'मनोहर डॉक्टर' : पुस्तक प्रकाशन

 कै. डॅा. मनोहरराव पाटील. माझे आजोबा. गेल्यावर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अगदी अवचित आणि खूप दुःखद, दुर्दैवीरित्या ते आम्हाला सोडून गेले.
आजोबा माझ्यासाठी काय होते हे शब्दात सांगणं कठीणच नाही अशक्य आहे. आपला भावनिक/वैचारिक स्व हा आपल्या भोवतालामुळे आणि आपल्यावर ज्यांचा प्रभाव असतो अशा माणसांमुळे घडत असतो. माझ्या अशा जडणघडणीत माझ्या आजोबांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांचा निःस्वार्थ, निरपेक्ष, धाडसी, मनस्वी, मिश्कील स्वभाव पाहत मी मोठी झाले. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी केलेली निखळ माया आणि दिलेले विचार कायमच जगण्याचं बळ आणि दिशा दाखवत आले आहेत.
ते आता नाहीत हा पोटात गोळा आणणारा विचार मनात ठेऊन काढलेलं मागचं पूर्ण वर्ष खूप अस्वस्थतेने भरलेलं होतं. दिशा हरवलेल्या वारुसारखं. मधल्या काळात त्यांचं जीवन आणि अफाट कार्य पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध करण्याचा विचार झाला आणि मागच्या सहा महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर काल त्याला मूर्त स्वरूप प्राप्त झालं.
त्यांच्या आठवणींवर आधारित ‘मनोहर डॅाक्टर’ या पुस्तकाचं प्रकाशन दि. १४-०३-२०२२ रोजी, त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त, त्यांनी आयुष्यभर जिथे निष्काम वैद्यकीय सेवा पुरवली त्या कासार शिरसी (ता. निलंगा, जि. लातूर) या गावात, त्यांचे जीवश्च-कंठश्च मित्र असलेले, माजी सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य डॅा. जयप्रकाशजी मुंदडा यांच्या हस्ते करण्यात आलं.
हे पुस्तक म्हणजे केवळ एक स्मृतीग्रंथ नाही. तो वस्तूपाठ आहे त्यांनी जपलेल्या मूल्यांचा. स्वार्थ नावाची गोष्ट माहित नसलेला एक अवलिया पन्नासच्या दशकात हैदराबादच्या ऊस्मानिया विद्यापीठातून डॅाक्टर होऊन शहरातलं जीवन लाथाडून ग्रामीण भागात आजन्म वैद्यकीय सेवा पुरवण्याचा निर्णय घेऊन गावी येतो आणि आपला पूर्ण जन्म आणि ज्ञान त्याकामी खर्ची घालतो. हा प्रवास थक्क करणारा आहे. रोमांचक आहे. आताच्या क्षणिक आणि भौतिक आयुष्यांमध्ये अशी माणसं आणि त्यांनी जपलेली मूल्ये परिकथा वाटण्याइतक्या दूरच्या वाटतात.
हे पुस्तक म्हणजे संग्रह आहे त्या सगळ्या अनवट आठवणींचा ज्या आपल्या प्रत्येकासाठी मार्गदर्शक आहेत. एक समाधानी आणि निःस्वार्थ आयुष्य कसं जगावं याचा परिपाठ म्हणजे हे पुस्तक. ते सर्वांनी अवश्य वाचावं असं आहे.
डॅाक्टरांचा विस्तृत जीवन परिचय आणि मान्यवरांनी, कुटुंबियांनी, मित्रपरिवाराने त्यांच्याविषयी जागवलेल्या आठवणी असं या पुस्तकाचं स्वरूप.
पुस्तकाच्या निर्मितीमध्ये मला मदत केलेल्या सर्वांचे यानिमित्ताने मी आभार मानते. आजोबांचे मित्र, नातेवाईक, माझे कुटुंबीय सर्वांनी याकामी खूप मोलाची मदत केली. पुस्तकाचे प्रकाशक, जागृती सार्वजनिक ग्रंथालय, कासार शिरसी यांचीही खूप मदत झाली. आदरणीय डॅा. मुंदडा यांनी ज्या घरोब्याने या पूर्ण प्रक्रियेत मला स्वतःची नात समजून मदत केली त्याबद्दल आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. माझे काका श्री. सुरेश पाटील यांच्या अनुभवी मार्गदर्शनामुळे निर्मिती प्रक्रिया खूप सुकर झाली. तसेच, आजोबांचे मित्र श्री. विठ्ठलराव उजळंबे, जागृती वाचनालयाचे श्री. होळकुंदे आणि बाजीराव पाटील यांनी केलेली मदतही उल्लेखनीय आहे.
सर्वांचे मनापासून आभार!


संजीवनी देशपांडे


टिप्पण्या

Tejshri Bhagwat म्हणाले…
Khup ch chan 🙏
Aajoba nehmich aaple pahile Mitra astat.
Tumhi tyachya sathi pustak lihale hyacha tyana hi khup abhiman watala asel.
Tumch lihan ch etak chan asat ki pustak pan chan ch asel hyat kahi vad ch nahi
Tumhala mana pasun pudhchya watchlist sathi shubhechcha 🙏🙏🙏
Agodr ch comment dyaychi hoti pan jamale nahi tyasathi dilgiri

- Tejshri Bhagwat
Suharsha म्हणाले…
Nice..
All the best 👍
तेजश्रीजी आणि सुहर्षा,
खूप आभार :)

लोकप्रिय पोस्ट