटचं मी चारी आई-बाबांकडे पाहत म्हटलं.

त्यांचे चेहरे उतरले.

पण मोबाइल माझ्यासमोर धरत अनुराग म्हणाला,

नो, यू हॅव!

मी अविश्वासाने पाहिलं. माझा नंबर त्याने हाय-लाइट केला होता. म्हणजे? होता माझा नंबर तिथे? मला कसा नाही दिसला? क्षणात माझा चेहरा उजळला.

आणि आता खरंच माझ्या डोळ्यांत पाणी आलं. मी समोर पाहिलं, अनुरागचा चेहराही तितकाच आनंदी दिसत होता.

वेंधळी.. नीट चेक नव्हतं केलंस तू!

मी हसले. बाबांनी मला जवळ घेतलं. त्याच्या आई-बाबांनीपण तोंडभरून कौतुक केलं.

वॉव. कसला भारी दिवस. समोरचा रिजल्ट, जवळ बसलेले आई-वडील, अनुराग.. मला क्षणभर माझाच हेवा वाटला!

मग गप्पा-गप्पांमध्ये अनुरागने जाहीरच करून टाकलं आता एंगेजमेंटचा विषय इंटरव्ह्यु झाल्यावरच. तेव्हा मी त्याच्याकडे पाहतच राहिले!

 

 

विराम!


संजीवनी देशपांडे 


Stay tuned everybody. there's a surprise coming for all the Sampi Lovers on 9th December! :)


 

टिप्पण्या

Harshada म्हणाले…
खूप भारी ... डोळ्यासमोर सगळं उभं राहील ...

आता संपी ;-)
Harshada म्हणाले…
हे काय? संहिताचा pannacotta कुठेय?’ अनुरागचा उत्साहाने भरलेला आवाज ----
इथे रिया हवय ना?
हर्षदा, थॅंक यू :)

हो रिया हवंय. लक्षात आणून दिल्याबद्दल आभार!
अनामित म्हणाले…
हा अनुराग कसला cute आहे. Literally crushing over him. He is a good example of how men written by women are sensible, considerate and far from toxic masculinity.

Eagerly waiting for संपी ,though.
Sanjeevani म्हणाले…
Thank you :)
Such men do exist!
Harshada म्हणाले…
पण तुमच्या सगळ्या गोष्टीतले पुरुष फार sensible असतात आणि बायका/मुली जरा confuse लग्नाबद्दल / रेलशनशिप बद्दल..
इथे संहिता, रिया, संपी, आरसा मधली ती, सावली मधली मुक्ता

आणि पुरुष एकदम फर्म supportive.. Like here अनुराग , अनिकेत,आरसा मधला तो, सावली मधला मल्हार.. कायमच मुलींना समजून घेणारे/ त्यांना त्यांच्या करिअर मध्ये सपोर्ट करणारे आहेत...
असे खरेच खूप निर्माण होऊदेत.. Things will be easier for girls want to do something different
hmm.. most of men in my stories are like that. but not all. Rohan's character from Vijigisha was different.
Good observation though!
such men are there in the society but now there number should be increased!

लोकप्रिय पोस्ट