संपी आणि तिचं धमाल जग : भाग ४२
त्यानंतरचा आठवडा थोडा घाई-गडबडीतच गेला. आजोबांची तब्येत, संपीची पुण्याला परतण्याची तयारी हे सगळं आणि त्यातच
जराशा उरकल्याच्या भावनेत पार पडलेलं गेट टुगेदर. एकमेकांना भेटण्याची सुरुवातीची
ओढ, त्यातला
निरागसपणा कमी होऊन तिथे आता थोडसं groupism वगैरे गोष्टींनी
मूळ धरायला सुरुवात केलेली होती. त्यातच कोणीतरी कोणाला प्रपोज करणार मग कदाचित
आलेला नकार वगैरेमुळे गढूळलेले संबंध असं सगळं असल्यामुळे ते गेट टुगेदर संपीला
अगदीच कंटाळवाणं वाटलं. त्यात मंदार थोडासा अलिप्तच वाटत होता. संपी त्यामुळे
अवघडून आणि गोंधळून जात होती.
पुण्यात परतल्यावर,
आता पुण्यात भलत्याच रुळलेल्या संपीला घरीच आल्यासारखं वाटलं. कॉलेज
सुरू झालेलं होतं. तिला यायला तसा एक-दोन दिवस उशीरच झाला होता. हे आता फोर्थ
सेमिस्टर. पुन्हा नवे विषय, नवे प्राध्यापक. संपीला आता हे
सगळं फार आवडायला लागलं होतं, रोचक वाटायला लागलं होतं.
भविष्य, स्वप्नं खुणावत होती. त्यात घरातलं मोठं अपत्य
म्हणून येणारी एक प्रकारची जबाबदारी आणि त्या जबाबदारीची जाणीव दोन्ही तिला
व्हायला लागली होती. पूर्वीचा बुजलेपणा जाऊन आत्मभान येणं,
आपण कोणीतरी आहोत हे फीलिंग, जगाची होत चाललेली ओळख.. तिचं
मन नवोन्मेषांनी भरून गेलं होतं. वाचन तर सुरू होतंच जोडीला. त्यातलं बरंचसं ती
मंदारशी बोलायची. पण दोघांमध्ये काहीतरी हरवल्यासारखं नक्की होतं. भेटावं आणि सगळं
बोलावं नीट असं आता संपीलाही वाटायला लागलं आता. आणि ती वेळ लवकरच येऊन ठेपली.
आल्यावर एक-दोन दिवसातच संपीचा निकाल लागला. संपी लायब्ररीत कसलं तरी
पुस्तक शोधत होती मीनल धावत तिच्याकडे
आली. आणि लागलेला श्वास सांभाळत तिचा हात धरून थेट रिजल्ट पहायला तिला ऑफिस मध्ये
घेऊन गेली.
संपदा जोशी, ऑल क्लियर विथ डिस्टिंकशन!
निकाल पाहून संपी क्षणभर अवाक. आणि मग भानावर आल्यावर जोरात ‘मीनल!!!’
म्हणत तिने तिला मिठीच मारली. संपी ढगात होती. तिने आयुष्यात पहिल्यांदा घोकमपट्टी
न करता ‘अभ्यास’ केला होता आणि त्यातून
जे निष्पन्न झालं होतं ते फार सुखावणारं होतं. तिने काही वेळ ती गोष्ट पचवायला
घेतला. आणि मग पहिला फोन आईला आणि दूसरा मंदारला केला. आई अर्थात खूप खुश झाली.
कधी नव्हे ते तिने संपीला ‘शाब्बास!’
म्हटलं. मंदारला पण आनंद झाला. पण त्याचं बोलणं संपीला तुटक वाटलं. संपीने त्याला
पार्टी द्यायचं कबूल केलं आणि दोघे त्यादिवशी संध्याकाळी डेक्कनला भेटले.
‘अभिनंदन!’ म्हणत मंदारने एक छानसं फूल संपीला दिलं.
याला दरवेळी असं इतकं graceful कसं काय वागता येतं ब्वा! संपीला वाटूनच गेलं.
‘थॅंक यू!’ स्तुती/कौतुक न झेपणार्या संपीने अवघडून म्हटलं.
आणि मग पुन्हा त्या विषयावर न येता ती इकडचं-तिकडचं बोलायला लागली.
दोघांमध्ये यावेळी पूर्वीसारखा कम्फर्ट नव्हता हे मात्र खरं. काहीतरी
बोलायला हवंय किंवा मनात येत असलेल्या शंका बोलून कशा दाखवायच्या इ.इ. विचार डोक्यात
घोळत असताना सुरू असलेलं एक अवघडलेलं संभाषण.
‘वेगळाच दिसतोयस तू थोडासा. बरा नाहीयेस का?’
‘हम्म.. गर्लफ्रेंडचं लक्ष नसल्यावर असाच दिसणार ना!’
‘म्हणजे?’
‘म्हणजे.. तू बिझी असतेस आजकाल खूप. कॉल्सना उत्तरं नाहीत. टेक्स्ट्स ना रीप्लाय
नाही.’
‘अरे असं काही नाही. आजोबांची तब्येत बरी नाहीये ना, सो
या सुट्ट्यांत त्यांच्याजवळच राहिले खुपवेळ.’
‘हम्म.. पण श्रीला भेटायला वेळ होता तुझ्याकडे.’
‘श्रीला? कधी भेटले मी?’
‘c’mon, डोन्ट pretend. त्यादिवशी मी आइसक्रीम घ्यायला आलो होतो
तर भर रस्त्यात तुमच्या मस्त गप्पा चालू होत्या.’
‘ओहह.. अरे त्यादिवशी..’
‘इट्स ओके. संपदा.. forget it..’
‘नो वेट. पहिली गोष्ट, मी काहीही ‘pretend’ करत नाहीये. आणि दुसरी, तो मला दुकानात accidently भेटला. मी पोहे आणायला गेले होते.’
‘व्हॉटएवर.’
‘व्हॉटएवर काय व्हॉटएवर? आता समोर तो दिसल्यावर मी बोलायचं
पण नाही का?’
‘जाऊदेत ना. आपण का बोलतोय ह्या विषयावर. चल मी निघतो.’
‘तूच काढला आहेस हा विषय. थांब. आता संपवूनच जा.’
‘…..’
‘काय झालंय काय मंदार तुला? हा असा विएर्ड का वागतोयस
तू हल्ली? पूर्वीसारखा मोकळा का नाही?’
‘कारण तू पूर्वीसारखी वागत नाहीयेस.’
‘असं तुला वाटतं. मी तश्शीच आहे. काहीही बदललेलं नाहीये. तू ही अशी बॉयफ्रेंडगिरी
करू नकोस हं. मला नाही आवडत ते. मी विचारते का तुला, कोणाला भेटतोस, काय बोलतोस, ह्या msgला रीप्लाय
नाही केलास आणि त्या कॉलला रीप्लाय नाही केलास. तुला माहितीये, ह्याव्यतिरिक्त दुसरं आपण बोलतच नाही आजकाल.’
‘…..’
‘ऐ वेड्या, आवडतोस मला तू. आणि फक्त तू. बाकीचे मित्र
आहेत फक्त. आणि ते असणारच आहेत. तू हा असा त्या सगळ्यांना माझ्या आयुष्यातून घालवायला
पाहू नकोस बरं.’
मंदार पुन्हा शांतच होता. त्याला तिचं पटत होतं. पण कुठलीच गोष्ट पटकन
बोलून न दाखवण्याचा त्याचा स्वभाव. पण आत्ता आतून तो भलताच मात्र झाला होता आणि ते त्याच्या डोळ्यांतून दिसतही
होतं. हे जाणून संपीने हळूच त्याचा हात हातात घेतला. शब्द सांगू शकत नाहीत अशा हजार
गोष्टी केवळ एक स्पर्श सांगून जातो म्हणतात हे मंदारला त्याक्षणी पटलं. आता डोळ्यांत
पाणी दाटतंय की काय असं वाटत असतानाच, शर्थीने ते परतवत आणि चेहरा सांभाळत तो म्हणाला,
‘इतकी गोड दिसत आणि वागत जाऊ नकोस बरं तू. मी वाहवत जातो मग..’
यावर नाही म्हटलं तरी संपी लाजलीच. पण दरवेळी दाटणारा गोंधळ तिच्या
चेहर्यावर दाटला आणि मग ते लाजणं आणि गोंधळणं ह्यांची सरमिसळ होऊन ती नुसतीच गोड हसली.
आणि त्यावर तो,
‘हे बघ पुन्हा तेच.. कोण हसतं इतकं गोड? त्या श्री समोर
अशी हसत नाहीस नं तू..’
आणि मग यावर मात्र संपी मनापासून हसली.
‘गप्प बस तू.’
आणि मग दोघे कधी हातात हात घालून भटकायला लागले त्यांचं त्यांनाही
समजलं नाही.
संजीवनी
टिप्पण्या