संपी आणि तिचं धमाल जग : भाग ३९ 

‘..रंजीश ही सही, दिल ही दुखाने के लिये आ..

  आ फिरसे मुझे छोड के जाने के लिये आ..

 

करकच्चुन ब्रेक दाबत संपदाने गाडी थांबवली.

seriously?? हेच गाणं मिळालं तुला लावायला? फॉर गॉड सेक, चेंज इट!!

राधा आ वासून तिच्याकडे पाहत राहिली आणि तिने गाणं बदललं. Shuffle on असल्याने पुढचं गाणं लगेच सुरू..

‘.. आओगे जब तुम ओ साजना... अंगना फूल खिले..

संपदाने डोक्याला हात लावला. भंगार गाणी भरलीयेत तुझ्या फोनमध्ये!!

राधा आता चिडलीच.

संपदा! काय झालंय तुला? का वागतेयस अशी? तो नुसता समोर काय आला आज. आणि तू ही इतकी अशी बिथरलीयेस? कम ऑन..

काय? त्याचा काय संबंध? मला काहीही फरक पडत नाही कळलं का? तो समोर येऊदे नाहीतर अजून कुठे येऊदे. मला का ही ही फरक पडत नाही!

हो का! छान. चांगलंय. मग आता चिडचिड न करता गाडी चालव. पोचायचंय आपल्याला घरी.

मी का चालवू. तू चालव.

संपदा दार उघडून बाहेर आली आणि राधाच्या सीट समोर उभी राहिली. तिच्या विक्षिप्त वागण्याकडे मग पूर्ण दुर्लक्ष करत राधाने गाडी चालवली आणि घरी पोचेपर्यंत पूर्णवेळ संपदा रस्त्यावरून येणार्‍या-जणार्‍यावर काय तर गाडी चालवतात!’, रस्ता यांच्या तीर्थरूपांचा वाटतो की काय यांना?’ किंवा गेलाबाजार एवढा टोल घेतात आणि बंगले बांधतात. Corrupt सगळे! ही अशी आगपाखड करत राहिली. राधा एका कानाने ऐकून दुसर्‍या कानाने सोडून देत होती. डिनायल मोड मध्ये असणार्‍या माणसाला काय आणि कसं समजावणार?  तिने ठरवून टाकलं होतं आता ती जोवर स्वत:हून काही येऊन बोलत नाही तोवर तो विषयच काढायचा नाही.

 

.......

 

थोडासा आडोसा करून दिशाने पटकन तिची साडी बदलली. जीन्स आणि टॉप चढवला. तिचा तो सराईतपणा पाहून संपी चाटच पडली. हिला अजून साडीची घडीही घालता येत नव्हती. ती नेसणं खूप दूर. आणि वर हे असं समोर कोणीतरी असताना मग त्या आपल्याच मैत्रिणी का असेनात, कपडे वगैरे चेंज करणं? शक्यच नाही. दिशा चेंज करत होती तरी हीच जास्त लाजली. उगाचच पुस्तक चाळल्यासारखं करत भिंतीकडे पाहत तिने दिशाला विचारलं,

अग्ग पण साडी का नेसली होतीस तू?? आणि पुण्यात कधी आलीस?’

अगं इवेंट होता एक. त्यासाठी आले होते. काल रात्री उशिरा आले. आज दिवसभर इवेंटचं काम. आता परत रात्रीच्या ट्रेनने परत जायचंय. तोवर म्हटलं पाहावं तुझी भेट होतेय का.. म्हणून सहज पिंज केलं.

इवेंट? कसला?’

किती प्रश्न गं! चल काहीतरी खाऊ. भूक लागलीये मला.

अरे हो, मी काही विचारलंच नाही तुला. चल जाऊ.

वाटेत पूर्णवेळ दिशा नाही नाही त्या गप्पा मारत होती. जुने दिवस, आठवणी सगळं. संपीला मात्र तिच्याविषयी कुतूहलच वाटायला लागलं. म्हणजे ही काहीतरी सांगत नाहीये असं काहीसं. सात वाजत आले होते, संपीने तिला त्यांच्या ठरलेल्या छोले-भटूरे वाल्याकडे नेलं. दोघींना भुका लागलेल्या होत्या. पाच-सहा घास पोटात जाईपर्यन्त दोघी शांत. मग सहज बोलावं तशी दिशा बोलायला लागली,

फर्स्ट इयर चे चार बॅकलोग्स आलेत. सो इयर डाउन. फेल. एक वर्ष घरी बसा म्हणली यूनिवर्सिटी.. हाहा! घरी सांगितलं. सगळे अर्थात चिडले. परत ये म्हणाले. पण मला माहितीये गेले असते तर वेडी झाले असते. Frustration ने किडले असते. म्हटलं येत नाही. ते म्हणले, पैसे पाठवत नाही. मग काय? सुरू केलं हे. एक इवेंट मॅनेजमेंट कंपनी आहे. एवेंट्स organize करते. त्यात पडेल ते काम करायचं. पेर इवेंट पैसे मिळतात. त्यावर खर्च भगवतेय. आणि मग जमेल तसा अभ्यास. परीक्षा आलीचे आता जवळ.. भय्या और एक प्लेट..

तिने बोलता बोलता अजून एक प्लेट मागवली.

संपी आ वासून दिशाकडे पाहतच राहिली. त्यात तिचं खाणं पण तसंच राहिलं.

दिशा.. अगं.. मला माहीत नव्हतं हे..

ऑब्वियसली. कॉनटॅक्ट मध्ये नव्हतोच ना आपण.

हम्म.. पण तू ठिकेस नं आता?’

खरंतर काय बोलावं हे संपीला मुळात कळतच नव्हतं. एकतर तिचं YD झालंय हे पचायला जड गेलं आणि मग ती चक्क जॉब करतेय तो पण हा असा आडवळणाचा. ज्यात फिरावं लागतं. कसं करत असेल ही सगळं. हे सगळंच थक्क करणारं आहे. एकतर इयर डाउन व्हावं इतकी काही दिशा अभ्यासात सुमार नव्हती. चांगली होती. मग असं कसं काय झालं. तोंडातला घास गिळता गिळता मात्र संपीला एकीकडे दिशासाठी वाईटही वाटलं आणि मग तिचा खंबीरपणा पाहून कौतुकही.

हम्म त्रास झाला सुरूवातीला. पण आता ठिके. संपे, कसंय, स्वत:साठी नं स्वत:लाच खंबीर व्हावं लागतं बघ. रडत बसणार्‍याची दुनिया नाही. काहीही झालं तरी हसायचं आणि पुढे जायचं. तिथेच थांबून रहायचं नाही.

किती खरं बोलत होती ती.

अगं पण YD? कसं काय

तो माझा वेडेपणा. आता तुला सांगायला हरकत नाही. अनिरुद्ध आठवतो तुला? शिर्के..

हो आठवतो की..

आवडायला लागला होता मला खूप. बारावी झाल्यावर फोन वगैरे. कॉलेज वेगळं असलं तरी संपर्क वाढला. त्यात पाहिल्याच सेमिस्टर मध्ये त्याची आई वारली. कॅन्सर होता त्यांना आठवतंय? तो फारच खचला गं. मग मला पण फार काळजी वाटायला लागली. आम्ही दोघं वेगवेगळ्या शहरात होतो. मी मग कॉलेजला दांडी मारून त्याला भेटायला जायला लागले. त्याने नीट अभ्यास करावा म्हणून प्रयत्न करायला लागले. आणि या सगळ्यात स्वत:च्या कॉलेज आणि अभ्यासाकडे नको इतकं दुर्लक्ष केलं. तो म्हणायचा तू तुझं व्यवस्थित बघ माझी काळजी करू नको. पण मी.. जरा जास्तच झालं सगळं. शेवटी हे असं झालं.

तिचं सगळं ऐकून संपीला एकावर एक धक्केच बसत होते. तिची प्लेट कै आज संपत नाही हे तिला कळलं. दिशाचं मात्र व्यवस्थित खाणं सुरू होतं.

आणि शिर्के? त्याचा रिजल्ट?’

हाहाह.. तो क्लियर झाला..

ओह अगं.. म्हणजे छान झालं.. म्हणजे त्याचं छान झालं..

हाहा संपे तशीचेस अजून.. समजलं गं मला. त्याच्यासाठी छानच वाटतंय. मीच स्वत:कडे दुर्लक्ष करण्याचा मूर्खपणा करायला नको होता.

हम्म.. मग तो काय म्हणाला?’

आपण आता नको बोलूया म्हणाला.

काय??”

हो. त्याच्यामुळे माझं वर्ष गेलं असं वाटतंय त्याला. सो त्याने आता माझ्यापासून स्वत:ला दूर ठेवायचं असं ठरवलंय म्हणे. एक लंबा दर्दभरा खत लिक्खा था.. हाहा..

अरे म्हणजे असं कसं..

दुनिया.. संपे दुनिया.

मग तू काय म्हणालीस?’

मी? रात्रभर तर्क-वितर्क लढवत खुप्प विचार केला. आपण फेल झालो म्हणून हा असं म्हणतोय असं वाटलं. दुसर्‍या क्षणी नाही, त्याला आपली काळजी वगैरे वाटत असेल, माझा अभ्यास व्हावा वगैरे महणून त्याने असं केलं असावं असंही वाटलं. दोन टोकांचे विचार. मग खुप्प रडले. मग हट काही का कारण असेना म्हणत त्याच्या अशा वागण्याने आपण हर्ट झालो हे मात्र स्वत:पाशी मान्य केलं. आणि त्या रात्री संपे शपथ घेतली, स्वत:चं अस्तित्व विसरून कोणाचं सख्खं व्हायला कधी जायचं नाही. आधी स्वत:चा विचार करायचा. दुसर्‍यादिवशी सकाळी एक मोठा कोरा कागद घेतला, त्यावर मधोमध हाहा..!’ एवढंच लिहलं आणि पाठवून दिलं. परत मागे म्हणून वळून पाहिलं नाही बघ!

आता संपीने हातातली प्लेट खालीच ठेऊन दिली होती. तोंडाचा आ आता कायमस्वरूपी झालेला होता. त्यादिवशी रात्री तिला स्टेशनच्या बस मध्ये बसवून हॉस्टलवर परतताना पूर्णवेळ ती दिशाचाच विचार करत राहिली..

 

क्रमश:

 

संजीवनी देशपांडे

 

(सगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचल्या. विलंबासाठी सॉरी म्हणायलाही शब्द नाहीत. सांभाळून घ्या :I)

 

 

 

टिप्पण्या

Suharsha म्हणाले…
0wsome as usual....
Please keep continuity in writing.. It lowers interest in story due to breaking the link.
अनामित म्हणाले…
हाही भाग गोड आहे. संपीची कथा कधी संपू नये असं वाटतं
अनामित म्हणाले…
Nicely written!!
But we expect a little consistency from you...
Tanuja म्हणाले…
Very nicely written. Keep writing!
अनामित म्हणाले…
पुढील भाग????
अनामित म्हणाले…
Next part kadhi ....????? Eagerly waiting
इंद्रधनु म्हणाले…
>>स्वत:चं अस्तित्व विसरून कोणाचं सख्खं व्हायला कधी जायचं नाही
Very true..
अनामित म्हणाले…
Next part kadhi 🙄
अनामित म्हणाले…
रंजीश ही सही, दिल ही दुखाने के लिये आ...
This is for next part 🧐🧐
अनामित म्हणाले…
प्रतिसादांची उत्तरे तरी महिन्यातुन एकदा द्या!
अनामित म्हणाले…
एका भागासाठी एकेक महिना लागत असल्याने ही कथा संपवलेली बरी..
अनामित म्हणाले…
Khup chan lihata tumhi,
I appreciate.
Kama tun vel bhetun etak samarpak n sajese suchayala hi vel lagato
He hi mi manya karate
Pan lekhan lambaval ki wachayacha utsah jato
सगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचल्या. तुम्ही सगळे एवढा वेळ काढून आवर्जून इथे येऊन वाचता, प्रतिक्रिया देता, पुढच्या भागाची वाट पाहता याचं मला खरंच खूप अप्रूप आहे. एकेकाळी केवळ स्वान्तसुखाय लिहणारी मी तुमच्या सर्वांमुळे लिहणं seriously घेऊन केव्हा नियमितपणे लिहायला लागले माझं मलाही कळलं नाही. पण अलिकडे मला ते जमत नाहीये याचं मलाही खरंच खूप वाईट वाटतंय.

संपी लिहायला घेतली तेव्हा रोज एक भाग लिहून मी पोस्ट करत होते. तुम्ही वाचत गेलात. संपी मध्ये गुंतत गेलात. लिहायला मलाही खूप मजा येत होती. पण मध्ये दुसर्‍या लाटेत अगदी ध्यानी-मनी नसताना माझे आजोबा निरोपही न घेता मला सोडून गेले. आणि ते जाणं इतकं चटका लावणारं होतं की मी अजूनही त्यातून पुरेशी सावरलेली नाहीये. माझ्या काळजाच्या खूप जवळचा माझा हक्काचा माणूस होता तो. हॉस्पिटलमध्ये कुठल्याशा बेडवर जवळचं कोणीही आसपास नसताना, हात-पाय बांधलेल्या अवस्थेत त्यांना जावं लागलं आणि ही गोष्ट माझ्या काळजाचे अजूनही रोज तुकडे-तुकडे करते.

ते पेशाने डॉक्टर होते. वय ८९. पण तब्येत ठणठणीत. आयुष्यभर मराठवाड्याच्या ग्रामीण भागात नि:स्वार्थ रुग्णसेवा केली त्यांनी. लोकांच्या तोंडी अजून त्यांचं नाव असतं. त्यांचं काम त्यांनी कधीही मिरवलं नाही की कधी कुठे कोणासमोर त्याची वाच्यता केली. फार-फार वेगळा माणूस होता. हजारोंना आईच्या मायेने बरं केलं, हजारो गरीब बायकांची ५०-६० वर्षांपूर्वीच्या काळात स्वत: पदरमोड करून सुखरूप बाळंतपणे केली. अशा माणसाला हे असं मरण यावं हे काही केल्या पटत नाहीये.

मागच्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर पुस्तक लिहतेय. स्मरणिकेच्या स्वरुपात. माणूस गेल्यावर या गोष्टी लक्षात येतात हे किती दुर्दैवी आहे. पण, असो. त्यांच्या सगळ्या जवळच्या माणसांना भेटणं, माहिती, लेख यांचं संकलन करणं, आपल्याच आजोबांचे नवे-नवे पैलू भूतकाळात डोकावून एक्सप्लोर करतेय. त्यांना अधिकाधिक जाणून घेऊन त्याची आमच्या पुढच्या पिढ्यांना तरी माहिती व्हावी म्हणून हा सगळा खटाटोप सुरू आहे. यात माझी बरीच मानसिक आणि शारीरिक शक्ति खर्च होतेय. त्यामुळे इकडे दुर्लक्ष होतंय. याचा मनात खेद जरूर आहे.
पण लिहायचं म्हणून काहीतरी लिहणं मनाला पटत नाही. त्यामुळे तुमचा रोष पत्करून शांत बसलेय.
संपीची कथा मला गुंडाळायची नाहीये. तिचा प्रवास हेच तिचं सौंदर्य आहे. आणि ते मला जपायचं आहे.

पुढच्या महिन्यात आजोबांचं वर्षश्राद्ध आहे. त्यादिवशी पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. काम आता अंतिम टप्प्यात आलंय.

त्यामुळे लवकरच इथे पुन्हा लिहायला सुरुवात करेन.

(रंजीश म्हणून नाही खूप प्रेमाने परत येईन आणि तितकंच सकस लिहाण्याचा प्रयत्न करेन :) )


तुमचीच,

संजीवनी
Tanuja म्हणाले…
All the best wishes for your book!
माधुरी विनायक म्हणाले…
ही हानी कधीही भरून न निघणारी. सावरा. संपीची गोष्ट अनेकांना रिलेट होणारी, त्यामुळे वाचकांनी प्रतिसादात हक्काने विचारलंय. तुमचं काम जीव ओतून करताय. ते छान पूर्ण होणार. अनेक शुभेच्छा.
अनामित म्हणाले…
पुढील भाग लिहीताय का तुम्ही
अनामित म्हणाले…
तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात झालेली हानी भरून येणे शक्य नाही, परंतु तरीही तुम्ही जिद्दीने तुमच्या आजोबांच्या अमूल्य आठवणींवर पुस्तक लिहिलंत याबद्दल तुमचं खूप कौतुक. स्वतःला सावरा. आजोबा सदैव तुमच्या मनात आठवणींच्या रूपाने जिवंत आहेत.

संपीच्या कथेचा पुढचा भाग येईलसं वाटत नाही. सो, बहुतेक काही काळ गेल्यावर संपी अवचटला परत भेटली असावी, लग्नाचा नाही तरी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला असावा आणि अशाच प्रकारे कथेची गोड अंत झाला असावा असं मी स्वतःपुरतं समजून घेतेय. गोष्टीत अती गुंतलं की अपेक्षा वाढतात, पण त्या पूर्ण झाल्या नाहीत की अशी स्वतःची समजूत घालून पुढच्या गोष्टींकडे वळायला हवं वाचकांनी
तुम्हाला पुढील लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा!
अनामित म्हणाले…
Lavkar Liha pudhil Bhag

लोकप्रिय पोस्ट